digestive system icon पचनसंस्थेचे नेहमीचे आजार पचनसंस्थेचे गंभीर आजार
उचकी

उचकी म्हणजे श्वासपटलाची वारंवार होणारी प्रतिक्षिप्त क्रिया. जठराच्या वरच्या भागात दाह झाल्याने उचकी लागते. तिखट, दारू, इ. पदार्थांमुळे असा त्रास होतो.

जेवणात उचकी लागल्यास थोडा गूळ खाऊन पाणी प्यावे. अशी उचकी 1-2 तासांत थांबते. गुळाने उचकी न थांबल्यास सूतशेखर ऍंटासिड किंवा फॅमोटिडीन गोळीचा उपयोग होईल.

दिवसदिवस उचकी लागत असल्यास डॉक्टरकडे जाणे आवश्यक आहे. यामागे मूत्रपिंडाचा आजारही असू शकेल.

आम्लपित्त

acidity आम्लता ही नेहमी आढळणारी तक्रार आहे. ब-याच माणसांना कधी ना कधी याचा अनुभव येतोच. पण काही जणांना आम्लतेचा नेहमी त्रास होतो. अशांना वैद्यकीय सल्ल्याची गरज असते.

आम्लता किंवा आम्लपित्त म्हणजे जठरात प्रमाणापेक्षा जास्त आम्ल (आंबट द्रव) तयार होणे. या जादा आम्लामुळे पोटात जळजळ, तोंडात आंबट पाणी येणे, छातीत जळजळ अशा तक्रारी निर्माण होतात. कधीकधी जठरातले पदार्थ उलटीवाटे बाहेर पडतात.

खालील कारणांनी आम्लता येऊ शकते.

gastritis

  • नेहमी जास्त तिखट, मसालेदार, तेलकट पदार्थ खाणे.
  • मानसिक ताण, काळजी, सदैव घाई-गडबड.
  • अनियमित जेवणाची सवय., जागरण
  • धूम्रपान, तंबाखूसेवन, दारूसेवन, इत्यादी.
  • काही औषधांमुळे आम्लता होते. उदा. ऍस्पिरीन, सांधेदुखीची औषधे.
  • हेलिकोबॅक्टर नावाच्या एका जिवाणूंशी आम्लता आणि जठरव्रणाचा संबंध आढळला आहे. जठरव्रणापैकी साठसत्तर टक्के जठरव्रण हे या जिवाणूंमुळे होतात. (यासाठी डॉक्सी किंवा ऍमॉक्सिसिलीन हे औषध पाच दिवस देऊन पहावे.)

आम्लपित्तामुळे पुढे अल्सर (जठरव्रण) निर्माण होऊ शकतो. अल्सर असेल तर पोटात एका ठरावीक जागी दुखत राहते. जेवणामुळे हे दुखणे थांबते तरी किंवा वाढते तरी. आम्लपित्तावर उपचार करताना तो अल्सर नाही याच्याबद्दल खात्री करून घ्यावी.

उपचार
  • जेवणात नियमितता ठेवावी.
  • साधा आहार घ्यावा. तेलकट, तिखट पदार्थ टाळावेत.
  • मानसिक ताण, काळजी, सदैव चिंता यांच्यावर नियंत्रण ठेवावे. (व्यायाम, विश्रांती, करमणूक वगैरेमुळे उपयोग होईल.)
  • आम्लविरोधी (ऍंटासिड) गोळया घेतल्यावर जळजळ कमी होते. दुधामुळे काही जणांची आम्लता कमी होते तर काही जणांची वाढते.
  • आयुर्वेद – सूतशेखर मात्रा (गोळी).
होमिओपथी निवड

आर्सेनिकम, कल्केरिया कार्ब, कॉस्टिकम, फेरम फॉस, लायकोपोडियम, नक्स व्होमिका, पल्सेटिला, सल्फर.

 

डॉ. शाम अष्टेकर २१, चेरी हिल सोसायटी, पाईपलाईन रोड, आनंदवल्ली, गंगापूर रोड, नाशिक ४२२ ०१३. महाराष्ट्र, भारत

message-icon shyamashtekar@yahoo.com     ashtekar.shyam@gmail.com     bharatswasthya@gmail.com

© 2017 arogyavidya.net | All Rights Reserved.