श्वसनसंस्थेचे आजार
फुफ्फुसाचा कर्करोग (Lung Cancer)
फुप्फुसाचा कर्करोग हा उतार वयातला एक गंभीर आजार आहे. विशेषतः धूम्रपान करणा-या व्यक्तींना हा आजार होण्याची 30 पटीने जास्त शक्यता असते. प्रदूषणामुळे याचे प्रमाण वाढत आहे. ऍस्बेस्टॉस धुळीमध्ये राहणा-यांना या आजाराचा विशेष धोका आहे. यामुळे अनेक देशांमध्ये ऍसबेसटॉसच्या वापराला बंदी घातली आहे. इतर अनेक कर्करोगांच्या रक्त प्रसारानंतर फुप्फुसामध्ये गाठी होतात. या अवस्थेत हा असाध्य आजार असतो.
खोकला येत राहणे, बेडक्यात रक्त पडणे ही यातली मुख्य लक्षणे आहेत. भूक मंदावणे, वजन घटणे, छातीत दुखणे, गिळायला त्रास, इत्यादी लक्षणेही दिसतात.
या रोगाचे निदान छातीच्या चित्रानेच होऊ शकते. यासाठी आता प्रगत तंत्रे (उदा. सी.टी. स्कॅन) उपलब्ध आहेत. प्राथमिक अवस्थेत शस्त्रक्रिया करून उपाय करता येतो. पण रोग जास्त पसरला असेल तर काही महिन्यांत मृत्यू संभवतो.
या आजारावर मुख्य प्रतिबंधक उपाय ‘धूम्रपान न करणे’ हाच आहे.
फुफ्फुसाचा कर्करोग म्हणजे फुफ्फुसांतील पेशींमध्ये झालेली अनियंत्रित वाढ (uncontrolled growth). या पेशी गाठ (tumor) तयार करतात आणि पुढे शरीराच्या इतर भागात पसरू शकतात. हा कर्करोग जगभरात आणि भारतातही मृत्यूचे एक प्रमुख कारण आहे. याचे मुख्य कारण म्हणजे धूम्रपान (Smoking), पण धूर, प्रदूषण, आणि व्यावसायिक रसायने यांचाही सहभाग असतो. या कर्करोगत अनेक प्रकार असतात, त्यावर पुढील दिशा अवलंबून असते
कारणे
- धूम्रपान सर्वात महत्त्वाचे कारण (सक्रिय व निष्क्रिय दोन्ही प्रकार)
- प्रदूषण व धूर वाहनांचा धूर, औद्योगिक धूर, लाकूड/गोवऱ्यांचा धूर
- रासायनिक पदार्थ Asbestos, Radon gas, Chromium, Nickel यांसारखे पदार्थ
- अनुवंशिकता काही लोकांमध्ये कर्करोगाचा धोका आनुवंशिक असतो
- पूर्वीचा फुफ्फुस आजार जुना क्षयरोग (TB), COPD, इत्यादींमुळे जोखीम वाढते
लक्षणे
- फुफ्फुसाच्या कर्करोगाची लक्षणे सुरुवातीला सौम्य असतात म्हणून निदान उशिरा होते.
- सतत खोकला (नवीन किंवा वाढलेला)
- रक्तमिश्रित कफ (hemoptysis)
- छातीत वेदना किंवा अस्वस्थता
- श्वास घेताना त्रास
- आवाज बसणे (hoarseness)
- वारंवार फुफ्फुस संसर्ग (जसे न्यूमोनिया)
- वजन घटणे, भूक मंदावणे
- थकवा व अशक्तपणा
कर्करोग पसरल्यास (metastasis)
डोकेदुखी, हाडात वेदना, पिवळे डोळे, यकृत/मेंदू/हाडांवर परिणाम.
निदान (Diagnosis)
- छातीचा एक्स-रे (Chest X-ray) – प्राथमिक तपासणी.
- सिटीस्कॅन CT Scan / MRI Scan – गाठीचा आकार व पसरलेपणा समजतो.
- पेशी तपासणी Sputum Cytology – कफातील पेशींची तपासणी.
- ब्रॉन्कोस्कोपी Bronchoscopy – श्वासनलिकेतील ऊतकांचे निरीक्षण व नमुना (biopsy).
- नमूना तपासणी Biopsy – निदानाची खात्री करण्यासाठी आवश्यक.
- पेट स्कॅन PET Scan – कर्करोग शरीरात कुठे पसरला आहे हे पाहण्यासाठी.
उपचार (Treatment)
- उपचार कर्करोगाच्या प्रकार, टप्पा (stage), आणि रुग्णाच्या एकूण आरोग्यावर अवलंबून असतो.
- शस्त्रक्रिया कर्करोग फक्त एका भागात असल्यास गाठ काढून टाकतात.
- किरणोपचार (Radiation Therapy): उच्च उर्जेच्या किरणांनी कर्करोग पेशी नष्ट केल्या जातात. शस्त्रक्रियेनंतर किंवा केमोथेरपीसह दिला जातो.
- औषधोपचार (Chemotherapy): कर्करोग पेशींच्या वाढीला आळा घालणारी औषधे. याने रक्ताद्वारे संपूर्ण शरीरात परिणाम होतो .
- लक्ष्यित उपचार (Targeted Therapy): विशिष्ट जनुक (gene) किंवा प्रथिनांवर लक्ष्य करणारी औषधे. ही काही रुग्णांमध्ये उपयुक्त असतात.
- इम्युनोथेरपी (Immunotherapy) शरीराच्या रोगप्रतिकारक शक्तीला सक्रिय करून कर्करोगाविरुद्ध लढा देते.
कर्करोगाचे टप्पे (Stages)
- फुफ्फुसाच्या मर्यादित भागातच गाठ-उपचार करणे सोपे असते, पण वेळीच निदान झाले पाहिजे.
- आसपासच्या लिम्फ नोड्सपर्यंत प्रसार: उपचार जटिल असतात
- इतर अवयवांपर्यंत (हाड, यकृत, मेंदू) प्रसार; उपचार जटिल असतात
गुंतागुंत
- वजन घट, अशक्तपणा
- फुफ्फुसांमध्ये द्रव साठणे (Pleural effusion)
- रक्तस्त्राव; रक्तमिश्रित कफ
- मानसिक नैराश्य (Depression)
- श्वसन अपयश (Respiratory failure)
प्रतिबंध (Prevention)
- धूम्रपान पूर्णतः टाळा
- निष्क्रिय धूम्रपानापासून दूर राहा
- प्रदूषण, धूर व हानिकारक रसायनांपासून संरक्षण
- पौष्टिक आहार व नियमित व्यायाम
- नियमित आरोग्य तपासणी – विशेषतः धूम्रपान करणाऱ्यांसाठी
सारांश
- फुफ्फुसाचा कर्करोग हा टाळता येण्यासारखा आजार आहे.
- धूम्रपान टाळणे हेच सर्वात प्रभावी प्रतिबंध आहे.
- सुरुवातीच्या टप्प्यात निदान झाले तर उपचार शक्य असून आयुष्य वाढवता येते