महाराष्ट्रात विंचवाचे दोन प्रकार आढळतात – काळा विंचू आणि लाल विंचू. काळा विंचू आकाराने मोठा परंतु कमी घातक असतो. हा काळा विंचू महाराष्ट्रात बहुतेक ठिकाणी सापडतो. याउलट मुख्यत: कोकणात सापडणारा लाल विंचू जास्त घातक असून रुग्ण त्यामुळे दगावू शकतो.
काळया विंचवाचा दंश झाल्यावर खूप वेदना होते. दंशाच्या जागेपासून ही वेदना वर वर चढत जाते आणि सुमारे तास-दोन तास ती वाढत जाते. तरुण व प्रौढ व्यक्तींमध्ये वेदनेपेक्षा जास्त परिणाम सहसा होत नाहीत. दंशाच्या ठिकाणी घाम येतो आणि स्नायूंची थरथर जाणवते. रक्तदाब थोडा वाढू शकतो व नाडीचा वेग थोडा मंदावतो. परंतु यापेक्षा अधिक दुष्परिणाम सहसा नसतात.
हा विंचू चावल्याचावल्या त्या जागेच्या वर दोरी किंवा कपडा आवळून बांधण्याचा प्रघात आहे. मात्र याचा उपयोग होत नाही, आणि दोरी काढल्यावर वेदना एकदम वाढते.
तोंडाने वेदनाशामक गोळी दिल्यास बराच वेळ वेदना कमी जाणवते. तोंडात किंवा पाण्यात विरघळणा-या वेदनाशामक गोळया वापरल्यास इंजेक्शनची गरज पडत नाही.
विंचू दंशाची वेदना कमी होण्यासाठी दंशाच्या भागात लिग्नोकेनचे इंजेक्शन (जखम शिवताना वापरतात ते) देतात. हे इंजेक्शन रुग्णालयातच दिलेले बरे. याचा परिणाम फक्त अर्धातास टिकतो. त्यानंतर परत एकदा-दोनदा हे इंजेक्शन द्यावे लागते.
काही जिल्ह्यांमध्ये दंशावर शेवग्याचा डिंक चेचून ओला करून लावणे हा उपाय केला जातो. मात्र तो खात्रीलायक नाही. तुरटी भाजून दंशाच्या जागी लावणे हा प्रथमोपचार उपयुक्त आहे असे दिसते. मात्र वेदनाशामक गोळी हा त्यापेक्षा जास्त खात्रीशीर उपाय आहे.
महाराष्ट्राच्या काही भागामध्ये (विशेषतः कोकण) विंचवाची वेगळी जात आढळते. या विंचवाच्या दंशामुळे फुप्फुसांना सूज येते. उलटी, घाम येणे, दम लागणे, हातपाय थंड पडणे, खोकल्यात रक्त, इ. लक्षणे लगेच दिसून येतात. पूर्वी यामुळे हमखास मृत्यू होत. हे सर्व दुष्परिणाम या विंचवाच्या विषामुळे ऑटोनॉमिक चेतासंस्थेशी निगडित आहेत. पण कोकणातल्या डॉ. बावसकर यांच्या संशोधनामुळे यावर अगदी सोपा उपाय निघाला आहे.
यावर प्राझोसिन (1 किंवा 2 मि.ग्रॅ. ची गोळी) किंवा निफेडिपीन (5 मि.ग्रॅ.) यापैकी एक गोळी लक्षणे दिसताच द्यावी. प्राझोसिन गोळी पोटातून द्यावी, व खोकला-रक्त वगैरे लक्षणे दुरुस्त होईपर्यंत चार तासांनी देत राहावे. निफेडिपीनची कॅप्सूल असते व ती फोडून जिभेखाली चोखावी. ही गोळी एरवी अति रक्तदाब कमी करण्यासाठी वापरली जाते. या गोळीचा परिणाम 5-15 मिनिटात दिसतो.
मात्र केवळ अशी लक्षणे असतील तरच ही औषधे वापरावीत; इतर वेळा वापरू नये. महाराष्ट्रात कोकण सोडून असे विंचू आढळत नाहीत.
विंचवांचा प्रादुर्भाव छप्पर, जुने कपडे, चपला, बूट आणि अडगळ यामध्ये जास्त असतो. छपरातून रात्री विंचू खाली टपकतात. यासाठी कौलारु छपराखाली लाकडी सिलिंग असणे उपयोगी ठरते. शेतीकाम करताना हातात जाड कापडी मोजे वापरणे चांगले. गुंडाळून ठेवलेले अंथरुण पांघरुण आधी नीट पसरून पाहून झोपावे.
कीटकनाशक फवारणीने विंचू सहज मरतात. म्हणूनच वर्षातून एकदा कीटकनाशक फवारणी करून घ्यावी. मातीची व कौलारु घरे, झोपडया आणि अडगळीची घरे यांमध्ये अशी फवारणी अवश्य करून घ्यावी. विशेष करून कोकणात याचा जास्त लाभ होईल.