मानसिक आरोग्य आणि मनोविकार

शरीर क्रियांमध्ये दिसणारे बदल

  • झोपेच्या चक्रात बदल, अनियमितता, निद्रानाश, कधीकधी जास्त झोप.
  • दिवसा जास्तच झोपाळूपण
  • साधारणपणे भूक कमी होते, मात्र एका आजारात ती फार वाढते
  • कागद, धातू, माती इ. पदार्थांबद्दल खायची ओढ लागते. यावरून शंका घ्यायला हरकत नाही.
  • लैंगिक इच्छा साधारणपणे कमी होते किंवा नष्ट होते. उन्माद विकारात लैंगिक इच्छा वाढलेली असू शकते.
शुद्धी-जागृती इ.चे बदल
  • सामान्यपणे निरोगी माणूस झोपेचा काळ सोडता जागृत आणि सचेतन असतो. काही मनोविकारात यात कमीअधिक घट होते.
  • थोड्या काळापुरता मनोरुगण अचेतन किंवा गुंगल्यासारखा दिसणे.
  • गोंधळलेपण हे एक सौम्य लक्षण आहे.
  • अर्धवट शुद्धी किंवा ग्लानी अवस्था.
  • प्रतिसाद न देणे.
  • मनोरुग्णाला या अवस्थांबद्दलची जाणीव नसू शकते.
  • स्वत:चे नाव, ओळख, गावाचे नाव, नाती, शिक्षण वगैरे भान संपणे ही वरची पायरी आहे.
  • स्थळकाळाचे भान बिघडणे किंवा नष्ट होणे. उदा. मी किंवा तू कोण आहे, आपण कुठे आहोत वगैरे सामान्य गोष्टी न आठवणे.
लक्ष विचलित होणे

आपले लक्ष सतत इकडे तिकडे बदलत राहणे हे एक महत्त्वाचे लक्षण आहे.

असे लक्षण लहान मुलांमध्ये आढळले तर तो एक स्वतंत्र विकार असतो

प्रेरणा कमी होणे

अशी व्यक्ती स्वत:ची नेहमीची कामे देखील सुरू करू शकत नाही कारण त्या वक्तीची प्रेरणा कमी झालेली असते.

स्वत:ची इच्छा आणि स्व प्रेरणा कमी होणे हे बहुधा भ्रमविकार किंवा नैराश्यविकाराचे लक्षण असते.

हालचालीसंबंधी लक्षणे

अशी व्यक्ती सामान्य व्यक्तींपेक्षा लक्षात येईल इतकी कमी किंवा जास्त हालचाल करत असते.

या व्यक्तीला एखादा स्नायूगट सतत—राहत असल्याने वारंवार काही हालचाली होत राहतात. या हालचाली सहसा कपाळ, भिवया, ओठ इ. दर्शनी भागावर जास्त जाणवतात.

काही जण वारंवार खोकल्याचे किंवा तत्सम आवाज काढतात किंवा कण्हतात.

विचित्र हातवारे उदा. सारखे डोके खाजवणे, नाकाशी चाळा, घसा साफ करणे, खांदे उडवणे वगैरे गोष्टी मूलत: निरर्थक असतात पण वारंवार होणे हे मनोविकारांचे लक्षण असू शकते.

अर्थात अशा काही गोष्टी आपल्याला सामान्य निरोगी लोकांमध्येही दिसतात. म्हणूनच इतर लक्षणे आहेत की नाही याचा शोध घेणे महत्त्वाचे असते.

चेहर्‍यावरचे हावभाव आणि पवित्रे

काही व्यक्ती विचित्र स्थितीत बसतात किंवा उभे राहतात. उदा. सारखे वाकून बोलणे किंवा खोटेच टेकल्याप्रमाणे दिसणे वगैरे.

चेहर्‍यावरचे हावभाव कधीकधी अत्यंत मंद किंवा अतिरेकी असू शकतात.

बोलण्यातले बदल

इतर व्यक्तींनी बोललेल्या वाक्यांचे किंवा शब्दांचे मागोमाग उच्चारण करणे असे एक लक्षण दिसून येते.

बोलण्यामध्ये ज्यादा जोर लावून बोलणे हे उन्मादाचे निदर्शक असू शकते.

अति बडबड, असंबद्ध बडबड, सतत गाणी म्हणत राहणे ही लक्षणे असू शकतात.

संवेदनांमधले बदल

संवेदना म्हणजे डोळे, कान, त्वचा, नाक, जीभ यामधून होणार्‍या ऐंद्रिय संवेदना. यातूनच आपल्याला ज्ञान होते. मनोविकारांमध्ये हे संवेदन बिघडलेले असू शकते. यात अनेक प्रकार आहेत. काही वेळा एखादी वस्तू पाहून त्याबद्दल दुसराच ग्रह करून घेणे याला भास किंवा भ्रम म्हणता येईल. उदा. एखाद्या झाडाला किंवा ढगाला पाहून भूत किंवा देव वगैरे मानणे.

काही वेळा संवेदना वस्तू प्रत्यक्ष नसतानाही तसा भास होणे. उदा. कुठलाही आवाज निर्माण होत नसताना उगाचच आवाज ऐकू येणे हे एक महत्त्वाचे आरि वारंवार दिसणारे लक्षण आहे. अशा व्यक्ती सतत काहीतरी आवाज किंवा वाक्य ऐकल्याचे सांगतात जी आपल्याला ऐकू येत नाही. उदा. आपल्या दिवंगत आई-वडिलांचे किंवा दूरच्या नातेवाईकांचे बोलणे ऐकू येते असे वाटणे.

मूड किंवा मनोवस्था बदलणे

जास्त भीती, तणाव, दु:ख, राग किंवा अत्यानंद वगैरे मूड किंवा मनोवस्था बिघडण्याची लक्षणे-चिन्हे असतात.

काही वेळा समोरच्या प्रसंगाशी त्या व्यक्तीचा मूड किंवा वागणे जुळत नाही. उदा. कुणाच्या मृत्यू प्रसंगी आनंद दाखवणे किंवा हसत सुटणे.

मूड किंवा मनोवस्था सतत हिंदोळ्यांप्रमाणे खालीवर होत राहणे हे गंभीर-मानसिक आजाराचे लक्षण आहे.

स्मृतीबदल

काही रुग्णांना फक्त लांबचे आठवते किंवा काहींना फक्त ताज्या घटनाच आठवतात.

काही जणांची आठवण संदर्भाशिवाय किंवा चुकीच्या प्रसंगाशी जोडून येते.

स्मृती भ्रंश किंवा अल्झायमरच्या आजारात सर्व प्रकारची स्मृती कमी होत जाते. इतकी की स्वत:चे नाव, नाते, पत्ता, दिनमान वगैरे गोष्टीही समजेनाशा होतात.

वैचारिक आणि संकल्पनात्मक बदल

विचारांमधले बदल व बिघाड हे गंभीर मानसिक आजारांचे सूचक असतात. विचारांची संगती, संबंध लागत नाही किंवा अतर्क्य विचार सुचतात.

काही व्यक्ती असे शब्द वापरतात की ज्यांचा अर्थ फक्त त्यांच्यापुरताच असतो. तो इतर कुणालाही कळत नाही. म्हणजेच अशा व्यक्ती काही वेगळाच शब्द निरर्थकपणे वापरतात.

काही वेळा विचारांची साखळी अपूर्ण राहते तर कधी विचारांची दिशाच भरकटते.

काही वेळा विचारशक्ती अत्यंत क्षीण व मंद होते तर याउलट काही व्यक्ती सतत या विचारापासून त्या विचारावर उड्या मारत असतात. – चंचलता

भ्रम म्हणजे सबशेल खोट्या धारणा. प्रेम, द्वेष, धोका, आजार, भीती, वैभव, सत्ता, शिक्षण, नाती इ. बद्दल काही भ्रामक समजूती बाळगणे हे घडून येते.या गंभीर आजारांच्या खुणा आहेत. (उदा. एका माणसाला वाटत होते की तो मंत्री झाला आहे – प्रत्यक्षात नसूनही. )

आत्मभान आणि निर्णयशक्ती

भ्रमविकारामध्ये त्या व्यक्तीला स्वत:चे भान नसते किंवा अत्यंत अपूर्ण असते. स्वत:च्या आजाराबद्दल भानच नसल्यामुळे अशा व्यक्ती वैद्यकीय उपचारांना तयारच नसतात, त्यांना न्यावे लागते. याउलट सामान्य मनोविकारांमध्ये हे भान शाबूत असल्यामुळे या व्यक्ती उपचार घ्यायला तयार असतात.

एखाद्या प्रसंगात २-३ विधानांचा किंवा घटनांचा क्रमवार अर्थ लावून अर्थ काढणे आणि निर्णय देणे अशा व्यक्तींना शक्य होत नाही.

मनोविकारांच्या केसपेपर्सवरून संग्रहित केलेली काही लक्षणचिन्हे

मादक पदार्थांचे व्यसनरोज दारू लागते त्याशिवाय राहत नाही.
 नेहमी भांग पितो
  
आक्रमक आणि रागीट स्वभावसारखा भांडण करतो आणि धमक्या देतो.
 अचानक चावायला बघतो.
  
जागृती-शुद्धीनेहमी गोंधळलेला असतो.
 सारखी चक्कर येते असे सांगते
  
 भ्रम
 सारखी घर अंगावर पडल्याची तक्रार करतो.
 साप नसतानाही नेहमीच साप आला म्हणून सांगतो.
 सारखा इतरांचा संशय घेते.
 नेहमी घाबरलेला असतो.
 लोक माझ्यावर हल्ला करतात असे सांगतो.
 कुणीतरी दबा धरून हल्ला करणार असे नेहमी सांगतो.
 स्वत:ला नेहमी कोंडून घेतो.
 घरातून सारखे पळून जाते
 रोज मला देव भेटतो असे सांगते.
 स्वत: देव असल्यासारखा बोलतो आणि वागतो.
 बायकोचा नेहमी संशय घेतो, अनैतिक संबंधाचा आरोप करतो
 स्वत:ला कायम मंत्री किंवा आमदार समजत असतो
  
प्रगटीकरणसारखे मोठमोठ्याने गाणे म्हणतो
 कधीपण कारणाशिवाय हसत सुटतो.
 चेहर्‍यावर आनंद, राग, दु:ख काहीच दाखवत नाही
  
भासटी.व्ही. रेडिओमधून काहीतरी वेगळेच ऐकतो, सांगत सुटतो.
 कानात सारखे बोलणे ऐकू येते असे सांगतो.
  
स्मृतीयेताजाता विसरत असतो, विसरून काहीही करतो.
  
मूडनेहमीच हवेत असतो.
 येताजाता सतत रागावतो.
 नेहमी वैतागलेली आणि गोंधळलेली असते.
 कुणाशीही मिसळत नाही, बसून राहतो.
 सारखे देवळात जाऊन बसून राहते.
 सारखा रडतो आणि कण्हत असतो.
 नेहमीच दु:खी आणि कष्टी दिसतो आनदी कधीच नाही.
 मनावर ताबाच नसतो.
 मनाला शांतताच नाही, नेहमीच वैतागलेला दिसतो.
 नेहमी कुठेतरी शुन्यात बघत राहतो.
 लग्नाच्या बायकोशी नांदत नाही (लैंगिक इच्छा नाही)
  
इजा करणे२-३ वेळा त्याने आत्महत्येचा प्रयत्न केला.
 लोकांवर धाऊन जातो.
 नेहमी स्वत:ला मारून घेतो.
 बैलांवर सारखा राग काढतो आणि भरंकर मारझोड करतो.
 बायकोला रोज मारहाण करतो.
  
हलाचाल बिघाडविचित्र चालणे
 विचित्र हातवारे करतो.
 सारखी पुजा करत बसतो.
 अशक्तपणाची सतत तक्रार
 सारखे चेहरे वेडावून दाखवतो.
 शेतात सारखा काम करत बसतो, विश्रांती घेत नाही
 झटके येतात (फेफरे)
 कुणाच्याही मागे लांब चालत जातो.
 येताजाता झाडावर चढून तासन् तास बसतो.
 आपली मान आणि डोके सारखे हलवत राहतो.
 कधीपण वेडावाकडा नाच करत असतो.
 दिवसभर जमिनीवर काठी आपटत बसतो.
 गावात सारखा बिनकामाचा भटकर राहतो.
 उगीचच निरर्थक हातवारे करतो.
 कुणालापण येताजाता नमस्कार करतो.
 हातपाय सारखे कडक झाल्याचे सांगतो.
 कुणालाही दगड मारतो आणि लहानांवर धावून जातो.
 हाताला नेहमी कंप असतो.
  
मंत्रचळेपणासारखी हातपाय धुते, दिवसातून कितीतरी वेळा.
 आपली गादी सारखी गुंडाळतो आणि परत पसरतो.
  
आत्मभान बिघडणेअगदी लहान मुलासारखा वागतो.
 कारण नसताना गावात भीक मागत हिंडतो.
  
आजूबाजूचे भानदिवस, तारीख जागा सांगू शकत नाही, सकाळ दुपार कळत नाही.
 माहितीतल्या लोकांनाही ओळख देत नाही.
 नातेवाईकांनाच ओळखत नाही.
 कधीपण कोणाचेपण कपडे घालतो.
 माणसे असतानाही त्यांच्यासमोर कपडे काढून टाकतो.
 दिवसा-रात्री कधीही घरी येतो त्याचा नेम नाही.
  
संवेदनाऐकू येत नाही.
 कानात निरनिराळे आवाज ऐकू येतात
  
शरीरक्रिया बिघाडनीट खात-पित नाही
 जेवण, झोप, स्वत:बद्दल काही चिंता नाही.
 कोठेही संडास करून ठेवतो.
 जेवणाची शुद्धच नसते.
 कोठेही लघवी करतो त्याला धरबंध नाही.
 कपड्यात लघवी करते.
  
झोपझोपच लागत नाही. रात्री कितीवेळा पण उठते.
 सारखी झोपते
 सतत जांभया देत असतो.
 कितीतरी आठवडे झोपत नाही
  
शारीरिक त्रासाची लक्षणेसतत पोटदुखी म्हणून सांगतो.
 मान मोडल्याचे सांगतो त्यामुळे मान वळवून पाहत नाही.
 पोटात जळजळ सांगतो.
 सारखी डोकेदुखीची तक्रार असते.
 नेहमी छातीत धडधड होते.
 नेहमीच काहीतरी दुखत असते.
 हातपाय बधीर होऊन गार पडतात असे सांगतो.
  
बोलणेकोणालाही शिव्या देतो.
 सारखी बडबड
 कुणाशीही बोलत नाही
 बोलणे कळत नाही, अर्थ लागत नाही
 इतर बोलतात तेच बोलतो.
 तुम्ही काहीही म्हटले की तुमचाच शेवटचा शब्द तुम्हाला सांगतो.
 तोंडाने विचित्र आवाज काढतो. सारखा पुटपुटतो.
 तेच वाक्य सारखे बडबडत राहतो.
 कारण नसताना आरडाओरडा करतो.
  
विचार आणि संकल्पनासारख्या बढाया मारतो.
 घरातून नेहमी पळून जातो, कधीपण परत येतो.
 कशावरही पैसे खर्च करतो आणि ते सांगतही नाही.
 प्रत्येक अमावस्या पौर्णिमेला गोंधळ करतो.
 विचित्र कपडे घालतो.
 नेहमी आपले कपडे फाडते.
 त्याला भविष्याची सारखी चिंता असते.
  
स्वप्रेरणाहप्ता हप्ता घर सोडत नाही
 काहीच काम करत नाही
 कुणाचेही ऐकत नाही
 मुलांकडे लक्ष देत नाही
 सांगितलेले काहीच ऐकत नाही
 नेहमीसारखा स्वयंपाक देखील करत नाही.
 कधीकधी स्वयंपाक न करताच बसून राहते.
 कधीकधी बोलत नाही
 स्वत: आंघोळच करत नाही
 काम नाही करत आळशासारखे बसून राहते.
 लैगिक इच्छाच नाही.
 काहीही हलाचाल न करता बसून राहतो.
 खोलीत सारखा एकटाच बसून राहतो.

मनोविकाराचे निदान लक्षणे (तक्रारी) आणि चिन्हे (निरीक्षण) यावरून करायचे असते. बर्‍याच वेळा आजारी व्यक्ती स्वत: लक्षणे सांगू शकत नाही. ही माहिती मित्रांकडून किंवा नातेवाइकांकडूनच घ्यावी लागते. बर्‍याच वेळा पेशंट स्वत: डॉक्टरकडे यायला तयार नसल्याने केवळ वर्णनावरूनच डॉक्टर गोळ्या देतात. मनोविकारासाठी कोणतीही प्रयोगशाळा तपासणी नाही. काही मनोविकारांशी शरीरातल्या जैव रासायनिक द्रव्यांशी संबंध जरी असला तरी त्या आजाराचे सर्व रुग्णांमध्ये असे बदल दिसत नाहीत. त्यामुळे एकूण रोगनिदान हे माहितीवरूनच करावे लागते. सुदैवाने मनोविकार निश्‍चित करणे इतर आजारांपेक्षा थोडे सोपे असते.