मानसिक आरोग्य आणि मनोविकार

फेफरे

कमला ला सहा वर्षांची मुलगी आहे आणि ती आता शाळेत जायला लागली आहे. ती दोन वर्षांची असताना अंगणवाडीतच तिला पहिला झटका आला. घाबरून गेलेल्या बाईंनी तिच्या आईला बोलावणे पाठवले. त्यांच्या म्हणण्यानुसार कमला अचानक आचके देऊ लागली. हातपाय थरथरायला लागले आणि शरीर कडक होऊन ती जमिनीवर पडली. तिच्या तोंडातून फेस येत होता आणि डोळे वरच्या दिशेला फिरलेले होते. तोंडातून रडण्यासारखा बारीक आवाज येत होता आणि हाका मारूनही ती प्रतिसाद देत नव्हती. फ्रॉकमध्ये तिने लघवीदेखील केली होती. काही सेकंदात झटका संपल्यावर ती जणू बेशुद्ध होऊन झोपी गेली. सगळी मुलं घाबरली, काही पळून गेली. घाबरलेल्या आईने कमलाला प्राथमिक आरोग्यकेंद्रात नेले व सर्व माहिती सांगितली. तिथल्या डॉक्टरने सांगितले की हे नक्कीच फेफरे असणार.परत झटका आल्यास सतत उपचार घ्यायला लागतील. याशिवाय मेंदूतज्ज्ञाकडे दाखवायलादेखील त्याने सांगितले. पक्के रोगनिदान होण्यासाठी आणि उपचार व्यवस्थित होण्यासाठी त्याच्या मते जिल्हा रुग्णालयातील तज्ज्ञाकडे जाणे महत्त्वाचे होते. जिल्हा रुग्णालयात डॉक्टरांनी सर्व चौकशी करून औषधे दिली. शिवाय त्यांच्याकडचा सल्लागार खूपच चांगला होता. या समुपदेशकाने कमलाच्या आई-वडिलांना बसवून आजाराची व उपचाराची सगळी माहिती सांगितली. काय काय काळजी घ्यायची ते सांगितले आणि स्वत:चा फोन नं. दिला. आता कमलाला उपचार चालू आहेत आणि फेफरे येत नाहीत. उपचार मात्र तिला अजून ३-४ वर्षे घ्यायला लागू शकतात.

फेफरे रोगातील घटना

येणारी प्रत्येक फीट ही काही फेफरे नसते. बहुतेक वेळा तापामुळेच झटके येतात. मात्र काही मुलांना येतात ते झटके फेफर्‍याचे असतात. कमलाच्या वरच्या गोष्टीचे वर्णन मोठ्या फेफर्‍याचे आहे. याशिवाय इतरही काही फेफर्‍याचे प्रकार आहेत. प्रौढांमध्येपण फेफरे येऊ शकते. कमलासारखी शेकडो मुले फेफरेग्रस्त आहेत. येणार्‍या झटक्याच्या वर्णनावरून आपल्याला फेफरे ठरवता येते पण उपचारासाठी तज्ज्ञांची मदत लागते. झटक्यांची इतर कारणे नाहीत ना याची खात्री करावी लागते आणि उपचाराचे योग्य पर्यायही निवडावे लागतात.

खरे म्हणजे फेफरे हा काही मानसिक आजार नाही पण फेफर्‍यावर उपचार करताना औषधांचे काही अपरिहार्य दुष्परिणाम असतात आणि कुटुंबही चिंताग्रस्त असते म्हणून समुपदेशनाची नेहमीच गरज असते. या मुलांच्या उपचारामुळे शालेय शिक्षणात थोडासा अडथळा निर्माण होतो आणि पुढे व्यवसाय निवडतानाही सुरक्षित पर्याय निवडावा लागतो. यामुळेच आपण या मुलांनाही आपल्या यादीत ठेवायला पाहिजे. या आजाराचे प्रमाण २०० मुलांमध्ये १ असे पडते. काही मुलांच्या बाबतीत हे फेफरे थांबून जाते तर काही जणांना आयुष्यभर हा आजार पुरतो. मेंदूमध्ये एका विद्युत वादळामुळे फेफरे निर्माण होत असते. यामागे काही अनुवंशिक कारणे असू शकतात किंवा प्रसुतीच्या वेळी मेंदूला इजा पण असू शकते.  किंवा बाळ न रडल्यामुळे प्राणवायू कमी पडणे ही कारणे असू शकतात. पण बहुतेक वेळेस कारण असे समजत नाही. फेफर्‍याचा झटका येण्याआधी काही पूर्वसूचना मिळू शकतात. काही स्नायू उडणे म्हणजे त्यांची अनैच्छिक हालचाल, मुठी वळणे किंवा पाय आखडणे या घटना घडतात. शरीराचे जोरदार झटके १०-३० सेकंदांपर्यंत टिकतात. मुल गोंधळून गेलेले असते आणि झटक्यानंतर १-२ तास चक्क झोपी जाते. हातापायांच्या हालचाली अगदी वेगाने होतात, मान आणि चेहरादेखील हलत असतात.  झटका संपल्यावर अशक्तपणा येतो आणि डोके दुखत राहते. झटक्यांच्या वेळी डोळे उघडे असतात आणि बुबुळे वर जातात, लाळ गळते आणि काही क्षण श्‍वसन थांबलेले असते. अशी फिट कधीही आणि कुठेही येऊ शकते. झटका येऊन गेल्यावरही मेंदूचे विद्युत आलेख पाहून रोगनिदान निश्‍चित करता येते. पण हे काम तज्ज्ञांनीच करावे हे बरे.

झटक्यांनंतर मुल किंवा व्यक्ती बरी होते आणि शक्यतो जिवाला धोका नसतो. मात्र झटक्याची एकूण व्याप्ती अर्ध्या तासापेक्षा जास्त राहिली तर तत्काळ डॉक्टरकडे न्यावे लागेल. अशा व्यक्ती दगावू शकतात.

हा आजार शक्यतो शालापूर्व वयात येतो. परंतु पहिला झटका आल्यानंतर कदाचित २-३ वर्षे दुसरा झटका न येणे शक्य असते. म्हणूनच शक्यतो पहिल्या झटक्यानंतर लगेच उपचार सुरू करत नाहीत. पुढचा झटका आला तरच उपचार सुरू करतात. फेफर्‍यासाठी औषध देणे, न देणे हा एक महत्त्वाचा निर्णय असतो त्यामुळे तो साधक बाधक विचार करून तज्ज्ञांनीच घेतलेला चांगला. काही रुग्ण औषधाविना राहू शकतात. या बद्दलचे निर्णय डॉक्टर, रुग्ण आणि पालक या सगळ्यांनी मिळून घ्यायचा असतो.

फेफर्‍यावरचे औषधोपचार

शक्यतो पहिल्या झटक्यानंतर डॉक्टर लगोलग उपचार सुरू करीत नाहीत. दोन वर्षात दुसरी फीट न आल्यास औषधांची गरज नाही असे धरले जाते. काही मुलांना दुसरा झटका येतच नाही. मात्र दोन वर्षात एक किंवा अनेक झटके आले तर मात्र औषधे द्यावी लागतात.

फेफर्‍यासाठी साधारणपणे १-२ औषधे एकत्र दिली जातात. यामुळे साधारणपणे ६०% बालकांना/व्यक्तींना फेफर्‍यापासून मुक्त जीवन जगता येते पण औषधे घेत राहावी लागतात. औषध केव्हा थांबवायचे याबद्दल डॉक्टर ठरवतील. सामान्यपणे सुरू केल्यानंतर ४ वर्ष सतत औषधे दिली जातात आणि त्यानंतर फेर विचार करता येतो.

औषधे घरात नीट सुरक्षित ठेवावीत, कुणीतरी त्याची जबाबदारी घ्यावी. रुग्णाला या व्यक्तीने नियमितपणे औषध द्यावे किंवा व्यवस्था करावी.  मुल चुकून औषध जास्त खाणार नाही यासाठी सुरक्षित किंवा कुलपात ठेवलेले बरे.

बहुतेक औषधांनी झोपाळूपणा, अस्वस्थता आणि गोंधळलेपण असे दुष्परिणाम होतात. यामुळे शैक्षणिक व व्यावसायिक कामांमध्ये अडथळे येतात. काही औषधांनी कंप सुटतो, डोके हलके वाटते आणि डोकेदुखीचा त्रास होऊ शकतो.

या औषधांनी आराम न वाटल्यास काही पर्याय आहेत. योग आणि प्राणायाम यामुळेही काही रुग्णांना आराम मिळतो असे दिसते पण यावर नीट संशोधन व्हायला पाहिजे. आयुर्वेदातही काही उपचार आहेत. त्यावरही जास्त ठोस संशोधन होऊन परिणामकारकता आणि रुग्ण निवड निश्‍चित झाली पाहिजे. हे पर्यायी उपचार कुणाला उपयोगी पडतील याबद्दल त्या त्या डॉक्टरने निर्णय घेणे चांगले.

रुग्ण स्त्री किंवा मुलगी असेल तर पाळी येणे, गरोदरपणा, कुटुंबनियोजन आणि काही स्त्री बीजांड दोषांच्या संदर्भात विशेष काळजी आणि सल्ला लागतो. डॉक्टरांना आणि समुपदेशकांना याबद्दल योग्य माहिती देऊन योग्य तो सल्ला घ्यावा आणि त्याप्रमाणे काळजी घ्यावी.

आरोग्य कार्यकर्त्यांची मुख्य जबाबदारी

फेफर्‍याचे रुग्ण माहितीवरून शोधून काढणे, त्यांना डॉक्टरांपर्यंत घेऊन जाणे आणि औषधोपचार ठरला असल्यास त्याचा पाठपुरावा या महत्त्वाच्या गोष्टी आपण करू शकतो. असे कोणतेही बालक/व्यक्ती वैद्यकीय मदतीशिवाय राहू नये याची आपण काळजी घेऊ शकतो.

आरोग्य कार्यकर्त्यांनी आणि समुपदेशकांनी रुग्णांना आणि त्यांच्या कुटुंबीयांना या आजाराच्या परिणामांबद्दल माहिती तर दिलीच पाहिजे शिवाय त्यांना धीर दिला पाहिजे. त्या कुटुंबाला या आजाराची वस्तुस्थिती समजायला व स्वीकारायला मदत करावी लागते. त्या बालकाच्या शैक्षणिक प्रगतीत थोडा अडथळा निर्माण झाला असला तरी सुरक्षिततेच्या दृष्टीने औषधोपचार महत्त्वाचा असतो हे मनात ठसवावे लागते. काही वर्षानंतर औषधे बंद करता येतात असेही सांगायला पाहिजे. फेफरेग्रस्त बालकांच्या पालकांचा आधारगट निर्माण करता आल्यास चांगले. अशा आधारगटांमुळे एकमेकांची मदत घेता येते व उत्साह टिकून राहतो.

प्राथमिक स्वास्थ्य केंद्र किंवा ग्रामीण रुग्णालयात फेफर्‍यासाठी औषधे उपलब्ध असतात नसल्यास आपण त्यासाठी प्रयत्न करायला पाहिजे. या औषधांचे सामान्य दुष्परिणाम रुग्णांना आणि पालकांना समजावून सांगायला पाहिजेत. या आजाराबद्दल वर्गशिक्षकांना आणि बालकाच्या मित्र मैत्रिणींना देखील सांगून ठेवायला पाहिजे. प्रसंग आला तर काय करायचे याबद्दल सूचना देऊन ठेवायला पाहिजे.

क्वचित तुमच्यासमोर फेफर्‍याचा झटका आल्यास कोणते प्रथमोपचार करायचे याची आपल्याला माहिती हवी आणि ती पालकांना तसेच शिक्षकांनाही सांगून ठेवायला पाहिजे. मुख्य म्हणजे रुग्णाच्या तोंडात जीभ चावली जाऊ नये म्हणून पातळ कपड्याची घडी (उदा. हातरुमाल) द्यावी, रुग्णाला कुशीवर झोपवावे, तोंडाला येणारा फेस पुसून घ्यावा त्याला उचलून बाजूला किंवा दुसर्‍या खोलीत न्यावे आणि नंतर झोप लागते हे आपल्याला माहीत असणे महत्त्वाचे आहे. झटका ३० मिनिटांपेक्षा अधिक टिकला तर प्रकृतीला धोका असतो. अशा बालकाला/व्यक्तीला डॉक्टरकडे न्यायला पाहिजे. सामान्यपणे फेफर्‍याचा झटका ३०-४० सेकंद किंवा १-२ मिनिट टिकतो जास्त नाही.

मुख्य म्हणजे हा आजार उपचारांनी नियंत्रणाखाली येतो हा महत्त्वाचा संदेश कुटुंबीयांना, शाळेत आणि समाजात नीटपणे पोचला पाहिजे.

फेफर्‍याचा रुग्ण वयाने मोठा असेल तर व्यावसायिक पुनर्वसनासाठी काही काळजी घ्यावी लागेल. जिथे स्वत:ला किंवा इतरांना धोका आहे असे काम, उदा. वाहन चालवणे, भट्टी किंवा आगीच्या ठिकाणी, स्वयंपाक, वायरमन, मशीन काम इ. गोष्टी टाळाव्यात. जिथे धोका नाही तिथे अशा व्यक्तींना काम मिळायला हवे. मात्र शेतात काम करायला किंवा दुकानात हलके काम करायला काही अडचण नसते.

मतिमंद बालक

उज्वलाचे बाळंतपण खेड्यात घरीच झाले. बाळ बाहेर पडायला थोडा उशीर लागला त्यामुळे बाळ लवकर रडले नाही. त्या क्षणास कोणाला असे वाटलेही नाही की याचा बाळाच्या मेंदूवर परिणाम होऊ शकतो. वजन उंचीच्या बाबतीत बाळाची वाढ ठीक-ठाक होती. मात्र बाळ २ वर्षाचे झाल्यावर आजीला वाटले की बाळ नीट बोलू शकत नाही किंवा प्रतिसाद देत नाही. तालुक्याच्या डॉक्टरला दाखवल्यावर त्यानी तपासून मतिमंदत्व असावे म्हणून बालरोगतज्ज्ञाला दाखवायचा सल्ला दिला. बालरोगतज्ज्ञांनी बाळ नीट तपासून मतिमंदत्वाचे निदान केले आणि उज्वला आणि तिच्या नवर्‍याला सर्व कल्पना दिली. बाळंतपणाच्या वेळी बाळ मोकळे व्हायला लागलेला उशीर कदाचित कारणीभूत असू शकेल पण आता त्याचा विचार करू नये असे समजावून सांगितले. बाळाच्या मेंदूला त्या वेळी प्राणवायू कमी पडल्यामुळे मेंदूवर थोडा परिणाम झाला असावा. बाळाच्या विकासात आणि शिक्षणात काही अडचण येणार आहे त्यावर मात करायला लागेल असे त्यांना नीट समजावून सांगितले. त्या दिवशी तरी उज्वला आणि तिच्या नवर्‍यास अत्यंत दु:ख झाले पण हळूहळू ते आतून सावरत आहेत. या बाळाची विशेष जबाबदारी आपल्याला घ्यावी लागणार याची दोघांनी मनाची तयारी केली आहे. अशा बालकांना खास शाळा असतात. त्याची सोय शहरातच आहे याची माहिती घेतली. घरातल्या इतरांनी विशेषत: आजी आजोबांनी या बाळासाठी आता मनाची तयारी करून लागेल ती सर्व मदत करायचे ठरवले आहे.

ही कथा वारंवार घडणारी आहे. भारतात अशी पुष्कळ मुले आहेत. त्या मुलांना आपल्या प्रेमाची गरज आहे तसेच विशेष लक्ष देऊन त्यांची काळजी घेण्याचीही गरज आहे. मतिमंदत्व म्हणजे सामान्य बुद्धिमत्तेच्या तुलनेत कमी बौद्धिक आणि भावनिक पातळी असणे. याचे कारण मेंदूची अपुरी वाढ हे असते. मतिमंदत्वाची अनेकविध कारणे आहेत. दर २०० बालकांमध्ये एखादे बालक मतिमंद असल्याचे आढळते.

तुमच्या गावात हजारभर लोकसंख्या असेल तर त्यात सुमारे २०० बालके असतात व त्यात एखादे बालक असे असू शकते. यासाठी आपण थोडे शोधक नजरेने पाहावे लागते.

मतिमंदत्वाची कारणे

बाळंतपणाच्या वेळी बाळ आत अडकून पडणे किंवा लवकर न रडणे हे प्रमुख कारण आहे. यामुळे बाळाच्या मेंदूला प्राणवायू कमी पडतो आणि मेंदूपेशींचे नुकसान होते. अशा बाळाला मतिमंदत्व असते आणि स्पास्टिक या नावाने ओळखला जाणारा विकार होतो. या विकारात हालचाली मंद व कष्टदायक पद्धतीने होतात.

बाळ नीट जन्मले पण २-३ दिवस बाळाला स्तनपान नीट न मिळाल्यास बाळाची उपासमार होते आणि मेंदूला ग्लुकोज साखरेचा पुरवठा होत नाही. या कारणानेही वरीलप्रमाणेच मतिमंदत्व व स्पास्टिक विकार होतो. आपल्या देशात काही समाजांमध्ये स्तनपान लवकर करत नाही त्याने असे दुष्परिणाम संभवतात.

गलगंड असलेल्या मातेला किंवा थायरॉक्झीन हार्मोनची कमतरता असलेल्या मातेला होणारे बाळ मतिमंद जन्मते. या बाळाचा रडण्याचा आवाज मांजरीसारखा आणि दुबळा असतो. वेळीच ओळखता आले तर औषधे देऊन पुढचे दुष्परिणाम टाळता येतात. मात्र त्यासाठी फक्त २४ तास एवढाच अवधी असतो.

मोंगोलिझम या जनुकीय दोषामुळे होणार्‍या आजारातही मतिमंदत्व असते. पहिले मुल आईच्या तिशीनंतर झाले तर असा दोष संभवतो. या बाळाचा चेहरा, डोळे व भिवया चटकन ओळखू येतात. हाताच्या आणि पायाच्या तळव्यावरही काही खाणा-खुणा असतात त्यावरून मोंगोलिझम ओळखता येतो.

ऑटिझम म्हणजे स्वमग्नता हा मतिमंदत्वाचा एक प्रकार आहे. सामान्यपणे दोन वर्षांच्या वयात हा विकार समजून येतो. हे बालक कायम स्वत:मध्येच गुंगलेले असते आणि अगदी आई-बाबांशीही फारसा प्रतिसाद न देता आणि इतर जगाशी फार संबंध नसलेल्या पद्धतीने राहते. त्यामुळे त्याचा शैक्षणिक विकास फारसा होत नाही.

मतिमंदत्वाची इतर अनेक कारणे आहेत पण त्याबद्दल डॉक्टर ठरवतील. शिवाय कारण काहीही असले तरी पुढची सर्व काळजी कमीअधिक प्रकारे तीच असते.

मतिमंदत्व कसे ओळखायचे

मतिमंदत्व दोन वर्ष वयाच्या सुमारास ओळखता आले पाहिजे तरच त्यावर उपाय करता येतो. लवकर ओळखले गेले तर कुटुंबाने वस्तुस्थिती स्वीकारून पुढची वाटचाल करायला जास्त सोपे जाते. या बालकांना विशेष प्रशिक्षण लागते आणि त्यासाठी वेगळ्या संस्था आणि समुपदेशक लागतात. मतिमंदत्व ओळखण्याचा सर्वात सोपा मार्ग म्हणजे बालकाच्या वाढ-विकासाचे टप्पे तपासत राहणे. हे वयानुसार विकासाचे टप्पे सोबतच्या तक्त्यात दिले आहेत. पण या विकासांच्या टप्प्यांमध्ये टप्पा थोडा लांबणीवर पडला तर फार घाबरून जाऊ नये कारण थोडेफार फरक असतातच. पण लक्ष मात्र ठेवायला पाहिजे. शंका आल्यास बालरोगतज्ज्ञांना लवकरात लवकर दाखवावे.

बालकाच्या विकासाचे टप्पे

जन्मापासून मोठे होईपर्यंत बालक विकासाचे अनेक टप्पे पार करत जाते. यातले काही टप्पे आपण बालकाच्या मेंदूची वाढ व विकास नीट होतो की नाही हे पाहायला शोधकपणे वापरू शकतो.

विकासाचा टप्पाटप्पा गाठण्याचे सामान्य वयोमानकोणत्या महिन्यात टप्पा गाठला नाही तर मतिमंदत्वाची शक्यता धरावी
बाळाचे नाव घेतल्यावर नजरेने प्रतिसाद देते.१ ते ३ महिने४ था महिना
इतरांकडे बघून स्मितहास्य करते१ ते ४ महिने६ वा महिना
मान धरते२ ते ६ महिने६ वा महिना
हाताचा आधार घेऊन जमिनीवर बसू शकते.५ते १० महिने१२ वा महिना
भिंतीच्या आधाराने उभे राहू शकते.९ ते १४ महिने१८ वा महिना
चालू शकते.१० ते २० महिने२० वा महिना
२-३ शब्दांचे वाक्य बोलू शकते.१६ ते ३० महिने३ वर्ष
स्वत: खाऊ-पिऊ शकते.२ ते ३ वर्ष४ वर्ष
स्वत:चे नाव सांगू शकते.२ ते ३ वर्ष४ वर्ष
मलमूत्र विसर्जनाबाबत शिकवता येते३ ते ४ वर्ष४ वर्ष
सामान्य धोके टाळू शकते (आगीपासून लांब राहणे)३ ते ४ वर्ष४ वर्ष

मतिमंदत्व कुठल्याही उपचाराने बरे होऊ शकत नाही. आपले बाळ मतिमंद आहे असे कळल्यावर त्या कुटुंबावर मोठा आघात होतो. काही कुटुंबे यासाठी भगत-मांत्रिकाकडे किंवा देव-ऋषी वगैरेंची मदत घेऊ पाहतात. यामुळे उपयोग काही होत नाही फक्त वेळ आणि पैसे बरबाद होतात.

मतिमंदत्वाचे मोजमाप करण्यासाठी बु्ध्यांक चाचणी केली जाते. यासाठी भारतीय पद्धती विकसित केल्या आहेत. बुध्यांक चाचणी मानसोपचार तज्ज्ञ करू शकतात. बुध्यांक चाचणीप्रमाणे मतिमंदत्वाच्या पायर्‍या ठरविल्या जातात. (तक्ता पाहा)

बुध्यांकमतिमंदत्वाचा स्तर आणि सूचना
९० पेक्षा जास्तसामान्य
७१-९०सीमान्त मतिमंद
५१-७०सौम्य मतिमंदत्व शिक्षण शक्य असते
३६-५०साधारण मतिमंदत्व प्रशिक्षणाने गोडी
२१-३५तीव्र मतिमंदत्व खास कल्याण गृहात ठेवावे लागते
२० पेक्षा कमीअतितीव्र मतिमंदत्व खास कल्याण गृहात ठेवावे
पुढे काय?

मतिमंदत्व जरी बरे करता येत नसले तरी एवढे मात्र निश्‍चित आहे की काही उपचार आणि आधार देण्याच्या पद्धतींमुळे हळूहळू का होईना मर्यादित विकास होत राहतो. अर्थातच इतर मुलांच्या तुलनेने ही प्रगती केव्हाही कमीच असते पण स्वत:ची काळजी घेण्यासाठी (स्वच्छता, खाणे पिणे, स्वसंरक्षण इ.) बालकाला शिकवून तयार करता येते. जर प्रशिक्षित साहाय्य आणि उपचार मिळाले नाही तर बालकाचा विकास खुंटून जातो. म्हणूनच निराश न होता आहे त्या परिस्थितीत जेवढे करता येईल तेवढे करायलाच पाहिजे.

सुरक्षितता महत्त्वाची.

मतिमंदत्व बालकांना सतत लक्ष देऊन काळजी घ्यावी लागते. धोकादायक आणि असुरक्षित परिस्थिती किंवा सामाजिक ठिकाण यांना सांभाळायला लागते. दुर्दैवाने अनेक बालकगृहांमध्ये त्यांच्यावर शारीरिक, मानसिक आणि लैंगिक अत्याचार होण्याची शक्यता असते. स्त्रिया व मुलींना तर हा धोका कुटुंबातून देखील होऊ शकतो बाहेर तर असतोच. या बाबतीत दक्ष राहायला हवे. काही वेळेस लैंगिक अत्याचारामुळे गरोदरपण लादले जाते अशा बातम्या येतात. याबद्दल बर्‍याच वेळा जास्त उशीर झालेला असतो. मतिमंदत्व असताना गर्भ राहिला तर कायदेशीर गर्भपात करून घेता येतो पण तो २० आठवड्यापर्यंतच.

मुली व स्त्रियांसाठी स्वच्छतेच्या नेहमीच्या बाबींशिवाय पाळी येण्याचा पण मुद्दा असतो याची स्वच्छता ठेवणे अवघड जाते कारण त्या नीटपणे घड्या/पॅडस् वापरू शकत नाही. पालकांना यावर लक्ष ठेवणे अवघड जाते. बरेच पालक या मुलींना बालिकागृहांमध्ये ठेवण्याचा पर्याय निवडतात. अशा संस्था कमीच आहेत आणि एकूण गरजेला त्या पुर्‍या पडू शकत नाहीत. अशा विशेष बालकगृहांमध्ये दैनंदिन किंवा निवासी संस्था असे दोन प्रकार आहेत. दैनंदिन संस्थांमध्ये बालकांना नेण्या-आणण्यासाठी वाहनांची सोय असल्यास चांगले.

निवासी बालकगृहांमध्ये तिथल्या कर्मचार्‍यांवर आणि एकूण निगरानीवर बरेच काही अवलंबून असते. याबद्दल येणार्‍या बातम्या फार चांगल्या नाहीत. मात्र सगळी बालकगृहे अशी नसतात.

शहरामध्ये विशेष संस्था असल्यामुळे पालकांना थोडा आधार असतो. मात्र खेड्यांमध्ये ही सोय असू शकत नसल्यामुळे परिस्थिती अवघड होते. अशा बालकांना निवासी संस्थांमध्ये ठेवणे हाच पर्याय असतो. अनेक पालक नाइलाजाने अशा बालकांना घरीच ठेवतात व त्यांना विकासाची संधी मिळू शकत नाही. खेडेगावांमधल्या अशा काही पालकांनी एकत्र येऊन आधारगटांचे प्रयत्न सुरू केले आहेत. हे काम अर्थातच अवघड आहे पण आधारगटाचा निश्‍चित उपयोग होतो. यासाठी काही स्वयंसेवक तयार करता येतात. हे काम जास्त सोपे होईल. काही दुर्दैवी कुटुंबांमध्ये मात्र अशा मतिमंद बालकाला पालक घरात कोंडून, बांधून कामावर निघून जातात. रोजगार मिळवणे जरी अपरिहार्य असले तरी अशी अमानुषता आपल्याला नको आहे. मतिमंद मुलांना सामाजिक सुरक्षा आणि निगरानी गृहांची गरज आहे. त्यासाठी शासकीय अनुदान पण असते.धर्मादाय संस्था अशी बालकगृहे सुरू करू शकतात आणि सरकारी मदत मिळू शकते. सेवाभावी व  निष्ठावंत कार्यकर्ते व कर्मचारी हेच अशा संस्थांचे खरे बळ असते.

कायदेशीर दृष्ट्या मतिमंदत्व हे विकलांगतेचे वैध कारण आहे; त्यासाठी योग्य ती सरकारी मदत मिळण्यासाठी जिल्हा रुग्णालयातून प्रमाणपत्र घेऊन समाजकल्याण खात्याकडे अर्ज करता येतो.