‘ताप’ हा केवळ ‘ताप’ नसतो. तर ताप हे एक लक्षण आहे. त्यामागचा मूळ आजार ओळखून उपचार करणे आवश्यक आहे. हिवताप निर्मूलनाच्या कार्यक्रमात’ कोठलाही ताप हिवताप समजून उपचार करा’ असे थोडेसे अशास्त्रीय आवाहन पूर्वी केले जात असे. यापुढे आपण असे न करता ताप किंवा इतर लक्षणांमागचा मूळ आजार शोधून त्यावर योग्य तो उपचार, सल्ला द्यायचा आहे. याप्रमाणे प्राथमिक पातळीवर बरे होण्यासारखे आजार ओळखून उपचार करणे, गंभीर आजारांच्या बाबतीत योग्य त्या तज्ज्ञाकडे पाठवणे, महत्त्वाचे आजार वेळीच ओळखणे, इत्यादी कौशल्ये आपल्याला या रोगनिदानातून शिकायची आहेत. या पुस्तकातले रोगनिदान तक्ते व मार्गदर्शक यासाठी उपयोगी पडतील.
हे रोगनिदान मार्गदर्शक आणि तक्ते कसे वापरायचे ते आता पाहू या. यातील मार्गदर्शक म्हणजे वाटाडया हा वापरावयास अगदी साधा, सोपा आहे. तक्ता त्यामानाने थोडासा अवघड, पण जास्त माहितीपूर्ण व शास्त्रीयदृष्टया अधिक परिपूर्ण आहे. प्रत्येक रुग्णाच्या बाबतीत आधी मार्गदर्शक पाहून निदान करा. जास्त माहितीसाठी तक्ता बघा.
शक्यतोवर रोगनिदान मार्गदर्शकात ‘माहिती’ विचारून रोगनिदान करण्याचा प्रयत्न केला आहे. जिथे ‘तपासा’ असे लिहिले आहे तेथे काही शारीरिक तपासणी करणे गृहीत धरले आहे. उदा. तापाच्या रोगनिदानात ‘मान ताठरणे’ किंवा तापाच्या मानाने ‘नाडी मंद’ असा उल्लेख आहे. तेथे संबंधित तपासणी करणे आवश्यक आहे. या तपासण्यांबद्दल माहिती योग्य त्या ठिकाणी दिली आहे. प्रत्येक ‘प्रश्नाला’ (चौकटीतले शब्द व वाक्य) ‘होय’ किंवा ‘नाही’ असे उत्तर संभवते. ‘होय/आहे’ असे असेल तर बाणाची दिशा शक्यतोवर उजव्या बाजूला ठेवलेली आहे. ‘नाही’ असे उत्तर असेल तर खाली म्हणजे पुढच्या चौकटीकडे (प्रश्नाकडे) जायचे आहे.
काही ठिकाणी चौकटीत दोन-तीन पर्याय दिले आहेत. तिथे त्यांपैकी काहीही ‘होय’ असेल तर उजवीकडे जाऊन पुढील निर्णय घ्यायचा आहे. उदा. तापाच्या तक्त्यात ‘सूज, पू, ठणका’ यांपैकी काहीही एक असले तरी ‘होय’ असे धरून उजवीकडे जायचे आहे. मात्र जेथे दोन अटी (प्रश्न) चौकटीत ‘एकत्र’ दिलेल्या आहेत (उदा. ताप सतत पण त्या मानाने नाडी मंद) तेथे दोन्ही गोष्टींना ‘होय-आहे’ हे उत्तर असेल तरच उजवीकडे जा. दोन्हीपैकी एक ‘आहे’ आणि दुसरे नसेल तर ‘नाही’ म्हणून खाली जावे.
मार्गदर्शकात प्रश्नांचा क्रम महत्त्वाचा आहे. प्रश्न त्याच क्रमाने विचारले गेले पाहिजेत; नाहीतर निदान चूकू शकते. उदा. तापाच्या तक्त्यात ‘थंडीताप’ हा प्रश्न खोकल्याच्या खालोखाल लगेच घेतला तर ‘हिवतापाचे’ निदान करणे अवघड होईल. कारण फ्ल्यू, जंतुदोष, सांधेताप या अनेक आजारांत थंडीताप येऊ शकतो. म्हणून हे आजार आधीच वेगळे काढले आहेत. म्हणूनच निदान करताना मार्गदर्शक समोर ठेवणे आवश्यक आहे. आपण पत्ता विचारताना हा खाणाखुणांचा क्रम महत्त्वाचा म्हणून लक्षात ठेवतो तसाच हा क्रम महत्त्वाचा आहे.
रोगनिदान मार्गदर्शकातला क्रम सर्वसाधारणपणे आधी गंभीर आजार असल्या-नसल्याची खात्री करून घेण्यासाठी विशिष्ट पध्दतीने ठेवला आहे. तापाच्या तक्त्यात हिवताप, इत्यादी निदाने शेवटी येतात. त्याआधी गंभीर आजार नसल्याची खात्री केली जाते. मात्र सर्दी पडशासारखा आजार ओळखायला सोपा असल्याने साधा असला तरी आधी घेतला आहे. रोगनिदानात या क्रमामुळे खूप निर्धोकपणा येणार आहे. तसेच गंभीर आजार वेळीच ओळखल्यामुळे आपल्याबद्दल विश्वास वाढेल हे वेगळेच.
गोल कंसातले शब्द रोगनिदानाचा निर्णय व पुढील उपाययोजनेचे स्वरूप सांगतात. कंसाची साधी रेषा, तुटक रेषा, ठळक सलग रेषा वापरून आजाराचा प्रकार सांगितला आहे. साध्या रेषेचा कंस म्हणजे आजार साधा आहे. प्राथमिक पातळीवर तुम्ही स्वतः उपचार करा. ठळक रेषेची खूण मध्यम आजाराची आहे – याचा अर्थ उपचार करा, पण काळजी घेणे आवश्यक आहे. उदा. जुलाबाचे आजार साधे खरे पण ‘शोष’ पडला तर माणूस दगावू शकतो. शोष पडू नये म्हणून काळजी घेणे आवश्यक आहे. तसेच ‘शोष’ खूप असेल तर तज्ज्ञाकडे पाठवणे आवश्यक आहे. घसादुखी-घसासूज हे मध्यम आजार म्हणून उपचार करायला हरकत नाही. पण घटसर्प नाही याची खात्री करून घ्या. रुग्णाकडे लक्ष ठेवा. ठळक रेषा म्हणजे गंभीर आजाराची निशाणी आहे. असे आजार वेळीच ओळखून (प्रथमोपचार आवश्यक असल्यास तो देऊन) तज्ज्ञाकडे पाठवणे आवश्यक आहे.
रोगनिदान मार्गदर्शक आता संगणकावरही पाहता येतील.
रोगनिदान तक्ता ‘आडवा’ वाचायचा आहे.
रोगनिदान तक्ता तयार करताना उजव्या बाजूस शेवटी त्या लक्षणांशी संबंधित रोगांची यादी दिली आहे. त्याच्या आधीच्या स्तंभात त्या रोगाच्या ‘विशेष’ खाणाखुणा दिल्या आहेत. उदा. तापाच्या तक्त्यात ‘न्यूमोनिया’ समोर छातीत दुखणे, दम लागणे, अचानक सुरुवात, इत्यादी विशेष बाबी दिल्या आहेत. या विशेषांवरून रोगनिदान खूप सोपे होते.
डावीकडील भागात निरनिराळया इतर लक्षणांची माहिती संक्षिप्तपणे नोंदली आहे. चार अक्षरांचा वापर – ह, ब, क, उ- केला आहे. (ह-हमखास, ब-बहुधा, क-कधीकधी, उ-उशिरा) याचा अर्थ सोपा आहे.
या सर्व नोंदींवरून त्या आजाराची भरपूर माहिती मिळते. काही लक्षणे, चिन्हे एखाद्या आजारात उशिरा येतात. उदा. सांधे तापात उशिरा छातीत दुखते. त्याचीही नोंद तक्त्यात केली आहे. प्राथमिक पातळीवर रुग्णाची तपासणी पहिल्या एक-दोन दिवसांतच होणे अपेक्षित असते. ‘लवकर’ दिसणा-या लक्षणांची वेगळी नोंद केलेली नाही. पण तसे करणे सहज शक्य आहे.
रोगनिदान मार्गदर्शकात रोग किंवा आजार ओळखल्यानंतर तक्त्यातून त्याची जास्त माहिती घेऊन पडताळा करता येईल. मार्गदर्शकात सर्व लक्षणांची माहिती देणे शक्य नाही. त्यामुळे गोंधळ उडण्याची शक्यता असते. म्हणून मार्गदर्शकाबरोबर तक्ता पाहणे आवश्यक आहे.
नुसता ‘तक्ता’ पाहूनही रोगनिदान शक्य आहे. समजा, ‘ताप’ आलेल्या माणसाची दुसरी प्रमुख तक्रार ‘पोटात दुखणे’ ही आहे. आता तापाच्या तक्त्यात ‘पोटात दुखणे’ या स्तंभात पहा. आधी जिथे ‘ह’ आहे तो आजार पहा. मग ‘ब’ असलेले आजार पहा. दोन्हींत तुलना करा. इतर लक्षणे, विशेष बाबी यांचा विचार करून आजार ठरवा. तापाबरोबर पोटात दुखणे हे यकृतदाह किंवा काविळीत हमखास आढळते. तर विषमज्वरात आणि मूत्रसंस्थेचा जंतुदोष यांतदेखील ब-याच वेळा पोटात दुखते. इतर लक्षणांचा व विशेष बाबींचा अभ्यास करून या दोन्हींतले एक निवडता येईल. समजा, या दोन्हींमध्ये कोठलेच रोगनिदान समाधानकारक वाटत नसल्यास मग ‘कधीकधी’ पोटात दुखणारे आजार पहा. हिवताप, न्यूमोनिया या आजारांत क्वचित पोट दुखू शकते, पण इतर लक्षणांचा पूर्ण विचार करून मगच निष्कर्ष काढावा लागेल.
तक्त्याचा आणखी एक फायदा म्हणजे एखाद्या आजारात ‘कधीकधी’ आढळणारे लक्षण, खूण दिसून आली तर आपला गोंधळ उडणार नाही. उदा. हिवतापात कधीकधी पोटात दुखते. इतर सर्व चित्र हिवतापात फिट बसत असल्यास मग ‘पोटात दुखणे’ या क्वचित प्रसंगी येणा-या लक्षणाने गोंधळ उडणार नाही; कारण तक्त्यामध्ये तशी नोंद आहे. अशा पध्दतीने एका ओळीत एका रोगाच्या लक्षणांचा आणि चिन्हांचा अभ्यास तक्त्यामुळे शक्य आहे. तक्त्याचा अभ्यास होत गेला, की रोगनिदान अत्यंत सोपे होऊन जाईल.