तिरळेपणा
दोन्ही डोळे समांतर कक्षात न राहण्याच्या दोषास ‘तिरळेपणा’ म्हणतात. तिरळेपणाबद्दल कमी माहिती असल्याने व अंधविश्वासामुळे मुलाच्या आयुष्याला कायमचे गालबोट लागते.
- तिरळेपणावर वेळीच उपचार केल्यास, दृष्टीहीनता व तिरळेपणा दोन्हीवरही मात करता येऊ शकते.
- जसजसे मुलाचे वय वाढत जाते तसतसे तिरळेपणावर उपचार करून दृष्टी परत मिळवणे अवघड होत जाते.
- हा तिरळेपणा काही मुलांमध्ये कायमचा असतो तर काहींमध्ये तो मध्येच उद्भवणारा असू शकतो.
- हा दोष आतील, बाहेरील, वरील किंवा खालील कोणत्याही दिशेत असू शकतो.
- तिरळेपणावर वेळीच उपचार झाला नाही तर डोळा आळशी होण्याची स्थिती निर्माण होते. ही स्थिती दृष्टीहीनतेस कारणीभूत ठरू शकते.
तिरळेपणाची कारणे
- आनुवंशिकता
- असंतुलित स्नायुशक्ती व डोळयास होणारा कमी रक्तपुरवठा.
- मोतीबिंदुमुळे निर्माण होणारी पुसट प्रतिमा, बुबुळावरील व्रण, आंतरपटलाचे रोग, दृष्टीदोष, डोळयात गाठ असणे, इ.
तिरळेपणाची लक्षणे
- एक डोळा किंवा दोन्ही डोळे वेगवेगळया दिशेने पाहणे.
- एका किंवा दोन्ही डोळयांमध्ये दृष्टीदोष
- तीव्र सूर्यप्रकाशात तिरळेपणा असणारी मुले डोळा मिटून घेतात.
- काही मुले चेहरा किंवा डोके एका ठरावीक दिशेत वाकवून वस्तुकडे बघण्याचा प्रयत्न करतात.
- दोन प्रतिमा दिसतात
कायमची दृष्टीहीनता येऊ नये यासाठी केले जाणारे उपचार
- दृष्टीदोषामुळे आलेला तिरळेपणा हा ठरावीक चष्म्याचा नंबर लावून घालवता येतो.
- सामान्य डोळयास पट्टी (पॅच) लावून आळशी झालेल्या डोळयाची नजर वाढवता येते.
शस्त्रक्रिया
- समांतर कक्षात नसलेले डोळे शस्त्रक्रियेने योग्य दिशेत आणले जातात.
- शस्त्रक्रिया पूर्ण भूल देऊन किंवा फक्त डोळयांस भूल देऊन केली जाते.
- शस्त्रक्रिया होणा-या मुलास सर्दी, ताप, खोकला, इ. सारखा आजार नसावा.
- शस्त्रक्रिया डोळयाच्या पांढ-या भागात केली जाते.
- शस्त्रक्रियेनंतर एखादाच दिवस हॉस्पिटलमध्ये राहावे लागते.
- जरी शस्त्रक्रिया झाली असेल तरीही चष्मा वापरणे बंधनकारक आहे.
बालवयातला तिरळेपणा एकतर जन्मजात असतो किंवा दृष्टीदोषामुळे तयार झालेला असतो. तिरळेपणा आढळला तर लवकरात लवकर नेत्रतज्ज्ञास दाखवणे आवश्यक असते. शस्त्रक्रियेने तिरळेपणावर उपाय करता येतो. दृष्टीदोष असल्यास त्यावरही उपाय करावे लागतात.
डोळयात काही विकार नसताना आणि नंबर चष्मा देऊन दुरूस्त केला तरी डोळयाची नजर कमी होणे म्हणजेच ‘आळशी डोळा’.
डोळा आळशी कशामुळे होतो?
- तिरळेपणा
- दोन डोळयातील चष्म्याच्या नंबरमधील तफावत.
- जन्मजात मोतीबिंदू
- पापणी पडणे
आळशी डोळा हा विकार बालपणीच होतो. लहान मुलांमध्ये दृष्टी तयार होण्याची प्रक्रिया नऊ वर्षापर्यंत होते. जेवढे वय लहान तेवढाच हा विकार होण्याचा संभव जास्त असतो.
डोळा आळशी का होतो?
जेव्हा दोन डोळयांमधील चष्म्याच्या नंबरमध्ये तफावत असते तेव्हा जास्त नंबर असलेल्या डोळयाकडून अस्पष्ट प्रतिमा मेंदूकडे पाठविली जाते. तिरळेपणामध्ये एकाच वस्तूच्या दोन वेगवेगळया प्रतिमा दोन्ही डोळयांकडून मेंदूस पाठविल्या जातात. त्यामधील तिरळा असलेल्या डोळयाकडून येणारी प्रतिमा ही आपोआपच दुर्लक्षित होते व तिरळा असणारा डोळा आळशी होतो. ही अस्पष्ट प्रतिमा मेंदू दुर्लक्षित करतो त्यामुळे त्या डोळयाची दृष्टी कमी होते व डोळा आळशी बनतो.
त्वरित उपचार न केल्यास हा रोग, कायमचा जडतो व नंतर कोणतीही उपाययोजना करून दृष्टी परत मिळवता येत नाही.
या विकारावर उपचाराचे चांगले परिणाम मिळण्यासाठी रुग्णाचा व रुग्णाच्या नातेवाईकांचा योग्य प्रतिसाद आवश्यक असतो.
आळशी डोळयावर उपचार काय करावा?
लवकर निदान झाल्यास व लवकर उपचार केल्यास हा विकार बरा होऊ शकतो.
- आळशी डोळा या विकारावरील सर्वात महत्त्वाचा उपचार म्हणजे रुग्णाकडून त्याच्या आळशी डोळयाकडूनच काम करून घेणे आवश्यक असते. चांगली दृष्टी परत मिळविण्यासाठी सामान्य (काम करणारा) डोळा पट्टी लावून झाकणे (पॅचींग) व आळशी डोळयाकडून काम करून घेणे.
- रुग्णांस दृष्टीदोष असल्यास योग्य नंबरचा चष्मा देणे.
- आळशी डोळा व तिरळेपणा एकत्र असल्यास शस्त्रक्रिया केली जाते.
- सामान्य डोळयास पट्टी लावून ठेवण्याच्या प्रक्रियेस ‘डोळाबंद’ असे म्हणतात. ही प्रक्रिया रुग्णाच्या वयोमानानुसार व विकाराच्या तीव्रतेनुसार काही तास किंवा काही दिवसांसाठी केली जाते.
- पट्टी लावणा-या (पॅचिंग केलेल्या) रुग्णांचा, पाठपुरावा हा नेत्रतज्ज्ञांकडून ठरावीक कालावधी नंतर होणे गरजेचे असते.
- पट्टी लावून ठेवण्याच्या (पॅचिंगच्या) प्रक्रियेस सुरुवातीला मुलं प्रतिसाद देत नाहीत परंतु दृष्टीत सुधारणा होत राहिल्याने या प्रक्रियेचा स्वीकारही वाढत जातो.
- लहान मुलांमध्ये सुरुवातीस थोडा काळच पॅचिंग केले जाते. नंतर चांगल्या परिणामांसाठी त्याचा कालावधी हळूहळू वाढवला जातो.
- पॅच हा डोळयावर चेह-यालाच लावला जातो.
- चष्मा वापरणा-या रुग्णांमध्येही हा पॅच चष्म्याला न लावता डोळयावरच लावला जातो.