पचनसंस्थेचे आजार

हर्निया (अंतर्गळ)

हर्निया हा आजार म्हणजे आतडयाचा कोणतातरी भाग पोटाच्या स्नायूंच्या पदरातून बाहेर पडणे.

  • काही लहान मुलांना बेंबीच्या ठिकाणी असा फुगार दिसतो. हर्नियावर हाताने (किंवा आवाजनळीने) तपासल्यावर आतडयाची हालचाल व आवाज समजतात. हर्निया बोटाने आत ढकलल्यावर आत जातो आणि हात काढून जोर केला तर परत बाहेर येऊ शकतो.
  • पोटाचे ऑपरेशन झाले असल्यास (विशेषत: मध्यरेषेवर) काही वर्षानी क्वचित तिथले स्नायू दुबळे पडतात. यामुळे तिथे हर्नियाचा फुगार दिसतो.
  • हृदयाचे बायपास ऑपरेशन झाल्यावर काही वर्षात त्या जागी पोटाच्या वरच्या भागात फुगार दिसतो, हा देखील हर्निया असतो.
  • सर्वात जास्त आढळणारा जांघेतला हर्निया असून तो लहान वयात किंवा उतारवयात दिसतो. 

पोटातला दाब वाढल्यावर फुगार होणे ही हर्नियाची एक महत्त्वाची खूण आहे. जोरात खोकला करणे, उभे राहणे, वजन उचलणे, शौचासाठी कुंथणे, शिंकणे, इ. कारणांनी पोटात दाब वाढू शकतो.

हर्निया हा शस्त्रक्रियेनेच बरा होऊ शकतो. हर्निया स्वत: सहसा दुखत नाही. पण त्यातल्या आतडयाला पीळ पडून ‘आतडीबंद’ झाला तर खूप वेदना होते. यावर ताबडतोब शस्त्रक्रिया करावी लागते.

हर्नियाच्या ठिकाणचा फुगार एकदम वाढणे, दुखरेपणा, गरमपणा, उलटया, इत्यादी लक्षणे गंभीर समजावीत.

जलोदर

यकृतातून जाणा-या नीलाप्रवाहात अडथळा आल्यामुळे किंवा हृदय-पंप नीट रक्त खेचत नसल्यास पोटात पाणी साठून जलोदर होतो.

सर्व आतडी, जठर, यकृत, प्लीहा, पांथरी, इत्यादींवर एक पातळ दुपदरी आवरण असते. हया दुपदरी आवरणात नेहमी थोडासा द्रवपदार्थ असतो. या आवरणामुळे आतडयाची हालचाल सोपी होते. यामुळे मार, आजार यांपासून आतील अवयवांचे संरक्षण होते. जलोदर म्हणजे या दुपदरी आवरणात प्रमाणाबाहेर पाणी साठणे. या आजाराची कारणे अनेक आहेत.

  • हृदयाच्या निरनिराळया आजारात रक्ताभिसरणाची क्रिया नीट न होऊन पाणी साठणे.
  • यकृत निबर होऊन यकृतातून जाणा-या नीलांना अडथळा होऊन या आवरणात पोटात पाणी साठणे.
  • उदरपोकळीच्या आवरणात टी.बी., कॅन्सर हे आजार होणे.
  • तीव्र कुपोषणाचे आजार, यामुळे प्रथिनांची कमतरता.
  • जलोदर हे गंभीर आजाराचे लक्षण असून यासाठी लवकरात लवकर वैद्यकीय सल्ला आवश्यक आहे.
आयुर्वेद

जलोदराची कारणे अनेक आहेत. यकृतसूजेनंतर येणा-या जलोदराचा प्रकार आधुनिक वैद्यकाप्रमाणे साध्य (बरा होणारा) आहे. परंतु आयुर्वेद रुग्णालयांमधून केल्या जाणा-या उपायांचा चांगला उपयोग होतो हा अनुभव आहे. मीठ, पाणी जरासुध्दा न घेता केवळ पूर्णपणे दुधावर सहा महिनेपर्यंत निग्रह दाखवू शकणा-या रुग्णांना चांगला उपयोग झाला आहे. आहारातील एक अट म्हणजे सर्व प्रकारच्या उसळी टाळणे. असे पथ्य पाळल्यानंतर हळूहळू पचनशक्तीप्रमाणे चतकोर भाकरी, ओवा-जिरे मिसळलेली लसणीची चटणी यांचा प्रयोग करावा. एकूण पथ्यापथ्य तीन ते नऊ महिनेपर्यंत पाळावे लागते.

या आजारात सौम्य जुलाब होत राहणे चांगले असते. यासाठी आहारातल्या डाळींवर रुईचा चीक आधीच टाकून द्यावा. यासाठी 20 ग्रॅम डाळीवर रुईचा चीक दोन-तीन थेंब टाकावा (जास्त टाकू नये नाहीतर जुलाब होतील). भाकरी-पोळीचे पीठ भिजवताना त्यामध्येही दोन थेंब रुईचा चीक मिसळावा. या जुलाबामुळे शरीरातले अनावश्यक पाणी कमी होत राहते.

आरोग्यवर्धिनी (500 मि.ग्रॅ) हे औषध यकृताचे कामकाज सुधारण्यास उपयोगी आहे. याच्या 1-2 गोळया दिवसातून 2-3 वेळा याप्रमाणे 3 ते 9 महिने द्याव्या. याबरोबरच कुमारीआसव आणि पुनर्नवारिष्ट 2-2 चमचे तेवढयाच पाण्यात मिसळून देत राहावे. सप्टेंबर ते जानेवारीपर्यंत पुनर्नवा (खापरखुट्टी, वसू) भाजी म्हणून खेडयांमध्ये मिळू शकते. या वनस्पतीचा 50-100 ग्रॅम या मात्रेत रोज 2 वेळा वापर केल्यास यकृतपेशींचे काम सुधारते. 3 ते 6 आठवडे हे उपचार सुरू ठेवावेत.

यकृत निबर होणे (लिवर सि-हॉसिस)

यकृत निबर होऊन बिघडणे याला खालीलपैकी काही कारणे असू शकतात.

  • दारूचे व्यसन हे यकृत खराब होण्याचे प्रमुख कारण आहे.
  • स्थूलता आणि पोटात चरबीचे प्रमाण वाढल्याने यकृतदाह सुरू होतो, याला मेटबॉलिक यकृत दाह असे म्हणतात (मेटबॉलिक फॅटी लिवर डिसीज). पूर्वी याला नोन-अल्कोहोलिक फॅटी लिवर डिसीज असे म्हणायचे.  हा आजार आता पौगंड आणि तरुण  वयात देखील दिसून येत आहे.
  • सांसर्गिक कावीळ, विशेषत: ‘बी’ प्रकार हे यकृत दाहाचे आणखी एक प्रमुख कारण आहे.
  • भारतातील लहान मुलांमध्येदेखील याचा एक प्रकार आढळतो. त्यात यकृत निबर होते व जलोदर होतो. 6 महिने ते 3 वर्ष वयामध्ये हा आजार जास्त आढळतो. नात्यात होणारी लग्ने, आहारात खवट शेंगदाण्यातून जाणारे अफ्लाटॉक्सीन नावाचे विषारी द्रव्य, तांब्याच्या भांडयांचा स्वयंपाकात वापर व आनुवंशिकता ही त्याची महत्त्वाची कारणे सापडली आहेत.

कावीळ, जलोदर, पोटावरच्या नीला उठून दिसणे, मळमळ, उलटी, आजाराच्या शेवटच्या अवस्थेत रक्ताची उलटी वगैरे अनेक लक्षणे यात दिसून येतात.

वेळीच निदान झाले तर डीपेनिसिलीन व आरोग्यवर्धिनी या औषधांचा चांगला उपयोग होतो. एकदा सि-हॉसिस हा यकृताचा रोग जडला, की बरा होणे जवळजवळ अशक्य असते. याचे परिणाम फार दूरगामी असतात. केवळ या रोगासाठी तरी दारू आणि स्थूलता टाळणे आवश्यक आहे. मुलांना पहिल्यापासून व्यायाम खेळ आणि योग्य आहार याचे महत्व समजले पाहिजे.

यकृत आरोपण म्हणजे योग्य नातेवाईक शोधून त्याच्या यकृताचा काही भाग आरोपण करता येतो. पूर्ण यकृत बसवावे लागत नाही , कारण काही भाग देखील काम करू शकतो. मेंदुमृत व्यक्तींचे यकृत देखील काही रुग्णाना जीवनदान देऊ शकते. मात्र यकृत आरोपण ही अत्यंत गुंतगुंतीची शस्त्रक्रिया आहे आणि नंतर देखील बरीच काळजी घ्यावी लागते. त्याचा खर्च काही लाखांच्या घरात जाऊ शकतो. त्यानंतर दारू कायम वर्ज्य करावी लागते. तसेच योग्य जीवनशैली सांभाळावी लागते.  

निदान

यकृत सूज किंवा लिवर सीरहोसिस या आजारचे निदान आता बहुदा पोटाच्या सोनोग्राफी वरून सर्वात  आधी होते. यात यकृत आकार वाढणे आणि त्याच्या पेशी खराब होणे याचे स्पष्ट चित्र दिसते. सोनोग्राफीत त्याची सुरुवात देखील दिसते. अधिक स्पष्ट चित्रणसाठी एलस्टॉग्राफ हे सोनोग्राफीचेच प्रगत तंत्र वापरतात.

याचबरोबर यकृत-कार्याच्या रक्ताच्या तपासण्या करतात. यात मुख्य म्हणजे सेरम बिलीरुबिन, लिपीड म्हणजे स्निग्ध पदार्थ चाचणी, SGOT /SGLT पातळी तपासले जाते. सीटी चाचणीत अधिक तपशील,तसेच कर्करोग कळू शकतो.

प्रतिबंध
  • हेपटायटिस बी लशीकरण जन्मापासून 3 डोस दिले जातात.
  • लहानपणापासून लट्ठपणा  टाळून, योग्य शरीरभार राखणे आवश्यक आहे.
  • दारू पूर्णपणे टाळणेच योग्य.पण जर शक्यच नसले तरी दिवसाला 60 मिलीच्या वर  कधीच घेऊ नये, आणि शक्यतो रोज घेऊच नये
  • रक्त-संक्रमण कायदा कडक करून रक्तातून विषाणू जाणार नाहीत याची काळजी घेतली जाते. वैद्यकीय व्यावसाईक व परामेडीक व्यक्ती यांनी वरील लस तर घ्यावीच (दिली जाते) पण रक्त संसर्ग होऊन नये म्हणून काही निश्चित नियम व पद्धती पाळाव्यात.  
युनिव्हर्सल प्रिकॉशन्स (सार्वत्रिक काळजी)

युनिव्हर्सल प्रिकॉशन्स म्हणजे प्रत्येक रुग्णाचे रक्त व शरीरिक द्रव संभाव्य संसर्गजन्य आहेत असे गृहित धरून घेतली जाणारी सुरक्षितता उपाययोजना. या उपायांमुळे HIV, हिपॅटायटिस B व C यांसारखे संसर्ग टाळता येतात.

पुढील विवेचन मुख्यत:HIV च्या दृष्टीने लिहिलेले असले तरी या सर्व संसार्गासाठी लागू आहे.

1. वैयक्तिक संरक्षक साधने (Personal Protective Equipment – PPE)

  • हातमोजे (Gloves) – रक्त, जखम, शरीरिक द्रव हाताळताना
  • मास्क व फेस शिल्ड – शिंतोडे उडण्याची शक्यता असल्यास
  • एप्रन / गाऊन – शस्त्रक्रिया, ड्रेसिंग करताना
  • प्रत्येक रुग्णासाठी नवीन हातमोजे वापरणे आवश्यक

2. हात स्वच्छता (Hand Hygiene)

  • रुग्णास स्पर्श करण्यापूर्वी व नंतर
  • रक्त/द्रव हाताळल्यानंतर
  • साबण व पाण्याने किमान 20 सेकंद हात धुणे
  • गरज असल्यास अल्कोहोल आधारित हँडरब वापरणे
  • हात स्वच्छता ही HIV प्रतिबंधाची सर्वात महत्त्वाची पायरी आहे

3. सुई व धारदार वस्तूंची सुरक्षित हाताळणी (Sharps Safety)

  • सुई पुन्हा झाकू नये (No recapping)
  • वापरलेल्या सुई थेट पंक्चर-प्रूफ डब्यात टाकाव्यात
  • तुटलेली काच, ब्लेड काळजीपूर्वक टाकणे
  • सुई टोचण्यामुळे (Needle Stick Injury) HIV होण्याचा धोका असतो

4. रक्त व शरीरिक द्रवांचे सुरक्षित व्यवस्थापन

  • रक्त सांडल्यास 1% ब्लीच द्रावण वापरून स्वच्छ करणे
  • रक्ताचे नमुने नीट झाकलेल्या कंटेनरमध्ये वाहतूक करणे
  • रक्त व शरीरिक द्रव थेट त्वचेवर लागू देऊ नयेत

5. निर्जंतुकीकरण व स्वच्छता (Disinfection & Sterilization)

  • वापरलेली उपकरणे नीट निर्जंतुक करणे
  • ऑटोक्लेव्ह / रासायनिक निर्जंतुकीकरण पद्धती वापरणे
  • लिनेन, कपडे योग्य पद्धतीने धुणे

6. कचरा व्यवस्थापन (Biomedical Waste Management)

  • कचरा रंग-कोडेड पिशव्यांमध्ये टाकणे
  • सुई, रक्ताने माखलेले साहित्य वेगळे करणे
  • नियमांनुसार विल्हेवाट लावणे

7. सुई टोचल्यास तात्काळ उपाय (Post Exposure Prophylaxis – PEP) 

  • जर:सुई टोचली, रक्त डोळ्यात/तोंडात गेले तर:जखम साबण-पाण्याने धुवावी
  • त्वरित वरिष्ठांना कळवावे
  • 72 तासांच्या आत PEP उपचार सुरू करावेत
  • HIV तपासणी करावी

8. लैंगिक संपर्कातून HIV टाळण्यासाठी काळजी (सर्वसामान्यांसाठी)

  • सुरक्षित लैंगिक संबंध (कंडोम वापरणे)
  • अनेक लैंगिक साथीदार टाळणे
  • रक्त संक्रमण फक्त तपासलेल्या रक्तातूनच
  • इंजेक्शनसाठी नेहमी नवीन सुई वापरणे