आरोग्यविद्या हे ई-पुस्तक आमच्या भारतवैद्यक या पुस्तकावर आधारलेले आहे. मात्र त्यात पुष्कळ बदल केलेले आहेत. भारतवैद्यक हे पुस्तक मुख्यत: ग्रामीण कार्यकर्त्यांसाठी तयार केलेले होते. आत्ता महाराष्ट्र निम्मा ग्रामीण तर निम्मा शहरी आहे आणि आरोग्यक्षेत्रात बरेच बदल झालेले आहेत. तरीही ग्रामीण जनतेची गावपातळीवर प्राथमिक आरोग्यसेवेची गरज भागलेली नाही. आणि शहरातही अनेक वस्त्यांमध्ये प्राथमिक आरोग्यसेवा तुटपुंज्या आहेत. याशिवाय मध्यम वर्गीय कुटुंबानाही आरोग्याबद्दलची हवी ती माहिती सोप्या भाषेत लगेच मिळण्याची सोय नाही. तसेच शाळा, आश्रमशाळा, महाविद्यालये प्रशिक्षण केंद्रे स्वयंसेवी संस्था, शासकीय आरोग्य केंद्रे आणि घराघरांमध्ये अशा ई-पुस्तकाची सदैव गरज असते. आरोग्य, वैद्यकीय माहितीच्या प्रसारामुळे एकूण आरोग्य आणि आरोग्य व्यवस्था सुधारतात, आजारांचा प्रतिबंध होऊ शकतो, बराच वेळ व खर्च वाचतो आणि ग्राहक हक्कांचे संरक्षण होऊ शकते. म्हणूनच आरोग्य साक्षरतेला आतोनात महत्त्व आहे.
भारतवैद्यक या मूळ पुस्तकात अनेक आवश्यक विषयांची भर घालून, माहिती अद्ययावत् करून, छोटे छोटे विभाग करून आणि भाषा अधिक सोपी करून हे पुस्तक तयार झाले आहे. या ई-पुस्तकात सुमारे हजारभर रंगीत चित्रे आणि फोटो आहेत. याशिवाय साठएक व्हिडीओ क्लिप्स पण आहेत. या पुस्तकाचे एक महत्त्वाचे अंग म्हणजे रोगनिदान तक्ते आणि मार्गदर्शक. यातील रोगनिदान मार्गदर्शक संवादी म्हणजे इंटरॅक्टीव्ह असून त्यातून साधेसोपे प्रश्न किंवा खाणाखुणा शोधून सहजपणे प्राथमिक निदान करता येईल. सर्वसाधारणपणे ई-पुस्तक म्हणजे पी.डी.एफ. या चित्रप्रतिमेत असते. मात्र हे पुस्तक पूर्णपणे लिंक्ससहित आहे. म्हणून अनुक्रमणिकेत क्लीक करून त्या त्या विषयांकडे क्षणार्धात जाता येते. एवढेच नव्हे तर वर म्हटल्याप्रमाणे यातले मार्गदर्शक तर संवादी आहेत. आमच्या मते मराठीत अशा प्रकारचा मल्टिमेडियाचा वापर ई-पुस्तकात प्रथमच होत असावा. उपलब्ध माहिती तंत्रज्ञानाचा पुरेपूर वापर करण्याचा आम्ही यात प्रयत्न केला आहे. पूजासॉफ्ट कंपनी नवी मुंबई यांच्या मदतीने हे सर्व काम तडीस जात आहे. याबद्दल मी श्री. माधव शिरवाळकर, श्री. विश्वनात खांदारे आणि श्री. सचिन सातपुते यांचे आभार मानतो.
2010 मध्ये हे पुस्तक तीन वेगवेगळया स्वरुपात प्रकाशित होईल. प्रथम सी.डी. आवृत्ती, त्याच्यामागोमाग वेब आवृत्ती आणि लवकरच छापील पुस्तक प्रकाशित होईल.
इंग्रजी भाषेत सी.डी व वेब स्वरुपात माहितीचा महासागर तयार झालेला आहे. मराठी भाषेत त्यामानाने फारच जुजबी साधने आहेत. आरोग्याबद्दलची माहिती शोधताना फारच मोजक्या वेबसाईटस् (संकेतस्थळे) सापडतात. त्यातही उपलब्ध लेख मर्यादित स्वरुपाचे आहे, काहीतर केवळ वस्तूंच्या विक्रीपुरतेच मर्यादित आहेत. संगणकांचा प्रसार वेगाने होत आहे आणि लवकरच खेडोपाडी संगणक दिसणार आहेत. मात्र मराठीत विषयवार आशय उपलब्ध करणे ही मोठी जबाबदारी मराठी लेखकांनी घ्यायला पाहिजे. मराठी वापराचा आग्रह अगदी रास्त आहे. विविध विषयांवरची दर्जेदार माहिती सहजपणे सर्वांना उपलब्ध होणे ही मराठी भाषेच्या आणि त्यापेक्षा मराठी जनतेच्या विकासासाठी पूर्वअट आहे. दुर्दैवाने मराठी भाषकांनी एका न्यूनगंडापोटी मातृभाषेकडे दुर्लक्ष करून स्वत:ची आणि महाराष्ट्राची अपरिमित हानी करून घेतलेली आहे. याही परिस्थितीत नव्या नव्या प्रयत्नांची आणि चळवळींची गरज आहे. हे ई-पुस्तक आणि त्याच्यासोबत वेब आवृत्तीचे काम यादृष्टीने आम्ही महत्त्वाचे मानतो.
गेली सहा वर्षे मी मुक्त विद्यापीठात आरोग्यविद्याशाखा संचालक म्हणून काम करताना प्राथमिक आरोग्यासाठी अनेक पुस्तके लिहिली आणि लिहून घेतली आहेत. हे ई-पुस्तक करताना मला मुक्त विद्यापीठाच्या प्रगल्भ लेखन प्रारुपांचा फारच उपयोग झाला हे मी नम्रपणे नमूद करतो. 1992 साली लिहिलेले पुस्तक (भारतवैद्यक) मी यामुळे नव्याने परत लिहिले आणि जास्त सोपे केले.
मराठीत अनेक डॉक्टर्स आणि कार्यकर्ते आरोग्य-वैद्यकीय स्वरुपाचे चांगले लेखन करीत आहेत. खरे म्हणजे ही परंपरा निदान शंभर वर्षांची आहे आणि अत्यंत समृध्द आहे. हे सर्व लेखन पारखून तपासून योग्य स्वरुपात विकीपेडीया प्रमाणे सर्वांना वेबवर उपलब्ध होणे आवश्यक आहे. मुक्त विद्यापीठातर्फे असा प्रकल्प लवकरच सुरू होत आहे. आरोग्यविद्या हे पुस्तक भारतवैद्यक संस्थेने प्रकाशित केले असले तरी ते या नव्या आरोग्य पेडीयाचा भाग होणार आहे. या एकूण प्रयत्नातून मराठी बांधवांना अद्ययावत् आणि हवी ती आरोग्यविषयक माहिती उपलब्ध होत जाईल आणि वाढत राहील.
हे ई-पुस्तक सी.डी. स्वरुपात महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात, दऱ्या-डोंगरात, गावा-गावांत उपयोगी पडणार आहे. जेथे जेथे संगणक आहे तेथे हे ई-पुस्तक वाचता येईल. या पुस्तकातल्या वैशिष्टयपूर्ण रोगनिदान मार्गदर्शकांचा कुणीही उपयोग करू शकेल. यामुळे वैद्यकीय सेवांमध्ये व्यक्तिगत पातळीवर निर्णयक्षमता खूपच वाढेल आणि त्यामुळे वैद्यकीय व्यावसायिकांची जबाबदारीही वाढेल. या पुस्तकातल्या विविध प्रकरणांमधून विविध प्रयत्नांना चालना मिळावी अशी अपेक्षा आहे. वैयक्ति आणि सार्वजनिक स्वच्छता, व्यायाम, योग, शास्त्रीय औषध चळवळ, औषधी वनस्पती, होमिओपथी, ऍक्युप्रेशर, रोगप्रतिबंध, राष्ट्रीय आरोग्य योजना, पोषण, न्यायवैद्यक वगैरे अनेक विषय यात समाविष्ट आहेत.
खेडोपाडी वैद्यकसेवा मिळण्यासाठी 1932 साली लिहिलेल्या एका पुस्तकाच्या (सिध्दौषधिप्रकाश – लेखक कै.वैद्य श्री. गणेशशास्त्री जोशी) दुस-या आवृत्तीच्या प्रस्तावनेला (1953) हा मजकूर अगदी बोलका आहे.असे अभ्यासक्रम चालवले जावेत ही महात्मा गांधींची इच्छाही यात दिसते. मात्र आज 1992 सलातही अशी सार्वत्रिक व्यवस्था नाही हे दु:खद सत्य आहे
सिध्दौषधिप्रकाश या पुस्तकाचा सर्वात अधिक गौरव महात्मा गांधी यांनी केला. प्रथम एक प्रत महात्मा गांधी यांना भेट म्हणून पाठविली. पुस्तक पाठविल्यानंतर सुमारे एक महिन्याने त्यांचे सेक्रेटरी कै. महादेव भाई देसाईंचे पत्र आले. त्यात त्यांनी लिहिले की, तुमचे पुस्तक महात्माजींनी वाचले, तुम्ही ज्या उद्देशाने हे पुस्तक लिहिले, तो उद्देश सफल झाला आहे. महात्माजींची अशी इच्छा आहे की, खेडेगावांत नेहमी आढळणारे विकार लक्षात घेऊन त्यांवरील उपचार लिहिलेले लहान पुस्तक सुमारे आठ आणे किंमतीचे छापावे. त्यानंतर त्यांनी वेळोवेळी आणखी तीन प्रती मागविल्या. त्यांचेजवळ नेहमी असलेल्या पुस्तकांत हे पुस्तक असे. चाळीस सालचे चळवळीपासून त्यांचा वेळ तुरुंगातच गेला.एकोणीसशे पंचेचाळीस साली महात्माजींची प्रकृती पहाण्याकरिता जेव्हा पुन्हा जाणे येणे सुरू झाले तेव्हा पुन्हा पुस्तकाची गोष्ट निघाली. आयुर्वेदाचे शिक्षणाचा चार महिन्यांचा शिक्षणक्रम आखून तो या पुस्तकावरून शिकविता येईल, असे मी महात्माजींनी आज्ञा केल्यावरून सांगितले.
मी दिलेला शिक्षणक्रमव हे पुस्तक डॉ. श्रीमती सुशीला नायर यांचेकडून तपासून घेतले व या पुस्तकावरून चार महिने शिकलेला विद्यार्थी कशा योग्यतेचा होतो हे पाहाण्याकरिता रा. रामभाऊ वानखेडे नावाचा एक विद्यार्थी मजकडे चार महिने शिक्षण घेण्याकरिता पाठविला. सिध्दौषधिप्रकाश पुस्तक चार महिन्यतांत शिकून तो विद्यार्थी सेवाग्रामला गेला व तेथे श्रीमती डॉ. सुशीला नायर यांचे हाताखाली तेथील दवाखान्यात आयुर्वेदीय औषधे देऊ लागला. महात्माजींचे व डॉ. सुशीला नायर या दोघांचेही मत चार महिन्यांचे आयुर्वेद शिक्षणाचे बाबतीत अनुकूल झाले व त्यांनी हा शिक्षणक्रम शंभर विद्यार्थी प्रत्येक वेळी घेऊन मी शिकवावा, विद्यार्थ्यांचे शिबिर सेवाग्रामला असावे, त्यांची सर्व व्यवस्था श्री. कन्हुभाईंनी करावी,सिध्दौषधिप्रकाशाचे भाषांतर हिंदीत करावे व छापावे असे सर्व ठरवले. इतक्यात महात्माजींना दिल्लीला व्हाइसरॉयांचे बोलण्यावरून जावे लागले. दिल्लीहून परत आल्याव वैद्यक शिक्षणाचे शिबिर काढावयाचे असे पत्रही आले. परंतु दुर्दैवाने त्यांचा खेदजनक अंत झाला व सर्वच ग्रंथ आटपला. सिध्दौषधि-प्रकाशाचा महात्माजी कसा उपयोग करून घेणार होते, याबद्दल वाचकांना कळावे म्हणून हा मजकूर लिहिला आहे.
माझे मित्र डॉ. शाम अष्टेकर यांनी ‘वैद्यक’तज्ज्ञाबरोबर ‘भारत’ तज्ज्ञाकडून प्रस्तावना घेण्याचे ठरवले त्यात त्यांचा काही उद्देश असावा.
भारतवैद्यक या कल्पनेचा जन्म झाला काही वर्षांपूर्वी पुण्याला भरलेल्या ग्रामीण भागात सेवाभावी काम करणा-या एका डॉक्टर मंडळींच्या बैठकीत. जन्माच्या वेळी मी हजर होतो. आणि बारशालाही हजर होतो.
शेतकरी संघटनेचा रास्त भावाचा एककलमी कार्यक्रम राबवण्याचा मी यथाशक्ती प्रयत्न करत असतो. विपर्यस्त वाटावा इतका एकांगीपणा पत्करूनही मी हे व्र्रत चालवतो. आणि तरीही वैद्यकविषयावरच्या एका पुस्तकावर आज लिहायला बसलो आहे. खेडोपाडी जाऊन गावातील समाजजीवनाच्या विविध अंगांनी काम करणाऱ्यांना हा एकांगीपणा विशेष जाणवतो. राजकीय पक्षांच्या नेत्यांनसुध्दा नुसत्या शेतीमालाच्या भावाने काय होणार, गावांना रस्ते, पाणी, वीज, सफाई, शिक्षण, आरोग्यसेवा या सगळया सुविधा पुरवल्या पाहिजेत असे वाटत असते किंवा निदान त्यांचा कार्यक्रम असा असतो.
सकाळपासून संध्याकाळपर्यंत तिन्हीत्रिकाळ राबणा-या शेतक-या ला आयुष्यातील इतक्या अत्यावश्यक गरजांकरता कोणा तिऱ्हाईताच्या दयेची वा भिकेची गरज किंवा अपेक्षा नसावी हे मला पटतच नाही. अगदी सरकारने जिल्हा परिषदेमार्फत फुकट दवाखाने काढावेत व आपण शेतकऱ्यांनी घरातील आजारी माणसांना तेथे नेऊन रांगेत उभे करावे व जे काही औषध गोळया देतील त्यावर अवलंबून राहावे हेही मला मोठे विचित्र वाटते.
शहरात पाचपन्नास पावलाला डॉक्टरचा दवाखाना असावा आणि तेथून चाळीस पन्नास किलोमीटर दूर गावात गेले तर अडल्या बाळंतिणीच्या मदतीलासुध्दा फक्त निरक्षण सुईणच असावी हेही मला विचित्र वाटते.
याला उत्तर काय? शेती हा किफायतशीर व्यवसाय झाला म्हणजे गावोगाव चांगले एम.बी.बी.एस. झालेले डॉक्टर दवाखाने उघडतील आणि उपचारासाठी आलेल्या शेतकऱ्यांशी नीट आदराने वागतील एवढेच नव्हे तर त्यांच्या कुवतीनुसार चांगल्यात चांगला उपचारही करतील अशी अपेक्षा मी व्यक्त करत असे.
एक कलमी मागणीच्या पाठपुराव्यात अनेक वेळा वैद्यकीय सेवेचा विषय निघाला आहे. बाजारात येताना तापाने फणफणलेल्या पोराला घेऊन येणारी शेतकरी स्त्री महागडे औषध परवडत नाही म्हणून औषध विकत न घेताच परत जाते. या परिस्थितीत गरिबांना साखर स्वस्त मिळावी म्हणून साखरेवर लेव्ही लावणारे सरकार गरिबांची पोरे औषधाविना मरू नयेत म्हणून औषधांवर लेव्ही का लावत नाही, हा प्रश्न ऐकल्यानंतर सुन्न झालेल्या शेकडो सभा मी पाहिलेल्या आहेत.
‘आपल्या देशातले महत्त्वाचे रोग म्हणजे हगवण, नारू व बाकीचे त्वचारोग. या तीन रोगांवर जरी सर्वकष योजना करण्याचं ठरवलं तरी या देशातले 90टक्के लोक निरोगी होतील. पण या रोगांवर उपचार करणारी माणसंही नाहीत आणि औषधंही नाहीत; आणि आहेत त्या ठिकाणी काहीही सोयी नाहीत. उलट शहरांमध्यें मोठमोठे दवाखाने बांधून त्यातून, जिच्यामुळे सबंध देशातील फार तर लाखभर लोकांचा आजार बरा होऊ शकेल अशी मोठी यंत्रसामग्री आणण्याकरता प्रचंड खर्च होतो. बाकीच्या लोकांकरिता मात्र काहीच रक्कम उपलब्ध होत नाही. उदाहरणार्थ, चाकणजवळील भामनहरच्या खो-या तील 27 गावांपैकी 24 गावं अशी आहेत की एकदा पावसाळा सुरू झाला की त्यांचा इतर जगाशी अजिबात संबंध राहात नाही. मग सहा महिने त्यांनी तसंच गावात अडकून राहायचं. कुणी आजारी पडलं तर डॉक्टर नाही. बाळंतीण अडली आणि घरच्या माणसांबरोबर तडफडत मेली असं दर पावसाळयात निदान एकदोन वेळा घडतं. या24 गावांपैकी 17 गावं संबंध खरजेनं भरलेली आहेत. खरूज हा रोग दिसायला साधा असला तरी त्या गावातनं या रोगाचं उच्चाटन करायचं म्हटलं तर ती इतकी सोपी गोष्ट नाही, कठीणच आहे. कठीण म्हणजे काय? या गावांतून खरजेचं उच्चाटन करायचं म्हटलं तर प्रत्येक गावावर दर महिन्याला कमीत कमी 300 ते 400 रुपये खर्च करावे लागतील. अशा तऱ्हेने निदान एक वर्ष जर उपचार केले तर या रोगाचं या खेडयांमधून उच्चाटन होईल प्रत्येक गावाला एका वर्षासाठी 5000 रुपये म्हणजे 27 गावांना मिळून 85 हजार रुपये लागतील. शहरामधील दवाखान्यातून मोठी यंत्रसामग्री आणण्यासाठी ज्या रकमा खर्च केल्या जातात त्यामानाने 85 हजार म्हणजे अगदी किरकोळ रक्कम पण तीही आपल्याला उभी करता येत नाही.’ (शेतकरी संघटना : विचार आणि कार्यपध्दती, पृष्ठ 63-64)
इतपत ग्रामीण वैद्यकीय सेवेविषयीचा विचार 1980 सालीही मांडला गेला होता. त्यानंतर वर्षा दोन वर्षात एक वेगळा प्रश्न मांडला गेला. समजा, शेतीमालाच्या भावाचा प्रश्न सुटला तर त्यानंतर ग्रामीण भागातील आरोग्यसेवा कशी असेल? असल्या प्रश्नांना त्यावेळी मी फारसे महत्त्व देत नसे. बिनतोटयाची शेती हा इतिहासात ‘नव नवल नयनोत्सव’ होणार आहे. त्यानंतरची व्यवस्था कशी असेल याचा आराखडा आपण काढावयास बसणे म्हणजे जन्मांधाने दृष्टी मिळाल्यानंतरची स्वप्नसृष्टी रंगवण्यासारखे आहे असे म्हणून मी या प्रकारचे प्रश्न थोडे उडवून लावत असे. ग्रामीण भागांत काम करणा-या अष्टेकर ऍंटीया, बंग, मंकड इत्यादी मंडळींशी घनिष्ट संबंध असूनही मी स्वत:ला या प्रश्नापासून अलिप्त ठेवले होते.
ग्रामीण भागात आरोग्यसेवा पोचवणा-या या सर्व मंडळींच्या प्रयत्नांबद्दल मनात एक मोठी शंका होती. शहरातील सुखवस्तू मंडळींना अद्ययावत संशोधनाच्या आधाराने आधुनिक औषधोपचार आणि उपकरणव्यवस्था आणि याउलट खेडेगावातील आजाऱ्यांना अर्धशिक्षित आरोग्यसेवक आणि तयला कशीबशी पढवलेली जुजबी औषध गोळयांची उपचारपध्दती हे इंडिया-भारत द्वैत मनाला पटत नव्हते.
शेतीच्या अगदी पहिल्या अनुभवाच्या दिवसांत एक मोठा विचित्र अनुभव आला. माझ्या शेतावर विहिरीचे काम चालू असताना दगडाची कपची उडून एका मजुराच्या पायात घुसली. लगेचच डॉक्टरकडे नेले. काही उपचार झाले पण ती लहान वाटणारी जखम कोरडी होईना, चिघळतच चालली. ससून हॉस्पिटलमध्ये नेल्यानंतरसुध्दा हा पाय कापायला पाहिजे असा निर्णय घेतला पाय कापायचाय म्हटल्यानंतर घाबरून जाऊन रोगी पळाला तो नाहीसाच झाला. काही महिने गेले आणि मी तो विषय विसरून गेलो. आणि एक दिवस बाजारला तो मला पुन्हा दिसला. तो काही बोलला नाही, मीच त्याच्या पायाचा विषय काढला. मावळातल्या कोण्या ठाकराकडून त्याने झाडपाल्याचा उपाय करून घेतला होता व पाय ठीक झाला होता. मला मोठे आश्चर्य वाटले. विंचू चावल्यावर, साप चावल्यावर डॉक्टरचा काही उपयोग नसतो; त्याला आसपासच्या मंत्र असलेल्या माणसाकडेच न्यावे अशी सर्वदूर समजूत आहे. काविळीला तर अगदी अत्याधुनिक डॉक्टरकडेही औषध नसते. ते स्वत:च काविळीवर गावठी उपाय करून घ्यायला सांगतात; हे ही अनेकदा ऐकू आले. गावोगावी काहीही औपचारिक शिक्षण नसलेल्या आणि वाडवडिलांकडून झाडपाले आणि जडीबुटींची माहिती मिळवलेल्या सुईणी आणि वैदूंकडे जाऊन काही मूल्यवान ज्ञानकण वाचून रहिले असतील याची जाणीव झाली.
पण याहूनही महत्त्वाचा मुद्दा पुढे आला. गावात एम.बी.बी.एस. डॉक्टर आला, अगदी शहरातल्याप्रमाणे आरोग्यसेवा देऊ लागला, तर काय होईल? महागडी फी, महागडया औषधांच्या भरमसाठ शिफारशी, एक रोग बरा झाला तर दुसरी चार विघ्ने उत्पन्न करणारा औषधोपचार, एका विशेषज्ञाकडून दुस-या विशेषज्ञाकडे चालणारी अनंत फरफट? शेतीमालाचा भाव मिळाल्यानंतरसुध्दा शेतक-या ला मिळणारी आरोग्यसेवा अशीच असणार आहे काय? या सर्व प्रश्नांतून भारतवैद्यकाची कल्पना निघाली. ऍलोपथी, आयुर्वेद, होमिओपथी, युनानी अशा अनेक औषधव्यवस्था देशात प्रचलित आहेत.संशोधनाचे प्रचंड गाठोडे असलेली पाश्चिमात्य ऍलोपथी औषध उत्पादकांच्या बलाढय बहुद्देशीय कंपन्या आणि अवकाशभ्रमणाच्या प्रयोगात निष्पन्न झालेली यंत्रसामग्री यांच्या तावडीत जाते आहे. आयुर्वेदाचे महत्त्व जाणणारे सुध्दा नव्या संशोधनाने त्याला स्वतंत्र व्यवस्था बनवण्याऐवजी, आयुर्वेदाचा, पराकोटीचा उज्वल काळ भूतकाळात होऊन गेला, असली ‘पुरोगामी’ वृत्ती दाखवतात. वैद्यक पदवी कोणत्याही शास्त्रातली असो, सर्व परवानाधारी डॉक्टर प्रामुख्याने ऍलोपथीचा आणि इंजेक्शनांचा उपयोग करतात, हे वास्तव आहे.
या वास्तवातून सुटण्यासाठी ‘भारतवैद्यक’ या कल्पनेचा उगम झाला. ‘भारतवैद्यक’ म्हणजे लोकवैद्यक नाही; म्हणजे सर्वसामान्यांकरिता त्यांना परवडेल अशा दुय्यम दर्जाची आरोग्यसेवा नाही. गुणवत्तेत रतीमात्रही कमी पडणार नाही अशी आरोग्यसेवा सर्वसामान्यांना उपलब्ध करून देणे हे तिचे उद्दिष्ट आहे. पण त्याबरोबरच वैद्यक हे काही निखळ शास्त्र (Pure Science) नाही, व्यवहारात आणायची पध्दती (Applied Science) आहे याचाही विसर पडता कामा नये.
गावाशी संपर्क असलेल्या तरुण डॉक्टर मंडळींनी गावोगावच्या सुइणी, वैदू, मांत्रिक इत्यादींशी संपर्क साधावा, त्यांच्या औषध उपचाराचे ज्ञान करून घ्यावे, त्यात काही तथ्याचे किंवा मूल्यवान असेल तर त्याचा उपयोग शास्त्रीय पध्दतीने सर्वदूर होईल अशी व्यवस्था करावी, जेथे इतर वैद्यकव्यवस्थांच्या औषधांना स्थानिक पर्यायच नाही तेथे त्या औषधांची योजना करावी; थोडक्यात, प्रयोगशाळेतील शास्त्र आणि शतकानुशतकांच्या परंपरेने चालत आलेल्या ज्ञानाचा संगम करणारी व्यवस्था म्हणजे ‘भारतवैद्यक’.
हे काम एकदा करून संपायचे नाही. ही सतत चालणारी प्रयोगशाळा आणि तपस्या आहे.
पण केवळ वैद्यकव्यवस्था तयार झाली म्हणजे सगळे भागले असे नाही. ही वैद्यकव्यवस्था गावोगाव पोचली पाहिजे. त्याकरिता भारतवैद्यकाचे डॉक्टर म्हणजे ‘भारतवैद्य’ गावोगाव उपलब्ध करून दिले पाहिजेत. ज्या दिवशी आरोग्याची चिंता असलेली शहरी सज्जन मंडळी औषधोपचारासाठी शहरातील व्यवस्था बाजूला ठेवून भारतवैद्याला शोधत येतील त्या दिवशी भारतवैद्याची खरी प्रतिष्ठापना झाली असे म्हणता येईल.्र
या प्रतिष्ठापनेतील पहिले पाऊल ‘भारतवैद्यक’ प्रकाशनाने होत आहे. या प्रकाशनात भारतवैद्यकाची कल्पना संपूर्ण साकार झाली आहे असा आग्रह नाही. त्या दृष्टीने टाकलेले हे पहिले पाऊल आहे. हे संकलन आजही अनेक ठिकाणी भारतवैद्यांच्या प्रशिक्षणाकरिता वापरले जात आहे. एका बाजूला वैद्यकीय महाविद्यालयांचा महापूर आला आहे. पाच पाच लाख रुपयांच्या देणग्या देऊन आईबाप मुलाला शहरी डॉक्टर बनवण्याकरिता जीव टाकत आहेत. ही परिस्थिती वैद्यकीय क्षेत्रातच आहे असे नाही. अभियांत्रिकी क्षेत्रातही तीच अवस्था आहे. ‘इंडिया-भारत’ द्वंद्व शेती कारखानदारीत दिसते, शहरी ग्रामीण वैद्यकीय सेवेतील तफावतीत दिसते तसेच शिक्षण क्षेत्रातही दिसते. भारतीय शिक्षण व्यवस्थेत परंपरागत ब्राह्मणी शिक्षण पध्दत आणि पाश्चिमात्य पध्दत या दोन्हीतीलही अवगुणांची पराकोटी झाली आहे. डॉक्टर, इंजिनिअर बनण्यासाठी महागडे आणि कित्येक वर्षे लागणारे पाश्चिमात्य पध्दतीचे शिक्षण घ्यावे लागते. अ्रर्थातच हे शिक्षण शहरातील उच्चभ्रू लोकांची, सोयीसवलती मिळणारी पोरेच घेऊ शकतात. हे शिक्षण पुरे झाले की, आपण या देशातील सर्वसामान्यांपेक्षा वेगळे आहोत अशी डॉक्टर-इंजिनिअरांची मनोधारणा होते. पैशाच्या हव्यासाने ते नोकरी धंद्यास लागतात आणि जमेल तितके परदेशांत निघून जातात. त्यामुळे खेडोपाडी डॉक्टर नाही आणि इंग्लंड अमेरिकेतली इस्पितळे भारतीय डॉक्टरांनी भरलेली अशी विचित्र परिस्थिती तयार झाली आहे.
शहरांतील महाविद्यालयांतील शिक्षणाची पध्दत थोडीफार बदलून या परिस्थितीत काही सुधारणा होणार नाही. खेडोपाडी कित्येक वैद्य, वैदू, सुइणी, दाया देशातील बहुसंख्य लोकांना वैद्यकीय सेवा देत असतात. बारावी पास झालेल्या पोरांना वैद्यकीय महाविद्यालयात प्रवेश देण्याआधी खेडयातील या ‘डॉक्टरांना’ प्रशिक्षण देणे महत्त्वाचे आहे. त्याच्यासाठी सहा महिने, वर्षाचे आणि अगदी पंधरवहा-महिन्याचेसुध्दा बहि:शाल अभ्यासक्रम तयार केले तर बहुसंख्यांना उपलब्ध असलेली वैद्यकीय सेवेची गुणवत्ता कितीतरी उंचावेल. एक अभ्यासक्रम पुरा करून ही मंडळी गावोगाव कामाला जातील. ज्यांच्या कामाची वाखाणणी होताना आढळेल त्यांना चढत्या श्रेणीचे अभ्यासक्रम देता येतील. पण हे असले धाडस शासनाच्या हातून होणे नाही. त्यात काही व्यक्तींनी आणि संस्थांनी पुढे येऊनच हात घातला पाहिजे..
वैद्यक, वैद्य आणि सामग्री ही कोणत्याही वैद्यक व्यवस्थेची तीन अंगे. या प्रकाशनाच्या निमित्ताने पहिले अंग सुमूर्त होत आहे.
डॉ. अष्टेकरांच्या या जाडसर, समग्र मराठी वैद्यकीय ग्रंथाचे प्रयोजन काय असा प्रश्न अनेकांच्या मनात उभा राहील. आपल्या ग्रामीण भागातील आरोग्याची व वैद्यकीय सेवेची स्थिती लक्षात घेतली तर या प्रश्नाचे उत्तर मिळेल. आकाराने व लोकसंख्येने अधिक्यानेअसलेला कोरडवाहू ग्रामीण भाग हा आपल्या देशातील सर्वात जास्त मागास व दारिद्रयग्रस्त आहे. पाणी, संडास, सांडपाण्याचा निचरा इ. स्वच्छतेच्या सोयीही या भागात अभावानेच आढळतात. त्यामुळे या गरीब, कुपोषित जनतेत आजारांचे प्रमाण जास्त आहे. योग्य दर्जाच्या, उपचारात्मक व रोगप्रतिबंधक सेवा मात्र फारच तुटपुंज्या आहेत. शहरापासून वीस-पंचवीस किलोमीटर गेले की चांगल्या वैद्यकीय सेवा दुर्लभ होऊ लागतात. या सर्व परिस्थितीचा परिणा म्हणजे अशा ग्रामीण भागात विशेषत: बालमृत्यूचे प्रमाण शहरी भागापेक्षा जास्त आहे. तसेच सर्वसामान्य ग्रामीण जनता, विशेषत: स्त्रिया, आजारी पडल्यावर अंगावर दुखणी काढत दिवस काढतात. एकविसाव्या शतकाकडे झेप घेऊ बघणा-या आधुनिक भारताच्या दृष्टीने लांछनास्पद असलेली ही परिस्थिती बदलण्यासाठी मुळात दारिद्रयनिर्मूलन, सर्वांगीण सामाजिक सुधारणा याची तर आवश्यकता आहेत. पण जोपर्यंत आजार आहेत तोपर्यंत आजारांवर शक्यतो मोफत वा किमान रास्त दरात चांगल्या दर्जाची आरोग्यसेवा उपलब्ध होणेही आवश्यक आहे. नेमका हा दुसरा भाग सरकारी धोरणांमध्ये डावलला गेलेला आहे. पहिल्या भागाच्या बाबतीतही आर्थिक, सामाजिक परिवर्तनाच्या बाबतीत सर्वसामान्य कोरडवाहू ग्रामीण जनतेच्या दृष्टीने काही प्रगती झालेली नाही.
उपचारात्मक काम हे जणू खाजगी क्षेत्राचेच आहे असे म्हणून सरकारने अ्रापली जबाबदाती झटकून टाकली आहे. खाजगी क्षेत्रातही चांगले प्रशिक्षित डॉक्टर्स खेडयात जात नाहीत. त्यामुळे थातुर मातुर शिक्षण घेतलेले, ‘कंपाउंडरचा डॉक्टर झाला’ या सदरात मोडणारे तथाकथित डॉक्टर्स ग्रामीण भेगात बेकायदेशीर डॉक्टरकीचा ‘धंदा’ करतात. त्यांच्यामार्फत मिळणारे उपचार हे बहुतांशी अशास्त्रीय, निकृष्ट दर्जाचे, अनेकदा अनारोग्यजनक असतात. त्यामुळे विशेषत: कोरडवाहू ग्रामीण जनतेकडे आधीच अत्यंत तुटपुंजा असलेला पैसा असल्या आजरांमध्ये मोठया प्रमाणावर वाया जातो. तसेच ‘डॉक्टरी उपायांनी गुण येत नाही’ म्हणून गंडे-दोते, मांत्रिक-तांत्रिक यांनाही वाव राहतो.
ग्रामीण भागातील आरोग्य-सेवेची ही आत्यंतिक परवड दूर झालीच पाहिजे. खाजगी व्यवसाय करणा-या डॉक्टर्सची संख्या भारतात वाढते वाढल्या, त्यासाठी डॉक्टर्सची संख्या वाढली तरी ग्रामीण भागातली तुलनेने विरळ वस्ती व आर्थिक मागासलेपणा यामुळे भारतात पाश्चिमात्य देशांप्रमाणे दर पाचशे ते हजार लोकसंख्येमागे एक डॉक्टर अशी व्यवस्था करणे अवघड जाणार आहे. दुसरी गोष्ट म्हणजे निरनिराळया देशांमध्ये तसेच भारतात निरनिराळया ठिकाणी झालेल्या कल्पक प्रयोगांमुळे हे स्पष्ट झाले आहे की भारतासारख्या देशात अधिकांश आजार असे आहेत की ज्यांचे निदान व उपचार करायला डॉक्टर आवश्यक असतोच असे नाही. मर्यादित प्रशिक्षण घेतलेले ‘आरोग्य सेवक’ही हे काम चांगल्याप्रकारे करू शकतात. कोणत्या रुग्णांना डॉक्टरकडे जायची गरज आहे हे या आरोग्यसेवकांनी वेळेवर ओळखणे, अशा निवडक रुग्णांसाठी डॉक्टर उपलब्ध असणे, आरोग्य सेवकाला डॉक्टरचे मार्गदर्शन व पाठबळअसणे हे मात्र आवश्यक असते. अशा आरोग्य-सेवकांचे इतरही अनेक फायदे असतात. याकडेआपण नंतर वळूच. आज मात्र त्यांची क्षमता पुरेशी विकसित केली गेलेली नाही व त्यांना योग्य ते स्थान आपल्या आरोग्य व्यवस्थेने दिलेले नाही. असे असले तरी आजपर्यंतच्या अनुभवावरून निश्चित म्हणता येते की त्यांना अधिक सक्षम बनवून आरोग्य सेवेमध्ये महत्त्वाचे स्थान दिले पाहिजे. डॉ. अष्टेकरांच्या या पुस्तकामागे हेच गृहीतकृत्य आहे.
अधिक प्रशिक्षित व अधिक पाठबळ असलेल्या आरोग्य सेवकांना डॉ. अष्टेकर ‘भारतवैद्य’ म्हणतात. ‘वैद्य’ म्हटल्यावर आपल्याला आयुर्वेदिक उपचार करणारा असे वाटते. पण लेखकाने मुख्यत: ऍलोपथीचाच आधार घेतला आहे. त्यामुळे मला ‘आरोग्य सेवक’ हेच नाव ठीक वाटते. आज सरकारी वा बिनसरकारी आरोग्य प्रकल्पांमधील आरोग्य सेवकांना ‘आरोग्य रक्षक’ वा ‘आरोग्य- स्वयंसेवक म्हटले जाते. ही नावे मात्र काहीशी दिशाभूल करणारी आहेत. आरोग्य रक्षण हे तर खरं म्हणजे डॉक्टर्सही करू शकत नाहीत. आर्थि-सामाजिक परिस्थिती सुधारूनच आरोग्य रक्षण करता येईल. ‘आरोग्य स्वयंसेवक’ हेही पर्याप्त नाही. ‘स्वयंसेवक’ म्हणून त्याला अगदी तुटपुंज्या मानधनावर राबवायचे, इतरांनी मात्र व्यवस्थित पगार घ्यायचा अशा दुटप्पी धोरणाचा असे नामकरण एक भाग आहे. म्हणून ‘आरोग्य सेवक’ हेच नाव सर्वात चांगले आहे.
औरोग्यसेवक कोणकोणती कामे करू शकतील हे लक्षात घेणे महत्त्वाचे आहे. (इथे ‘शकतील’ असे म्हटले आहे कारण आज अपवाद वगळता त्यांना चांगल्या दर्जाचे शिक्षण व पाठबळ मिळत नसल्याने हे आरोग्य सेवक आज तुलनेने फार थातुर मातुर काम करत आहेत ही वस्तुस्थिती आहे. एक म्हणजे आरोग्य शिक्षण हे अत्यंत महत्त्वाचे काम हे आरोग्य सेवक चांगल्या प्रकारे करू शकतील. आज हे काम दुर्लक्षिले गेले आहे. लोकांच्या भाषेत, त्यांचे मन, संस्कृती जाणून; पुरेसा वेळ खर्च करून आरोग्य शिक्षण करण्यासाठी लोकांमध्ये राहणारे ‘आरोग्य सेवक’ हेच अधिक पर्याप्त माध्यम आहे. या आरोग्य सेवकांकडून उपचारात्मक सेवा मिळत असल्यामुळे त्यांनी दिलेल्या आरोग्य सल्ल्याला लोक डॉक्टरांप्रमाणेच महत्त्व देतात कारण त्यांच्या दृष्टीने तो एक प्रकारचा डॉक्टरच असतो. दुसरे म्हणजे वैद्यकीय विज्ञानाभोवती आज जे गूढतेचे उच्चभ्रूपणाचे वलय आहे ते दूर करण्यात या आरोग्यसेवकांना एक खास स्थान आहे. थोडे फार शिकलेली आपल्यातलीच एक व्यक्ती ताप, जंत, जुलाब इत्यादींवर व्यवस्थित अ्रौषधोपचार करू शकते व वेगवेगळया आरोग्यप्रश्नांवर सल्ला, माहिती देऊ शकते हा अनुभव वैद्यकीय विज्ञानाभोवतीचे वलय दूर करण्यात महत्त्वाचा ठरतो. रोगप्रतिबंधनाच्या निरनिराळया कामांमध्ये जनतेचे सहकार्य मिळवणे हेही स्थानिक आरोग्य सेवकांकडून जास्त चांगले होऊ शकते.
मर्यादित प्रशिक्षण घेतलेल्या, मर्यादित पातळीवर काम करू शकणा-या अशा आरोग्य सेवकांची मोबदल्याची अपेक्षा डॉक्टरांच्या तुलनेने कमी असते. पण जणू काही त्यांचा एवढाच महत्त्वाचा उपयोग आहे असे समजून त्यांना अनेकदा थातुर मातुर प्रशिक्षण देऊन अत्यंत तुटपुंजा औषध-पुरवठा करण्यात येतो व अत्यंत तुटपुंज्या ‘मानधनावर’ राबवण्यात येते. तसेच आरोग्य शिक्षण करण्यासाठी आवश्यक अशी पर्याप्त चित्रे, पुस्तिका इ. शैक्षणिक साहित्य पुरवले जात नाही. डॉक्टरांकडून योग्य मार्गदर्शन, पाठबळ, निरंतर शिक्षण मिळत नाही. आपल्या हाताखालील एक गावकामगार एवढयाच दृष्टीने या आरोग्य सेवकांकडे आज पाहिले जाते. त्यामुळे त्यांची क्षमता पुरेशी विकसित होऊन उपयोगात औणली गेलेली नाही. हे चित्र बदलायचे असेल तर सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे ‘आरोग्य सेवक’ या संकल्पनेमागची व्यापक भूमिका तसेच आरोग्य सेवक या थराची क्षमता सर्वांना मनापासून पटली पाहिजे. जिथे डॉक्टर उपलब्ध होऊ शकत नाही, तिथे ‘कामचलाऊ डॉक्टर’ कडून काम भागवायचे या दृष्टीकोनातून मुख्यत: या आरोग्यसेवकांकडे बघू नये. खरं तर शहरांमध्येही नेहेमीच्या साध्या किरकोळ आजारांचे निदान व उपचार, आरोग्य शिक्षण (हे काम नुसते लेख लिहून होणार नाही, शंका निरसनासाठी चर्चा करावी लागते,) ही कामे करण्यासाठी आरोग्य सेवकांचा खूप उपयोग होऊ शकेल. आजारी पडले की प्रत्येक वेळी डॉक्टरकडे धाव घेण्याची गरज नसते. प्रथम आरोग्य-सेवकाला प्रकृती दाखवायला काय हरकत आहे? अर्थात वरवर किरकोळ वाटणारी पण प्रत्यक्षात गंभीर असणारी लक्षणे कशी ओळखायची त्याचे चांगले प्रशिक्षण आरोग्य सेवकांना हवे, तसेच डॉक्टरांचा पाठिंबा हवा. हे झाले आणि शहरी भागात व सुखवस्तू समाजातही चांगले प्रशिक्षित आरोग्य-सेवक काम करू लागले तर अर्थातच ग्रामीण भागातही या कल्पनेचा प्रसार व्हायला मदत होईल. आज आपल्याकडे सुशिक्षित समाजातही आरोग्याबाबत जवळजवळ अज्ञान असते तर दुस-या बाजूला उच्चशिक्षित डॉक्टरांचा ताफा सज्ज असतो. मध्ये प्रचंड दरी आहे. ही काही आदर्श परिस्थिती नाही. आदर्श आरोग्यव्यवस्थेत सर्वसामान्य जनतेमध्ये आरोग्यविषयक चांगल्या प्रकारे जाणीव व ज्ञान हवे. चांगल्या प्रशिक्षित सेवकांचे वस्ती-वस्तीमध्ये जाणे हवे व मग साधारण डॉक्टर, तज्ज्ञ डॉकटर अशी साखळी व्यवस्था हवी. आज पुण्यामध्ये ससून सारख्या मोठया हॉस्पिटलमध्येही साधे जुलाब, खरुज यावरील उपचारासाठी रांगा लागतात, किंवा सर्दी, ताप, कांजिण्या यासारख्या आजारांवरील उपचारांसाठी खाजगी बालरोगतज्ज्ञाकडे गर्दी होते. ही परिस्थिती बदलली पाहिजे. त्यासाठी ‘आरोग्य-सेवक’ ही कल्पना रुजली पाहिजे. ग्रामीण भागात सध्याच्या परिस्थितीत या आरोग्यसेवकांवर जास्त जबाबदा-या पडतील व काही बाबतीत जिथे डॉक्टरची गरज आहे तिथेही आरोग्य सेवकालाच काम निभावून न्यावे लागेल. आजच्या समाज व्यवस्थेच्या चौकटीत ही मर्यादा नाईलाजाने मान्य करावी लागेल. तसेच मूलभूत सामाजिक परिवर्तन झाले, सर्वांगीण विकास झाला तरी नव्या समाजव्यवस्थेतही सुरुवातीच्या 20-25 वर्षांत दर पाचशे-हजार लोकसंख्येमागे एक डॉक्टर असणे शक्य होईलच असे नाही. त्यामुळे ‘निदान आरोग्य-सेवक तरी उपलब्ध असले पाहिजेत.’ असेच सर्वसाधारण धोरण असावे लागणार आहे. मात्र ‘आरोग्य-सेवका’ मागील तात्त्वि भूमिका ‘डॉक्टर नसेल तेथे’ अशी हवी असे मला वाटते. ही भूमिका म्हणजे अ्राज अनेकांना प्रथमदर्शनी एक दिवास्वप्न वाटेल, पण नीट विचार केला तर या भूमिकेची यथार्थता लक्षात येईल.
शहरी व सुखवस्तू समाजात ‘आरोग्य सेवक’ या संकल्पनेचा प्रसार व्हायला, तिला मान्यता मिळायला वेळ लागेल. ग्रामीण भागात मात्र या आरोग्य सेवकांची आज नितांत आवश्यकता आहे. पण ग्रामीण भागातील आजारांचे आजचे स्वरुप, प्रमाण, डॉक्टरांची कमतरता याचा विचार केला तर आज सरकारी योजनेत आरोग्य रक्षक, अंगणवाडी शिक्षिका, यांनाच काय पण बहुद्देशीय आरोग्य कर्मचारी वा परिचारिका यांना जे प्रशिक्षण दिले जाते त्यापेक्षा किती तरी चांगल्या दर्जाचे प्रशिक्षण द्यायला हवे. असे प्रशिक्षण देण्यात एक प्रमुख अडचण अशी की अशा प्रशिक्षणासाठी आवश्यक असे चांगले पुस्तक मराठीत उपलब्ध नाही किंवा भाषांतर करून जसेच्या तसे वापरता येईल असे सुयोग्य पुस्तकही इंग्रजीत वा इतर भारतीय भाषेत नाही. आरोग्य दूताला उपयोगी पडेल असे सर्वात चांगले उपलब्ध पुस्तक म्हणजे ‘व्हेअर देअर इज नो डॉक्टर’ या जगप्रसिध्द पुस्तकाचे मराठी भाषांतर ‘डॉक्टर नसेल तेथे.’ पण या पुस्तकाच्या काही मर्यादा आहेत. रुग्णाला त्रस्त करणा-या लक्षणांपासून सुरुवात करून रुग्णाला आणखी प्रश्न विचारून त्याच्या आरोग्याची अधिक माहिती करून घेऊन, तसेच त्याची शारीरिक तपासणी करून डॉक्टर्स जसे रोगनिदान करतात तसे पध्दतशीरपणे रोगनिदान ‘डॉक्टर नसेल तेथे’ या पुस्तकाने करता येत नाही. ज्या आजारांचे निदान अगदी उघड असते अशा आजारांवरील उपचारांबद्दल तसेच इतर बरीच उपयुक्त माहिती अत्यंत कल्पकतेने, प्रभावीपणे ‘डॉक्टर नसेल तेथे’ मध्ये मांडली आहे. पण ‘रोगनिदान कसे करायचे?’ हा प्रश्न त्यातून फारसा सुटत नाही. डॉ. शाम अष्टेकरांनी प्रस्तुत पुस्तकात जसे रोगनिदानाचे तक्ते पध्दतशीरपणे, प्रत्येक प्रमुख लक्षणासाठी वोपरले आहेत, तसे त्यासाठी वापरले पाहिजेत. दुसरे म्हणजे शरीरशास्त्र, शरीर क्रियाशास्त्र, विकृतिशास्त्र याचीही पध्दतशीर तोंडओळख करून घ्यायला हवी. वैद्यकीय विज्ञानाच्या मूलभूत तत्त्वांची ओळख झाली की याअधिक पक्क्या व विस्तृत पायावर पुढील वाटचाल करणे सोपे जाते. लेखकाने या पुस्तकात चांगल्या प्रकारे साधले आहे.
केवळ किरकोळ, प्राथमिक उपचार शिकवणे एवढा या पुस्तकाचा हेतू नाही असे म्हटल्यावर एक कळीचाप्रश्न उभा राहतो की कोणकोणत्या आजारांबद्दल कितपत प्रशिक्षण घ्यायचे? हे ठरवण्यासाठी डॉ. अष्टेकरांनी आरोग्य सेवकांच्या दृष्टीने आजारांचे पध्दतशीर वर्गीकरण केले आहे व या आजारांच्या गटांनुसार माहितीचे स्वरुप बेतले आहे. यामुळे जुलाब, श्वासनलिकादाह अशा स्वरुपाच्या आजारांचे निदान व उपचार पूर्णपणे स्वत:च्या जोरावर करण्याइतकी माहिती आरोग्य-सेवकाला मिळेल. त्याचबरोबर क्षयरोग, कुष्ठरोग याबाबत या रोगांची शंका घेणे, डॉक्टरांनी सांगितलेल्या उपचारांचा पाठपुरावा करणे, या आजारांबाबत लोकशिक्षण करणेयासाठी आवश्यक तेवढीच माहिती पुस्तकात दिली आहे. त्यामुळे अनावश्यक माहितीचा बोजा टाळता आला आहे.
नेहमी आढळणा-या पण किरकोळ नसणा-या आजारांचेही (उदा. मलेरिया, गळवे, अमिबा लागण, श्वासनलिकादाह इ.) निदान व उपचार करण्याइतपत ज्ञानआरोग्य सेवकाला मिळाले पाहिजे. तो/ती हे ज्ञान यशस्वीपणे वापरेल हे प्रमुख गृहीततत्त्व या पुस्तकामागे आहे. त्याची व्यवहार्यता अजमावून पाहण्यासाठी काही प्राथमिक चाचपणी झाली असली तरी हे गृहीतकृत्य अजून सिध्द व्हायचे आहे. या पुस्तकाच्या वापरातूनच हे काम होऊ शकेल. त्या दृष्टीने हे पुस्तक म्हणजे एका गरजेच्या पण महत्त्वाकांक्षी योजनेचा प्रस्ताव आहे. हा प्रस्तवा व्यवहारात आणण्याचे आव्हान आपण सर्वांनी स्वीकारले पाहिजे. कारण सध्याच्या समाजव्यवस्थेत ग्रामीण, सर्वसामान्य जनतेची आरोग्यसेवेबाबतची परवड थांबवण्यासाठी तसेच वैद्यकीय सेवेची रचना लोकाभिमुख करण्यासाठी आवश्यक असे ते एक अत्यंत महत्त्वाचे पाऊल आहे. मात्र हे प्रशिक्षण घेतलेल्यांनी खाजगी व्यवसाय करून जनतेची पिळवणूक करता कामा नये. त्यासाठी आवश्यक ती शैक्षणिक मूल्ये या पुस्तकामार्फत रुजवण्याचा लेखकाने प्रयत्न केला आहे. पण जोडीला काही संस्थात्मक उपायही हवेत. ग्रामीण ‘आरोग्य सेवक’ हे एखाद्या संस्थेच्या ‘टीम’चा भाग असले पाहिजेत. या संचाला डॉक्टरचा पाठिंबा, मार्गदर्शन हवे. त्यांचे निरंतर प्रशिक्षण व्हायला हवे. तसेच स्थानिक जनतेचा अंकुश राहील अशी व्यवस्था हवी. हे सर्व नेमके कसे साधायचे याबद्दलही अजून बरेच काम व्हायचे आहे. या पुस्तकाच्या निमित्ताने त्याला चालना मिळाली. आज सरकारी योजनांमध्ये ग्रामीण भागासाठी बहुद्देशीय आरोग्य कर्मचारी आहेत. परिचारिक आहेत. त्यांचे आरोग्यविषयक काही किमान शिक्षण झालेले असते. पुढचे प्रशिक्षण देण्यासाठी या पुस्तकाचा उपयोग होऊ शकेल. मात्र रोगप्रतिबंधात्मक सेवाच मुख्यत: सरकारी क्षेत्रातून द्यायच्या हे सध्याचे धोरण निदान काही प्रमाणात तरी त्यासाठी बदलायला हवे. कारण या पुस्तकात रोगप्रतिबंधक उपाय, सामाजिक आरोग्य याबद्दल पुरेशी माहिती असली तरी रोगनिदान व उपचार याबद्दलची पध्दतशीर माहिती हे या पुस्तकाचे प्रमुख वैशिष्टय आहे.
आयुर्वेदिक चिकित्सेवरील विभाग हे या पुस्तकाचे दुसरे प्रमुख वैशिष्टय. आजच्या आधुनिक जमान्यात आयुर्वेदिक उपचार पध्दतीचे स्थान काय हा माझ्या मते न सुटलेला, वादग्रस्त प्रश्न आहे. आयुर्वेदिक वा होमिओपथिक उपचार पध्दती किपतपत शास्त्रीय आहेत या वादात न पडता जे उपचार रुग्णाला निश्चित उपयोगी, मानवणारे, परवडणारे आहेत ते वापरले गेले पाहिजेत ही डॉ. अष्टेकरांची भूमिका स्वागतार्ह आहे. मात्र ‘निश्चित उपयोगी’ हे कसे ठरवायचे याबद्दल वाद आहेत.
‘ऍलोपथी’च्या शास्त्रात याबाबत निश्चित निकष आहेत व ते निकष लावण्याची पध्दत याबाबत शास्त्रज्ञांमध्ये एकमत आहे. त्या आधारे ऍलोपथिक औषधांची चाचणी घेण्याची पध्दत त्या त्या वर्तुळात मान्य झाली आहे. याच पध्दतीनुसार आयुर्वेदिक व इतर पॅथींचे उपचार तपासून पहाता येणे अवघड आहे कारण त्यांची एकूण समज व व्यूहरचनाच वेगळया प्रकारची आहे. त्यामुळे या उपचारपध्दती ऍलोपथीच्या पध्दतीनुसार काटेकोरपणे घासून न घेता, विशेषत: प्रस्तुत पुस्तकासारख्या प्राथमिकपातळीवरील पुस्तकासाठी अधिक व्यावहारिक दृष्टीकोन ठेवला पाहिजे. ज्या व्याधींचे निदान व उपचार थोडया प्रशिक्षणानंतर करता येतील व जे उपचार गुणकारी ठरतात असा त्या क्षेत्रातील चिकित्सक तज्ज्ञांचा अनुभव आहे अशा उपचारांचा समावेश करावा हा लेखकाचा निर्णय प्राप्त परिस्थितीत योग्य आहे असे मला वाटते. त्यांना हा विभाग लिहिण्यासाठी चिकित्सक, सव्यसाची तज्ज्ञ लाभले त्यामुळे पुस्तकातील हा विभाग उपयोगी ठरावा. या विभागात दिलेल्या उपचारांबद्दलचा अनुभव वाचकांकडून गोळा करून त्याची पध्दतशीर नोंद केली, विश्लेषण केले तर या प्रश्नाबाबत जी एक प्रकारची अनिश्चितता आहे ती दूर होण्यास मदत होईल. औषधी वनस्पती ओळखणे, त्यांची जोपासना, त्यांची साठवण याबाबत प्रशिक्षण देण्याची या विभागाचे एक तज्ज्ञ लेखक वैद्य श्री. भा. वि. साठये यांची तयारी आहे. त्याचा पाठपुरावा झाला पाहिजे. स्थानिक वनस्पतींपासून खात्रीलायक औषधे बनवून वापरण्याचे ज्ञान जनतेमध्ये विकसित झाले तर विकेंद्रित, स्वयंनिर्भर औषधोपचार पध्दतीच्या दिशेने ते एक फार मोठे योगदान ठरेल.
डॉ. शाम अष्टेकर हे केवळ डॉक्टर नाहीत. प्रखर सामाजिक जाणीव असलेले, ग्रामीण गरिबांबद्दल पोटतिडिक असणारे डॉक्टर आहेत. त्यामुळे त्यांची भूमिका केवळ तज्ज्ञ अशी नाही. ग्रामीण भागातील अनारोग्य, वैद्यकीय सोयींची ग्रामीण भागातील कमतरता, पुरुषप्रधान संस्कृतीमुळे स्त्रियांच्या आरोग्यावर होणारे परिणाम इत्यादींबद्दल लिहिताना त्यांचा सामाजिक दृष्टीकोन स्पष्ट होतो. तसेच या प्रकारचे पुस्तक लिहिण्याचा त्यांचा निर्णय, त्यासाठी त्यांनी तीन-चार वर्षे केलेली वेगवेगळया प्रकारची नियोजनबध्द धडपड यातूनही त्यांची तळमळ अर्थातच दिसते. नुसते पुस्तक लिहून ते मोकळे होणार नाहीत. दिंडोरीला भारतवैद्यक संस्थेतर्फे प्रशिक्षण केंद्र उभे राहात आहे. या पुस्तकाच्या आधारे तिथे पध्दतशीरपणे भारत-वैद्यांचे प्रशिक्षण होणार आहे. आपला देश ‘भारत’ व ‘इंडिया’ यात दुभंगलेला असून ‘इंडिया’ चे ‘भारता’वर वर्चस्व आहे हे लक्षात घेणे ही भारतातील परिस्थिती, त्यातील आरोग्य व्यवस्था समजण्यासाठी कळीचे महत्त्वाचे आहे…. अशी काहीशी विवाद्य चौकट लेखकाने स्वीकारलेली आहे. ती वाचकाला मान्य असो वा नसो त्यांनी जागोजागी केलेली सामाजिक टिपणी सामान्य वाचकाला विचार करायला लावेल. तंत्रवैज्ञानिक ज्ञानाबरोबर सामाजिक विचार हा वैद्यकशास्त्रात एक महत्त्वाचा भाग असायला हवा हे लक्षात आणून देईल.
अशा रितीने वेगवेगळया बाजूने पाहू गेल्यास डॉ. शाम अष्टेकरांचे हे पुस्तक हे एक महत्त्वाचे पुढचे पाऊल आहे. हे पुस्तक वापरून चांगल्या दर्जाचे ‘आरोग्य-सेवक’ कितपत तयार होऊ शकतात हे प्रत्यक्ष व्यवहारात ठरेल. त्या दृष्टीने कसून प्रयत्न करू बघणाऱ्यांना हे पुस्तक फारच उपयोगी ठरेल. ‘प्रशिक्षणासाठी चांगले पुस्तक नाही’ अशी तक्रार करायला आता जागा राहिलेली नाही! ग्रामीण भागाबद्दल आस्था असणा-या सर्वांनी या पुस्तकाचा पुरेपूर उपयोग करून या काहीशा धाडसी प्रयोगाला साथ त्यायला हवी.
डॉ. अनंत रा. सी. फडके
डॉ. शाम अष्टेकर यांच्या भारतवैद्यक या ग्रंथरुपी पुस्तकाची दहा वर्षांच्या आत तिसरी आवृत्ती निघत आहे. यातच लेखकाचा हे पुस्तक लिहिण्यामागचा हेतू सफल झाला आहेअसे मला वाटते.
डॉ. अष्टेकरांनी व्यावसायिक शिक्षणानंतर ग्रामीण भागात व्यवसाय करून प्रथम स्वत:ला व्यावसायिक दृष्टया संपन्न बनवले. या अनुभवाच्या बळावर सामाजिक बांधिलकीने त्यांनी ग्रामीण आरोग्याच्या प्रश्नाबद्दल धोरणात्मक मार्ग शोधण्याचा यशस्वी प्रयत्न केला आहे. आरोग्याशी निगडित ग्रामीण भागातील वैयक्तिक आरोग्यातून परिसर स्वच्छतेपर्यंत सर्वच बाबींची अभ्यासपूर्ण माहिती संकलित केली आहे व ती अतिशय सोप्या भाषेत सामान्यांना समजेल अशा पध्दतीने मांडली आहे. ही माहिती जशी सामान्यांना उपयोगी आहे तेवढीच ती व्यावसायिकांना उपयुक्त अशी आहे, हे अवघड काम त्यांनी अतिशय यशस्वीपणे हाताळले आहे.
डॉ. अष्टेकर स्वत: आधुनिक वैद्यकशास्त्रातील तज्ञ असूनही त्यांनी आयुर्वेद, होमिओपॅथी व ऍक्युप्रेशर या विद्याशाखांचा रुग्णांनी उपयोग करण्यासाठी सल्ला दिला आहे, ते स्तुत्य आहे. प्रत्येक विद्याशाखेत रुग्णांच्या हिताच्या ब-या च गोष्टी आहेत. त्याचा योग्य उपयोग रुग्णासाठी व्हावा ही लेखकाची तळमळ रास्त आहे. आयुर्वेदातल्या आचार- विचार,आहार-विहार, दिनचर्या व ऋतुचर्या या गोष्टी आरोग्य संवर्धनाच्या दृष्टीने अतिशय मोलाच्या आहेत. होमिओपॅथीमध्ये अतिशय कमी खर्चात रोजच्या ब-या च आजारांवर मात करण्याची क्षमता आहे. रुग्णहिताच्या दृष्टीने सर्व विद्याशाखांचा समग्र विचार होणे गरजेचे आहे.
भारतवैद्यकाची कल्पना लेखकाने तळमळीने मांडली आहे. स्वातंत्र्यानंतरच्या 54 वर्षांत देशाने आरोग्याच्या क्षेत्रात बरीच प्रगती केली आहे. देवी, प्लेग, महारोग व पोलिओ यासारख्या संसर्गजन्य रोगावर यशस्वी मात केली आहे पण अजूनही क्षयरोग, कुपोषण, कर्करोग यावर मात करता आली नाही व त्यातच एच.आय.व्ही एडस्ची आता मोठया प्रमाणावर भर पडत आहे. भरीस भर म्हणून बदलत्या जीवनपध्दतीमुळे उद्भवणा-या हृदयरोग, रक्तदाब, मधुमेह, पचनसंस्थेचे आजार, मानसिक आजार व फुप्फुसाचे विकार यात प्रचंड प्रमाणात वाढ होत आहे. त्याच्या तपास व उपचार पध्दती महागडया असून सामान्यांच्या आवाक्याबाहेर आहेत. शहरी भागात दर्जेदार रुग्णालये व डॉक्टर यांची खाजगी क्षेत्रात स्पर्धा आहे, जगातल्या उत्तमातल्या उत्तम सोयी उपलब्ध आहेत पण ग्रामीण भागात प्रभावी आरोग्यसेवा देण्यात यश आले नाही त्यासाठीच लेखकाने हा पर्याय हुडकण्याचा प्रयत्न केला आहे. या बाबीचा थोडा सविस्तर विचार होणे गरजेचे आहे असे मला वाटते. आपला देश ब-या च क्षेत्रात व्यावसायिक मनुष्यबळ जगाला पुरविणारा देश म्हणून मान्यता पावत आहे. संगणक व माहिती तंत्रज्ञान ही गेल्या 1-2 दशकातली प्रगती आहे पण त्या अगोदर पाश्चात्य व मध्य पूर्वेतील देशांना व्यावसायिक डॉक्टर पुरवणारा भारत सर्वांत महत्त्वाचा देश आहे. आज अमेरिकेत तज्ज्ञ डॉक्टरांपैकी बहुतेक डॉक्टर भारतीय आहेत. परदेशात भारतीय डॉक्टर जसे भरपूर आहेत तसेच देशातही आहेत, पण ते सर्व शहरी भागात तालुका, जिल्हा व महानगराच्या ठिकाणी आहेत व ग्रामीण भागात निकडीच्या गरजा भागवण्यास डॉक्टर उपलब्ध नाहीत, हा फार मोठा विरोधाभास आहे. राष्ट्रीय नियोजनात आरोग्यविषयक नियोजनाबद्दल ग्रामीण आरोग्याचा सपशेल फज्जा उडविणारी बाब आहे याची कारणे बरीच आहेत, यावर गांभीर्याने विचार करून निर्णय घेण्याची वेळ आता येऊन ठेपली आहे.
भारतवैद्यक ही संकल्पना रास्त असली तरी त्यातही ब-या च तांत्रिक व कायदेशीर बाबी उपस्थित होण्याचा धोका संभवतो. सद्य परिस्थितीत सर्वात सोयीचा मार्ग मला वाटतो तो व्यवसाय करणारी परिचारिका (Practising Nurse). ही पध्दती अवलंबण्यासाठी, महाराष्ट्रापुरते बोलायचे झाल्यास डॉक्टरांची संख्या गरजेपेक्षा 7 पट जास्त आहे, तरी ग्रामीण भागात डॉक्टरांचा प्रश्न सुटत नाही. पुढेही डॉक्टरांची संख्या वाढवून हा प्रश्न सुटेल असे वाटत नाही. सध्या महाराष्ट्रात प्रशिक्षित परिचारिकांची संख्या 100367 आहे व दरवर्षी 3427 परिचारिकांची प्रशिक्षणाची सोय आहे. परिचारिकांचे व्यावसायिक कसब ब-याच चांगल्या प्रतीचे आहे. त्यांना समाजमान्यता आहे. अशा परिचारिकांना ग्रामीण भागात व्यवसाय करण्यासाठी थोडे अधिकचे प्रशिक्षण देण्याची सोय केल्यास फार मोठया समस्येवर हा समर्पक उपाय ठरेल असे माझे मत आहे. योजनेचा तपशील व त्याचे नियोजन ह्यावर स्वतंत्र विचार होणे गरजेचे आहे, कमी वेळात प्रभावीपणे ग्रामीण समस्येवर उपाय काढण्यासाठी व्यवसाय करणारी परिचारिका (Practising Nurse) हा खरोखरच उपयुक्त पर्याय ठरेल व लेखकाचे हे पुस्तक त्यांना ख-या अर्थाने संदर्भ ग्रंथ म्हणून उपयोगी पडेल.
ग्रामीण आरोग्याचे प्रश्न उत्तम रीतीने सोडवायचे असतील तर आरोग्य सेवेच्या सुविधेबरोबरच आरोग्याबद्दलच्या लोकशिक्षणाची चळवळ फार मोठया प्रमाणावर उभी करणे हा एकमेव कमी खर्चात आरोग्याची काळजी घेण्याचा उपाय आहे असे मला वाटते. यात सामाजिक बांधिलकी असलेल्या व्यक्ती, संस्था व शासन यांचा सहभाग मोठया प्रमाणावर अपेक्षित आहे.
लेखकाचे या उत्तम व उपयुक्त पुस्तकाबद्दल मन:पूर्वक अभिनंदन. त्यांच्या भावी वाटचालीबद्दल हार्दिक शुभेच्छा.
डॉ. दयानंद डोणगांवकर, कुलगुरू (महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठ, नाशिक)