ऍडेनोईड (ऍडेनो) नावाच्या रसग्रंथी नाक आणि घसा यांना जोडणा-या भागात पाठभिंतीवर असतात. साध्या तपासणीत त्या दिसत नाहीत.
ऍडेनोग्रंथीचा त्रास तीन ते पाच वर्षे या वयात विशेष असतो. ऍडेनोवाढीची मुख्य खूण म्हणजे मूल श्वासासाठी तोंड उघडे ठेवते. मधूनमधून बारीक खोकलाही असतो. अशा मुलांना झोपेत श्वासोच्छ्वासाला विशेष त्रास होतो.
ऍडेनोसुजेवर कोझालच्या किंवा ऍमॉक्सी गोळयांचा उपयोग होऊ शकतो. सहसा पाच वर्षानंतर हा त्रास थांबतो. पण त्रास वारंवार होत असेल तर शस्त्रक्रियेने या ग्रंथी काढून टाकणे चांगले. टॉन्सिलच्या शस्त्रक्रियेत ऍडेनोईडग्रंथीही काढून टाकली जाते.
होमिओपथीने टॉन्सिलसूज व ऍडेनोईडसूज बरी होते असा अनेक जणांचा अनुभव आहे. म्हणून शस्त्रक्रियेआधी होमिओपथीचा उपयोग करून पहावा. यासाठी होमिओपथीचे प्रकरण पहा.
नाकाच्या पोकळीच्या वर, बाजूला, मागे आणि मेंदूखाली अशा प्रत्येकी चार-चार पोकळया असतात. त्या नाकाला जोडलेल्या असतात. या पोकळयांनाच सायनस म्हणतात. या पोकळया हाडांमध्ये असतात. निरोगी अवस्थेत या पोकळया हवेशीर व रिकाम्या असतात. सर्दीपडशात या पोकळयांची नाकात उघडणारी तोंडे सुजून बंद होतात. त्यामुळे पोकळयांतल्या आवरणालाही सूज येते. यामुळे डोके ‘जड’ वाटते. सर्दीपडसे कमी झाले, की या पोकळयाही मोकळया होऊन बरे वाटते.
सर्दीपडशात काही वेळा या पोकळयांमध्ये दाह सुरू होतो. बहुधा हा दाह जिवाणूंमुळे होतो. जेथे दाह होतो ती पोकळी जड होते व नंतर पू भरून ठणकते. जी पोकळी ठणकते त्यावर दाबल्यावर दुखरेपणा आढळतो. डोळयाखालच्या किंवा कपाळावरच्या सायनस पोकळयांचे दुखणे अशाने सहज समजते. मात्र नाकामागील अंतर्भागात पोकळी सुजली असेल तर वरून कळत नाही. अशा वेळी फक्त डोके ठणकत राहते. ही डोकेदुखी बहुधा कानापुढच्या खोलगट भागात असते.
हेपार सल्फ, लॅकेसिस, मर्क्युरी सॉल, नेट्रम मूर, नक्स व्होमिका, फॉस्फोरस, पल्सेटिला, सिलिशिया
उन्हातून आल्यावर काही लहान मुलांमध्ये नाकातून रक्तस्राव होतो. याला घोळणा फुटणे असे म्हणतात. यात नाकाच्या पुढच्या भागातल्या नाजूक रक्तवाहिन्या (केशवाहिन्यांचे जाळे) उष्णतेने फुगून फुटतात व रक्त येते.
काही वेळा अतिरक्तदाब किंवा रक्ताच्या कर्करोगात पण घोळणा फुटतो. म्हणून वारंवार असा त्रास होत असल्यास तज्ज्ञास दाखवावे.
रक्तस्त्राव सुरु असताना जास्त हालचाल न करता बसून रहावे. डोके पुढे झुकलेले ठेवावे. म्हणजे रक्त गिळले जाणार नाही.
वारंवार घोळणा फुटण्यामागे योग्य ती सर्व तपासणी (तज्ज्ञाकडून) होऊन गंभीर कारण नसल्यास पुढील उपचार करा. पोटातून दीड-दोन चमचे अडुळसा रस व मध आणि गूळ (किंवा साखर) द्यावे. रक्तस्रावाच्या प्रवृत्तीला या उपायाने आळा बसतो.