Disease Science Icon खास तपासण्या रोगशास्त्र
क्ष-किरण तपासणी (एक्स-रे)

क्ष-किरण (एक्स-रे) हे डोळयांना न दिसणारे किरण असतात. या किरणांना वस्तू भेदून जाण्याची क्षमता असते. साधे प्रकाश किरण (ऊन किंवा लाईट) हे पातळ कागद , कपडा यातून थोडया प्रमाणात आरपार जातात. मात्र जाड कापड, कागद यामुळे प्रकाश किरण पूर्णपणे अडतात. पण क्ष-किरण हे मात्र यापेक्षा भेदक असतात. पत्र्याचा पातळ थर, कागद, कापड त्वचा, इत्यादी अडथळे भेदून ते पलीकडे जाऊ शकतात. क्ष-किरणांची ताकद (भेदकता) जशी वाढवू तसे हाडांसारखे पदार्थही भेदले जाऊ शकतात. या तत्त्वाचा उपयोग करून क्ष-किरण चित्र काढले जाते. त्वचा, मांस, हाडे, हवा यांची क्ष-किरण अडण्याची शक्ती व घनता वेगवेगळी असते. क्ष किरणांमुळे पलीकडे ठेवलेल्या फिल्मवर या भागांचे वेगवेगळे चित्र उमटते. सामान्य लोक भाषेत यालाच ‘फोटो काढणे’ असे म्हणतात.

X-ray Machine
Scanning Machine

क्ष-किरण तंत्राने एकेकाळी वैद्यकीय उपचारात मोठी क्रांती झाली. छाती,पोट, हात,पाय, कवटी, इत्यादी अनेक भागांची विशिष्ट आजारांसाठी क्ष-किरण तपासणी करता येते. क्षयरोग, मुतखडे, अस्थिभंग, कॅन्सरचे काही प्रकार, हाडांची सूज, आतडीबंद, आतडयांना छिद्र पडणे यामुळे क्ष-किरणतंत्र आता मोठया प्रमाणावर वापरले जाते.

बेरियम नावाचे विशिष्ट औषध प्यायला देऊन पचनसंस्थेची खास चित्रे काढता येतात. यामुळे जठरव्रणाचे निदान होऊ शकते. क्ष-किरण अडवणारे आणखी एक औषध शिरेतून देऊन मूत्रपिंड ते कसे बाहेर टाकतात याचे चित्र घेतले जाते. मूत्रपिंडाचे कामकाज, अडथळे, इत्यादी तपासण्यासाठी याचा उपयोग होतो.

पचनसंस्थेतल्या हवेच्या रचनेवरून आणि स्थानावरून पचनसंस्थेला छिद्र पडणे किंवा आतडीबंद झालेला ओळखता येते. शरीरात बाहेरची एखादी नको असलेली वस्तू गेली असेल (उदा. मुलांनी एखादी टाचणी, पिन, नट गिळणे) क्ष किरण चित्राने कळू शकते. तसेच शस्त्रक्रियेत एखादी धातूची वस्तू चुकून आत राहिली असेल तर तीही यात दिसू शकते.

अस्थिसंस्थेच्या आजारांचे निदान करताना तर क्ष-किरण चित्र नेहमीच वापरले जाते. क्ष-किरण चित्राच्या या रोगनिदानक्षमतेमुळे अनेक गंभीर आजारांचे निदान होऊ शकते, त्यांच्या प्रगतीवर लक्ष ठेवता येते. हल्ली आपण स्कॅन तंत्राबद्दल ऐकतो. हा ही क्ष किरणाचाच प्रकार आहे. ऍंजिओग्राफीतही क्ष-किरणांचाच वापर होतो.

कर्करोग व व्यंगाची भीती

क्ष-किरण चित्रांचा वापरही गरजेपेक्षा अधिकच होत आहे. चांगली काळजी घेतली नाही तर क्ष-किरण शरीरावर दुष्परिणाम करू शकतात. क्ष-किरण हा एक किरणोत्सर्ग आहे. अणुबाँबमुळे किरणोत्सर्ग एकदम आणि प्रचंड प्रमाणावर होतो. क्ष-किरण हा अगदी अल्प प्रमाणावर घडवून आणलेला किरणोत्सर्ग आहे. जर त्वचेवर एकाच ठिकाणी क्ष-किरणांचा मारा केला तर त्वचेवरच्या पेशी मरून त्या ठिकाणी एक व्रण तयार होतो. हा व्रण लवकर बरा होत नाही. काही दिवसांनी या व्रणाच्या ठिकाणी कॅन्सर होण्याची दाट शक्यता असते. तसेच क्ष-किरणांमुळे शरीरातल्या काही थोडया पेशी मरू शकतात. असे जास्त प्रमाणावर झाले तर शरीराला घातक असते. क्ष-किरणांमुळे पेशींमध्ये कर्करोगाची प्रवृत्ती निर्माण होऊ शकते. पण हे कॅन्सर शक्यतेचे प्रमाण अत्यल्प आहे.

Neck X-ray
Scanning Machine

लहान मुले, अर्भके, गर्भावस्थेतल्या पेशी यांच्यावर या क्रमाने क्ष-किरणांनी जास्त हानी होते. स्त्री-पुरुष बीजांडांच्या पेशींवर क्ष-किरण पडल्यास एक तर त्या मरतात किंवा त्या विकृत होतात. अशा विकृत बीजपेशीमुळे पुढच्या संततीत अनेक व्यंगे येऊ शकतात. हे सर्व परिणाम काही काळानंतर होत असल्याने आणि क्ष-किरण अदृश्य असल्याने हा धोका आपल्याला जाणवत नाही. पण हा धोका निश्चित असल्याने क्ष-किरणांचा वापर अगदी जपून केला पाहिजे. यासाठी पुढील सूचना महत्त्वाच्या आहेत :

  • क्ष-किरण चित्र काढण्याचा आग्रह रुग्णाने स्वतः करू नये.
  • लहान वयात क्ष-किरणांपासून जास्त नुकसान होते, म्हणून लहान वयात क्ष-किरणांचा वापर टाळावा. अपरिहार्यच असल्यास शक्य तर बीजांडे तरी झाकली जावीत अशी व्यवस्था करावी. शिशाचे पडदे किंवा पट्टी वापरून बीजांडे झाकता येतात.
  • शक्यतो चांगल्या सुसज्ज केंद्रात क्ष-किरण तपासणी करावी. ग्रामीण भागात, तालुक्याच्या गावी वगैरे आढळणारी क्ष-किरण व्यवस्था अपुरी, घातक असू शकते. यंत्र वापरणा-या अनेक डॉक्टरांना या धोक्याची आणि प्रतिबंधक काळजीची पुरेशी कल्पना नसते. क्ष-किरण तपासणी चालू असताना आजूबाजूला मुले, माणसे वावरत नाहीत हे पाहणे आवश्यक असते. क्ष-किरण यंत्राजवळ काम करणा-या डॉक्टरांना व साहाय्यकांना शिशाचे झगे (एप्रन)घालावे लागतात. दारे खिडक्याही शिशाच्या पट्टयांनी सीलबंद होतील अशी व्यवस्था करावी लागते. क्ष-किरण व्यवस्था व त्याची संरक्षक व्यवस्था वापरणारे डॉक्टर-तंत्रज्ञ यांवर फार गोष्टी अवलंबून असतात.
स्कॅन

या तंत्रापेक्षा स्कॅन तंत्राने शरीरातील इंचाइंचावरचे चित्र काढता येते. विशेषकरून मेंदूच्या आजारात याचा फार चांगला उपयोग होतो.

सोनोग्राफी

Sonography Machine क्ष-किरण चित्रे काही प्रमाणात तरी घातक असतात. तसेच क्ष किरणांद्वारे मांसल भागाचे चित्र फारसे चांगले येत नाही. शरीराच्या आतली चित्रे घेण्याचे तंत्र आता आणखी सुधारले आहे. सूक्ष्म ध्वनिलहरी सोडून त्या शरीरातील अंतर्भागावरून परावर्तीत करून चित्र उमटता येते. या तंत्राला अल्ट्रासाऊंड किंवा सोनोग्राफी असे नाव आहे. हे तंत्र अधिक निश्चित आणि जास्त भरवशाचे आहे. क्ष-किरण चित्राने दिसू न शकणा-या अशा अनेक बाबी या तंत्राने अधिक चांगल्या समजतात. उदा. गर्भाचे हृदय काम करते आहे की नाही, त्यात व्यंग आहे काय, शरीरातल्या मांसल गाठी यांचे चांगले निदान या तंत्रात होते. गर्भावस्थेत वारेची जागा, गर्भाचे दोष, गर्भाची वाढ, इत्यादी अनेक महत्त्वाच्या गोष्टी या तंत्राने समजतात. म्हणून प्रसूतीपूर्व चिकित्सेत या तंत्राचा वापर वाढला आहे. ओटीपोटातल्या, उदरपोकळीतल्या अवयवांच्या गाठी, इत्यादींच्या निदानासाठी हे तंत्र अगदी वरदान ठरले आहे.

मात्र सोनोग्राफीचा लिंगनिश्चितीसाठी गैर आणि बेकायदा वापर वाढत आहे. यामुळे सोनोग्राफी केंद्रावर बरीच बंधने घालावी लागली आहे. ‘येथे गर्भलिंगनिदान केले जात नाही.’ अशी पाटी लावावी लागते. सरकारी निरीक्षकाला सोनोग्राफी केंद्र तपासण्याची मुभा असते. परंतु डॉक्टरवर्गानेच या अपप्रवृत्तीला आळा घालावा लागेल.

 

डॉ. शाम अष्टेकर २१, चेरी हिल सोसायटी, पाईपलाईन रोड, आनंदवल्ली, गंगापूर रोड, नाशिक ४२२ ०१३. महाराष्ट्र, भारत

message-icon shyamashtekar@yahoo.com     ashtekar.shyam@gmail.com     bharatswasthya@gmail.com

© 2017 arogyavidya.net | All Rights Reserved.