स्त्री प्रजनन संस्था

पोलिसिस्टिक ओव्हरीयन डिसीज (PCOD) पीसीओडी

अलिकडे, ‘मला PCOD झाला आहे’ असं सांगत अनेक मुली, स्त्रिया डॉक्टरांकडे येतात. लग्न न

झालेल्या तरुण मुली, लग्न झालेल्या आणि आता प्रेग्नन्सी हवी असणाय्रा, मध्यमवयात पाळीचे त्रास होत असलेल्या, रजोनिवृत्तीकडे झुकलेल्या अशा सर्व वयातील स्त्रिया सोनोग्राफीचा रिपोर्ट घेऊन येतात आणि सांगतात_ आम्हाला PCO आहे, आम्हाला ट्रीटमेंट द्या!

काय आहे हा Polycystic Ovarian Disease किंवा Syndrome?

१९३५ साली Irving F. Stein आणि Michael L. Leventhal ह्या दोन डॉक्टरांनी ह्या PCO च्या लक्षणांचं वर्णन केलं. त्याची कारणमीमांसा शोधण्याचा प्रयत्न केला आणि उपाययोजनेबाबतीतही संशोधन केलं. खूप लठ्ठ असलेल्या, मासिकपाळी अनियमित असलेल्या अंगावर लव असलेल्या, मूल होत नसलेल्या सात स्त्रियांच्या लक्षणांचा त्यांनी अभ्यास केला. कारणमीमांसा शोधली आणि त्यांच्या स्त्रीपिंडावर शस्त्रक्रिया केली. ह्या उपाययोजनेमुळे त्यांच्या मासिकपाळीत नियमितता येते हे दाखवून दिले. ह्या मूलगामी संशोधनानंतर ह्या विषयाचा खूप अभ्यास केला गेला, संशोधन केलं गेलं. तंत्रज्ञानात नवनवीन गोष्टींची भर पडत गेली. शरीरातील हॉरमोन्सचे – संप्रेरकांचे काम कसे चालते ह्याचेअधिकाधिक ज्ञान मिळत गेले. सोनोग्राफीचा शोध लागला. ज्या प्रकारच्या लक्षणांवरून त्या स्त्रीला ‘Stein-Leventhal Syndrome’ (संशोधक डॉक्टरांच्या नावावरून आलेले नाव) झाला आहे असं म्हणत असत त्याला आता PCOS – Polycystic Ovarian Syndrome असं नाव दिलं गेलं.

स्त्रीच्या मासिक पाळीचं चक्र हे अतिशय गुंतागुंतीच्या परंतु अतिशय सुसूत्र आणि सुसंबध्द अशा अंतर्गत यंत्रणेनुसार चालत असतं. वेगवेगळ्या संप्रेरकांचे – हॉरमोन्सचे कार्य ठराविक काळात, ठराविक प्रकाराने चालणे हे मासिक पाळीच्या नियमिततेसाठी अतिशय आवश्यक असते. ही नियमितता एका महत्वाच्या गोष्टीची निदर्शक असते_ स्त्रीपिंडामध्ये-बीजांडकोशामध्ये स्त्रीबीजाची वाढ होऊन त्याचे उत्सर्जन होणे – ते योग्यवेळी फुटणे. त्यावेळी शुक्रजंतूंशी- पुरुषबीजाशी त्याचा संयोग झाला तर फलन होते. निसर्गाचा विचार, शरीरस्वास्थ्याबरोबर, पुनरुत्पादन- प्रजनन – त्यायोगे निसर्गचक्र चालू रहाणे ह्यासाठी असतो. त्यादृष्टीने संप्रेरकांचे चक्र व्यवस्थित चालू असणे फार महत्वाचे असते. कुठल्याही कारणाने ह्या चक्रामध्ये अडथळा निर्माण झाला की स्त्रीबीज वाढणे-फुटणे हे कार्य व्यवस्थित वेळेवर होऊ शकत नाही. परिणामत: मासिक पाळीचे चक्र बिघडते. पाळी अनियमित येणे, वजन वाढणे, चेहेय्रावर मुरुम-पुटकुळ्या येणे, शरीरावर अनैसर्गिक लव वाढणे, ही तर ह्याची समोर दिसणारी लक्षणं आहेत. त्याही पुढे जाऊन दिवस रहाण्यासाठी – प्रेग्नन्सीसाठी त्रास होणे – वंध्यत्व, दिवस राहिले तर प्रेग्नन्सीमध्ये मधुमेह होणे, बाळाची वाढ योग्य रितीने न होणे, त्यानंतर मध्यम वयामध्ये मधुमेह होणे, रजोनिवृत्तीच्या सुमारास गर्भाशयातील स्तर वाढून कॅन्सरकडे वाटचाल होणे, असे अनेक धोके ह्या PCOS ह्या छोट्या शब्दामागे दडलेले आहेत. हे जरी खरं असलं तरी कारणं समजून घेऊन त्यावर उपाययोजना व्यवस्थित करता येते. ह्या बागुलबुवाचा धाक वाटतो तितका मोठा नाही. काही गोष्टी निश्चितपणे समजून घ्यायला हव्यात. सिस्ट म्हणजे कोष , पॉली म्हणजे अनेक. स्त्रीबीजाण्डात अनेक छोटे कोष तयार होणें म्हणजे पॉलिसिस्टिक ओव्हरी . केवळ सोनोग्राफीमध्ये पॉलिसिस्टिक ओव्हरी दिसणे म्हणजे PCOD किंवा PCOS नव्हे. PCOS म्हणण्यासाठी, त्यांच्या लक्षणांचा अभ्यास, संप्रेरकांच्या – हॉरमोन्सच्या वाढलेल्या, चढउतार नसलेल्या पातळ्यांचा तपास करावा लागतो. सोनोग्राफीमध्ये Ovaries Polycystic दिसल्या म्हणजे त्या मुलीला आता पुढचे त्रास असणारच/ होणारच असं गृहीत धरणं चुकीचं आहे. पाळीची अनियमितता आहे, सोनोग्राफीमध्ये स्त्री-बीजाण्डात Cysts आहेत म्हणजे आता वंध्यत्व नक्की – ह्या मुलीला मूल होणारच नाही असं नाही. स्त्रीबीज तयार होऊन फुटण्याची क्रिया अनियमितही होत असेल. तरूण जोडप्याच्या नैसर्गिक कामवासनेनुसार घडणाय्रा संभोगातून फलित गर्भ तयार होऊ शकतो. अलिकडच्या काळातील जलद आणि आखीव – Programmed – जीवनशैलीमध्ये नैसर्गिक ऊर्मींचेही तक्ते बनू लागले आहेत! PCOD आणि PCOS ह्यातला सूक्ष्म फरकही समजून घेणं आवश्यक आहे. दोन्ही अवस्थांमध्ये लक्षणं सर्वसाधारणपणे सारखी असतात. दोन्ही प्रकारामध्ये मुख्य परिणाम ओव्हरीच्या- स्त्रीपिंडाच्या कार्यावर होतो. इस्ट्रोजेन, प्रोजेस्टेरॉन ह्या संप्रेरकांबरोबरच इन्हिबिन, रिलाक्सिन आणि काही थोड्या प्रमाणात अँन्ड्रोजेन्स – ह्यांच्या प्रमाणावरही स्त्रीपिंडाचे काम चालू असते. PCOD ह्या प्रकारामध्ये बीजांडकोशामध्ये अपरिपक्व बीजे मोठ्या प्रमाणावर तयार होतात –

कालांतराने, पक्वता येण्याऐवजी त्यांची छोटी छोटी Cysts – पाण्याने भरलेल्या फुग्यासारख्या गाठी तयार होतात – परिणामत: स्त्रीपिंडाचा आकार वाढतो, अँन्ड्रोजेन्स- पुरुष संप्रेरके जास्त प्रमाणात तयार होतात_. स्रीबीजाची वाढ आणि उत्सर्जन ह्या क्रिया वेळेवर घडत नाहीत_ पाळी अनियमित होते, वजन वाढते, केस गळतात. पण आहार-विहारावरील नियंत्रण, नियमित व्यायाम आणि काही औषधे ह्यांनी ही परिस्थिती सुधारता येते. PCOS ही समस्या संप्रेरकांच्या असंतुलित प्रमाणामुळे निर्माण होते. PCOD पेक्षा ह्याचे परिणाम गंभीर असतात. अँण्ड्रोजेन्सची पातळी प्रमाणाबाहेर वाढल्यामुळे पाळी अनियमित होते, – स्त्रीबीज फुटण्याची क्रिया वेळेवर होत नाही, चेहेय्रावर आणि शरीरावर अनैसर्गिक केसांची वाढ होते, प्रेग्नन्सी रहायला त्रास होतो. ह्याहीपुढे जाऊन मधुमेह, हृदयविकार, आरोग्यास घातक ठरेल अशी वजनवाढ__ ह्यासर्व गोष्टी होऊ शकतात. त्यामुळेच ह्या घटनेला – Syndrome – लक्षणसमुदाय ह्या नावानेच संबोधले जाते. इतरही काही संप्रेरकांच्या- हॉरमोन्सच्या बदललेल्या, बिघडलेल्या पातळ्यांचा ह्या PCOS शी संबंध असतो. मधुमेहामुळे ज्याचं नाव सगळ्यांना माहीत आहे ते – इन्श्युलीन हे द्रव्यही ह्या PCOS च्या संदर्भात महत्वाची भूमिका करतं. पुरुषांच्या शरीरात असणारी Androgenic संप्रेरके – जी स्त्रियांच्या शरीरातही काही थोड्या प्रमाणात असतात – त्यांचाही मोठ्या प्रमाणातला सहभाग PCOS असणाय्रा स्त्रियांमध्ये गडबड घडवत असतो. PCOD ही त्यामानाने सर्वसामान्यपणे आढळणारी – साधारणपणे १०% स्त्रियांमध्ये आढळणारी समस्या आहे. थोड्या उपचारांनी ह्या स्त्रियांना फरक पडतो, गर्भधारणा होऊ शकते. सहसा फार गंभीर गुंतागंतीचे आजार होत नाहीत.  PCOS ही मात्र थोडी गंभीर समस्या आहे. जगातील २% ते २.५% स्त्रियांना ह्यामुळे त्रस्त असतात.

ह्यामुळे स्त्रीच्या जननक्षमतेवर परिणाम होतो – दिवस रहाण्यामध्ये अडथळे येतात. दिवस राहिलेच तर  गर्भपाताचे, अपुय्रा दिवसांच्या बाळंतपणाचे, गरोदरपणातील गुंतागुंतीचे प्रमाण जास्त असते. मधुमेह, उच्च रक्तदाब, हृदयविकार, ही PCOS ची पुढची पायरी असू शकते. गर्भाशयाचा कॅन्सर ही रजोनिवृत्तीच्या सुमारास होऊ शकणारी आणखी एक समस्या. अर्थात ह्या सगळ्याच समस्या निर्माण होतातच असे नाही. लवकर निदान झाल्यामुळेही ह्यापैकी काही समस्यांचे निराकरण होते. PCOD आणि PCOS होण्याच्या कारणांचा शोध घेणं हे अवघड काम आहे. अनेक कारणांमुळे स्त्रीबीज तयार होण्याच्या प्रक्रियेमध्ये अडथळे निर्माण होतात. परिणामत: स्त्रीबीज तयार होण्याची, फुटण्याची प्रक्रिया अनियमित होते किंवा होतच नाही. कारणे वेगवेगळी असू शकतात किंवा अनेक कारणांमुळे हे घडू शकते. मेंदूमधल्या पिटूइटेरी किंवा हाइपोथैलेमस ह्या ग्रंथींच्या कामातील अडथळे हे कारण असेल, इन्सुलिन निरुपाय किंवा अनुवांशिक दोष असतील. प्रत्येक स्त्रीला वेगवेगळ्या गोष्टींसाठी उपाययोजना करण्याचीसुध्दा कधीकधी गरज पडते. लग्न न झालेल्या तरुण मुलीला आपली चेहेय्रावरची लव, मुरुम पुटकुळ्या, अनियमित पाळी ह्याची काळजी वाटते. लग्न झालं आहे, इतक्यात मूल नको आहे पण PCOD/PCOS चा त्रास आहे त्यांना विशिष्टप्रकारच्या गर्भनिरोधक गोळ्या द्याव्या लागतात. गर्भधारणा व्हावी यासाठी प्रयत्न करणाय्रा PCOपीडित स्त्रियांना स्त्रीबीज तयार होण्यासाठी आवश्यक असलेले उपाय करावे लागतात. काही वेळा दुर्बिणीद्वारे शस्त्रक्रिया करून स्त्रपिंडातील Cysts – फोडून अँड्रोजेनची पातळी कमी करण्याचे प्रयत्न करावे लागतात. मध्यमवयातील, पाळीचे त्रास होत असणाय्रा, रक्तातील साखरेचे प्रमाण थोडे अधिक असणाय्रा, ज्यांना Type II Diabetes होण्याची शक्यता आहे, रक्तदाबाचा त्रास आहे अशा स्त्रियांना त्या दृष्टीने उपाययोजना करावी लागते.

PCOD/PCOS च्या बहुतेक कारणांचं मूळ आजची जीवनशैली इथे येऊन थांबतं. वाढलेलं वजन, बिघडलेली संप्रेरकं, मधुमेहाच्या जवळ पोहोचणारं रक्तातील साखरेचं प्रमाण, पाळीची अनियमितता, वंध्यत्व__ ह्या गोष्टी आजच्या पिढीच्या जीवनशैलीकडे बोट दाखवतात. वजनामध्ये अगदी थोडी – २ ते ५% घट झाली तरी बिघडलेल्या काही गोष्टी जाग्यावर येतात. पाळीच्या अनियमितपणासाठी येणाय्रा कितीतरी मुली सांगतात – पूर्वी चालणं खूप व्हायचं किंवा खेळणं असायचं, व्यायाम व्हायचा तेव्हा पाळी नियमित येत असे. सर्वसाधारणपणे खाण्यापिण्यात एकंदर ऊष्मांकांचं प्रमाण कमी होईल, हे पहावं लागतं. संतुलित आणि बेताचा आहार हेच ‘डाएट’चं तंत्र असावं. व्यायामाचं महत्व तर मधुमेह आणि हृदयरोग ह्याबाबतीतही सिध्द झालेलं आहे. PCOS लाही ते लागू आहे. खूप जोरदार व्यायाम काही दिवसच करण्यापेक्षा झेपणारा व्यायाम नियमितपणे करणं जास्त महत्वाचं आहे. बैठ्या जीवनशैलीमुळे शारीरिक हालचाल कमी झाली आहे. तिच्याकडेही लक्ष देणे जरुरीचे असते. संप्रेरके, स्त्रीबीज तयार होण्यासाठी, फुटण्यासाठीची औषधे, मधुमेहावरची औषधे, अँड्रोजेन कमी करण्याची औषधे, ह्या बरोबरच आहार-विहाराचा, मानसिक स्वास्थ्याचाही विचार वैद्यकीय सल्ला देताना करावा लागतो.

बदललेल्या जीवनशैलीशी सामना करत असलेल्या तरूणपिढीला वेगवेगळ्या मार्गांनी मदत करणे, त्यांच्या सद्यस्थितीतील आणि भविष्यातील निरामय आयुष्यासाठी सल्ला देणं, उपाययोजना सुचवणं हे महत्वाचं ठरतं.

ओटीपोटात सूज

स्त्रियांच्या बाबतीत ओटीपोट म्हणजे गर्भाशय, गर्भनलिका, स्त्रीबीजांडे व आजूबाजूचा भाग (स्नायू, इत्यादी).

ओटीपोटात सूज हा तसा दुर्लक्षित आजार आहे. आपल्या देशात स्त्रियांसाठी चांगल्या वैद्यकीय सेवा नसणे हे त्याचे एक प्रमुख कारण आहे. या आजारांमध्ये आकस्मिक म्हणजे नवे जंतुदोष आणि जुने जंतुदोष असे दोन गट पाडता येतील. पहिल्या प्रकारात नीट उपचार न झाल्याने दुसरा प्रकार उद्भवतो.

कारणे

ओटीपोटात सूज येण्याचे मुख्य कारण म्हणजे जंतुदोष. या जंतुदोषाची अनेक कारणे आहेत ती अशी :

  • बाळंतपण किंवा गर्भपाताच्या वेळी जंतुदोष होणे : बाळंतपणापेक्षा गर्भपात हे महत्त्वाचे कारण आहे, विशेषतः चोरूनमारून केलेले सदोष गर्भपात जंतुदोषास हमखास आमंत्रण देतात. पण वैद्यकीय गर्भपातातही जंतुदोषाचा थोडा धोका असतोच. (म्हणूनच गर्भपातापेक्षा संतती प्रतिबंधक जास्त चांगले.)
  • ओटीपोटावरच्या शस्त्रक्रिया : सिझेरियनची शस्त्रक्रिया, स्त्रीनसबंदी, गर्भाशय काढून टाकणे, इत्यादी.
  • लिंगसांसर्गिक आजार : परमा (गोनोरिया) व इतर जंतुदोष.
  • क्षयरोग : (इतर अवयवांतून आलेला क्षयरोग)
  • तांबी, लूप, इत्यादी वस्तूंमुळे होणारा जंतुदोष : या वस्तूंच्या गर्भाशयातल्या सतत अस्तित्वाने काही स्त्रियांना सौम्य जंतुदोष होऊ शकतो.
  • इतर काही प्रकारचे जंतुदोष : यातील अनेकांची कारणे माहीत नाहीत.
लक्षणे, चिन्हे व रोगनिदान

या आजाराचे मुख्य दोन प्रकार पाडता येतील: तीव्र आकस्मिक किंवा नवा जंतुदोष (दाह) व दीर्घ म्हणजे जुना जंतुदोष (दाह):

आकस्मिक तीव्र जंतुदोष दाह (नवी सूज)

हा प्रकार बहुधा बाळंतपण, गर्भपात, शस्त्रक्रिया, लिंगसांसर्गिक आजार या घटनांनंतर येतो. यात अचानक ताप, ओटीपोटात खूप वेदना, दुखरेपणा ही मुख्य लक्षणे असतात. हा प्रकार अगदी त्रासदायक आणि गंभीर असतो. यासाठी वेळीच तज्ज्ञाकडे पाठवणे आवश्यक असते. रुग्णालयातच यावरचे उपचार करता येतील. अर्धवट उपचार झाल्यास जंतुदोष ओटीपोटात टिकून राहतो. यातून खाली दिलेला दुसरा प्रकार संभवतो.

ओटीपोटात दीर्घ दाह (जुनी सूज)

ह्या आजाराची लक्षणे सौम्य स्वरूपाची असतात. ओटीपोटात मंद दुखते, दुखरेपणा, म्हणजे आतून तपासताना किंवा लैंगिक संबंधाच्या वेळी दुखते. याबरोबरच, पाळीच्या वेळी दुखणे, कंबरदुखी, अशक्तपणा, बारीक ताप, अंगावरून पाणी जाणे (कधी यास दुर्गंधी असते.), इत्यादी लक्षणे आढळतात. वर सांगितल्याप्रमाणे हा प्रकार बहुधा तीव्र जंतुदोषातून सुरु होतो. पण काही वेळा याची सुरुवात नकळत होते. क्षयरोग हेही याचे एक कारण आहे. हा संथपणे चालणारा आजार आहे.

आतून तपासताना किंवा लैंगिक संबंधात दुखरेपणा ही ओटीपोटात सूज असल्याची नक्की खूण आहे. ओटीपोटात सूज आहे ही शंका घेऊन वेळीच तज्ज्ञाकडे पाठवणे फार महत्त्वाचे आहे.

दुष्परिणाम

सतत दुखरेपणा असणे हा मुख्य त्रास असतो. यामुळे लैंगिक संबंध त्रासदायक होतो. त्याचबरोबर वंध्यत्व व अस्थानी गर्भ राहणे हे महत्त्वाचे दुष्परिणाम आहेत. गर्भनलिका सुजून बंद झाल्यामुळे वंध्यत्व येते. गर्भनलिका अंशतः बंद झाल्यास स्त्रीबीज गर्भनलिकेत अडकून पडते व अस्थानी गर्भ राहतो. हे दोन्ही दुष्परिणाम गंभीर आहेत.

उपचार व प्रतिबंध

ओटीपोटात सूज असण्याचे प्रमाण व त्याचे दुष्परिणाम पाहून वेळीच रोगनिदान करणे महत्त्वाचे आहे. बाळंतरोग, दूषित गर्भपात व लिंगसांसर्गिक आजारांचा प्रतिबंध केल्यास ओटीपोटात सूज येण्याचे प्रमाण खूप कमी होईल. यासाठी सर्वत्र चांगल्या वैद्यकीय सेवा उपलब्ध होणे आणि उपयोगात आणणे आवश्यक आहे.