त्वचेखाली रंगद्रव्याचे प्रमाण कमी झाल्याने ‘पांढरे डाग’ येतात. मात्र पांढरे कोड का येते याची पूर्ण माहिती आपल्याला अजून तरी नाही. काही प्रकारचे कोड काही प्रमाणात आनुवंशिक आहेत. याचा अर्थ काही वेळा ते पुढच्या पिढयांत उतरू शकतात. पण दिसण्याचा भाग सोडल्यास कोडाचा इतर त्रास अजिबात नसतो. केवळ डागांसाठीच कोडावर उपचाराची इच्छा असते.
कोडासाठी अजून तरी हमखास औषध किंवा उपाय सापडलेला नाही. ब-याच वर्तमानपत्रांत लोकांच्या भावनांचा आणि अगतिकतेचा गैरफायदा घेऊन कोडाच्या उपचारांची जाहिरात येते व ती ब-याचदा फसवी असते. कोडाच्या उपचारावर अजून संशोधन चालू असून अल्ट्राव्हायोलेट किरण, काही रसायने, इत्यादी वापरून पांढरा झालेला भाग इतर त्वचेसारखा करण्याचे प्रयत्न चालू आहेत. (याने सुमारे 60-70 टक्के रुग्णास फायदा होतो)
मात्र आयुर्वेदिक पध्दतीत आंतरशुध्दीबरोबर भल्लातक तेल लावतात. याने काही रुग्णांमध्ये सुधारणा झाल्याचा अनुभव आहे. यासाठी आयुर्वेद तज्ज्ञाकडे पाठवावे.
किनवट तालुक्यात उनकेश्वर येथे उष्ण पाण्याचे झरे आहेत. या गंधकयुक्त पाण्याचा वापर व वनौषधी उपचारासाठी अनेक रुग्ण येतात. यातल्या अनेकांना गुण आलेला दिसतो.
महाराष्ट्रात नारूचे पूर्ण उच्चाटन झाले आहे. या रोगाचे लांबलचक सुतासारखे जंत असतात. ते पायातून बाहेर पडून पाण्याशी संपर्क आल्यावर अंडी घालतात. पाण्यातला एक बारीकसा किडा (सायक्लॉप्स) ही अंडी गिळतो. या किडयाच्या पोटात ही अंडी वाढतात. माणसाने हे पाणी प्यायल्यावर त्यातून सूक्ष्म जीव बाहेर पडून शरीरात घर करतात, हे जंत वाढतात व हळूहळू प्रवास करून पायात येतात जिथे पाण्याचा संपर्क येतो अशा ठिकाणी ते त्वचेतून बाहेर पडतात आणि अंडी घालतात.
सुरक्षित व शुध्द पाणीपुरवठा हाच यावरचा खरा प्रतिबंधक उपाय आहे. पिण्याच्या पाण्याच्या विहिरीच्या पाय-या काढून टाकणे ही यातली महत्त्वाची युक्ती होती. याचबरोबर पिण्याच्या पाण्यासाठी बोअरचा वापर वाढल्याने नारुचा प्रभाव कमी झाला.