पचनसंस्थेचे आजार

अमिबामुळे आव

अमिबा हगवणीचा सुरुवातीचा जोर कमी झाल्यावर त्याचे आवेत रुपांतर होते. अमिबामुळे होणा-या या हगवणीचा प्रकार चिवट असतो. ब-याच वेळा हा त्रास मधून मधून होत राहतो. विष्ठा सैल असणे, दिवसातून एक-दोन वेळा होणे, अर्धवट होणे, वायू होणे, घाण वास येणे, मोठया आतडयात मंद दुखत राहणे, इत्यादी तक्रारी आढळतात. बहुधा याचे कारण अमिबा हेच असते. ही कारण मल-तपासणीत स्पष्ट होते. (मात्र हे कारण नसल्यास इतर करणे जसे गव्हाची / ग्लुटेनची किंवा दुधाची अलर्जी असू शकेल किंवा इररिटेबल बोवेल सिंड्रोम (IBS )असे निदान होऊ शकते. हा काहीसा मानसिक आजार समजला जातो,मानसिक ताण तणाव ,नैराश्य असेही घटक यात सापडतात ,योग्य उपचारांनी बरा होऊ शकतो). अमिबा-आंव असल्यास औषधांनी तेवढयापुरता आराम पडून परत आजार पुढे चालू राहतो, असेही दिसून येते. सतत प्रवास, बाहेर खावे लागणे, इत्यादी कारणांमुळे हा आजार शरीरात टिकून राहतो. चिवट जुनाट आतडीदाह होण्यामागे ‘अमिबा’ हे सर्वात प्रमुख कारण आहे. 

  • मेट्रोनिडझोल तोंडाने सात दिवस घेणे (किंवा एक दिवस सेकनिडजोल) घेणे हा यावर उपाय आहे.
  • आयुर्वेदिक कुटजरिष्ट किंवा कुटजघनवटी गोळ्या, दिवसातून 2-3 दा याप्रमाणे 5-7 दिवस घेणे हाही चांगला उपाय आहे.    

जंत

जंत होणे ही आपल्या देशातली महत्त्वाची समस्या आहे. ग्रामीण भागात तर 80-90 टक्के मुलांच्या पोटात जंत असतात. माणूस खातो त्यातले बरेच अन्न त्याच्या पोटातले जंत खाऊन टाकतात. त्यामुळे जंत विकारामुळे मुले अशक्त, कुपोषित होतात.

जंतांचे मुख्य दोन प्रकार आहेत. एक मुख्यत: पचनसंस्थेत वाढणारे तर दुसरे यकृत, स्नायू वगैरे इतर ठिकाणी वाढणारे. पण सर्वसाधारणपणे पचनसंस्थेत वाढणा-या जंतांनाच जंत म्हणण्याची पध्दत आहे. या प्रकरणात आपण फक्त पचनसंस्थेच्या जंतांबद्दल शिकू या.

आपल्या देशात पचनसंस्थेच्या जंतांचे मुख्य प्रकार चार-पाचच आहेत. या सर्व जंतांची अंडी विष्ठेतून सगळीकडे पसरतात. या अंडयांतून सूक्ष्म कृमी बाहेर पडून तोंडावाटे अथवा त्वचेवाटे (पावलातून) परत नवीन माणसाला जंताची बाधा होते. यांतले काही जंत त्यांच्या जीवनचक्रात रक्तावाटे फुप्फुसात येतात. त्यामुळे खोकला येतो.

या सर्व जंतांचे जीवनचक्र अस्वच्छतेवर अवलंबून असते. मानवी विष्ठेची योग्य विल्हेवाट लावली गेली तर जंतांची बाधा होत नाही. म्हणून जंतांचे उच्चाटनासाठी मानवी विष्ठेची योग्य विल्हेवाट लागली पाहिजे. घरोघरी सुरक्षित संडास हाच यावरचा खरा उपाय आहे. स्वच्छ भारत योजना ही मोहीम यासाठी फार महत्वाची आहे 

लक्षणे व चिन्हे

मोठे जंत (गोल जंत), लहान जंत (कृमी) हे लहान मुलांमध्ये जास्त प्रमाणात असतात. अशी मुले अशक्त असतात. ही मुले लवकर दमतात. वाढ खुंटू शकते.

  • पोटात बारीक दुखत राहणे.
  • पातळ जुलाब होणे किंवा शौचास साफ न होणे किंवा उलटया होणे.
  • क्वचित मोठे जंत खूप झाल्याने आतडयाची वाट बंद होऊन उलटया व पोटदुखी सुरु होते ,वेळीच उपचार न झाल्यास  मृत्यू येऊ शकतो.
  • यांपैकी आकडेकृमी आतडयातून रक्त शोषतात. त्यामुळे रक्तपांढरी (ऍनिमिया) होते.
  • काही प्रकारच्या कृमींमुळे गुदद्वाराजवळ खाज सुटते. (कारण बारीक कृमी अंडी घालायला गुदद्वाराशी येतात)
  • काही प्रकारच्या कृमींमुळे मुलीना लंघवीच्या ठिकाणी खाज सुटते.
उपचार

तात्पुरता उपचार म्हणून जंत पडून जाण्यासाठी औषध द्यावे. जंतांवर अलबेन्डझोल गोळया गुणकारी आहेत. हे औषध जन्तांमध्ये साखरेचा वापर थांबवते, त्या मुळे जंत लुळे पडतात,मरतात, आणि शौचाद्वारे पडून जातात. त्याची एकावेळी  एकच गोळी किंवा औषध डोस पुरतो.

याच प्रकारे एक – दोन आठवडयानंतर परत उपचार करावा. मात्र अस्वच्छतेमुळे काही काळानंतर जंत परत होतात. मुलांची नखे वारंवार कापणे हे प्रतिबंधासाठी आवश्यक आहे.

भारतात राष्ट्रीय जंत-विरोधी अभियानातर्फे आता दरवर्षी दोनदा एक ते 19 वर्षांच्या मुलामुलीना अलबेन्डाझोल ही गोळी दिली जाते. (चार-वर्षे वेंपर्यंत अर्धी गोली, नंतर पूर्ण) दरवर्षी 10 फेब्रुवारी आणि 10 ऑगस्ट या दोन दिवशी अंगणवाडी, बालवाडी, शाळा, जूनियर कॉलेज इत्यादि सर्व संस्थांमध्ये ही गोळी  दिली जाते.  मूल आजारी असेल तर डॉक्टर आधी पाहतात मगच गोळी  दिली जाते.

मांसाहारामुळे होणारे जंत

डुक्कर किंवा  गाय/बैल या प्राण्यांचे मांस नीट न शिजवता खाल्यामुळे विशिष्ट प्रकारचे लांब जंत (टेप कृमी) आतडयामध्ये तयार होतात. डुकरे व गायी माणसाची विष्ठा खात असल्याने गाय, डुकरे यांच्या शरीरात (मांसात) हे जंत तयार होतात.

डुक्कराच्या कमी शिजवलेल्या  मांसामधून जे टेप कृमी तयार होऊ शकतात ,त्यांच्या पासून शरीरात इतरत्रही (स्नायू, डोळे,मेंदू ) गंभीर आजार निर्माण होऊ शकतो त्याला cysticercosis म्हणतात .

मांस कुकरमध्ये चांगले शिजवणे हाच यावरचा हमखास प्रतिबंधक उपाय आहे.

टेपकृमीवर ‘प्राझीक्वांटेल’ हे प्रभावी औषध वापरतात .

जंत/ लक्षणे – पोटदुखी, खोकला खाज, झटके किंवा अंधत्व .

आयुर्वेद

लहान मुलांना जंत होऊ नये म्हणून वावडिंगाचा वापर करावा. लहान मुलांसाठी दूध तयार करताना त्यात वावडिंगाच्या बिया उकळून ते दूध द्यावे. वरचा आहार चालू करताना म्हणजे सहा महिन्यांनंतर पाच बिया वापराव्यात. दोन वर्षापर्यंत वाढवत 25 बियांपर्यंत न्यावे. याचा अर्थ असा, की दिवसभराच्या द्यायच्या वरच्या दुधात 5 ते 25 बिया वापराव्यात. बिया दोन-तीन तास आधीच भिजवून ठेवल्यावर त्याचे सत्व दुधात लवकर मिसळते.

याऐवजी तयार विडंगारिष्टही वापरता येईल. विडंगारिष्ट अर्धा ते तीन चमचे दिवसातून दोन वेळा पाजावे. देताना दोन-तीन आठवडे रोज द्यावे. नंतर तीन-चार आठवडयांचा खंड पाडावा असे दोन-तीन वर्षेपर्यंत हा क्रम ठेवावा. या उपायाने जंत होणार नाहीत. तसेच मुलांच्या आहारात सौम्य कडू रस (उदा. शेवग्याच्या पाल्याचा रस + मध) जाईल हे पाहावे.

पोटात झालेले जंत घालवण्यासाठी काही औषधे आहेत. पळसाचे बी, हिंग, ओवा, कापूर एकत्र करून कृमिकुठार नावाचे औषध बनते. याच्या (250मि.ग्रॅ.च्या) दोन गोळया रोज रात्री याप्रमाणे आठवडाभर घ्याव्यात.

होमिओपथी निवड

कल्केरिया कार्ब, सीना, नेट्रम मूर, पल्सेटिला, सिलिशिया, सल्फर