
एखाद्या जोडप्याला मूलबाळ होत नसल्यास दोघांपैकी एकात किंवा दोघांमध्ये जीवशास्त्रीय दोष असू शकतो. वंध्यत्वाची तक्रार असलेल्या जोडप्यांपैकी 33 टक्क्यांत पुरुषाकडे दोष असतो. 33 टक्क्यांत स्त्रीमध्ये तर उरलेल्यांत दोघांमध्येही दोष असतो असे आढळले आहे.
संभोगाबद्दल अज्ञान, भीती, शुक्रपेशींची कमतरता, स्त्रीबीज तयार न होणे , गर्भनलिका रोगामुळे बंद होणे, गर्भाशयात गर्भ न राहणे इत्यादी प्रकारची कारणे वंध्यत्वामागे असू शकतात. मधुमेह, रक्तपांढरी इत्यादी आजारांत स्त्री-पुरुषबीज तयार होण्याची शक्यता कमी होते. लिंगसांसर्गिक आजार व क्षयरोग यांमुळे गर्भनलिका बंद होतात. यामुळे स्त्रीबीज गर्भाशयात येऊ शकत नाही.
वंध्यत्वावर उपचार करताना त्या जोडप्याची खूप मानसिक पूर्वतयारी लागते. पतिपत्नींनी एकमेकांवर दोषारोप न करता आधी कारण समजावून घेणे आवश्यक असते. यासाठी दोघांनी एकत्रच तपासणीला जाणे आवश्यक असते.
आधी पुरुषाच्या तपासणीत सक्षम शुक्रपेशी आहेत की नाही, ते पाहतात. ही तपासणी खूप सोपी आहे. हस्तमैथुनाने पुरुषाच्या वीर्याचा ताजा नमुना घेऊन सूक्ष्मदर्शकाखाली तपासला जातो. या शुक्रपेशींची संख्या आणि हालचाल पाहून वीर्य पुरेसे जननक्षम आहे की नाही हे कळते. यातच दोष असेल तर वंध्यत्वाचे निदान सोपे होते.
पुरुषांच्या तपासणीनंतर स्त्रियांच्या तपासणीत गर्भाशयाची तपासणी, गर्भनलिका मोकळी आहे की नाही, बीज तयार होते की नाही, इत्यादी तपासणी केली जाते. सोनोग्राफी आणि गर्भनलिकांची क्ष किरण तपासणी करतात.
वंध्यत्व तपासणीचे तंत्रज्ञान आता पुष्कळ प्रगत झाले आहे. यात शुक्रपेशी तपासणी, शरीरातील संप्रेरकांची पातळी तपासणी, गर्भाशयाची लॅपरॉस्कोपिक तपासणी, सोनोग्राफी, गर्भनलिका तपासणी इ. तंत्रे वापरली जातात. उपचाराच्या वेळेस यातल्या काही तपासण्या परत परत कराव्या लागतात.
शुक्रपेशी किंवा स्त्रीबीज नसेल तर गर्भधारणा होणे शक्य नसते. पण इतर कारणांवर उपचार होण्यासारखा असेल तर वंध्यत्वावर मात करता येते; यासाठी तज्ज्ञांची मदत लागते. अंधश्रध्दा न बाळगता सत्य परिस्थिती जाणून मार्ग काढणे आवश्यक असते. हे त्या जोडप्यास समजावून सांगणे आवश्यक आहे.
वंध्यत्वाच्या समस्येवर मात करण्यासाठी गेल्या काही वर्षात वैद्यकीय तंत्रज्ञानाने बरीच मजल मारली आहे. कारणाप्रमाणे योग्य तंत्रज्ञान वापरावे लागते. ही माहिती इथे थोडक्यात दिली आहे. वंध्यत्वावर उपचार करताना कारणाचे निदान करून योग्य उपाययोजना करावी लागते. कारणाप्रमाणे उपचारांची रुपरेषा खाली थोडक्यात दिली आहे.

वीर्यात शुक्र पेशींची संख्या आणि हालचालीची क्षमता तपासणी ही पहिली पायरी आहे. वीर्यामध्ये प्रति मिली 50 लाखापेक्षा कमी शुक्रपेशी असतील तर प्रजनन थोडे अवघड होते. त्यासाठी आधी दोन-तीन दिवस शरीरसंबंध न ठेवणे चांगले म्हणजे दिल्याचा रिपोर्ट योग्य येऊ शकतो. शुक्रपेशींची संख्या कमी असेल तर योग्य आहार विहाराने काही महिन्यात सुधारणा होऊ शकते. वीर्यात शुक्रपेशी कमी असण्याची अनेक कारणे आहेत. कुपोषण, मधुमेह, उतारवय, संप्रेरक बिघाड, स्थूलता, अति धूम्रपान, अति मद्य सेवन इ. विविध कारणे असू शकतात. योग्य जीवनशैली म्हणजे आहार विहार यामुळे काही कारणांमध्ये सुधारणा होऊ शकते. स्त्रीबीज निर्मितीचे चक्र लक्षात घेऊन दोन पाळयांच्या मधले दहा दिवस शरीरसंबंध केला तर दिवस राहण्याची शक्यता वाढते. विशेष करून स्त्रीबीज सुटण्याचे मधले दोन-तीन दिवस तपमान तक्ता किंवा शेंबटा तपासून शरीरसंबंध करण्याचे दिवस निवडले आणि तीन चार वेळा शरीरसंबंध केला तर जास्त यश मिळू शकेल.
सुधारित तंत्रज्ञानाने मृत शुक्रपेशी आणि कमी हालणाऱ्या शुक्रपेशी बाजूला काढून चांगल्या निवडल्या जातात आणि 0.3ml गर्भाशयाच्या आत सोडतात. वीर्याचा एक नमुना घेतला तर त्यात विभागून दोन-तीन वेळा वापरता येतो सोनोग्राफी तंत्राने स्त्रीलिंग स्त्रीबीज सुटले असल्याचे निदान करून अधिक अचूकता येते आणि अधिक यश मिळते.
मात्र शुक्रपेशी कमी संख्येनेच असतील तर एक पर्याय वापरला जातो. गर्भाशयात वीर्याचे इंजेक्शन देता येते. या तंत्रात त्या पुरुषाचे वीर्य प्रयोगशाळेत हस्तमैथुनाने जमा करून सिरींजमधून गर्भाशयात सोडले जाते. यातही शुक्रपेशी कमी असतील तल सेंट्रीफ्युज तंत्राने ते एकत्र करून इंजेक्शन दिले जाते. या तंत्राचा वापर अर्थातच स्त्रीबीज निर्मितीच्या वेळीच करतात. यासाठी सोनोग्राफी इ. तंत्रे वापरावी लागतात.
स्त्री बीजकोश, नलिका, गर्भाशय आदी विविध अवयवांमध्ये वेगवेगळ्या अडचणी येऊ शकतात. त्याचे निदान करण्यासाठी सोनोग्राफी आणि लॅप्रोस्कोपी ही प्रमुख तंत्रे वापरले जातात त्याचप्रमाणे आ रक्ताच्या तपासण्याचाही उपयोग होतो.
संप्रेरकांच्या असमतोलामुळे काही स्त्रियांमध्ये स्त्रीबीज निर्माण होत नाही. अशा स्त्रियांना संप्रेरक उपचार करून गुण येऊ शकतो.
क्लोमीफिन हे औषध स्त्रीबीज निर्मितीस चालना देऊ शकते. परंतु या औषधाचा धोका म्हणजे एका वेळी अनेक स्त्रीबीजे सुटतात. त्यामुळे एकापेक्षा जास्त गर्भ राहू शकतात. हे अर्थातच काही धोकादायक आहे.
स्त्रीबीज निर्मितीच्या वेळी गर्भाशयाच्या तोंडातील शेंबटा पारदर्शक आणि पातळ होतो. यामुळे शुक्रपेशी गर्भाशयात सहज प्रवेश करू शकते. काही स्त्रियांच्या बाबतीत गर्भाशयाच्या तोंडातील चिकटा कायमच घट्ट राहतो. याचे कारण जंतूदोष असू शकतो. यावर योग्य निदान करून जंतूविरोधी औषधे दिली जातात.
गर्भाशय नलिकेत अडथळा असेल तर स्त्रीबीज गर्भाशयात प्रवेश करू शकत नाही. अर्थात दोन्ही बाजूला गर्भनलिकांमध्ये अडथळे असल्यास स्त्रीबीज गर्भाशयात येणारच नाही. त्यामुळे गर्भाशयात गर्भ राहणे अवघड होते.(काही वेळा अशा स्त्रियांना गर्भनलिकेतच फलन झाल्याने अस्थानी गर्भधारणा होते.) काही वेळा गर्भनलिका दुरुस्त करून हा अडथळा काढून टाकता येतो. मात्र काही स्त्रियांच्या बाबतीत लॅपरॉस्कोपिक तंत्राने स्त्रीबीज बाहेर काढून कृत्रिम फलन करून गर्भाशयात ठेवता येते. यात अर्थातच पुष्कळ तपासण्या आणि पाठपुरावा लागतो.
काही वेळा गर्भाशयातच पडदा किंवा काही दोष असतात. अशा वेळी त्या त्या तपशिलाप्रमाणे उपचार करावे लागतात.