डोळयामध्ये कचरा, धातूचे कण, कीटक, इत्यादी जाणे ही वारंवार आढळणारी तक्रार आहे. धान्याचे तूस, झाडाच्या फांद्या, काटे, गाईगुरांचे शेपूट, शिंग, इत्यादींमुळे डोळयांना जखमा होण्याच्या घटना ग्रामीण भागात नेहमी आढळतात. कामगारांना डोळयात कचरा, कण जाण्याचा प्रकार वारंवार आढळतो. यावर प्रतिबंध म्हणून गॉगल लावायला पाहिजे. अशा वेळी नीट तपासणी करून बुबुळाची जखम शोधा. वाहन चालवताना गॉगल/ चष्मा न घालणे हे ही याचे एक नेहमीचे कारण आहे. त्यामुळे डोळा लाल होणे, पाणी सुटणे, वेदना, इत्यादी त्रास होतो. पण डोळे येण्याच्या सुरुवातीसही डोळयात काही तरी गेल्याची भावना होत असते.
तपासणीत डोळा पूर्ण उघडून व बुबुळाच्या बाजूच्या पांढ-या भागावर पापण्यांच्या आतल्या बाजूस नीट तपासणी करावी. दिसत असेल तर कण, कचरा, इत्यादी ओल्या कापसाच्या बोळयाच्या टोकाने काढून टाकावा. यानंतर डोळा स्वच्छ पाण्याने धुऊन घ्यायला सांगावे. याबरोबरच बुबुळाची काळजीपूर्वक आणि सावकाश तपासणी करणे आवश्यक आहे.
बुबुळाचा दाह होऊन जखम झाल्यामुळे कायमचा दृष्टीदोष येऊ शकतो. फूल मोठे व मध्यभागी असल्यास प्रकाशकिरण शिरू शकत नसल्याने डोळा निकामी होतो. या दोषामुळे भारतात लाखो मुलांचे डोळे अधू झालेले आहेत.
जखम झाल्यानंतर ताबडतोब दखल घेणे आवश्यक आहे. बुबुळात काही रुतले असल्यास किंवा जखम असल्यास लगेच डोळयांच्या डॉक्टरांकडे न्यावे. तोपर्यंत नुसते जंतुविरोधी औषधांचे थेंब टाकून पट्टी बांधावी.
लवकरच उपलब्ध होईल…