/tantrika tantra icon चेतासंस्थेचे आजार (मज्जासंस्था) मानसिक आरोग्य आणि आजार
डोकेदुखी

Headache डोकेदुखी हे अगदी नेहमी आढळणारे लक्षण आहे. ब-याच वेळा डोकेदुखीमागे निश्चित ठोस आजार नसतो. मानसिक ताण, भूक, उपासमार, गोंगाट, वातावरणातील बदल, अपचन, बध्दकोष्ठ, इत्यादी कारणांमुळेही डोकेदुखी होत असते. यामुळे डोकेदुखी एक ‘किरकोळ’ तक्रार समजली जाते. अशी डोकेदुखी ते कारण शमले, की आपोआप दूर होते. अन्यथा ऍस्पिरिन, पॅमालच्या गोळीनेही थांबते.

मात्र डोकेदुखीमागे गंभीर कारणे असू शकतात (उदा. मेंदूसूज). डोकेदुखीमागे किरकोळ कारण नाही असे वाटल्यास आणि ऍस्पिरिन, पॅमालने थांबत नाही (किंवा तात्पुरती थांबून परत चार-पाच तासांनी येते) अशा डोकेदुखीचा विचार रोगनिदानासाठी केला पाहिजे. फक्त 10% डोकेदुखीमागे काहीना काही अंतर्गत आजार असतो म्हणूनच डोकेदुखी ही एक अगदी गुंतागुंतीची तक्रार आहे. डोकेदुखीचे शास्त्र आता ब-यापैकी विकसित झालेले आहे. सोबतचा तक्ता आणि मार्गदर्शक यासाठी उपयोगी ठरू शकेल. डोकेदुखीबद्दल आणखी माहिती इतर प्रकरणांमध्ये दिली आहे.

डोकेदुखी (तक्ता (Table) पहा)

डोकेदुखीचे वर्गीकरण दोन गटांत केले जाते. (अ) प्राथमिक (ब) आजारसंबंधित डोकेदुखी. या दोन गटांत अनेक कारणे समाविष्ट आहेत.

(अ) प्राथमिक डोकेदुखी – यात चार उपप्रकार आहेत. यात डोकेदुखीमागे दुसरा कोणता आजार नसतो.

1. अर्धशिशी
2. तणाव-डोकेदुखी
3. चक्री डोकेदुखी
4. इतर

(ब) आजारसंबंधित डोकेदुखी : ही डोकेदुखी कोणत्यातरी आजारामुळे येते.

1. रक्तवाहिन्यांचे दोष – गुठळया, रक्तस्राव, इ.
2. मेंदूचे जंतुदोष – उदा मेंदूज्वर, मेंदूआवरण दाह, मेंदू-हिवताप, इ.
3. कर्करोग – मेंदूतल्या गाठी
4. इजा – मार
5. डोळा-कान, दात, मान, इ. अवयवांशी संबंधित डोकेदुखी
6. इतर संस्थांचे आजार उदा. फ्लू, डेंगू, अतिरक्तदाब, काचबिंदू, सायनसदुखी.
7. मेंदूच्या चेतांशी निगडित डोकेदुखी, मानदुखी.

अर्धशिशी

ही डोकेदुखी सहसा डोक्याच्या अर्ध्या भागात होते. (70% वेळा) पण कधीकधी ती दोन्ही बाजूसही येते. याबरोबर मळमळ, उलटी, प्रकाश सहन न होणे वगैरे त्रास असतो. ब-याच रुग्णांना अर्धशिशी येणार अशी पूर्वसूचना मिळते. हा आजार कुटुंबामध्ये अनेकांना असू शकतो. अर्धशिशी डोकेदुखीच्या आधी आणि नंतरही परिणाम जाणवतात. डोक्याच्या हालचालीने डोकेदुखी वाढल्यासारखी वाटते. उलटी झाल्याने डोकेदुखी बहुधा थांबते. हा आजार लहानपणीच सुरु होतो. बहुतेक वेळा हा आजार 1-2 दिवसात पूर्ण थांबतो त्यानंतर काही दिवसांनी ही डोकेदुखी परत येते. क्वचित ही डोकेदुखी तीन दिवसांपेक्षा जास्त टिकते. मासिक पाळी येण्याचा आणि अर्धशिशीचा थोडाफार संबंध आहे असे दिसते.

या आजाराचे कारण चेतातंतू किंवा रक्तवाहिन्यांचे तात्पुरते आकसणे हे असते.

उपचार

अर्धशिशीचा उपचार बरेच रुग्ण स्वत:च करतात. ऍस्पिरिन पॅमाल ही नेहमीची औषधे बहुधा उपयुक्त ठरतात. हीच औषधे अर्धशिशीच्या आधी पूर्वसूचना मिळाल्यावर घेणे जास्त उपयुक्त असते.

याशिवाय इतर अनेक औषधे उपलब्ध आहेत पण ती डॉक्टरी सल्ल्यानुसार वापरावीत.

तणाव-डोकेदुखी

काही जणांना दीर्घ किंवा आकस्मिक मानसिक तणावामुळे डोकेदुखी होते. तणाव, निराशा, दु:ख या भावनांमुळे ही डोकेदुखी होऊ शकते. याचे मुख्य कारण डोक्याच्या विविध स्नायूंमध्ये ‘तणाव’ निर्माण होऊन डोके दुखते. ही डोकेदुखी बराच वेळ टिकते व विश्रांतीने कमी होते. वेदनाशामक गोळया व विश्रांती हाच यावरचा उपाय आहे.

चक्री डोकेदुखी (क्लस्टर डोकेदुखी)

ही डोकेदुखी काही कालावधीनंतर परत परत येते. एकदा आल्यावर तासभर टिकते, कमी होते. दिवसात ती 1-2 वेळा उद्भवते. कधीकधी ही मद्यपानामुळे सुरु होते, पण बहुतेकवेळा काही कारण सांगता येत नाही. काही ऋतूंमध्ये ही डोकेदुखी जास्त वेळा येते. या डोकेदुखीबरोबर डोळयांना पाणी येणे, नाकातून पाणी येणे हीही लक्षणे दिसतात.

हा आजार प्राथमिक डोकेदुखी या गटात असला तरी इतर गंभीर आजार नाही याची खात्री करावी लागेल. यासाठी एकदातरी तज्ज्ञाने तपासणे महत्त्वाचे आहे. कदाचित मेंदूचा स्कॅन करावा लागू शकतो.

प्राथमिक डोकेदुखी (इतर प्रकार)

या तीन प्रकारांशिवाय अनेक प्रकारच्या डोकेदुख्या प्राथमिक गटात येतात. यातच एक प्रकार म्हणजे रोज येणारी डोकेदुखी.

होमिओपथी निवड

ऍसिडफॉस, आर्सेनिकम, बेलाडोना, ब्रायोनिया, कल्केरिया कार्ब, फेरम, ग्लोनाईन, हेपार सल्फ, लॅकेसिस, लायकोपोडियम, मर्क्युरी सॉल, नेट्रम मूर,सिलिशिया, सल्फर, थूजा

 

डॉ. शाम अष्टेकर २१, चेरी हिल सोसायटी, पाईपलाईन रोड, आनंदवल्ली, गंगापूर रोड, नाशिक ४२२ ०१३. महाराष्ट्र, भारत

message-icon shyamashtekar@yahoo.com     ashtekar.shyam@gmail.com     bharatswasthya@gmail.com

© 2017 arogyavidya.net | All Rights Reserved.