‘वृध्दांसाठी आरोग्यशास्त्र’ ही एक आता स्वतंत्र शाखा झाली आहे. मात्र वृध्दांचे आरोग्याचे बरेच प्रश्न निरनिराळया वैद्यक तज्ज्ञांचे विषय असतात हे लक्षात ठेवले पाहिजे. सामान्यपणे वृध्दांच्या आरोग्यसमस्यांची यादी अशी करता येईल.
यांतील अनेक रोगप्रक्रिया अपरिवर्तनीय आहेत, उदा. सांधेदुखी, सांध्यात हालचाल कमी होत जाणे हे अटळ आहे. मोतीबिंदू होणे, चष्मा लागणे हेही अटळ आहे. श्रवणशक्ती कमी होण्यावरही उपाय नाही. मात्र योग्य आहार विहाराने या सर्व गोष्टी थोडया पुढे ढकलता येतात.
यांतले बरेच आजार हे थांबवता येत नाहीत कारण शरीर जीर्ण होत जाते. पण काही समस्यांना मात्र उत्तम वैद्यकीय उपचार उपलब्ध आहेत. मोतीबिंदू , दात नसणे, पायाचे हाड तुटणे या तीनही प्रमुख समस्यांना अगदी चांगले उपाय आहेत. या उपायांनी वृध्दांच्या आयुर्मानात सरासरी दहावीस वर्षांची भर पडते.
दातांच्या कवळीमुळे म्हातारपण बरेच सुसह्य होते. यामुळे अन्न चावण्याची सोय होते. याचबरोबर बोलणे आणि चेहरेपट्टी चांगली राहणे हेही व्यक्तिमत्त्वाच्या दृष्टीने महत्त्वाचे आहे. कवळीचे फारच फायदे आहेत. मात्र योग्य वेळी कवळी करून घेतली पाहिजे. एकदा केलेली कवळी 10-20 वर्षे सहज टिकते.
म्हातारपणातले काही आजार लवकर शोधून उपचार केल्याने आयुष्य वाढते. अतिरक्तदाब आणि मधुमेह हे दोन आजार लक्षात ठेवायला पाहिजेत. दोन्ही आजार ओळखायला सोपे आहेत. या दोन्हींसाठी साधे उपचार नियमित घेऊन चांगला उपयोग होतो.
वृध्दापकाळात वेदना थोडी कमी प्रमाणात होते. त्यामुळे आधी जे आजार फार जाचक वाटतात ते थोडे सौम्य वाटतात. काही आजारांमध्ये याचा फायदा होतो तर काहींमध्ये तोटा होतो. उदा. सांधेदुखी वगैरेमध्ये याचा फायदा होईल पण अल्सर, जठरव्रण सारखा आजार न कळल्याने घातक ठरू शकेल. अस्थिभंगाच्या बाबतीत हा अनुभव येतो. म्हाता-या माणसांना हाड मोडल्याची वेदना त्यामानाने कमी होते. पण त्या त्या आजाराप्रमाणे दखल घेतलीच पाहिजे.
वातावरणातील बदल – विशेषत: थंडीचे दिवस – म्हातारपणात त्रासदायक ठरतात. थंडीत बरेच आजार बळावतात. यात सांधेदुखी, दमा, श्वसनाचे इतर आजार येतात. लहान मुले आणि म्हातारी माणसे यांना थंडीच्या बाबतीत तेवढाच त्रास होतो हे लक्षात घेऊन गरम कपडे वगैरे सोय केली पाहिजे.