श्वसनसंस्थेचे आजार

श्वासक्षमता मापन : स्पायरोमेट्री 

स्पायरोमेट्री म्हणजे फुफ्फुसांच्या क्षमतेचे मापन.  यासाठी स्पायरोमीटर हे उपकरण वापरतात मुख्य म्हणजे यात श्वास एकदा सोडून परत घेतला जातो म्हणजे फुफ्फुसांची क्षमता किती आहे कळते.  त्यानंतर श्वास पूर्ण सोडून एकूण किती श्वास सोडला जातो त्याचे मोजमाप होते आणि त्यातील पहिल्या सेकंदात किती श्वास बाहेर पडतो हे देखील मोजले जाते.  पहिल्या सेकंदात सोडून दिलेला श्वासाचे मोजमाप भागिले सोडलेला पूर्ण श्वास यांचे मोजमाप गुणोत्तर लक्षात घेऊन फुफ्फुसांमध्ये अवरोध किती आहे ते मोजले जाते. हे गुणोत्तर 0.7 पेक्षा कमी असेल तर अवरोध जास्त आहे असे धरतात. पहिल्या सेकंदात जास्तीत जास्त हवा सोडता येणे याचाच अर्थ फुफ्फुसामध्ये अवरोध अगदी कमी आहे. अवरोध असेल तर हवा हळूहळू बाहेर पडते त्यामुळे गुणोत्तर कमी होते.

दम्याचे उपचार करताना आधी त्याची वर्गवारी केली जाते त्यातून सौम्य दमा आहे का मध्यम आहे कि तीव्र  आहे हे ठरवतात.

  • सौम्य दमा म्हणजे आठवड्यामध्ये  रात्री उबळ न येणे आणि दिवसा दोन पेक्षा कमी वेळा उबळ येणे 
  • मध्यम दमा म्हणजे वरील कोणताही त्रास आठवड्यातून एक दोन वेळा होणे. तीव्र दमा म्हणजे वरील निकषाप्रमाणे आठवड्यातदोन पेक्षा अधिक वेळा त्रास होणे.

दम-आजाराच्या औषधांमध्ये मुख्य दोन प्रकार आहेत एक म्हणजे श्वासनलिका/ श्वसन मार्ग सैल करणारे औषध:  उदाहरणार्थ अमायनोफायलीन, किंवा सोलमोटेरॉल, आणि  ब्रोमो हॅकझीन. दमानियंत्रक औषधे यामध्ये मुख्यतः स्टेरॉईड औषध येतात. या औषधांमध्ये आकुंचन पावण्याचे प्रमाण कमी होते आणि बऱ्याच वेळेला दम्याचा अटॅक टळतो. 

रोगनिदान : खोकला, छातीत दुखणे

श्वसनसंस्थेमध्ये घशापासून ते फुप्फुसातल्या सूक्ष्म श्वासनलिकांपर्यंत काहीही आजार झाला, की खोकला येण्याची शक्यता असते. तसेच फुप्फुसदाहाने काही द्रवपदार्थ श्वासनलिकांमध्ये आल्यास खोकला येतो. खोकला म्हणजे श्वसनसंस्थेला नको असलेले पदार्थ बाहेर टाकण्यासाठी होत असलेला प्रयत्न. जेव्हा टाकाऊ पदार्थ फारसा तयार होत नसेल व दाहही होत असेल तेव्हा ‘कोरडा’ खोकला येतो. याउलट जेव्हा टाकाऊ पदार्थ जास्त असतो तेव्हा ‘बेडके’ पडतात (याला काही जण ‘जड खोकला’ किंवा कफ असे म्हणतात)

या बेडक्यातला मुख्य पदार्थ म्हणजे श्वासनलिकांमधून पाझरणारा चिकट द्रव. काही वेळा यात ‘पू’ किंवा रक्तही पडते. बेडक्याच्या रंगावरून आणि वासावरून आतला रोग काय असेल याचा अंदाज करतात. बेडक्यातून, खोकल्यातून रक्त पडते तेव्हा प्रथम क्षयरोग व मग कॅन्सरची शंका घ्यावी. बेडका हिरवट व पू-मिश्रित असेल तर न्यूमोनिया किंवा फुप्फुसातले गळू हे त्याचे कारण असू शकते.

छातीत दुखणे (तक्ता (Table) पहा)

खोकल्याची औषधे निरुपयोगी

दुकानात मिळणा-या खोकल्याच्या बहुतेक औषधात एखादा गोड पदार्थ, मद्यार्काचे काही प्रमाण, बेडका सुटण्यासाठी मदत करणारा एक क्षार वगैरे पदार्थ असतात. या औषधांमुळे खोकला थोडासा कमी झाला असे वाटते. एवढा परिणाम सोडला तर खोकल्याच्या बहुतेक औषधांचा उपयोग होत नाही. मूळ रोगच बरा व्हायला पाहिजे. खोकला हे केवळ लक्षण आहे.

खोकला दाबण्याचे एक औषध (कोडीन) मिळते. त्याचा वापर मर्यादितच झाला पाहिजे.

कोरडया खोकल्यात खडीसाखर, बाळहिरडा, इत्यादी चघळायला देणे हा एक चांगला उपाय आहे. खोकल्यात जास्त पाणी प्यायल्याने बेडका सुटायला मदत होते. हळद-दुधानेही वरवरचा खोकला (विशेषतः घसासूज) कमी होतो.