निर्मळता हा मानवी संस्कृतीचा आणि आरोग्याचा पाया आहे. मात्र आपल्या देशात खेडयांमध्ये आणि अनेक शहरांमध्ये गलिच्छतेचे साम्राज्य दिसते. रस्त्यावर वाहते सांडपाणी, डबकी, उघडयावर मलमूत्रविसर्जन, कचरा, प्रदूषण या सर्वांमुळे एक गलिच्छ वातावरण निर्माण होते. यातून आरोग्याला धोका तर आहेच, पण मानवी संस्कृतीवरच तो एक डाग आहे. संपूर्ण स्वच्छता अभियान ही एक सरकारी योजना आहे. पण सामाजिक चळवळीप्रमाणे ती चालली तरच यशस्वी होईल. स्वातंत्र्यापूर्वी आपल्या देशात ग्रामस्वच्छतेसाठी चळवळी झाल्या. भंगीमुक्ती चळवळ हे त्याचे एक टोक होते. मानवाने मानवाची विष्ठा वाहून नेणे हा त्या संपूर्ण समाजालाच कलंक आहे. जोपर्यंत रस्त्यावर मलविसर्जन होत राहील तोपर्यंत संपूर्ण भंगीमुक्ती साध्य होणार नाही.
स्वच्छता अभियानाची सुरुवात स्वत:पासून करायला पाहिजे. कुटुंब, वस्ती, गाव-शहर या सर्व पातळयांवर स्वच्छता निर्माण व्हायला पाहिजे. संस्कृती, आरोग्य, मानवी प्रतिष्ठा, आर्थिक प्रगती या सर्वांसाठी स्वच्छता फार महत्त्वाची आहे. केंद्र सरकारने 2000 साली याचसाठी संपूर्ण स्वच्छता अभियान सुरु केले आहे. खेडी आणि शहरे दोन्ही स्वच्छ व्हायला पाहिजेत. घरगुती संडास या अभियानाचा केंद्रबिंदू आहे. गरीब, श्रीमंत सर्वांसाठी हे अभियान आहे. लोकसहभाग हे याचे मुख्य सूत्र आहे.
संडासला बसणे ही एक लाजेकाजेची बाब आहे. अशावेळी कोणी पाहिले तर दोघांनाही संकोच वाटतो. संडासला बसलेल्यांना थोडी चाहूल लागली तर अर्धवट संडास होते. याच कारणाने पूर्वीपासून घरापासून बाहेर लांब जाण्याची पध्दत आहे. ‘परसाकडे’ या शब्दाचा अर्थही असाच आहे. संडास बांधायचा तर आडोसा पाहिजेच. हा आडोस अगदी तरटाचा पण चालेल. परिस्थितीनुसार योग्य तो आडोसा कुटुंबाने करून घ्यावा. लाकडी फळया, झापा (नारळाच्या) गवत किंवा कुडाच्या साहायाने स्वस्त आडोसा करता येतो. पत्रा किंवा वीट बांधकाम करायला खर्च पडतो. मात्र संडासचा एकूण विचार करणे आवश्यक आहे. संडासची जागा 6-6 महिन्याला बदलणारी असेल तर वीट बांधकाम न केलेलेच चांगले. हलवता येण्यासारखी शेड तयार केल्यास चांगले.
काही संडास अगदीच साधे असतात. त्यात भांडेही नसते. फक्त बसायच्या ठिकाणी भोक असते. यातून विष्ठा सरळ खाली खड्डयात पडते. खड्डयावर केवळ फळी किंवा स्लॅब असेल तर ती काम नसेल तेव्हा झाकून ठेवता येते. यासाठी फळी किंवा फरशी वापरता येईल.
मात्र इतर सर्व संडास प्रकारात भांडे लागतेच. यावर विष्ठा पडल्यावर ती सहजपणे सरकून खाली जावी यासाठी भांडे चिनी-मातीचे गुळगुळीत पॉलिशचे असावे लागते. सिमेंटचे भांडे या कामासाठी फार उपयुक्त नसते. मलपात्र हे पाण्याच्या वापरानुसार योग्य असावे लागते. शहरी भागात मोठे मलपात्र वापरले जाते. याला उतार कमी असतो. त्यामुळे भांडे साफ करण्यासाठी पाणी जास्त वापरावे लागते. ग्रामीण भागात पाण्याचा वापर कमी असतो म्हणून जास्त उतरते खोलगट भांडे योग्य असते. 1-2 लिटर पाणी टाकल्यावर भांडयातून विष्ठा खाली जाऊन भांडे साफ व्हावे अशी योजना असते.
मलपात्र महाग वाटत असेल तर बागेची कुंडी किंवा साध्या टाईल्सने पण मलपात्र तयार करता येते. खाली याचे वर्णन दिले आहे.
मलपात्राकरिता झाडे लावण्यासाठी वापरण्यात येणारी मध्यम आकाराची कुंडी वापरण्यात येते. या कुंडीला आतल्या बाजूने कपबशांचे तुकडे किंवा गुळगुळीत टाईल्सचे तुकडे लावून आतला पृष्ठभाग गुळगुळीत करण्यात येतो. यामुळे विष्ठा कुंडीला चिकटणार नाही व मलपात्र सहज स्वच्छ करता येईल. या संडासाला लागणा-या साहित्याची यादी
1. मध्यम आकाराची कुंडी 1 नग
2. मलपात्र तयार करण्यासाठी गुळगुळीत टाईल्सचे तुकडे
3. विटा 300 नग
4. सिमेंट 1 बॅग
5. रेती 12 घनफूट
6. मजुरी 1 गवंडी दिवस
अशा प्रकारच्या स्वस्त शौचालयांकरिता ग्लेझ्ड टाईल्सचा उपयोग करून मलपात्र तयार केले जाऊ शकते. असे मलपात्र तयार करण्याकरिता बाजारात मिळणा-या 8″x13″ आकाराच्या 4 ग्लेझ्ड टाईल्स वापरुन शौचालय बांधकामाच्या जागेवरच मलपात्र तयार केले जाऊ शकते. हे मलपात्र तयार करण्याकरिता कमी दर्जाचा किंवा दुय्यम प्रतीच्या 4 टाईल्स लागतात. तसेच कोपरे तुटलेल्या टाईल्सचा सुध्दा उपयोग हाऊ शकतो. असे मलपात्र अतिशय कमी किमतीमध्ये म्हणजेच रु. 25 च्या आत तयार होते.
संपूर्ण महाराष्ट्रामध्ये प्रत्येक गाव हागणदारी मुक्त करावयाचे झाल्यास शौचालय बांधकामाकरिता लागणारी मलपात्रे बाजारातून उपलब्ध होणे शक्य नाही. अशा परिस्थितीमध्ये टाईल्सपॅन हा पर्याय उपयोगी आणि किफायतशीर ठरेल.
हा संडासचा सर्वात महत्त्वाचा भाग आहे. विष्ठा काही महिने साठवून ती निरुपद्रवी करण्यासाठी हा भाग आवश्यक असतो. निरुपद्रवी झालेला भाग (खत) काढून तो शेतात वापरण्याआधी विष्ठा साठवली जाते. यातले जंतू, जंत, जंतांची अंडी वगैरे भाग रासायनिक क्रियेने नष्ट करण्याचे काम खड्डयात किंवा टाकीत होते.
यातला टाकीचा संडास (सेप्टीक टँक) खर्चीक असतो. शिवाय तांत्रिक दृष्टया तो कमी कार्यक्षम आहे. म्हणून या पुस्तकात फक्त खड्डा पध्दतीचे वर्णन केले आहे.
खड्डा पध्दतीत अनेक प्रकार आहेत. त्या भागातील जमिनीचा प्रकार, पाऊसमान व उपलब्ध जागा यानुसार योग्य तो पर्याय निवडावा लागतो. म्हणून खड्डा पध्दतीसाठी खालील गोष्टी विचारात घ्याव्यात.
जमीन भुसभुशीत असली तर बाजूची माती खड्डयात ढासळते. म्हणून अशा भागात बांबू तट्टया किंवा बांबूची ढोली वगैरे वापरून खड्डा मजबूत करावा लागतो. या ऐवजी विटांचे गोलाकार बांधकाम चालते. मात्र असे बांधकाम करताना पाण्याचा निचरा होण्यासाठी विटांमध्ये (गॅप) पोकळी सोडावी लागते. थोडा सिमेंटचा वापर करावाच लागतो.
खड्डा पध्दत महाराष्ट्राच्या बहुतेक ग्रामीण भागात अगदी उपयुक्त ठरू शकते. याचे कारण महाराष्ट्रातली जमीन कठीण आहे, मातीचा थर पातळ आहे व मुरुम थर लवकर लागतो. तसेच महाराष्ट्रात कोकण सोडता पाऊस कमी आहे आणि पावसाळयापुरताच आहे. तरीही खड्डा पध्दतीचे काही तोटे आहेत.
1. विष्ठेतील द्रवभाग जमिनीत मुरुन आजुबाजूला थोडा पसरण्याचा धोका असतो. हा धोका पावसाळयात जास्त असतो. जवळ विहीर, बोरवेल असेल तर हा धोका लक्षात ठेवायलाच लागतो. निदान 50 मीटर अंतर असावे हे चांगले.
2. खड्डा भरला की 3-6 महिने तो वापरता येत नाही. खत व्हायला तेवढा काळ द्यावा लागतो. यामुळे पर्यायी खड्डा जवळच असावा लागतो. या कारणाने दोन खड्डयांसाठी जागा असावीच लागते. हे दोन तोटे सोडता, खड्डा पध्दतीचे फायदे बरेच आहेत.
आडोसा, मळपात्र आणि खड्डा या तीन घटकांशिवाय दोन पर्यायी घटक प्रगत मॉडेलमध्ये वापरतात.
जलबंद म्हणजे एक छान युक्ती आहे. पाण्याच्या एका थरामुळे किडे व दुर्गंध खड्डयातून संडासमध्ये शिरु शकत नाहीत. एक वाकडा पाईप वापरुन हा जलबंद निर्माण करता येतो. याला गवंडी मंडळी ‘कोंबडा’ असे म्हणतात. मलपात्र आणि मळासाठी खड्डा/टाकी यामध्ये हा जलबंद वापरला जातो. हा कार्यक्षम ठेवण्यासाठी वेगळे पाणी लागते. संडासच्या स्वच्छतेनंतर 2-5 लिटर पाण्याने ‘फ्लश’ करतो त्यातले पाणी यात टिकून राहते. दुर्गंधमुक्त संडाससाठी जलबंद आवश्यक आहे. पाणीटंचाई असल्यास याऐवजी ‘झडप’ वापरता येते.
व्हेंट पाईप म्हणजे 8-10 फुटी 4 इंची पीव्हीसी पाईप असतो. एका टोकाला तो तिरपा कापतात. त्यामुळे हे तोंड जास्त मोकळे राहते. हे तोंड खड्डयात असते. यातून दुर्गंध बाहेर पडतो. वरच्या तोंडाला जाळीदार टोपी असते. मात्र माशा-डास आत जाऊ नये म्हणून मच्छरदाणीच्या जाळीचा कपडा याला बांधावा लागतो. लोखंडी जाळीपण चालते.
याशिवाय आणखी एक महत्त्वाची बाब लक्षात घ्यावी लागते. संडासनंतर शारीरिक स्वच्छतेसाठी पाणी वापरणार की कोरडी पध्दत (कागद, माती, पालापाचोळा, नारळाचा भाग) याचा विचार करावा लागतो. याप्रमाणे पुढचे मॉडेल ठरवता येते.
महाराष्ट्रात काही भागात संडाससाठी पाणी वापरण्याची पध्दत नाही. आदिवासी भागात किंवा दुष्काळी ग्रामीण भागात कोरडी पध्दत सर्रास वापरात होती. आहारातील चोथ्यामुळे विष्ठाही बांधीव आणि न चिकटणारी असल्यामुळे कोरडी पध्दत चालू शकते. खरे म्हणजे सर्व जगात ‘कोरडी पध्दत’ जास्त प्रचलित आहे. सर्व पाश्चात्त्य देशात ‘टॉयलेट’ पेपर वापरला जातो. हा कागद पातळ आणि मऊ असतो. गुदद्वार स्वच्छता करण्यासाठी तो खास बनवलेला असतो. तो नसल्यास जुनी वर्तमानपत्राची रद्दीही चालू शकते.
या कोरडया पध्दतीचा मुख्य फायदा म्हणजे हात खराब होत नाहीत. त्यामुळे जंतू व जंत हाताला चिकटत नाहीत. शिवाय पाण्याचीही बचत होते. पाणी कमी वापरले गेल्याने विष्ठा लवकर कोरडी होते आणि ती वाळून निर्जंतुक होण्यासाठी कमी अवधी लागतो.
एकूणच कोरडी पध्दत नीट वापरल्यास जास्त आरोग्यकारक आहे व पाणी बचतीची आहे. मात्र कोरडया पध्दतीसाठी संडासचे योग्य मॉडेल निवडावे लागते.
(अ) विष्ठा व कोरडी वस्तू खड्डयात पडण्यासाठी सरळ मार्ग असावा. ट्रॅप (जलबंद) बसवल्यास कोरडी पध्दत वापरणे जवळ जवळ अशक्य आहे. जर पातळ कागद वापरला तर तो ओला होऊन बोळा बनतो व फ्लशने निघून जातो. मात्र यासाठी कागद खास पाहिजे व पाणी 5 लिटरच्या आसपास वापरावे लागते. एकूणच ‘कोरडी पध्दत’ वापरावयाची असल्यास ट्रॅप न वापरणे योग्य होते.
(ब) ‘कोरडी पध्दत’ वापरायची असल्यास खड्डयावर फळी ठेवून केवळ भोक ठेवणे हे सर्वात चांगले. भांडे किंवा मळपात्रही वापरू नये. कारण त्यालाही पाणी लागते.
(क) जलबंद वापरल्यास दुर्गंध व किडेमकोडे टळतात. मात्र ट्रॅप वापरल्यास निदान 2 लिटर पाणी दरवेळी ओतावे लागते.