Disease Science Icon रोगशास्त्र खास तपासण्या
ताप का येतो?

Fever शरीरात रक्तातल्या पांढ-या पेशींची रोगजंतूंविरुध्दची लढाई चालू असते. या लढाईतून निघणा-या विषारी पदार्थामुळे ताप चढतो. ताप येण्यासाठी मेंदूच्या केंद्रातून आदेश मिळतो.

ताप बहुधा जंतुदोषामुळे येतो. जंतुदोषामुळे निर्माण होणा-या काही रासायनिक पदार्थांची मेंदूतल्या तापमान-नियंत्रण-केंद्रावर क्रिया होऊन ताप येतो. तापामुळे शरीरातल्या रासायनिक क्रियांना वेग येतो. म्हणून काही प्रमाणात ताप हा मूळ आजार बरा होण्यासाठी आवश्यक आहे. राग आल्याशिवाय जशी लढाई होत नाही तशी तापाशिवाय जंतूंशी लढाई होत नाही. बारीक ताप असेल तर ताप उतरवण्याची आवश्यकता नसते. मात्र ताप जास्त असेल तर मेंदूवर परिणाम होऊ शकतो. लहान मुलांना तापामुळे कधीकधी झटके येऊ शकतात. ताप किती आहे याबरोबरच कसा आहे हेही पाहणे महत्त्वाचे आहे.

तापाची महत्त्वाची कारणे समजावून घेण्यासाठी तापाचे रोगनिदान मार्गदर्शक व तक्ते पहा.

तापावर उपचार

साधारण किंवा मध्यम ताप असेल तर केवळ कोमट पाण्याने अंग पुसून ताप कमी करता येतो.

  • ऍस्पिरिन आणि पॅमाल ही औषधे तापावर गुणकारी आहेत. ऍस्पिरिनमुळे पोटात जळजळ होते. म्हणून आधी काही तरी थोडे खाऊन मगच ते घ्यावे. पॅमालने पोटात जळजळ होत नाही. लहान मुले व गरोदर स्त्रियांकरता पॅमालच वापरावे.
  • ताप हे केवळ लक्षण आहे. मूळ आजारावर उपचार होणे आवश्यक आहे.
ताप आणि आयुर्वेद

Fever Therapy तापाच्या अनेक अवस्था असतात. ताप सुरु होत असताना भूक कमी होते. त्यावरून प्रौढांसाठी लंघन हा प्रथम महत्त्वाचा उपचार ठरतो.

रोगनिदान नेमके असल्यास तापासाठी वेगळा योग्य उपचार असतोच. ताप असताना गोदंती मिश्रण (गोदंती व जहर मोहरा पिष्टी) 200 ते 300 मि ग्रॅ. दिवसातून 3-4 वेळा देणे उपयोगी ठरते. ताप उतरताच या पुडया थांबवाव्यात. थंडी भरून ठरावीक वेळाने मधून मधून येणारा ताप असतो. अशा वेळी काढेचिराईत उपयोगी आहे. या गोळयांनी थंडीताप आटोक्यात येतो.

अनेकदा इतर उपचारांनी जोरदार ताप नियंत्रित होतो, पण काहीजणांना 99 अंशाच्या आसपासचा ताप सतत राहतो. त्या वेळी गुडुचिघनवटी, संशमतीवटी ह्या 64 मि.ग्रॅ. च्या चार ते आठ गोळया 3-4 वेळा वापराव्यात. याने अंगात मुरलेल्या जुनाट तापाचे तीन चार दिवसांत निराकरण होते.

जुनाट ज्वरात त्वचेला, शरीराला कोरडेपणा येतो. अशा अवस्थेत कडू औषधाची तुपे उपयोगी पडतात. तित्तक तूप 15-20 मि.ली. ह्या प्रमाणात, सकाळी रिकाम्या पोटी चार ते सहा दिवस द्यावे.

ताप हे सर्वात सामान्य आणि महत्त्वाचे रोगलक्षण आहे.

 

डॉ. शाम अष्टेकर २१, चेरी हिल सोसायटी, पाईपलाईन रोड, आनंदवल्ली, गंगापूर रोड, नाशिक ४२२ ०१३. महाराष्ट्र, भारत

message-icon shyamashtekar@yahoo.com     ashtekar.shyam@gmail.com     bharatswasthya@gmail.com

© 2017 arogyavidya.net | All Rights Reserved.