femaleurine system icon स्त्रीजननसंस्था पुरुषजननसंस्था
गर्भाशयाच्या तोंडाची सूज

Uterine Swelling या आजाराचे नेमके कारण माहीत नाही. यामध्ये आतून तपासल्यावर गर्भाशयाच्या तोंडाचा भाग खरबरीत लालसर व सुजलेला दिसतो. हे दुखणे खूप स्त्रियांमध्ये आढळते. हे आजार दुर्लक्षित राहिले तर त्यातून कर्करोग होण्याची शक्यता असते.

या आजाराबरोबर जंतुदोष होऊन योनिदाह होऊ शकतो. यामुळे खाज, पाणी जाणे (स्राव), इत्यादी लक्षणे येतात. तसेच हा जंतुदोष आत पसरून ओटीपोटात (गर्भाशय व भोवतालचे अवयव) सूज येण्याची शक्यता असते. त्यामुळे कंबरदुखी, वरचेवर बारीक ताप येणे, लैंगिक संबंधाच्या वेळी पोटात दुखणे, पांढरा स्राव, पाळीचे वेळी खूप पोटदुखी, इत्यादी लक्षणे आढळतात.

जास्त त्रास होत असेल तर डॉक्टरांकडे पाठवावे. कॉटरीच्या (एक विद्युत उपकरण) साहाय्याने मांसल भाग ‘जाळणे’ हा यावर चांगला उपाय आहे. पण सर्वच स्त्रियांना याचा उपयोग होत नाही. आता यावर लेझर, क्रायो, इ. नवीन तंत्राने उपचार केला जातो. काही स्त्रियांच्या बाबतीत या अवयवाचा काही भाग शस्त्रक्रियेने छाटावा लागतो. उपचारानंतर 4-6 आठवडयाने हा भाग बरा होतो.

आयुर्वेदिक टिपणात सांगितल्याप्रमाणे ‘योनिधावन’ इत्यादींचे उपाय करून पाहावेत.

श्वेतप्रदर (पांढरे पाणी जाणे)

पांढरे पाणी जाणे हे एक लक्षण आहे. प्रदर म्हणजे अंगावरून जाणे. श्वेत म्हणजे पांढरे. श्वेतप्रदर म्हणजे अंगावरून पांढरे पाणी जाणे. (रक्तप्रदर म्हणजे अंगावरून रक्त जाणे.) पण बोली भाषेत रक्त नसलेल्या अनेक स्रावांना-श्वेतप्रदर-अंगावरून पांढरे पाणी जाणे, असेच म्हणतात. स्रावांचा रंग पाण्यासारखा पांढरट किंवा पिवळसर असू शकतो.

काही आजार नसतानाही असे पाणी जाऊ शकते. ही तक्रार ब-याच स्त्रिया करतात. याची कारणे खालीलप्रमाणे आहेत.

पाणी जाण्याची कारणे
  • वयात येणे, गरोदरपण, स्त्रीबीज सुटताना पाझर, इत्यादी सामान्य शारीरिक कारणे. यात आजाराचा संबंध नसतो.
  • गर्भाशय, गर्भनलिका, इ. अंतर्गत अवयवांच्या आजारांमुळे (जंतुदोष, कर्करोग, इ.) होणारे पाझर.
  • निरनिराळया जंतुदोषांमुळे होणारे योनिदाह (बुरशी, जिवाणू, ट्रायकोमोनास, परमा, इ.)
  • मधुमेहामुळे होणारा जंतुदोष

पांढ-या पाण्याच्या तक्रारींमागे किती विविध प्रकारची कारणे असतात हे यावरून लक्षात येईल. पाणी जाणे म्हणजे केवळ योनिदाह आहे म्हणून उपचार करून सोडू नये. रोगनिदान आणि योग्य सल्ला जास्त महत्त्वाचे आहेत.

जिवाणूबदल आणि पांढरे पाणी

योनिमार्गात नेहमी काही सहजिवाणू वस्तीला असतात. यांच्यामुळे आम्लता होऊन सहसा इतर जंतू वाढू शकत नाहीत. हे जिवाणू प्राणवायू पण सोडतात, त्यामुळे इतर जंतू मरतात. मात्र काही कारणांनी हे सहजिवाणू कमी होऊन इतर प्रकारचे नवे जंतू शिरून वाढू शकतात. यामुळे खरे म्हणजे योनीदाह होत नाही, केवळ पाझर वाढतात. खाज किंवा आग होत नाही. हे जंतू लिंगसांसर्गिक पध्दतीने पसरत नाहीत. असे जंतू असलेल्या निम्म्या स्त्रियांना फारसा त्रास पण होत नाही.

या पाहुण्या जंतुंमुळे होणारा पाझर – पांढरट, दुधाळ, पातळ व योगिमार्गात त्वचेला लागून आढळतो. याला मासळीसारखा वास असतो आणि हा अल्कली गुणधर्माचा असतो.(लिटमस टेस्ट केल्यास तांबडा लिटमस निळा होतो) यामुळे फारच झाले तर योनिद्वाराशी सौम्य खाज असू शकते.

यासाठी सोपा उपचार म्हणजे क्लिंडामायसीन मलम आतून लावणे. याऐवजी क्लिंडामायसीन नावाच्या योनीमार्गात बसवायच्या गोळया मिळतात. ही गोळी झोपताना रोज एक योनिमार्गात ठेवणे हा एक पर्याय आहे.

आणखी पर्याय म्हणजे लक्टील नावाचे एक मलम 7 दिवस रोज आतून लावल्यास योनिमार्गात आम्लता निर्माण होते व जंतूंची वाढ थांबते. मात्र उपचार थांबवल्यावर काही जणींना हा त्रास परत होण्याची शक्यता असते.

होमिओपथी निवड

आर्सेनिकम, कल्केरिया कार्ब, मर्क्युरी सॉल, नेट्रम मूर, पल्सेटिला, सेपिया, सिलिशिया, सल्फर

अंगावरून पांढरे पाणी जाणे (तक्ता (Table) पहा)

योनीदाह आणि अंगावरून पांढरे जाणे

अंगावरून पांढरे जाणे ही बऱ्याच स्त्रियांची तक्रार असते. काही वेळा हा आजार असतो तर काही वेळा आजार नसतो.

निरोगी अवस्थेत योनीमार्गात रहिवाशी जिवाणूंमुळे लॅक्टीक आम्ल असते. या आम्लामुळे इतर जिवाणू व जंतू वाढू शकत नाहीत. सामान्यपणे पांढरे पाणी गर्भाशय मुखातील ग्रंथीतून किंवा योनीमार्गातील ग्रंथीतून पाझरते. या स्त्रावामुळे योनीमार्ग आपोआप स्वच्छ आणि रोगजंतूरहित राहतो. सामान्यपणे हे स्त्राव कमी असल्याने लक्षात येत नाहीत. स्त्राव जास्त असेल तर त्याची तक्रार होते. पांढरे पाणी जाण्याची तक्रार कोणत्याही वयात आढळते. म्हातारपणातही हा त्रास होऊ शकतो. आता आपण या जिव्हाळयाच्या त्रासाबद्दल माहिती घेऊ या.
योनीमार्गातले नैसर्गिक स्त्राव

स्त्रीबीज सुटताना, शरीर संबंधात किंवा गरोदरपणात निसर्गत: पाझर वाढतात. यामुळे आपोआप स्वच्छता राहते आणि रोगजंतू वाहून जातात. काही स्त्रियांना चक्क कपडाही वापरावा लागतो. पण हे पाणी स्वच्छ असेल, घाण वास नसेल आणि वेदना नसेल तर काळजी करू नका.

अंगावरून रोगट स्त्राव

पांढऱ्या पाण्याबरोबर दुर्गंध, तांबूस पिवळी किंवा हिरवी छटा, ताप, ओटीपोटात वेदना असेल तर हा आजार असतो. यापैकी काही लिंगसांसर्गिक आजारपण असू शकतात. रजोनिवृत्तीनंतर योनीमार्गात आम्लता घटल्याने रोगजंतू वाढू लागतात. इथे अशा काही आजारांची माहिती दिली आहे.

  • खराब रोगट गर्भाशयमुख – यामुळे सौम्य वेदना आणि सळसळ-खाज जाणवते. शरीरसंबंधांच्या वेळी विशेष त्रास होतो. स्त्राव तांबूस असतो. उपचारांनी हा आजार बरा होतो.
  • योनीमार्गात रोगजंतू वाढून दुर्गंधयुक्त हिरवट स्त्राव आणि खाज येते.
  • योनीमार्गात बुरशीलागण होऊन दह्यासारखा स्त्राव आणि खाज येते. योनीमार्गाचा अंतर्भाग लालभडक दिसतो. बुरशीरोधक गोळी योनीमार्गात 2-3 दिवस ठेवा. य़ाने हा त्रास कमी होतो.
  • एकपेशीय योनीदाह – यात हिरवट स्त्राव येतो. योनीमार्गात आत लालसर ठिपके दिसतात. हे स्वत: प्रत्येक स्त्रीला आरशाने तपासता येते. यासाठीपण योनीमार्गात गोळी ठेवावी लागते.
  • परमा – हा लिंगसांसर्गिक आजार झाल्यावर योनीमार्गात वेदना, पिवळट पू, ताप आणि लघवीला जळजळ होते. जोडीदारालापण हा त्रास आधी असू शकतो किंवा नंतर होतो. वेळीच उपचार न केल्यास हे दुखणे ओटीपोटात जाऊ शकते.
  • ओटीपोटातील जंतूलागण – ओटीपोटात म्हणजे जननसंस्थेत जंतूलागण झाल्यामुळे ताप, दुखणे, दुर्गंधयुक्त स्त्राव हा त्रास होतो. वेळीच उपचार न केल्यास कायमचे दुखणे होते. पुढेपुढे गर्भनलिका सुजून वंध्यत्व येऊ शकते. लैंगिक संबंधावेळी ओटीपोटात दुखणे ही याची विशेष खूण आहे.
  • अधर्वट किंवा दुषित गर्भपात झाल्यास तांबूस आणि दुर्गंधयुक्त पाणी येते, ताप आणि वेदना होतात. त्यासाठी ताबडतोब उपचार घ्यावे लागतात.
  • गर्भाशयमुखाचा कर्करोग असल्यास स्त्राव तांबूस किंवा लाल येतो. यावर जंतूलागण झाल्याने दुर्गंध आणि पूमिश्रित पाणी येते.
प्राथमिक आणि वैद्यकीय उपचार
  • नैसर्गिक स्त्राव असेल तर काळजीचे कारण नसते. स्वच्छता मात्र पाळावी.
  • केवळ योनीदाह असेल तर योनीमार्गात ठेवण्याच्या गोळयांचा उपचार पुरतो. आवश्यक वाटल्यास तोंडाने एफ.एस.ए.3 या गोळयांचा उपचार करावा. वैद्यकीय तपासणी आवश्यक असते.
  • लिंगसांसर्गिक आजाराची शक्यता वाटल्यास वैद्यकीय सल्ला नक्कीच घ्यावा.
  • स्त्राव तांबूस असेल तर वेळीच तपासणी करायला पाहिजे.
विशेष सूचना
  • गरोदरपणाच्या शेवटच्या 1-2 महिन्यात पांढरे पाणी जास्त जात असेल तर डॉक्टरांना दाखवा. गर्भाशयाभोवतीचे पाणी गळत असल्यास बाळाला धोका असतो.
  • प्रत्येक स्त्रीने स्पेक्युलम, आरसा आणि प्रकाश वापरून योनीमार्गाची स्वयंतपासणी करायला शिकावी हे चांगले.
  • योनीमार्गात गोळी ठेवण्याचे तंत्र स्त्रीला आले पाहिजे. स्वयंउपचार सोपे असतात. पण आराम नाही पडला तर 2 दिवसांपेक्षा जास्त थांबू नका.
  • लिंगसांसर्गिक आजार टाळण्यासाठी फक्त सुरक्षितच लैंगिक संबंध ठेवा. अन्यथा निरोधचा अवलंब करावा.
  • पदर येण्याच्या अगोदर मुलींना अंगावरून जात असेल आणि वेदना असेल तर ताबडतोब आपल्या डॉक्टरांना दाखवावे.
  • शरीरसंबंधांनंतर लघवी केल्यास लिंगसंसर्गाची शक्यता कमी होते.
  • अंगावर जाण्याबरोबर वेदना, ताप आणि दुर्गंध यापैकी काहीही असेल तर वैद्यकीय सल्ला घेतलाच पाहिजे.

 

डॉ. शाम अष्टेकर २१, चेरी हिल सोसायटी, पाईपलाईन रोड, आनंदवल्ली, गंगापूर रोड, नाशिक ४२२ ०१३. महाराष्ट्र, भारत

message-icon shyamashtekar@yahoo.com     ashtekar.shyam@gmail.com     bharatswasthya@gmail.com

© 2017 arogyavidya.net | All Rights Reserved.