/tantrika tantra icon चेतासंस्थेचे आजार (मज्जासंस्था) मानसिक आरोग्य आणि आजार
अपघातात मेंदूला मार लागणे

महाराष्ट्रात वाहन अपघात वाढत आहेत. वाहनांची संख्या आणि वेग वाढणे हे त्याचे एक कारण आहे. दुसरे कारण म्हणजे वाहतूक-शिस्तीचा अभाव. अप्रशिक्षित वाहनचालक, मुलांनी बेदरकारपणे वाहन चालवणे ही प्रमुख कारणे आहेत.

रस्त्यावरच्या अपघातात, मारामारीत डोक्याला जखम होऊन मेंदूस मार लागण्याची शक्यता असते. (दुचाकी वाहनांवर हेल्मेट वापरणे आवश्यक आहे.) वरून या जखमा किरकोळ दिसल्या तरी मेंदूस इजा झाली आहे काय हा महत्त्वाचा प्रश्न असतो.

खालीलपैकी काहीही खाणाखुणा आढळल्यास ताबडतोब रुग्णालयात पाठवणे आवश्यक आहे.

  • तात्पुरती का होईना, बेशुध्दी आली असल्यास
  • नाकातून, तोंडातून, कानातून रक्त आल्यास
  • शरीराचा कोठलाही भाग लुळा किंवा बधिर झाल्यास.
  • दोन्ही डोळयांच्या बाहुल्यांचा आकार असमान (लहान-मोठा) असल्यास.
  • कवटी अथवा मेंदूस इजा झाल्याचे दिसत असल्यास.

वरील खाणाखुणांसाठी निदान रुग्णालयात दाखल करून 24 तासांपर्यंत तरी लक्ष ठेवणे आवश्यक असते. नातेवाईकांनी यासाठी रुग्णालयातून लवकर सोडण्याची घाई करू नये. स्कॅन व एम.आर.आय. तंत्रज्ञानाने आता या क्षेत्रात उत्तम निदान करता येते.

मेंदूत गळू होणे

मेंदूसुजेच्या काही प्रकारांत सूज विशिष्ट ठिकाणी येते. या जागी मेंदूत गळू किंवा बेंड तयार होते. हे गळू कोणत्याही जीवाणूंमुळे होऊ शकते व क्षयरोगातही होऊ शकते. या प्रकारात लक्षणे मर्यादित असतात. मेंदूच्या विशिष्ट भागात बिघाड झाल्याने शरीराचा संबंधित भाग बिघाड दाखवतो. यावरून तज्ज्ञांना गळू कोठे आहे त्याचे निदान करता येते. याच्या निदानासाठी स्कॅन फोटोची आवश्यकता असते. उपचार म्हणजे रोगजंतूंविरुध्द औषधयोजना व आवश्यक वाटल्यास पू काढून घेण्यासाठी शस्त्रक्रिया.

मेंदूत गाठ होणे

शरीरात कोठेही साधी किंवा कर्करोगाची गाठ येऊ शकते. त्याचप्रमाणे मेंदूत किंवा चेतारज्जूत गाठ होऊ शकते. गाठीची जागा, वाढीचा वेग, प्रकार (साधी गाठ- कर्करोग) यांवर त्याचे परिणाम अवलंबून असतात. शरीरातील विशिष्ट भागात घडणा-या परिणामांवरून मेंदूतल्या गाठीच्या स्थानाचा अंदाज घेता येतो. ‘स्कॅन’ व एम.आर.आय. तपासणीद्वारा गाठीची नेमकी जागा व प्रकार शोधणे शक्य असते. योग्य वेळी उपचार झाल्यास रुग्ण वाचू शकतो. गेल्या काही वर्षात रोगनिदानाच्या व उपचारांच्या तंत्रज्ञानात खूप प्रगती झाल्यामुळे या रुग्णांचे भविष्य पूर्वीइतके निराशाजनक राहिलेले नाही.

 

डॉ. शाम अष्टेकर २१, चेरी हिल सोसायटी, पाईपलाईन रोड, आनंदवल्ली, गंगापूर रोड, नाशिक ४२२ ०१३. महाराष्ट्र, भारत

message-icon shyamashtekar@yahoo.com     ashtekar.shyam@gmail.com     bharatswasthya@gmail.com

© 2017 arogyavidya.net | All Rights Reserved.