पचनसंस्थेचे आजार

पचनसंस्थेचे आजार प्रास्ताविक

लहानथोरांच्या सर्व प्रकारच्या आजारांमध्ये पचनसंस्थेच्या आजारांचे प्रमाण सर्वात जास्त आहे. याचे मुख्य कारण म्हणजे बाहेरून येणा-या पदार्थांचा या संस्थेशी खूप संबंध येतो. दूषित अन्न, अयोग्य अन्न, दूषित पाणी या सर्वांशी संबंध आल्याने या संस्थेच्या आजारांचे प्रमाण जास्त आहे. अन्नपाण्याची योग्य खबरदारी घेतल्याने पचनसंस्थेच्या आजारांचे प्रमाण खूप कमी होते. या उपायांचे सार्वजनिक आरोग्यरक्षणामध्ये सर्वप्रथम महत्त्व आहे.

पचनसंस्थेचे निरनिराळया प्रकारचे संसर्गदोष (जंतू, जंत, इ.) मोठया प्रमाणावर आढळतात. निरनिराळया प्रकारच्या हगवणी, कावीळ, विषमज्वर, पटकी, जंतविकार, इत्यादी महत्त्वाचे आजार यात येतात. नारू, पोलिओ या आजारांची सुरुवात पचनसंस्थेपासूनच होते. आम्लता, जठरव्रण, इत्यादी आजार देखील जंतूंमुळे होतात असे मानले जाते.

आयुर्वेद परंपरेत तर पचनसंस्थेतच अनेकविध आजारांचे मूळ आहे, असे मानतात. काही प्रमाणात त्यात तथ्यही आहे. या काही आजारांशी पचनसंस्थेचा काय संबंध आहे याबद्दल आयुर्वेदाचे मतही मांडले आहे. या प्रकरणांमध्ये आपण या आजारांबद्दल साधे रोगनिदान व उपचार शिकणार आहोत. तसेच पचनसंस्थेच्या आजारांचे निराकरण सार्वजनिक आरोग्याच्या उपायांनी कसे करायचे, हे देखील या प्रकरणात आपण शिकणार आहोत.

पचनसंस्थेच्या आजारांचे वर्गीकरण
  • पचनप्रक्रियेतले दोष/बिघाड- उदा: आम्लता, अपचन   
  • पचनसंस्थेतले रचना बिघाड- उदा.  आतडयाला पीळ पडणे   
  • पचनसंस्थेतले पाझर वाढणे-जुलाब. उलट्या
  • चलनवलन बिघाड- उदा: आतडयामद्धे अडथळा, मूळव्याध, गुदद्वार-व्रण इत्यादि  
  • जठर-आतडी यांचा दाह, सांसर्गिक आजार : उदा: आतडीदाह ,विषाणू कावीळ.   
  • कर्करोग : उदा: जठर-कर्करोग,
  • पाचन-मेंदू संबंध बिघडणे : उदा: बद्धकोष्ठ,
पचनसंस्थेचे आजार/तक्रारी साधे की गंभीर ?

पचनसंस्थेचा कोणताही आजार साधा आहे किंवा गंभीर हे तपासणी केल्यावरच ठरेल. तात्कालिक मळमळ, उलटी, जुलाब, आंव, जळजळ-आम्लता, अपचन, बद्धकोष्ठ, हे आजार/तक्रारी बहुधा तात्पुरत्या असू शकतात, तथापि 3-4 दिवसापेक्षा जास्त टिकल्यास हे आजार/तक्रारी गंभीर असू किंवा होऊ शकतात. जंत-होणे सामान्य आहे आणि उपचार सोपे आहेत, पण त्याचे स्वरूप काही वेळा गंभीर होऊ शकते.      

पचनसंस्थेचे काही खरोखर गंभीर आजार/तक्रारी पुढीलप्रमाणे: छातीत अन्न अडकले असे वाटणे, तीव्र आम्लता,, अल्सर (जठरव्रण), पित्तखडे, पित्ताशयदाह, स्वादुपिंडदाह, कावीळ- यकृतदाह (hepatitis A/B/C/D/E), हर्निया(अंतर्गळ), यकृत निबर होणे (सि-हॉसिस), जलोदर, उदरसूज-पोटसूज, पोटात तीव्र वेदना, पोटावर गाठ-गोळा लागणे, आतडीबंद/अडथळा, अपेंडिक्सदाह, आणि पचनसंस्थेचे कर्करोग (जठर-यकृत, स्वादुपिंड किंवा आतडयांचे कर्करोग), तोंडातून किंवा गुदद्वारातून रक्तस्त्राव, इत्यादि. यासाठी तोंडापासून गुदद्वारा पर्यन्त तपासणी आणि लागल्यास काही विशेष तपासण्या आवश्यक असतात. विशेषत: उतारवयात गुदाशय तपासणी आवश्यक ठरते.  सोनोग्राफी ही सोपी आणि प्राथमिक तपासणी करून लागेल तसे पुढील तपासण्या करतात.   

पचनसंस्थेच्या आजारांची लक्षणे
  • मळमळ
  • उलटी
  • पोटात किंवा छातीत  जळजळ
  • पोटात दुखणे
  • रक्तस्त्राव -वरुन किंवा खालून
  • जुलाब-हगवण  
  • बद्धकोष्ठ
  • गॅस -गुबारा
उचकी

उचकी म्हणजे श्वासपटलाची वारंवार होणारी प्रतिक्षिप्त क्रिया. बहुधा ही तात्पुरती तक्रार असते जठराच्या वरच्या भागात दाह झाल्याने उचकी लागते. तिखट, दारू, इ. पदार्थांमुळे असा त्रास होतो.

जेवणात उचकी लागल्यास थोडा गूळ खाऊन पाणी प्यावे. अशी उचकी 1-2 तासांत थांबते. गुळाने उचकी न थांबल्यास सूतशेखर ऍंटासिड किंवा फॅमोटिडीन गोळीचा उपयोग होईल.

दिवसदिवस उचकी लागत असल्यास डॉक्टरकडे जाणे आवश्यक आहे. यामागे मूत्रपिंडाचा आजारही असू शकेल.

जठर अन्ननलिका  आजार-गॅस्ट्रो इसोफेजीअल रिफ्लक्स आजार  (GERD)

जठरातील आम्ल गुणधर्माचा अन्नरस उलट अन्ननलिकेत येऊन जळजळ होणे याला गॅस्ट्रो इसोफेजीअल रिफ्लेक्स आजार  GERD असे म्हटले जाते. हा आजार मुख्यतः सदोष जीवनशैलीमुळे निर्माण होतो. या आजाराची काही कारणे पुढील प्रमाणे सांगता येतील:  स्थूलपणा म्हणजे पोटात चरबी साठणे, अन्ननलिकेचे खालचे  तोंड सैल होणे, घाईघाईने आणि घशाशी येईपर्यंत खाणे, जेवल्यानंतर लगेच आडवे होऊन झोपायची सवय, धूम्रपान, मद्यपान, सतत कॉफी-चहा-शीतपेय  पिणे, कमरेवर घट्ट कपडे घालणे,  इत्यादि कारणे असू शकतात. हा त्रास दीर्घकाळ सुरु असेल तर क्वचित hiatus hernia मुळे असू शकतो. हा आजार हळूहळू निर्माण होतो.

 जेवल्यानंतर पोट व छातीत जळजळ होणे, अन्न उलटे आल्यासारखे वाटणे, तोंडात आंबट पाणी येणे,  क्वचित उलटी अशा प्रकारचा त्रास होतो. पुढे पुढे अन्ननलिकेच्या खालच्या भागात व्रण तयार होतात, ते एंडोस्कोपीत दिसून येतात. आवश्यक वाटल्यास एंडोस्कोपी करावी लागेल. अधिक नक्की निदान करण्यासाठी अन्ननलिकेतील आम्लता-पीएच तपासणी केली जाते ( पीएच 4 पेक्षा कमी असणे हे निश्चित निदान मानले जाते)

हा आजार लक्षात आल्यावर खालील उपाय करून पहावेत.  अन्यथा वैद्यकीय तज्ञाची मदत घ्यावी लागेल. 

  • आहारातील अन्न कमी मसालेदार आणि कमी तेलकट-तुपकट असावे
  • एका वेळेला थोडे अन्न खावे 
  • अन्न चावून चावून खावे
  • जेवणाबरोबर फार पाणी पिऊ नये, तास-दीड तासाने पाणी प्यावे
  • शतपावली करावी आणि त्यानंतर बसावे, लगेच झोपू नये.
  • जळजळ वाटत असल्यास अँटॅसिडच्या गोळ्या घ्याव्यात.

 वैद्यकीय उपचारांमध्ये अन्ननलिकेची खालचे तोंड घट्ट करण्याची छोटीशी शस्त्रक्रिया केली जाते.

ढेकर 

सामान्यपणे ढेकर देणे ही एक मानसिक शारीरिक सवय आहे, आजार नाही. ढेकर देणे अशिष्टपणाचे  समजले जाते. ढेकर जठरातून दिली जाते, मात्र तिथे इतका गॅस/वायु नसतो. ढेकर देणारी व्यक्ति जठरातील थोडी हवा आणि श्वासातील हवा मिळून एकत्रित आवाज काढते.  प्रयत्नपूर्वक ही सवय कमी करता येते.

गॅस (गुबारा)

काही जणांना सारखा वारा सरणे याचा त्रास होत असतो. उतारवयात हे जास्त आढळते.

वायुविकाराचे मुख्य कारण म्हणजे आपल्याला माहीत नसताना हवा गिळण्याची सवय होय. दुसरे कारण म्हणजे काही अन्नपदार्थांवर होणारी जिवाणू प्रक्रिया. (बेसन पदार्थ खाल्ले तर अनेकदा असा अनुभव येतो).  बध्दकोष्ठता असल्यावर मोठया आतडयात मळ बराच वेळ राहून सूक्ष्मजंतूंच्या क्रियेमुळे वायू तयार होतो. हा वायू थोडा थोडा पण घाण वास येणारा असतो.

उपचार

बैठया जीवनपध्दतीत गॅस होणे स्वाभाविक आहे. काही ना काही व्यायाम करणे हे गॅस निवारण्यासाठी आवश्यक आहे. निदान चालण्याची सवय असावी. ज्या अन्नपदार्थांमुळे गॅस वायू होतो ते टाळावेत.

वायूने फारच त्रास होऊन पोट फुगले असल्यास एक सोपा उपाय करता येईल. गुडघे व कोपरावर ओणवे होऊन गुदद्वारात साधी लहान रबरी नळी सरकवल्यास( flatus tube) आतील हवेला वाट मिळून ती बाहेर पडते.प्रशिक्षित व्यक्ती ( जसे नर्स ताई किंवा आरोग्यमित्र ) हे करू शकतात. मात्र नळी ३ इंचापेक्षा जास्त आत सरकवू नये . वर सरकणे हा हवेचा नैसर्गिक गुणधर्म आहे. म्हणूनच पाण्यातून बुडबुडे वर येतात. या गुणधर्माचा वापर करून हवा गुदद्वाराच्या तोंडाशी आणता येते. आतडयाला पीळ पडला असल्यासही कधीकधी या उपायाचा गुण येतो व ऑपरेशन टळते. योगासनांपैकी काही आसने गॅस गुदद्वाराकडे आणतात. (उदा. पवनमुक्तासन)

आयुर्वेद

वायू, गुबा-यामागे काही कारणे असू शकतात. अति पाणी पिणे, आहारात बटाटा, रताळी, साबुदाणा असे पिठूळ पदार्थ असणे, हरबरा डाळ आणि उडीद, इत्यादी डाळी. अशा विशिष्ट पदार्थांशी संबंध टाळावेत. बैठे काम करणा-यांनाही याचा त्रास होतो.

वायू, गुबारा यांचा त्रास होणा-यांना कपभर गरम पाण्याबरोबर दीड चमचा लवणभास्कर चूर्ण किंवा एक चमचा हिंगाष्टक चूर्ण दिल्यास चांगला उपयोग होतो. ही चूर्णे जेवणाबरोबर, म्हणजे भात-पोळी याबरोबरही घेता येतात.

बैठे काम करणा-यांनी पोटाच्या साध्या क्रिया कराव्यात. एक साधी क्रिया पुढीलप्रमाणे. जेवणानंतर दीड-दोन तासांनी ताठ बसून बेंबी आत ओढून 5 ते 15 सेकंद तशीच ठेवण्याचा प्रयत्न करावा. असा उपाय वारंवार व नेहमी केल्यास गुबा-याचा त्रास निश्चित कमी होतो. मात्र बेंबी आत ओढून धरल्यास दुखत असेल तर आतील अवयवांना सूज आहे अशी शंका येणे साहजिक आहे अशा बाबतीत डॉक्टरांचा सल्ला घेणे आवश्यक आहे. योगाभ्यासात पोटासाठी बरेच उपाय आहेत.(नौलि, उड्डियान, इ.) या उपायांचा निश्चित उपयोग होतो.

होमिओपथी निवड

आर्सेनिकम, बेलाडोना, सीना, कॉस्टिकम, चामोमिला, फेरम मेट लायकोपोडियम, नक्स व्होमिका, पल्सेटिला, सिलिशिया, सल्फर, डायस्कोरिया, चायना