sexual health icon लैंगिक समस्या पुरुषजननसंस्था
लैंगिक समस्या
प्रास्ताविक

Sexual Statue लैंगिक इच्छा व ऊर्जा हीच समस्त प्राणीवर्गाच्या अस्तित्वाचा उगम आहे. पण इतर प्राणी व मानव यांच्या लैंगिकतेत काही महत्त्वाचे फरक आहेत. एकतर प्राणीवर्गात लैंगिक प्रवृत्ती बहुशः ऋतुप्रमाणे कमी जास्त होते; मानवात ती सर्व ऋतूंमध्ये, कधीही जागृत होऊ शकते. दुसरी गोष्ट म्हणजे प्राण्यांमध्ये लैंगिक जोडीदार निवडण्यात काही स्वातंत्र्य असते, मात्र लग्नसंस्थेमुळे मानवाने त्याबद्दल काही बंधने स्वीकारलेली आहेत. लग्नाची व्यवस्था नसती तर पशूंप्रमाणे ‘बळी तो कान पिळी’ हा न्याय लागू झाला असता. लग्नांचा तोटा म्हणजे काही जोडप्यांना वंध्यत्वाची समस्या सहन करायला लागणे, आणि काहींना लैंगिक असमाधान. बलात्कार हा शाप बहुतेक मानव समाजामध्ये आहे, पशूंमध्ये तो नाही हाही फरक आहे.

अनेक लोक लैंगिक असमाधानाने त्रस्त असतात. यासाठी कोणी काही औषध सुचवले तर काहीही खर्च करायला तयार असतात. योग्य सल्ला उपचार मिळण्याची सर्वत्र सोय नसल्याने या क्षेत्रात फसवेगिरी पुष्कळ आहे. वर्तमानपत्रात अशा पुष्कळ जाहिराती नित्य आढळतात. या समस्यांबद्दल महत्त्वाची काही माहिती आपल्याला असायला हवी. या समस्यांपैकी लिंगसांसर्गिक आजारांचे प्रकरण पूर्वीच होऊन गेलेले आहे. या प्रकरणात इतर काही समस्या पाहूया.

संवेदनाक्षेत्रे

शरीरसंबंधासाठी उत्तेजित होण्यासाठी शिश्न व योनिमार्गाचा काही भाग अत्यंत महत्त्वाची भूमिका बजावतो. शिश्नाचे टोक अत्यंत हळवे असते, त्यावरचा स्पर्श उद्दीपक असतो. अशीच कामगिरी योनिद्वारावरचे बोंड पार पाडते. बोंडाला बोटांचा किंवा शिश्नाचा स्पर्श कामोत्तेजक असतो.

या मुख्य भागांशिवाय ओठ, स्तन, स्तनाग्रे, मांडयांच्या आतील भाग, जननेंद्रियांबाजूची त्वचा, वृषण, इ. भागांना स्पर्श झाल्यावर कामोत्तेजक अनुभव येतो. कामक्रीडेमध्ये या स्पर्शाचे महत्त्व खूप आहे.

समलिंगी संबंध

एकूण लोकसंख्येत वरील प्रकारचा स्त्री-पुरुष लैंगिक संबंध सर्वाधिक प्रमाणात आहे. मात्र काही पुरुषांना पुरुषांबद्दलच आकर्षण वाटते, तसेच काही स्त्रियांना स्त्रियांबद्दल. अशा पुरुष-पुरुष किंवा स्त्री-स्त्री शरीरसंबंधांना समलिंगी संबंध म्हणतात. काही देशांमध्ये अजून याला कायदेशीर मान्यता नाही. भारतातही अशा संबंधांना काही समाजमान्यता मिळत आहे. अशा व्यक्ती शुध्द समलिंगी संबंध ठेवतात किंवा दोन्ही प्रकारचे (म्हणजे समलिंगी व भिन्नलिंगी) संबंध ठेवतात. तसेच काही जोडपी एकनिष्ठ असतात तर काहीजण जोडीदार बदलत राहतात.

पुरुष-पुरुष समलिंगी शिश्न व गुदद्वार, शिश्न व तोंड यांचा संबंध येतो. यात वीर्यपतन अर्थातच होते, आणि गर्भधारणेचा प्रश्न येतच नाही.

Relationship
Relationship

स्त्री-स्त्री लैंगिक संबंधात शिश्न नसल्याने वीर्यपतन, गर्भधारणा या दोन्हींचाही अभाव असतो. अशा स्त्रिया चुंबन, आलिंगन, आणि बोटाने (अथवा काही वस्तूंनी) योनिमर्दन करतात. शिश्न जरी नसले तरी, योनिमार्गाचे स्त्राव, आकुंचन, इत्यादी आनंद यातून मिळू शकतात.

भारतात अनेक शहरांत अशा समलिंगी व्यक्तींच्या संघटना व संस्था आहेत.

भारतासारख्या स्त्री-विरोधी समाजात स्त्री-समलिंगी संबंध हा ब-याच स्त्रियांना मोठाच आधार आहे. विधवाविवाह फारच कमी होत असल्याने आयुष्यभर लैंगिक दुःख भोगण्यापेक्षा अनेक स्त्रिया हा मार्ग स्वीकारतात.

भारतात हा वाद 2009 मध्ये कोर्टाच्या निर्णयाने समलिंगी संबंधाना एक संमती प्राप्त झाली आहे. परंतु लग्न, दत्तक व वारसहक्काचा मुद्दा अजून वादग्रस्त आहे.

 

डॉ. शाम अष्टेकर २१, चेरी हिल सोसायटी, पाईपलाईन रोड, आनंदवल्ली, गंगापूर रोड, नाशिक ४२२ ०१३. महाराष्ट्र, भारत

message-icon shyamashtekar@yahoo.com     ashtekar.shyam@gmail.com     bharatswasthya@gmail.com

© 2017 arogyavidya.net | All Rights Reserved.