न्यूमोनिया किंवा क्षयरोग यात फुप्फुसांचा जंतुदोष होतो. हा जंतुदोष फुप्फुसांच्या दुपदरी आवरणापर्यंत पोचला तर या आवरणासही जंतुदोष होतो. निरोगी अवस्थेत या दुपदरी आवरणात थोडा द्रव असतो. फुप्फुसाच्या हालचालीस असे आवश्यक असते. जंतुदोषामुळे यात पाणी, पू होतो. यामुळे त्या भागातल्या फुप्फुसाची हालचाल कमी होते व श्वसनाला अडथळा येतो. क्ष किरण चित्राने याचे चांगले निदान होऊ शकते.
छातीच्या संबंधित भागात दुखते व दम लागतो. जंतुदोषामुळे ताप आणि थकवा जाणवतो. या भागात बोटाने ठोकल्यावर ‘ठक्क’ असा (घट्ट) आवाज येतो. आवाजनळीने तपासल्यावर श्वसनाचे आवाज त्या भागात अजिबात ऐकू येत नाहीत.

क्षयरोग हा विशिष्ट सूक्ष्म जंतूमुळे, म्हणजे जिवाणूंमुळे होणारा आजार आहे. क्षयरोग हा सामान्यपणे फुप्फुसाचा आजार असला तरी आतडी, त्वचा, रसग्रंथी, मेंदू, सांधे, हाडे, इत्यादी निरनिराळया अवयवांमध्ये तो होऊ शकतो. आपल्या देशात याचे प्रमाण फार म्हणजे हजारी 20 इतके आहे. सर्व वयोगटांत हा आजार आढळतो. पण लहान मुलांमध्ये आणि मोठया माणसांत या रोगाचे वेगवेगळे रुप दिसते.
निकृष्ट राहणीमान, आणि कुपोषण हे क्षयरोगाचे सर्वात महत्त्वाचे कारण आहे. इंग्लंड-युरोपमध्ये एकेकाळी मोठया प्रमाणावर असलेला हा आजार तेथले राहणीमान सुधारताच खूपच कमी झाला. त्या वेळी क्षयरोगाची औषधे अजून निघायची होती. आपल्याकडे मात्र औषधे निघूनही क्षयरोगाचे प्रमाण खूप आहे. याचे कारण हेच, की निकृष्ट राहणीमानांचा प्रश्न शिल्लक आहे. अपुरा आहार, कोंदट घरे, गोठयासोबत राहणे, उपचाराचे प्रमाण कमी अशा परिस्थितीत क्षयरोग बऱ्याच टिकून आहे. रस्त्यावर व इतरत्र थुंकण्याची सवय अगदी वाईट खरी, पण हे क्षयरोगाचे मुख्य कारण नाही. 2015 पर्यन्त क्षयरोग-अंताचे म्हणजे निर्मूलनाचे उद्दिष्ट 2030 पर्यन्त तरी पुरे झाले पाहिजे यासाठी आपण प्रयत्नशील राहुया.
प्रसार आणि आजार स्वरूप : हा आजार माय बॅक्टीरिया मुले होतो आणि क्षयरोग श्वासातून हवेवाटे, पसरतो. आजार कुटुंबात आणि शजरी-पाजारी यात पसरत असला तरी अगदी अल्प सहवासतून देखील पसरू शकतो. तरुण वयापर्यंत बहुतेक लोकाना याचा संसर्ग होऊन जातो पान फक्त 1-2 टक्के लोकाना याचा आजार होतो.
क्षयरोग हा सौम्य पण दीर्घ प्रकारचा दाह आहे. हा आजार महिनोनमहिने चालतो. यातही दोन मुख्य प्रकार आहेत. (अ) लहान मुलांमध्ये होणारा क्षयरोग. (ब) प्रौढ वयात येणारा क्षयरोग.

लहान मुलांच्या क्षयरोगाच्या प्रकारात शरीराचा जंतूंशी प्रथमच संबंध येतो. यात फुप्फुसात एक ठिपक्याइतका डाग तयार होतो. बालकाची प्रतिकारशक्ती अजून तयार झाली नसल्याने छातीतल्या रसग्रंथीपर्यंत वेगाने जंत पोचतात. यामुळे छातीतल्या रसग्रंथी सुजतात. या सर्व घडामोडीत मुलाला सहसा त्रास होत नाही. यामुळे रोगाला रसग्रंथीतच अटकाव होतो. काही महिन्यांनी असा आजार पूर्ण बरा होतो. याची वरून काहीही लक्षणे-चिन्हे नसतात.
असा प्रथम क्षयरोग आजार फक्त छातीचे क्ष-किरण चित्र व कातडीवरची विशेष परीक्षा (टीटी) करूनच कळू शकतो. काही वेळा याबरोबर छातीतल्या रसग्रंथी सुजल्याने गिळायला थोडाफार त्रास होतो.
भारतात बहुसंख्य व्यक्तींना हा प्राथमिक आजार होऊन गेलेला असतो. तो कळत पण नाही. मात्र काही बालकांचा प्राथमिक आजार बरा होत नाही. यातून खालीलप्रमाणे दोन फाटे फुटतात.
(अ) काही मुलांमध्ये प्रतिकारशक्ती मुळात अपुरी असते. यामुळे क्षयरोग रसग्रंथीच्या पलीकडे निरनिराळया इतर अवयवांत (मेंदू, मणके, सांधे, हृदय, इ.) पसरतो. ज्या अवयवांचा आजार होतो त्याप्रमाणे लक्षणे-चिन्हे असतात.
(ब) याउलट काही मुलांमध्ये फुप्फुसातच जागच्या जागी आजार वाढत राहतो. या फुप्फुसांच्या आजारात न थांबणारा खोकला, बारीक ताप, रोडपणा, वाढ मंदावणे, कुपोषण, इत्यादी लक्षणे आढळतात.
ब-याच मुलांमध्ये हा सौम्य चिवट आजार कळून येत नाही. मुद्दाम शंका घेऊन खास तपासणी केल्यास आजार-निदान होतो. यासाठी पुढील लक्षण-चिन्हे ध्यानात घ्यावी (1) दोन आठवड्यापेक्षा जास्त चाललेला ताप किंवा खोकला, आणि उपचाराने बरे न होणे (2) वजनात >5% घट, खाणेपिणे बरे असूनही घट होणे (3) बालकाचा घरात-शेजारी क्षयरोग रूग्णाबरोबर निकट संबंध आलेला असणे . यापासून शंका घ्यावी. रोगनिदान करण्यासाठी क्ष-किरण चित्र ही मुख्य तपासणी आहे.
योग्य उपचाराने हा आजार पूर्ण बरा होतो, त्यासाठी नजीकच्या आरोग्य केंद्रात जाऊन मदत मिळवावी. आशा देखील आपल्याला मदत करतील.