श्वसनसंस्थेमध्ये घशापासून ते फुप्फुसातल्या सूक्ष्म श्वासनलिकांपर्यंत काहीही आजार झाला, की खोकला येण्याची शक्यता असते. तसेच फुप्फुसदाहाने काही द्रवपदार्थ श्वासनलिकांमध्ये आल्यास खोकला येतो. खोकला म्हणजे श्वसनसंस्थेला नको असलेले पदार्थ बाहेर टाकण्यासाठी होत असलेला प्रयत्न. जेव्हा टाकाऊ पदार्थ फारसा तयार होत नसेल व दाहही होत असेल तेव्हा ‘कोरडा’ खोकला येतो. याउलट जेव्हा टाकाऊ पदार्थ जास्त असतो तेव्हा ‘बेडके’ पडतात (याला काही जण ‘जड खोकला’ किंवा कफ असे म्हणतात)
या बेडक्यातला मुख्य पदार्थ म्हणजे श्वासनलिकांमधून पाझरणारा चिकट द्रव. काही वेळा यात ‘पू’ किंवा रक्तही पडते. बेडक्याच्या रंगावरून आणि वासावरून आतला रोग काय असेल याचा अंदाज करतात. बेडक्यातून, खोकल्यातून रक्त पडते तेव्हा प्रथम क्षयरोग व मग कॅन्सरची शंका घ्यावी. बेडका हिरवट व पू-मिश्रित असेल तर न्यूमोनिया किंवा फुप्फुसातले गळू हे त्याचे कारण असू शकते.
छातीत दुखणे (तक्ता (Table) पहा)
दुकानात मिळणा-या खोकल्याच्या बहुतेक औषधात एखादा गोड पदार्थ, मद्यार्काचे काही प्रमाण, बेडका सुटण्यासाठी मदत करणारा एक क्षार वगैरे पदार्थ असतात. या औषधांमुळे खोकला थोडासा कमी झाला असे वाटते. एवढा परिणाम सोडला तर खोकल्याच्या बहुतेक औषधांचा उपयोग होत नाही. मूळ रोगच बरा व्हायला पाहिजे. खोकला हे केवळ लक्षण आहे.
खोकला दाबण्याचे एक औषध (कोडीन) मिळते. त्याचा वापर मर्यादितच झाला पाहिजे.
कोरडया खोकल्यात खडीसाखर, बाळहिरडा, इत्यादी चघळायला देणे हा एक चांगला उपाय आहे. खोकल्यात जास्त पाणी प्यायल्याने बेडका सुटायला मदत होते. हळद-दुधानेही वरवरचा खोकला (विशेषतः घसासूज) कमी होतो.