पचनसंस्थेचे आजार

आम्लपित्त

आम्लता ही नेहमी आढळणारी तक्रार आहे.

ब-याच माणसांना कधी ना कधी याचा अनुभव येतोच. पण काही जणांना आम्लतेचा नेहमी त्रास होतो. सध्या हा आजार पचनसंस्था-मेंदू संबंध बिघडण्याशी जोडला जात आहे, त्याबरोबर बद्धकोष्ठ आणि आतडीदाह हेही आजार याच गटात धरले आहेत. परंतु पचन-मेंदू संबंध बिघाड म्हणण्याआधी इतर करणे वस्तुनिष्ठ रित्या तपासून घायला पाहिजेत.

आम्लता किंवा आम्लपित्त म्हणजे जठरात प्रमाणापेक्षा जास्त आम्ल (आंबट द्रव) तयार होणे. या जादा आम्लामुळे पोटात जळजळ, तोंडात आंबट पाणी येणे, छातीत जळजळ अशा तक्रारी निर्माण होतात. कधीकधी जठरातले पदार्थ उलटीवाटे बाहेर पडतात.

खालील कारणांनी आम्लता येऊ शकते.

  • नेहमी जास्त तिखट, मसालेदार, तेलकट पदार्थ खाणे.
  • मानसिक ताण, काळजी, सदैव घाई-गडबड.
  • अनियमित जेवणाची सवय., जागरण
  • धूम्रपान, तंबाखूसेवन, दारूसेवन, इत्यादी.
  • काही औषधांमुळे आम्लता होते. उदा. ऍस्पिरीन, सांधेदुखीची औषधे.
  • हेलिकोबॅक्टर पायलॉरी नावाच्या एका जिवाणूंशी आम्लता आणि जठरव्रणाचा संबंध आढळला आहे. जठरव्रणापैकी साठसत्तर टक्के जठरव्रण हे या जिवाणूंमुळे होतात. ही जिवाणू जठरात आमळता असूनही जगू-वाढू  शकतात. (श्वासावर एक युरिएज टेस्ट करून देखील हा संसर्ग कालू शकतो, पण ही टेस्ट सर्वत्र उपलब्ध नाही.)
  • आम्लपित्तामुळे पुढे अल्सर (जठरव्रण किंवा आंत्रव्रण ) निर्माण होऊ शकतो. अल्सर असेल तर पोटात एका ठरावीक जागी दुखत राहते. जेवणामुळे हे दुखणे थोडे थांबते तरी किंवा वाढते तरी. आंत्रव्रण असल्यास भोजनानंतर  तास दीड तासाने दुखायला लागते, कारण अन्न  तासभर तरी जठरात असते. वारंवार/सतत होणाऱ्या आम्लपित्तावर उपचार करताना तो अल्सर नाही याच्याबद्दल खात्री करून घ्यावी. एंडोस्कोपीने ही निदान आता अगदी सहज होते.
  • Haiatus hernia (आतला हर्निया ) : अन्न नलिका जठराला जिथे जोडलेली असते, तिथे श्वासपटलामध्ये  एक  स्नायूची झडप (sphincter) असते. तीसैल झाल्यास जठराचा काही भाग वर खेचला जाऊ शकतो. त्याला आतला हर्निया म्हणता येईल..आहार विहार सुधारून फायदा न झाल्यास काही लोकांमध्ये या साठी ओपेरेशन करावे लागू शकते .
उपचार
  • जेवणात नियमितता ठेवावी.भुकेच्या वेळीच शक्यतो जेवावे.
  • साधा आहार घ्यावा. तेलकट, तिखट पदार्थ टाळावेत.भुकेपेक्षा जास्त खाऊ नये.
  • मानसिक ताण, काळजी, सदैव चिंता यांच्यावर नियंत्रण ठेवावे. (व्यायाम, विश्रांती, करमणूक वगैरेमुळे उपयोग होईल.)
  • आम्लविरोधी (ऍंटासिड) गोळया घेतल्यावर जळजळ कमी होते. दुधामुळे काही जणांची आम्लता कमी होते तर काही जणांची वाढते.
  • आयुर्वेद – सूतशेखर मात्रा (गोळी).
  • वारंवार तक्रार असल्यास तज्ञ डॉक्टरकडून तपासणी आवश्यक आहे.
होमिओपथी निवड

आर्सेनिकम, कल्केरिया कार्ब, कॉस्टिकम, फेरम फॉस, लायकोपोडियम, नक्स व्होमिका, पल्सेटिला, सल्फर.

इरिटेबल बॉवेल सिंड्रोम (IBS) उर्फ अस्वस्थ आतडी

 हा आजार अनेक जणांना असतो. यात प्रत्यक्षात आढळणारा  दोष नसून पचन मेंदू संस्था संबंधामधला काही बिघाड असे याचे कारण सांगितले जाते. सामान्यपणे हा आतडे दाह प्रकारचा त्रास असतो. मात्र आतड्यात तसा काही दोष नसतो.  अमिबामुळे होणाऱ्या अवेचा जसा त्रास असतो तसाच हा त्रास होतो. आतड्यामध्ये दुखत राहते म्हणजे वेट येतात भूक कमी होते आतड्यांचे चलन वलन कमी जास्त होते त्यामुळे कधी शौचास  वारंवार होणे, सैलपणा, फुगल्यासारखे वाटणे शौचास  नीट होत नाही अशी भावना असणे विष्ठे बरोबर शेंबडा पडणे आधी त्रास होतो. अर्थात याचे निदान निरनिराळ्या तपासण्या करून बाकी काही आजार नाही असे निश्चित झाल्यावरच करता येते. हा त्रास निदान तीन महिने आहे किंवा जास्त आहे असे असले तरच रोगनिदान नक्की होते तोपर्यंत घाईने निर्णय घेता येत नाही.

 याचबरोबर याचे निदान करताना बाकी काही आजार नाही याच्या निश्चितीसाठी काही निकष पाळायला पाहिजेत:  45 वर्षाच्या वरील वयोगट, रक्त पांढरी म्हणजे ॲनिमिया, विष्ठे बरोबर कमी अधिक प्रमाणात रक्त जाणे, रात्री येणारी लक्षणे, पोटात गाठ किंवा गोळा लागणे, आणि कुटुंबामध्ये आतड्याचा कॅन्सर होऊन गेला असणे यापैकी काही असेल तर विशेष तपासण्या करून खात्री करायला पाहिजे 

 वैद्यकीय उपचार करताना तणावग्रस्त मनस्थिती/ नैराश्य/ /इत्यादी मानसिक आजाराचा दृष्टिकोन ठेवून उपचार करावे लागतात. याचबरोबर योग्य व्यायाम, खेळ, योगासने, आहारात पथ्यापथ्य, मानसिक ताणतणाव दूर करणे, हे उपाय आवश्यक आहेत 

 आतड्यांचे वेठ (कळ) कमी करण्यासाठी काही औषधे देता येतात. तसेच पोट साफ होण्यासाठी सौम्यविरेचक उपयुक्त ठरतात. आतड्यातील जीवाणूसृष्टी पुनस्थापित करण्यासाठी प्रोबायोटिक्स औषध, दही यांचा उपयोग होऊ शकतो. काही जणांना दूध पचत नाही त्याऐवजी दही घेणे चांगले. प्रोबायोटिक्स पेक्षा  दही जास्त उपयुक्त आहे.