शिश्नाच्या बोंडावरची त्वचा मागे करून पहा. ब-याच जणांच्या बोंडावर पांढरट -करडा थर आढळतो. हा आंघोळीच्या वेळी स्वच्छ करून काढला पाहिजे. रोज स्वच्छता केल्यास हा थर राहात नाही. हा थर कायम राहिल्यास तिथे कर्करोग होण्याची शक्यता असते.
शिश्नावरील कातडी स्वच्छ असणे आवश्यक आहे. ब-याच वेळा खरूज, नायटा, इत्यादी आजार शिश्नावर आढळतात. काही लिंगसांसर्गिक आजार शिश्नावर उघड दिसतात. शिश्नावरच्या पुढच्या आवरणावर जखम किंवा व्रण (दुखणारे किंवा न दुखणारे), लघवीच्या छिद्रावाटे पू, या सर्व लिंगसांसर्गिक रोगांच्या खुणा समजाव्यात.
मधुमेह असेल तर ब-याच वेळा शिश्नाचा पुढचा भाग सुजलेला व अस्वच्छ दिसतो.
मुस्लिम समाजात शिश्नाच्या तोंडावरची त्वचा सुंता करून काढून टाकतात. ही त्वचा शाबूत असेल तर त्याची तपासणी आवश्यक असते. उतारवयात या जागी कर्करोगाचा व्रण (जखम) किंवा छोटी गाठ असू शकते. न दुखणारा, न बरा होणारा व्रण असू शकतो. हा कर्करोग किंवा सिफिलिस हा लिंगसांसर्गिक आजार असू शकतो हे लक्षात ठेवा व डॉक्टरकडे पाठवा.
वृषण व बीजांड-त्वचेचे रोग (खरूज, नायटा) हे या जागेतही होऊ शकतात. ओलसर, घामट, कोंदट परिस्थितीमुळे या ठिकाणी खरूज नायटा फार लवकर होतात. अंडकोशांच्या किंवा वृषणाच्या दोन्ही बाजूंना एकएक याप्रमाणे बीजांडे (किंवा अंडगोल) असतात. वृषणाच्या नेहमीच्या आकारापेक्षा मोठा आकार आढळला तर पाणी किंवा पू झाला असल्याची शक्यता असते. तसेच हत्तीरोगाच्या प्रदेशात बीजांडे या रोगाने सुजून मोठी होतात.
पुरुषांच्या शुक्रपेशी आणणा-या वीर्यनलिका हाताला लागू शकतात. बीजांडकोश हाताच्या चिमटीत धरल्यावर ही नलिका चाबकाच्या बारीक वादीप्रमाणे कडक असल्यामुळे सटकते. पुरुष नसबंदी करताना दोन्ही बाजूंना ह्या नळया मध्ये कापून बांधतात. कापलेली टोके काही दिवसांनी गाठीसारखी टणक होतात.
जांघेतल्या रसग्रंथी निरोगी अवस्थेत सहसा जाणवत नाहीत. मांडीवर, पायावर कोठेही जखम, पू, गळू असेल तर त्या सुजून दुखतात, तेव्हा आजा-याला व तपासणा-याला दोघांनाही जाणवतात. मांडीवर, पायावर काही जंतुदोष नसेल आणि गाठी नसतील तर जननेंद्रियाची तपासणी करावी लागेल. लिंगसांसर्गिक रोगात (स्त्री व पुरुष) या गाठी सुजून येतात. लिंगसांसर्गिक रोगाच्या काही प्रकारांत त्या दुखतात तर काही प्रकारांत फुटून पू येतो.
हा बहुधा जन्मजात दोष असतो. यात मूत्रनलिकेत काही दोष नसतो पण बाहेरचे लघवीचे छिद्र खूप बारीक असते. त्यामुळे लघवी हळूहळू व थेंबथेंब होते. काही मुलांच्या बाबतीत लघवी शिश्न मुंडाबरोबर साठून त्वचेला फुगार येतो. कधीकधी लघवीचे छिद्र खूप बारीक असते किंवा जंतुसंसर्गामुळेही बारीक होऊ शकते. त्यामुळे लघवी करण्यास खूप वेळ लागतो. लघवीची धार लांब न पडता जवळ किंवा पायात पडते. हळूहळू किंवा थेंब थेंब लघवी होते.
याचा उपचार शस्त्रक्रियेने करतात. लघवीचे छिद्र लहान होण्याचे आणखी एक कारण म्हणजे शिश्नाच्या बोंडापुढील त्वचा चिकट असणे. हे ही जन्मजात असते किंवा जंतुसंसर्गाने होते. यात शिश्नाच्या बोंडापुढील त्वचा मागे येत नाही. लघवी करताना या त्वचेत लघवी साठून फुगा येतो व हळूहळू व थेंबथेंब लघवी होते. शस्त्रक्रिया करून हे छिद्र मोठे करणे किंवा त्वचेचा काही भाग काढून टाकणे हाच यावरचा उपाय आहे. मुस्लिम समाजात सुंता करण्याची पध्दत आहे. सुंता म्हणजे शिश्नावरच्या त्वचेचा काही भाग कापून काढून टाकणे.
शस्त्रक्रिया करायच्या आधी छिद्र मोठे होण्यासाठी खालील उपाय करून पहा.
खोबरेल तेल (किंवा तीळ तेल) कोमट करून ते शिश्नाच्या टोकाला हलके चोळावे. यानंतर त्वचा थोडी मागे सारण्याचा प्रयत्न करावा. असे दिवसातून चार-पाच वेळा करावे. याप्रमाणे सात-आठ दिवस केल्यावर काही मुलांच्या बाबतीत छिद्र लघवीपुरते मोठे होऊ शकते. याने उपयोग होतच नसेल तर ताबडतोब डॉक्टरकडे नेणे आवश्यक आहे.
लघवीचे छिद्र बारीक असेल तर आणखी एक धोका संभवतो. लैंगिक संबंधात एकदा मागे गेलेली त्वचा पूर्वीप्रमाणे पुढे न येता मागेच अडकू शकते. ही त्वचा मागे न गेल्याने व ती वाट मुळात बारीक असल्याने पुढचा भाग सुजतो. यामुळे त्वचा पुढे येणे आणखीनच अवघड बनते. अशा वेळी ताबडतोब शस्त्रक्रिया करावी लागेल.
बीजांडे गर्भावस्थेत पोटात असतात व जन्माच्या आधी काही आठवडे अंडकोशात उतरतात. कधी कधी ही प्रक्रिया मध्येच थांबते. बीजांड (एक किंवा दोन्ही) जांघेत किंवा पोटातच राहतात. इथले शरीराचे तपमान बीजांडाला मारक असते. हे लक्षात आल्यास लवकर डॉक्टरला दाखवले पाहिजे. शाळेच्या आरोग्यतपासणीतही ही तपासणी व्हायला पाहिजे. वेळीच शस्त्रक्रिया करुन बीजांड अंडकोशात न आणल्यास त्या बाजूचे बीजांड निष्क्रिय होते.