पचनसंस्थेचे आजार

थोडक्यात पचनसंस्थेची शरीररचना व कार्य

पचनसंस्था

आपण अन्न खातो त्याचे पुढे काय काय  होते? अन्नाचा घास तोंडामध्ये चावला जातो त्यात आपली लाळ मिसळते. ही लाळ गालांतल्या व जिभेखालच्या लालोत्पादक पिंडांतून तोंडात येते. या लाळेमुळे अन्न चावले जाताना थोडेसे पातळ व हलके केले जाते.

अन्न तोंडात घेतल्यापासून गुदद्वारातून मल  बाहेर पडेपर्यंत त्याचा प्रवास एका बंद नळीतून होतो. या नळीत जागोजागी त्याचे पचन होते. आवश्यक पदार्थाचे पचन, शोषण होऊन बाकीचे शेवटी बाहेर टाकले जातात. 

जठर

जठर ही एक दीड लिटर ची स्नायू-पिशवी उदरात असते. आपण घास गिळतो तो छातीतून खाली पोटात जातो हे जाणवते. गिळल्यानंतर घास अन्ननलिकेतून जठरात येतो. या जठराच्या पिशवीत  हायड्रोकलोरीक अमल आणि पेपसिन किण्व पाझरते,ही द्रव्ये अन्नात मिसळतात.  अन्न व सगळे रस तास-दीड तास घुसळले जातात. या घुसळण्यामुळे अन्नकण लहान व पातळ होतात. यामुळे अन्नातली प्रथिने पचण्यास सोपी होतात. एखाद्या वेळेस माणसाला उलटी होते; आणि ती तपासून जेवणानंतर किती वेळ गेला आहे ते कळू शकते. उलटीतून अन्न पदार्थ खाल्ल्याप्रमाणे जसेच्या तसे पडले असतील तर पचन न होता लगेच पडले असा त्याचा अर्थ करता येतो. मात्र अन्न ब-याच वेळाने उलटले तर ते खिरीसारखे पातळ व एकजीव कालवलेले दिसते. जठरात अर्धवट  पंचलेले अन्न पुढे आतडयात जाते आणि तिथे पचन पूर्ण होते.

जठरामध्ये काही पदार्थ, औषधे शोषली जाऊन रक्तात मिसळतात. ही क्रिया कशी होते ते पाहू या. जठराची पिशवी ही एक प्रकारच्या स्नायूंची बनलेली असते. या पिशवीत आतून मखमलीसारखे उतींचे  आवरण असते. या आवरणाखाली सूक्ष्म रक्तवाहिन्यांचे (केशवाहिन्यांचे) जाळे पसरलेले असते. जठरात शोषले जाणारे घटक या आवरणातून केशवाहिन्यांपर्यंत येतात. तेथून ते शोषले जाऊन रक्तात मिसळतात. यानंतर ते पुढे शरीरात सगळीकडे जातात.

आतडी

जठरातून अन्न पुढे आतडयात ढकलले जाते. आतडी दोन प्रकारची आहेत.

सुरुवातीला लहान आतडे असते. हे सुमारे 22 फुट लांब व सुमारे दीड इंची नळीच्या आकाराचे असते. (यातला अन्नमार्ग मोठया आतडयाच्या तुलनेत लहान व अरुंद म्हणून याला लहान आतडे असे म्हणतात.) उदरपोकळीत लहान आतडयाची वेटोळी असतात. आतडयांची ही नळी स्नायूंची बनलेली असते व त्यातही मखमलीसारखे आवरण असते.

अन्न जठरातून आतडयात आल्यानंतर त्यात लिवर मधून  पित्तरस व आणखी स्वादुपिंडातून येणारा स्वादुरस मिसळतो. तसेच आतडयातून आणखी एक रस (आंत्ररस) पाझरतो. या रसांमुळे अन्नातले सगळे घटक-काऱ्बोडके, प्रथिने, तेल-तूप आदि  नीट पचवले जातात. हे घटक हळूहळू आतडयांच्या आवरणातून रक्तात शोषले जातात.

अन्नाचे बहुतेक पचन व शोषण लहान आतडयात होते. बरीचशी औषधे लहान आतडयात शोषली जातात.लहान आतडयात काही वेळा आजार होऊन अतिसार, जुलाब होतात. या आजारात बहुतेक अन्न न शोषता तसेच बाहेर ढकलले जाते.

मोठे आतडे पाच-सहा फूट लांब पण रुंदीने मोठे असते. ते पोटात विशिष्ट रचना करुन बसवलेले असते. लहान आतडयातून चोथा व पाणी असलेला पातळ टाकाऊ पदार्थ मोठया आतडयात येतो. तेथे पाणी शोषले जाऊन सर्व चोथा आवळून बाहेर टाकला जातो.

मोठया आतडयाच्या सुरुवातीस उजव्या टोकाला एक मिरचीसारखा दिसणारा दोन-तीन इंचांचा अवयव असतो. याचा शरीराला तसा काही उपयोग नाही. मात्र त्याला सूज आल्यावर खूप त्रास होतो. हा अवयव म्हणजे आंत्रपुच्छ (अपेंडिक्स).

आतडयातील जीवाणू सृष्टि

आपल्या पचनसंस्थेमध्ये म्हणजे जठर सोडून सर्वत्र नेहमीच जिवाणू, विषाणू कवक म्हणजे फंगस आदि सूक्ष्मजीव-सृष्टी स्थायी रहिवासी म्हणजे नांदती असते. यात प्रकृतीप्रमाणे थोडेफार बदल होत असतात. मात्र यातले बरेचसे जिवाणू हे आपल्याला उपकारक असतात आणि अन्न-पचनामध्ये त्यांचा काही सहभाग असतो. तसेच शरीराच्या अनेक अंतर्गत चयापचय क्रियांवर या जिवाणूंचा काही प्रभाव असतो. काही जीवाणू बी12 जीवनसत्व बनवतात,शाकाहारी व्यक्तींमध्ये B12 प्रामुख्याने यामुळेच मिळते. मळामधील म्हणजे विष्ठेतील बहुतेक भाग पाणी आणि या जीवाणूभाराचा बनलेला असतो. नवजात बाल नैसर्गिक मार्गाने जन्मले तर मातेच्या योनि-गुदमार्गातील जीवाणू त्याला आपोआप मिळतात (सिजेरियन बाळांना हा लाभ काही काळानंतर होतो). हे बहुतेक जीवाणू कोलिफॉर्म, क्लोस्तरीडियम आदि प्रजातींचे असतात.

काही कारणाने या आतडयातल्या जीवसृष्टीत बदल झाला, नवीन जीवाणू आले किंवा जुने गेले तर पचनक्रियेमध्ये थोडा बदल जाणवू शकतो. मोठे किंवा लक्षणीय बदल झाले तर जुलाब होणे, गॅस होणे असे प्रकार घडतात. मळाला येणार वास या जीवाणू प्रक्रियेचाच परिणाम असतो.  

आज असे मानले जाते की या जिवाणूमुळे अन्न खाण्याचे इच्छेमध्ये काही बदल होऊ शकतात. मधुमेह, स्थूलता अपचन आधी आजारांमध्ये काही जिवाणूंचा विशेष प्रभाव आहे असे मानले जाते. जेव्हा आपण अँटिबायोटिक्स म्हणजे प्रतिजैविक औषधे घेतो त्यावेळेला यातले बरेचसे जिवाणू मरून जातात व आपल्याला पोट बिघडल्याचे जाणवते. काही दिवसांमध्ये ही जीवाणूसृष्टी पुनर्स्थापित होते आणि पचनव्यवस्था आणि शरीरव्यवस्था पूर्वीप्रमाणे चालू लागते.  काही जुलाब अतिसार या आजारांमध्ये औषधांबरोबरच काही जिवाणू चक्क औषध म्हणून देण्याची आता पद्धत आहे.  औषधांच्या दुकानात या जिवाणूंच्या कॅप्सूल किंवा लहान मुलांसाठी पातळ औषधे  मिळतात (प्रो बायोटिक्स).  ही जीवाणू निरोगी व्यक्तीकडून घेऊन वाढवलेली असतात. यामुळे आवश्यक जिवाणूसृष्टी पुनस्थापित होऊ शकते. 

पाचकरस व यकृत

आवश्यक ते पाचकरस लालोत्पादक पिंडातून, जठरातून, लहान आतडयातून येतात. तसेच ते यकृत (लिव्हर) व स्वादुपिंडातून येतात. पोटात उजव्या बाजूला वरती यकृत (लिव्हर) हा हिरवट तपकिरी रंगाचा मोठा (एक ते दीड किलो वजन) अवयव असतो. यातून पित्तरस पाझरतो पित्ताशयातून पित्तरस लहान आतडयात येतो.

याशिवाय यकृताचे महत्त्वाचे काम म्हणजे रासायनिक प्रक्रिया. आतडयात शोषलेले सर्व अन्नघटक व पदार्थ रक्तावाटे आधी यकृतात येतात. तिथे त्यातील साखर, प्रथिनघटक, स्निग्धद्रव्ये, जीवनसत्त्वे, क्षार अशी विभागणी होते. यानंतर आवश्यक ते पदार्थ रक्तात सोडणे, बाकीचे साठवून ठेवणे वगैरे कामे पार पाडली जातात. वापरुन झालेले रक्तातील घटक, औषधे, विषारी द्रव्ये यांची विल्हेवाट लावण्याचे काम यकृताचेच असते. थोडक्यात, यकृत हा शरीराचा जणू रासायनिक कारखाना आहे. (काही लोक याला काळीज म्हणतात पण काळीज म्हणजे खरोखर यकृत नसून हृदय असते).

मलविसर्जन

सर्वसाधारणपणे अन्न खाल्ल्यापासून आठ -दहा तासांत सर्व पचनक्रिया पूर्ण होऊन मळ बाहेर टाकण्यास योग्य होतो. सर्वसाधारणपणे दिवसातून एकदाच तो बाहेर टाकला जातो. पण काही जणांना मलविसर्जन दिवसांतून दोनदा तर काहींना दोन-तीन दिवसांतून एकदा असेही प्रमाण असू शकते.

आहारातील पदार्थाप्रमाणे मळाचे प्रमाण ठरते. जर आहारात भाजीपाला, कोंडा वगैरे चोथा असणारे पदार्थ कमी असतील तर मळाचे प्रमाण कमी होते. यामुळे शौचास साफ होत नाही. आहारात चोथा असणे आरोग्याला अत्यंत आवश्यक आहे.

संतुलित आहार आणि कोंडयाचे महत्व

पचन संस्थेच्या आणि एकूण आरोग्यासाठी संतुलित आणि पोषक आहार आणि कोंडा/तंतु आवश्यक आहेत. संतुलित अहराबद्दल स्वतंत्र विवेचन केले आहे. इथे आपण फक्त कोंडयाचे महत्व पाहणार आहोत. आपल्या धान्यात ,भाजीपल्यात काही भाग न पंचणारा  आणि तंतुमय असतो. ज्वारी-गव्हात काही भाग कोंडा असतो तो हाच. पूर्वी चाळणी  वापरुन पिठातील कोंडा बाजूला काढला जायचा . त्याचे महत्व आता समजले आहे. तांदूळ जास्त पॉलिश केल्याने देखील कोंडा-भाग निघून जातो, म्हणून उकड्या तांदूळ चांगला ठरतो. भाजीपाला, सॅलड, फळे, डाळी, कडधान्यावरचे आवरण/साल यातही तंतुमय कोंडा असतो. याउलट मांस-मासे, अंडी, दूध, मैदा, मिठाई यात काहीच कोंडा नसतो. आपल्या भोजनात 5-10% कोंडा आवश्यक आहे, म्हणजे रोज निदान 30-40 ग्राम कोंडा पोटात गेला पाहिजे, त्याचे पुढील लाभ आहेत: (1) भोजन पचायला आणि आतडयाच्या हालचालीला चलन मिळते (2) पोट साफ होते, कारण न पचलेला तंतुमय पदार्थ मळाला घट्टपणा आणि आकार देतो, त्यामुळे विष्ठा नीट बाहेर पडते. (3) तंतुमय पदार्थात उपयुक्त जीवाणू राहतात, वाढतात आणि त्याचे फायदे होतात. (4) आहरात कोंडा/तंतु असल्याने आतडयाचा कर्करोग लोकाना कमी प्रमाणात होतो असे सिद्ध झाले आहे. (5) रक्तातील साखर आणि कॉलेसटेरोल यांचे प्रमाण कमी राहते (6) अति रक्तदाब, मधुमेह रोखता येते.  

लहानपणापासूनच कोंडा आहारात असावा आणि त्याची सवय लागली पाहिजे.