पचनसंस्थेचे आजार

पचनसंस्थेचे कर्करोग

पोटासंबंधी तक्रारी असल्यास विशेषत: उतारवयातल्या व्यक्तींच्या बाबतीत कर्करोगाची शक्यता विसरून चालणार नाही. गिळायला त्रास किंवा बध्दकोष्ठाच्या सतत तक्रारी, टिकून राहणारी कावीळ, मलविसर्जनाच्या बदलत्या सवयी, जलोदर, पोटात खूप वेदना, तोंडावाटे किंवा गुदद्वाराने होणारा सौम्य किंवा जास्त रक्तस्त्राव इत्यादीपैकी काहीही असल्यास लवकरात लवकर तज्ज्ञास दाखवावे. पचनसंस्थेच्या तक्रारींबरोबरच भूक न लागणे, वजन कमी होणे, खूप अशक्तपणा, रक्तपांढरी, पोटावर गाठ-गोळा लागणे, उलटीतून किंवा विष्ठेतून रक्तस्राव या इतर तक्रारी असू शकतात.

सोनोग्राफी, पोटाचा एक्स्-रे, बेरियम चित्र,  एंडोस्कोपी, सिटीस्कॅन, आवश्यकतर पेट स्कॅन, एंडोस्कोपीक सोनोग्राफी, रक्तात कर्करोग-अंटिजेन्स/ biomarkers, बायोप्सी   या विविध तपासण्या लागू शकतात. कोणत्याही कर्करोगाप्रमाणे निदान करताना टीएनएम (मूल गाठ , प्रसार आणि रसग्रंथी-नोडस ) या तीन घटकांचे निदान केले जाते.

आवशक्यतेनुसार आणि शक्यता  पाहून शस्त्रक्रिया हा मुख्य उपचार करता येतो. तीबरोबर केमोथेरपी आणि रेडिओथेरपी (किरणोपचार) केली जाऊ शकते.  

अन्ननलिका कर्करोग

आपल्या देशात हा कर्करोग जास्त प्रमाणात आढळतो. अन्ननलिकेच्या कर्करोगात सर्वात आधी अन्न गिळायला त्रास सुरू होतो. गिळलेला घास छातीत अडकला आहे असे वाटत राहते.

अशी लक्षणे, चिन्हे दिसल्यास पुढील तपासणीसाठी तज्ज्ञाकडे पाठवावे. लवकर रोगनिदान झाल्यास शस्त्रक्रियेने उपयोग होऊ शकतो. पण ब-याच वेळा रोग लवकर समजून येत नाही. एडोस्कोपी तंत्राने आता याचे चांगले रोगनिदान होऊ शकते. सिटी स्कॅन तंत्राने छातीतली त्याची जागा, प्रसार आदि समजून येतात.

जठराचा कर्करोग

भारतात हा कर्करोग त्यामानाने कमी प्रमाणात आढळतो. दारू, धूम्रपान, नेहमी तिखट मसालेदार खाणे, लट्ठपणा, जठरात दीर्घकाळ अल्सर, मांसाहार, खारट पदार्थ, हेलिको जीवाणू रहिवासी असणे, कौटुंबिक इतिहास (आई-वडील, भावंडे  यांना जठर-कर्करोग असणे) आणि वाढते वय यापैकी कारणे असू शकतात.  जीवनसत्व क म्हणजे लिंबू खाण्यात असेल तर संरक्षण होते. जठरात वरच्या भागात जास्त करून कर्करोग आढळतो.

याची लक्षणे उशिरा समजून येतात, आणि ती पुढील प्रमाणे असू शकतात: भूक न लागणे, वजन घटणे, पोट भरल्यासारखे जड वाटणे, अपचन, मळमळ, उलटी, कधीकधी उलटीत रक्त, इत्यादी लक्षणे दिसतात. कर्करोगाची गाठ मोठी असल्यास पोटातील (पोटावरील क्र. 2,5 या भागात) ‘गाठ किंवा गोळा’ हाताला लागण्याची शक्यता असते.कधी कधी मानेच्याभागात गळपट्टीच्या हाडाच्यावर गाठ लागते.( secondaries) निदानासाठी एंडोस्कोपी आणि सिटीस्कॅन उपयुक्त आहेत.  

आतडयाचा किंवा गुदद्वाराचा कर्करोग

मोठया आतडयाचा किंवा गुदद्वाराचा कर्करोगही सहसा पन्नाशीनंतर आढळतो. वजन कमी होणे, शौचावाटे रक्त पडणे, बध्दकोष्ठ, मलविसर्जनाच्या सवयी बदलणे, इत्यादी लक्षणे आढळतात. तज्ज्ञाकडून लवकर तपासणी आवश्यक असते. एडोस्कोपी (दुर्बिणीमुळे) याचे रोगनिदान सोपे झाले आहे.

आतडयाचा कर्करोग टाळण्यासाठी: बद्धकोष्ठ टाळा, जीवनशैलीतील सुयोग्य बदल, भोजनात तंतुमय पदार्थ पुरसे असू द्या. (कोंडा, भाजीपाला, फळे), रोजच मांसाहार नको, लवकर शंका घ्या, पन्नाशीनंतर दरवर्षी पोटाची-सोनोग्राफी करून घ्या, डॉक्टरना आवश्यक वाटल्यास एंडोस्कोपी करून घ्या.  

यकृताचा कर्करोग

पोटावरील यकृताच्या भागात (म्हणजे पोटाचा भाग 1 व 2) निबरपणा, यकृताची वाढ, गाठ आढळणे हे यकृताच्या कर्करोगातले प्रमुख लक्षण-चिन्ह आहे. सोनोग्राफी तंत्राने याचे रोगनिदान आता अचूकपणे करता येते. मात्र यकृताचा कर्करोगही लवकर पसरणारा असल्याने रोग वेळीच ओळखला तरी विशेष उपयोग होत नाही.

आतडीबंद व पोटदुखी-एक तातडीक आणि घातक समस्या 

अन्ननलिकेपासून गुदद्वारापर्यंत पचनसंस्थेचा मार्ग नेहमी वाहता असतो. अन्नपचनाच्या प्रक्रियेसाठी आवश्यक तेवढा वेळ अन्न या मार्गात राहते व उरलेले पुढे सरकत असते. अन्नाच्या या पुढे सरकण्यासाठी स्नायूंची विशिष्ट हालचाल व्हावी लागते. अनेक कारणांमुळे ही प्रक्रिया बंद पडू शकते. या घटनेला आपण ‘आतडीबंद’ म्हणू या.

  • आतडयात जंत होऊन अडथळा येणे.
  • हर्निया अडकणे, आतडयाला पीळ पडणे.
  • आतडे शर्टाच्या बाहीप्रमाणे एकमेकात सरकणे.
  • कर्करोगाची वाढ
  • क्षयरोग किंवा इतर जंतुदोषांमुळे आतडयाचा अंतर्भाग अरुंद होत जाणे.
  • पोटसूज होऊन आतडयांची क्रिया मंदावणे
  • स्नायूंचे कामकाज थंडावणे ( उदा. रक्तातील पोटासियम कमी होणे)

अशा अनेक कारणांमुळे आतडयांमध्ये अन्न सरकण्याची क्रिया बंद पडते व ‘आतडीबंद’ उद्भवतो. कधीकधी ही घटना 24 तासांत घडून येते. याउलट कर्करोग, क्षयरोगासारखे कारण असेल तर आतडीबंद होण्यास कित्येक दिवस लागतात.

एकदा पूर्ण ‘आतडीबंद’ झाला, की पोट खूप दुखते. पोट फुगते व उलटया होतात.

सुरुवातीला आतडयांचे आवाज वाढतात, पण नंतर ते मंदावतात (हे आवाजनळीने कळते).

आतडीबंद फार गंभीर घटना असते. याची शंका आल्यावर ताबडतोब रुग्णालयात पाठविणे आवश्यक असते. बहुतेक वेळा यासाठी शस्त्रक्रिया करावी लागते.

स्थूलतेसाठी बॅरियाट्रिक शस्त्रक्रिया

खूप खाणे आणि काम-कष्ट न करणे ही एक मोठी आरोग्य समस्या  झाली आहे. इतर उपाय थकले तर स्थूलतेसाठी बॅरियाट्रिक शस्त्रक्रिया हा एक पर्याय सांगितला जातो. जेव्हा आहार, व्यायाम व औषधोपचार करूनही वजन नियंत्रणात राहत नाही तेंव्हा याचा विचार करावा. खालील परिस्थितीत बॅरिएट्रिक शस्त्रक्रियेचा विचार केला जातो: BMI ≥ 40 kg/m² (अतिशय जास्त लठ्ठपणा) किंवा BMI ≥ 35 kg/m² आणि खालीलपैकी एक किंवा अधिक आजार असणे: मधुमेह (Type 2 Diabetes), उच्च रक्तदाब (Hypertension), हृदयरोग, स्लीप अॅपनिया (झोपेत श्वास थांबणे), सांधेदुखी, गुडघेदुखी

याचे दोन-तीन प्रकार आहेत . एक प्रकार म्हणजे जठरचा काही भाग काढून टाकतात, याने जठरची एक नळी निर्माण होते. त्यामुळे भोजन-मर्यादा निर्माण होते, व ती व्यक्ति आपोआप कमी खाते. ही शस्त्रक्रिया भारतात जास्त प्रचलित आहे.  दूसरा प्रकार म्हणजे अन्ननलिकेतून अन्न सरळ आतडयात पोचवण्यासाठी जठर बायपास करणे. यामुळे यांना अन्नपचन कमी होते. बॅरियाट्रिक शस्त्रक्रिया हा एक यशस्वी पर्याय असला तरी त्याचे दुष्परिणाम व गुंतागुंत देखील असतात. शास्त्रक्रियेनंतर कायम पथ्य पाळावे लागते. मुळात स्थूलता हा आजार आहार-विहार नियंत्रणातून कमी करता येतो, यासाठी इच्छाशक्ती आणि प्रयत्न लागतात.