स्त्री प्रजनन संस्था

स्तनांचा कर्करोग

हाताला टणक लागणारी आकाराने वेडीवाकडी असलेली व न दुखणारी गाठ कर्करोगाची असण्याची शक्यता असते. काही काळानंतर ही गाठ स्तनाखालच्या स्नायूंपर्यंत पोचते. मग ती स्नायूंमध्ये मूळ धरते. कधीकधी वरच्या त्वचेलाही ही गाठ चिकटते. याबरोबरच त्या बाजूच्या काखेत कर्करोगाचे अवधाण येते. या गाठीही टणक लागतात. या अवस्थेत शस्त्रक्रिया करणे अवघड असते व तसे फायद्याचे नसते. कर्करोग नुसत्या गाठीच्या अवस्थेतच शोधणे आवश्यक असते. स्नायूंपर्यंत किंवा अवधाण येण्यापर्यंत वाढ झाल्यास जीवनाला आज ना उद्या धोका असतो. जवळजवळ निरुपाय होतो. स्तनाच्या कर्करोगाच्या प्रकाराप्रमाणे शस्त्रक्रिया, रासायनिक औषधे, किरणोपचार करावे लागतात.

स्तनांचा कर्करोग हा स्त्रियांसाठी महत्त्वाचा आणि जिव्हाळ्याचा विषय आहे. भारतात याचे प्रमाण जास्त आहे. पण वाईटात चांगले म्हणजे आपण तो लवकर शोधून काढू शकतो.

कारणे

हा कॅन्सर स्त्रियांना 35-55 या वयात होण्याची शक्यता असते. याची कारणे पुढीलप्रमाणे – स्थूलता म्हणजे चरबी वाढणे, स्तनभार जास्त असणे, खाण्यामध्ये तेल-तूप जास्त असणे, संततीप्रतिबंधक गोळ्यांचा दीर्घ वापर, अपत्य नसणे.  दारू आणि धूम्रपानाचे व्यसन देखील स्तन कर्करोगास कारणीभूत होऊ शकते . यात काही आनुवंशिक कारणेदेखील  असतात.

ज्या स्त्रिया एकूणच स्तनपान कमी करतात त्यांना कर्करोगाचा धोका थोडा जास्त असतो.

रोगनिदान
  • स्तन कर्करोगाची सुरुवात न दुखणारी छोटी गाठ, किंवा व्रण  याने  स्तन होते. नंतर स्तनांमध्ये दुखरेपणा आणि बोंडावर थोडा रक्तमिश्रित स्त्राव होऊ शकतो. त्या स्तनाचे बोंड ओढलेले किंवा संकुचित असू शकते.
  • स्तन-आजार याबरोबर काखेमध्ये कठीण गाठी लागत असतील तर मात्र कर्करोग वाढल्याची खूण आहे.
  • प्रत्येक स्त्रीने  आपल्या स्तनांची दरमहा एकदा तरी हाताने चाचपणी करणे चांगले. यासाठी घड्याळाच्या दिशेप्रमाणे क्रमश: स्तन तपासा. यात एखादी गाठ किंवा गोळा जाणवला तर ते महत्त्वाचे आहे. अर्थात प्रत्येकच गाठ किंवा गोळा कर्करोग नसतो नाही हेही लक्षात ठेवा.
  • नक्की खात्री करण्यासाठी त्या गाठीचा नमुना घेऊन सूक्ष्मदर्शक तपासणी करावी लागते. सुईने हा नमुना घेता येतो. कर्करोगाचे काही प्रकार आक्रमक तर काही सौम्य असतात नेमके निदान याबद्दलचे पेशी तपासणी होते त्यासाठी हिस्टोपॅथॉलॉजी चा उपयोग करतात
  • सोनोग्राफी तपासणी सोपी , त्रास – विरहित अणि उपयुक्त आहे.  
  • मॅमोग्राफी या एक्स-रे चित्रातून स्तनातील छोट्या गाठीही शोधता येतात. ही तपासणी चाळीशीनंतर जास्त भरवशाची असते.
  • एम.आर.आय तपासणी ही जास्त चांगली पण खर्चिकही असते.
स्तन-कर्करोगाचे उपचार

स्तन कर्करोगाचा प्रकार आणि प्रसार यावर उपचार अवलंबून असतात. आपले डॉक्टर याबद्दल योग्य तो सल्ला देतील. इथे याबद्दल थोडी माहिती घेऊ या.

  • कर्करोगाच्या छोट्या गाठी काढून टाकता येतात. अशा वेळी उरलेला स्तन काढण्याची गरज नसते.
  • मात्र गाठ मोठी असली तर तो स्तन आणि काखेतील गाठी काढाव्या लागतात. या शस्त्रक्रियेनंतर किरणोपचार लागू शकतील.
  • स्तन कर्करोगासाठी शस्त्रक्रियेनंतर कॅन्सरविरोधी औषधयोजना केली जाते. सामान्यत: याच्या 6 फेऱ्या असतात. याशिवाय संप्रेरक आणि प्रतिघटक -अँटीबॉडी – उपचारही लागतात. यामुळे परत कॅन्सर होण्याचा धोका कमी होतो.
  • हा कर्करोग शरीरात पसरू नये यासाठी औषधोपचार आवश्यक असतात.
  • कर्करोग बरा होण्याची शक्यता नसेल तर केवळ वेदनाशामक आणि सहाय्यक उपचार करतात. यांनी आजार बरा होत नसला तरी दुखणे सहन करणे शक्य होते.
  • स्तन शस्त्रक्रियेनंतर आवश्यक वाटल्यास प्लास्टिक सर्जरी करून मूळ आकार प्राप्त करून घेता येतो काही स्त्रियांना याची खूप आवश्यकता वाटते कारण स्वतःच्या शरीराबद्दल प्रत्येक जण संवेदनक्षम असतो. त्यामुळे ज्यांना जरूर वाटते त्यांनी ही शस्त्रक्रिया करून घ्यायला हरकत नाही.
विशेष सूचना
  • सर्व स्त्रियांनी स्वत:च्या स्तनांची तपासणी करायला शिकायला पाहिजे. आपण आपली तपासणी पाळीनंतर चार-पाच दिवसांनी करावी. किंवा तपासणी महिन्याच्या ठरावीक तारखेला करावी. शंका आल्यास डॉक्टरांना भेटावे.
  • रजोनिवृत्तीनंतर दरवर्षी मॅमोग्राफी तपासणी करणे चांगले.
  • स्तन कर्करोग वेळीच काढला तर पुढे आयुष्यात तो परत होण्याचा धोका कमी होतो. पण यासाठी कर्करोगाचा प्रकारही महत्त्वाचा असतो.
  • निस्तेजपणा किंवा वजन घटणे हे कर्करोग बळावल्याचे चिन्ह असू शकते.
  • मॅमोग्राफी तपासणीतही 10-15% बाबतीत निदान चुकू शकते. स्तनभार म्हणजे चरबी जास्त असेल तर चुकण्याची शक्यता जास्त असते. म्हणूनच वयाच्या पस्तीशी पर्यंत मॅमोग्राफी तपासणी फारशी भरवशाची नाही.
  • शिवाय क्ष किरण हे स्वत:च काही अंशी कर्करोगजनक ठरू शकतात. त्यामुळे मॅमोग्राफी तपासणीही आवश्यक तेव्हाच केली पाहिजे.