विषबाधेचे भय मानवाला अगदी आदिकाळापासून आहे, पण विषाचे प्रकार मात्र सतत बदलते आहेत. साधारणपणे विसाव्या शतकापर्यंत विषबाधेमध्ये निसर्गजन्य विषांचाच समावेश होता. मात्र एकविसाव्या शतकात मानवनिर्मित रासायनिक विषांची त्यात भर पडली आहे. ग्रामीण समाजात अजूनही निसर्गजन्य विषद्रव्यापासून अनेक विषबाधेचे प्रकार आढळतात. यात मुख्यतः साप, विंचू यांपासून होणारी विषबाधा, अफू, जमालगोटा, कण्हेर, गुंजा, इत्यादी वनस्पतींपासून होणारी विषबाधा यांचा समावेश होतो. पण आजची सर्वात महत्त्वाची आणि मोठया प्रमाणावरची विषबाधा कीटकनाशकांमुळे होते.
विषबाधांच्या घटना आत्महत्या, खून किंवा निव्वळ अपघात (म्हणजे कोणाच्याही मनात नसताना) यांपैकी कोणत्याही प्रकारे घडतात म्हणून विषबाधेची प्रत्येक घटना दखलपात्र असते.
विषबाधांचे वर्गीकरण सोबतच्या तक्त्यात दाखविले आहे. याबरोबरच त्यांचे परिणाम आणि प्रथमोपचार दाखवलेले आहेत.
प्रगत शेती म्हणजे कीटकनाशकांचा वापर हे समीकरण आज तरी दुर्दैवाने पक्के झाले आहे. विषारी कीटकनाशकांचे अनेक प्रकार आहेत आणि बहुतेकांचा परिणाम चेतासंस्थेवर होतो. विषारी औषधांची फवारणी करणा-या कामगारांना (व इतरांनाही) यातून अनेक प्रकारचे त्रास होऊ शकतात. एक तर याचे परिणाम हळूहळू होत राहतात. कालांतराने हे दुष्परिणाम प्रकट होतात. जास्त ‘डोस’ गेल्याने अचानक अपघातही होऊ शकतो. आत्महत्येसाठी किंवा क्वचित खुनासाठी विषारी पदार्थ प्यायला किंवा पाजला जातो. पण शेतीत होणारे अपघात मात्र विषारी पदार्थ श्वसनावाटे किंवा त्वचेवाटे शोषले जाऊन रक्तात भिनल्यामुळे हळूहळू होतात.
विषारी पदार्थ एकदम जास्त प्रमाणात शरीरात गेला तर लक्षणे आणि चिन्हांचे चित्र पुढीलप्रमाणे आढळते : श्वासाला औषधाचा वास येणे, मळमळ, उलटी, पोटात दुखणे, जुलाब, लाळ गळणे, थकवा, स्नायू वळवळणे, थरथर, झटके, बेशुध्दी व शेवटी मृत्यू.
या विषबाधेत जिवावरचा धोका असतो. वेळीच योग्य उपचार झाल्यास वाचण्याची थोडीफार शक्यता असते. आधी विषबाधा आहे हे लवकर ओळखणे महत्त्वाचे आहे. जवळची बाटली, त्यावरचे लेबल, श्वसनाचा वास व डोळयाच्या बाहुलीचा आकार सूक्ष्म होणे यावरून शंका घेता येईल. कदाचित शेजारी, नातेवाईक, बरोबरचे कामगार ही माहिती सांगू शकतील. विषबाधेची थोडी जरी शंका वाटली तरी ताबडतोब रुग्णालयात पाठवावे.
प्रथमोपचारात मीठपाण्याने उलटी करवून (म्हणजे विष बाहेर पडते) व ऍट्रोपीन इंजेक्शन पाच-सहा कुप्या देतात. ऍट्रोपीन हा या विषबाधेवर खास उतारा आहे. पण यासाठी विषबाधित व्यक्तीस लवकर रुग्णालयात नेणे आवश्यक आहे.
कीटकनाशक-विषबाधांचा प्रतिबंधक विचार होणे आवश्यक आहे. एक तर कीटकनाशकांच्या एकूण वापरासंबंधी निश्चित धोरण आणि मर्यादा ठरणे आवश्यक आहे. हा प्रश्न एकूणच खूप गुंतागुंतीचा आहे. अशा अतिरासायनिक शेतीपासून अल्परासायनिक सेंद्रियशेतीपर्यंतचे स्थित्यंतर घडवून आणावे लागेल. तात्पुरता उपाय म्हणून फवारणी कामगारांचे संरक्षण होईल अशी कामाची पध्दत रूजवणे आवश्यक आहे. उष्ण वातावरणामुळे पूर्ण संरक्षक पोषाख व मुखवटा फार काळ वापरता येत नाही. आपण चांगली कीटकनाशके निवडली पाहिजेत.
या सर्व समस्या लक्षात घेऊन ‘समतोल कीटकनियंत्रणाचे धोरण’ मांडले जात आहे. समतोल कीटकनियंत्रणात फवारणी आणि तिचा फायदा याचे गणित पाळावे लागते. फवारणी करण्याच्या तत्त्वाबरोबरच इतर अनेक मुद्दे आहेत. यात काटक पिकांची निवड, बेडूक, सरडे, पक्षी, इत्यादी कीटकभक्षक प्राण्यांवर मदार ठेवणे, पीकबदल, निवडक कीटकनाशकांचा (उदा. कडूनिंब) विशिष्ट पध्दतीने वापर, फवारणी करणारांचे योग्यसंरक्षण, प्रथमोपचाराची व्यवस्था, इत्यादी अनेक गोष्टींचा समावेश आहे. अशा समतोल धोरणाने कीटकनाशकांचा कमी वापर करूनही जास्त पीक घेता येते हे सिध्द झाले आहे. महाराष्ट्रातही आता यावर प्रयोग चाललेले आहेत.
आधुनिक जेनेटिक तंत्रज्ञानामुळे कीडनाशकांची गरज मोठया प्रमाणावर कमी होऊ शकते. कपास बियाणांमध्ये बीटी कॉटन या नव्या बियाणास मूळातच बोंड अळी प्रतिबंधक शक्ती असते त्यामुळे कीडनाशकांचा वापर खूप कमी झाला आहे. याचबरोबर कडूनिंबासारख्या नैसर्गिक कीडनाशकांचाही विविध पिकांत उपयोग वाढत आहे.