digestive system icon पचनसंस्थेचे नेहमीचे आजार पचनसंस्थेचे गंभीर आजार
आतडेदाह (कोलायटीस)

colitis आतडेदाह हा मोठया आतडयाचा एक चिवट आजार आहे. यात आतडयांच्या आतल्या भागावर व्रण तयार होतात. आमांशाचे जंतू, मानसिक ताण, इ.याची कारणे आहेत.

लक्षणे
  • पोटात मंद दुखत राहणे, शौचास साफ न होता आत काही तरी शिल्लक आहे अशी भावना राहणे यावरून याचे निदान ठरते.
  • मळाची सूक्ष्मदर्शकाखाली तपासणी करावी लागते.
  • गुदद्वारावाटे दुर्बिण तपासणीत नक्की कारण कळू शकते.
उपचार

आमांशावर अमिबा किंवा जंत हे कारण असेल तर त्याप्रमाणे उपचार करावेत. अमिबामुळे होणारा आतडीदाह फार चिवट असतो. सुरुवातीस सहा-सात दिवस मेझोलच्या गोळया द्याव्या. त्याबरोबर किंवा लगेच नंतर कुटजारिष्ट एक-दोन चमचे दिवसातून 2-3 वेळा याप्रमाणे महिनाभर घेण्यास सांगावे. काही लोकांना याचा चांगला उपयोग होतो. बरे होत नसल्यास तज्ज्ञाकडे पाठवावे.

जुलाब, आमांश, अतिसार

diarrhoea मनुष्य निरोगी असताना मळाचा घट्टपणा ठरावीक असतो. तसेच मलविसर्जन दिवसातून बहुधा एकाच वेळेस होते. मात्र काही आजारांत मळाचा पातळपणा वाढतो. याचे कारण लहान किंवा मोठया आतडयात असू शकते. काही वेळा पाण्यासारखे जुलाब होतात. दिवसातून एकापेक्षा अधिक वेळा जावे लागते. काही आजारात रक्त व चिकट पदार्थही काही वेळा पडतात. शौचाला अर्धवट झाल्यासारखे वाटते. या सर्वांना जुलाब असे सामान्य नाव असले तरी त्यात प्रकार आहेत.

जुलाब (तक्ता (Table) पहा)

जुलाब

लहान आतडयात आजार असेल तर त्यातले अन्न व पाणी शोषले न जाता बहुतेक सर्व अन्नपाणी तसेच बाहेर पडते. त्यामुळे पातळ, पाण्यासारखे जुलाब होतात. कित्येक वेळा पोटात अन्न नसले तरी लहान आतडयात पाणी, रस पाझरून त्याचेच जुलाब होतात. पातळ जुलाबांबरोबर काही वेळा कळ येते तर काही वेळा येत नाही. पटकी व अतिसारामध्ये हे जुलाब भाताच्या पेजेसारखे पांढरे येतात. पातळ जुलाबामध्ये रक्त सहसा पडत नाही.

पटकीत व तसल्याच काही आजारांत जुलाब व उलटया एकत्रच होतात. पण बहुधा उलटी आधी होते व मग जुलाब चालू होतात.

आव

आजार जर मोठया आतडयात असेल तर जुलाब फार पातळ होत नाहीत. यात बहुधा चिकट पदार्थ (व कधीकधी रक्त) पडते. बहुतेक वेळा पोटात कळ येते किंवा दुखत राहते. या प्रकाराला आमांश (आव) म्हणण्याची पध्दत आहे. हगवण हा शब्द दोन्ही प्रकारांच्या (लहान व मोठया आतडयांच्या) आजाराला वापरतात.

आवेत पडणारे रक्त आतडयाला जखमा झाल्याने पडते. या जखमा जंतूंच्या आक्रमणामुळे होतात. सर्वच प्रकारचे जंतू आतडयाला इजा करत नाहीत.

शौचाला पातळ होणे हे लहानपणापासून सर्वांच्या अनुभवाचे असते. मात्र यात खालीलप्रमाणे काही प्रकार असतात.

  • पाण्यासारखे पातळ जुलाब असल्यास अतिसार म्हणतात.
  • मळाला नुसता पातळपणा असेल तर हगवण म्हणतात. परंतु लोकभाषेत असा स्पष्ट फरक दिसून येत नाही.
  • आव हगवण (आमांश) दोन प्रकारची असते. रक्तशेंब असणारी व नुसती शेंब पडणारी.

हगवण हा शब्द दोन्ही प्रकारांना (लहान व मोठया आतडयाचा आजार) वापरतात. जुलाबात पडणारे रक्त मोठया आतडयात जखमा झाल्याने पडते. या जखमा जंतूंच्या आक्रमणामुळे होतात. सर्वच प्रकारचे जंतू आतडयाला इजा करत नसल्यामुळे नेहमी रक्त पडत नाही.

आजार लहान आतडयात असेल तर त्यातले अन्न व पाणी शोषले न जाता बहुतेक सर्व अन्न-पाणी तसेच बाहेर पडते. त्यामुळे पातळ, पाण्यासारखे जुलाब होतात. पोटात अन्न नसले तरी लहान आतडयात पाणी, रस पाझरून त्याचेच जुलाब होतात.

  • पातळ जुलाबाबरोबर काही वेळा कळ येते तर काही वेळा कळ येत नाही.
  • पटकी व अतिसारामध्ये हे जुलाब भाताच्या पेजेसारखे पांढरे असतात. पातळ जुलाबामध्ये सहसा रक्त पडत नाही.
  • पटकी व अशा काही आजारांत जुलाब व उलटया एकत्रच होतात. पण बहुधा उलटी आधी येते व मग जुलाब चालू होतात.

आजार जर मोठया आतडयात असेल तर जुलाब फार पातळ होत नाहीत. यात बहुधा चिकट पदार्थ (शेंब) व कधीकधी रक्त पडते. बहुतेक वेळा पोटात कळ येते आणि दुखत राहते. या प्रकाराला आमांश (आव) म्हणण्याचीही पध्दत आहे.

मुलांच्या अतिसारासाठी मुलांच्या आजारांच्या प्रकरणात माहिती दिली आहे. यात फक्त 6 वर्षानंतरची मुले, तरुण, प्रौढ यांच्यासाठी सूचना आहेत.

जुलाबाचे कारण शोधा

जुलाबाची अनेक कारणे असतात. अपचन, वावडे ही कारणेही असतात. मात्र जिवाणू, अमिबा, विषाणू ही महत्त्वाची कारणे आहेत.

जुलाबाचे कारण शोधून योग्य तो इलाज करावा लागतो. अमिबा किंवा जंतुदोषाचे जुलाब असल्यास विशिष्ट औषधे वापरावी लागतात. मात्र ब-याच वेळा जुलाब ‘विषाणूं’मुळे होतात आणि यांत औषधे उपयोगी पडत नाहीत.

जुलाबाचे मुख्य कारण म्हणजे दूषित पाणी. पाणी स्वच्छ आणि पुरेसे पाहिजे. राहणीमान सुधारण्याने स्वच्छता वाढते व रोग कमी होतो. ज्या लोकांना अपुरे, अशुध्द पाणी मिळते त्यांना या प्रकारचे आजार सतत होतात. लहान मुलांमध्ये तर जुलाब, अतिसार प्रमाण फार आहे. शहरातल्या झोपडपट्टयांतही याचे प्रमाण पुष्कळ आहे. नदी, उघडे झरे, उघडया विहिरी यांच्या पाण्यात हे जंतू ब-याच वेळा आढळतात. मुख्य म्हणजे मानवी किंवा प्राण्यांची विष्ठा व पिण्याचे पाणी यांचा संबंध आला तर हे आजार उद्भवतात. कूपनलिकांमुळे मात्र या आजारांचे प्रमाण घटले आहे.

हे सर्व रोग सूक्ष्मजंतूंमुळे (जिवाणू, अमिबा, विषाणू) होतात. हे सूक्ष्मजंतू आजा-याच्या विष्ठेतून येतात. हे जंतू हाताने, अन्नावाटे; पाण्यावाटे वा माशीच्या संपर्काने पसरतात. यासाठी हातांची, भांडयांची स्वच्छता, नखे कापणे, अन्न सुरक्षित ठेवणे, इत्यादी काळजी घेणे आवश्यक आहे.

जुलाबाच्या तक्त्यात पाहिल्यानंतर जुलाबांची निरनिराळी कारणे ध्यानात येतील.

हगवणीची दोन प्रमुख कारणे म्हणजे अमिबा आणि जिवाणू. दूषित अन्न-पाणी व वैयक्तिक अस्वच्छता ही दोन्हींचीही समान कारणे आहेत. परंतु त्यातील जिवाणू-हगवण ही बहुधा साथीमध्ये येऊ शकते. पावसाळयात सुरुवातीला दोन्ही प्रकारची हगवण जास्त दिसते.

अनेकदा ही दोन्ही प्रकारची हगवण एकत्र येते. पैकी कोणत्याही एकासाठी औषध दिले तरी मग ती चालूच राहते. दोन्ही आजारांच्या खाणाखुणांमध्ये थोडा फरक आहे.

  • जिवाणू हगवणीत कळ, मुरडा जास्त प्रमाणात असतो. यात पहिल्या दोन-तीन जुलाबांत विष्ठा पडून गेल्यावर नंतरच्या जुलाबात केवळ रक्तशेंब पडते, कधीकधी ताप येतो.
  • अमिबा या एकपेशीय प्राण्यामुळे दर वेळेस सैल, पातळ , हगवण होते. ब-याच वेळा शेंब पडते. क्वचित रक्तही पडते. वारा सरणे, अर्धवट जुलाब होऊन आत काहीतरी राहिल्याची भावना राहणे, ही सर्व अमिबा हगवणीची चिन्हे आहेत.
  • जिआर्डिया या अमिबासारख्या एकपेशीय प्राण्यामुळे येणारी हगवण फेसकट असते. त्याबरोबर बहुधा आवाज येतो व याचे जुलाब रोखून धरता येत नाहीत.
  • अपचनाचे निदान करताना अपचनाची माहिती, करपट ढेकर, इत्यादींवरून खात्री करता येते.

जुलाबांच्या या आणि इतर कारणांची माहिती तक्त्यात दिली आहे.

अमिबामुळे आव

अमिबा हगवणीचा सुरुवातीचा जोर कमी झाल्यावर त्याचे आवेत रुपांतर होते. अमिबामुळे होणा-या या हगवणीचा प्रकार चिवट असतो. ब-याच वेळा हा त्रास मधून मधून होत राहतो. विष्ठा सैल असणे, दिवसातून एक-दोन वेळा होणे, अर्धवट होणे, वायू होणे, घाण वास येणे, मोठया आतडयात मंद दुखत राहणे, इत्यादी तक्रारी आढळतात. बहुधा याचे कारण अमिबा हेच असते. औषधांनी तेवढयापुरता आराम पडून परत आजार पुढे चालू राहतो, असेही दिसून येते. सतत प्रवास, बाहेर खावे लागणे, इत्यादी कारणांमुळे हा आजार शरीरात टिकून राहतो. चिवट जुनाट आतडीदाह होण्यामागे ‘अमिबा’ हे सर्वात प्रमुख कारण आहे.

हगवण व जुलाबाचे उपचार

जंतुविरोधी औषधे

हगवण निरनिराळया प्रकारची असल्यामुळे कारण निश्चित करणे आवश्यक आहे. (रोगनिदान तक्ता पाहा).

  • विषाणू हगवणीसाठी खास औषध आधुनिक शास्त्रात नाही.
  • जिवाणू-हगवणीसाठी टेट्रा, कोझाल, फ्युराडिन यांपैकी एक विशिष्ट औषध द्यावे.
  • अमिबा व जिआर्डिया यांमुळे येणा-या हगवणीत मेझोल हे औषध वापरावे.
  • जंतामुळे येणा-या हगवणीत जंतावरचे बेंडेझोल हे औषध वापरावे. (मोठया माणसांना सहसा जंतामुळे हगवण होत नाही.) मात्र हा त्रास सामान्यपणे लहान मुलांना होतो.
जलसंजीवनी, आणि घरगुती द्रवपदार्थ

हगवण ब-याच वेळा होणे, मोठे जुलाब होणे इत्यादींमुळे शरीरातले पाणी कमी पडून शोष पडतो. शोष टाळण्यासाठी किंवा आधीच शोष झाला असेल तर उपचार म्हणून मीठ-साखर पाणी (जलसंजीवनी) चालू करा. (तपशील मुलांच्या आजारात पाहा.) यामुळे शरीरातील क्षार व पाण्याची भरपाई होते. नारळाचे पाणी, चहा, कॉफी, पेज, सरबत, इ. द्रवपदार्थही चांगले असतात.

शरीरातून गेलेल्या पाण्याची भरपाई करताना ते थोडयाथोडया प्रमाणात द्यावे. दर पाच-दहा मिनिटांनी तीन -चार चमचे असे दिल्यास पचनसंस्थेत शोषले जाते. एकदम जास्त दिल्यास जुलाब किंवा उलटी होण्याची शक्यता असते.

हगवण : आयुर्वेदिक उपचार

जुलाबाची कारणे अनेक आहेत. कारणांप्रमाणे विशिष्ट उपचार करावे लागतात. या विशिष्ट उपायांव्यतिरिक्त पचनक्रिया सुधारण्यासाठी काही पाचक औषधे आयुर्वेदात सांगितली आहेत.

एक उपाय म्हणजे त्रिकटू चूर्ण (सुंठ, मिरे, पिंपळी) एक-दोन ग्रॅम मात्रेत दिवसातून दोन-तीन वेळा द्यावे. जुलाब थांबल्यावर पाचक औषधे दोन-तीन दिवसांपर्यंत चालूच ठेवावीत.

  • पाण्यासारखे किंवा भाताच्या पेजेसारखे पातळ जुलाब होत असतील तर हा उपाय करावा. आले, कांदा किसून त्यांचा वस्त्रगाळ रस एकेक चमचा एकत्र करून त्यात किंचित कापूर मिसळावा. दर पंधरा मिनिटांनी तीन वेळा हे औषध द्यावे. यानंतर हेच औषध पाऊण तासाने देत राहावे. या उपायाने तीव्र उलटया-जुलाब तात्पुरते थांबतात. यानंतर बडीशेप, पुदिना यांचे अर्क उकळलेल्या पाण्यात टाकून हे कोमट पाणी देत राहावे. अर्क तयार नसल्यास उकळलेले आठ कप पाणी + 25 ग्रॅम बडीशेप ठेचून + 50 ग्रॅम ओला पुदिना ठेचून औषधी पाणी तयार करता येते. (बडीशेप, पुदीना घातल्यावर पाणी परत उकळू नये.)
  • हगवण किंवा जुलाब थांबण्यासाठी कुटजघनवटीच्या दोन गोळया तीन वेळा द्याव्यात.
  • मळाबरोबर आव, शेंब पडत असेल आणि मलविसर्जनानंतर अर्धवट भावना होत असेल तर 15 ते 25 मि. ली तिळाचे किंवा करडईचे तेल प्यायला द्यावे.
  • कोमट पाण्यात चमचाभर तूप टाकून प्यायला दिल्यावरही चांगला गुण येतो. किंवा याऐवजी शेंगदाणा तेल 10-15 मि.ली इतके द्यावे.
  • अपचनाचे जुलाब असतील तर त्या दिवसापुरते द्रव पदार्थ देत राहावेत. यासाठी तांदूळ किंवा कणीक पाण्यात उकळून वरचे पाणी मीठ साखर व आले किंवा सुंठ, मिरपूड टाकून द्यावे. यामुळे लवकर आराम वाटेल. (आले किंवा सुंठ, मिरपूड, इत्यादी पाणी उकळतानाच टाकावे)

 

डॉ. शाम अष्टेकर २१, चेरी हिल सोसायटी, पाईपलाईन रोड, आनंदवल्ली, गंगापूर रोड, नाशिक ४२२ ०१३. महाराष्ट्र, भारत

message-icon shyamashtekar@yahoo.com     ashtekar.shyam@gmail.com     bharatswasthya@gmail.com

© 2017 arogyavidya.net | All Rights Reserved.