मेंदूचा रक्तपुरवठा निसर्गाने फार चांगला ठेवलेला आहे. यात अनेक पर्यायी मार्ग असतात. मेंदू व चेतासंस्था ही अत्यंत नाजूक संस्था आहे. रक्तप्रवाहात दोन-तीन मिनिटे खंड पडला तरी मेंदूचा संबंधित भाग कायमचा बिघडू शकतो.
हृदयविकाराच्या झटक्यात दोन-तीन मिनिटांत परत हृदयक्रिया चालू झाली नाही तर पुन्हा हृदयक्रिया चालू होऊनही उपयोग नसतो; कारण मेंदूतल्या पेशी तेवढया काळात मरण पावतात.
हृदयविकारात जसा रक्तप्रवाह खंडित होतो, तसाच मेंदूचा झटका असतो. यातही रक्तप्रवाह खंडित होतो. याची तीन प्रकारची कारणे असू शकतात.
भारतामध्ये या मेंदू-झटका/अर्धांगवायूचे प्रमाण हजारी लोकसंख्येत 2 इतके आढळते. या व्यक्ती उतारवयातल्या किंवा वृध्द असतात. वाढत्या वयोमानाने या आजाराचे प्रमाण समाजात वाढतच जाणार आहे.
अतिरक्तदाब हे या आजाराचे एक प्रमुख कारण आहे. एक तर या आजारात रक्तवाहिन्या कडक झालेल्या असतात. जादा रक्तदाबाने त्या फुटतात. छोटया रक्तवाहिन्या फुटल्या तर थोडे नुकसान होते व ते भरून येते. मोठया रक्तवाहिन्या फुटल्या तर खूप नुकसान होते.
धूम्रपान, लठ्ठपणा, मधुमेह, उतारवय, रक्तातील मेद वाढणे ही या आजारामागची महत्त्वाची कारणे आहेत. या कारणांमुळे रक्तवाहिन्या फुटणे किंवा गुठळया होण्याची शक्यता निर्माण होते. मेंदूचा रक्तपुरवठा अनेक मार्गांनी होत असला तर सर्वच रक्तवाहिन्या या कारणांनी खराब झालेल्या असतात.
वरचा रक्तदाब 70 पेक्षा कमी झाला तर असा मेंदू घात होऊ शकतो. याला विविध कारणे आहेत. हृदयविकाराचा झटका हे त्याचे प्रमुख कारण असते. तसेच अतिरक्तदाबावर नियमित उपचार करणे हे मेंदू-आघात टाळण्यासाठी अत्यंत महत्त्वाचे आहे. रुग्णांना हे पटवले पाहिजे.
मेंदूच्या विशिष्ट भागात शरीराच्या विशिष्ट भागांचे नियंत्रण असते. तसेच मेंदू व चेतारज्जूच्या विशिष्ट भागातून संबंधित शरीराच्या संदेशांची ने-आण होत असते. नियंत्रण करणारा भाग किंवा संदेशवहन सांभाळणारा भाग यापैकी कोणत्याही भागात बिघाड होऊ शकतो. या भागामध्ये दाब येणे, रक्तपुरवठा बंद पडणे, पू होणे, मार लागणे यापैकी काही झाल्यास शरीराच्या संबंधित भागात शक्ती कमी होते किंवा लुळेपणा येतो.
अर्धांगवायू याप्रमाणे येतो
तात्पुरता किंवा कायमचा अर्धांगवायू
अर्धांगवायू कधीकधी तात्पुरता असतो, तर कधीकधी कायमचा. अर्धांगवायूचा झटका आल्यावर पहिल्या दोन-तीन दिवसांत शरीराचा कोणकोणता भाग लुळा पडणार हे ठरून जाते. दोन-तीन महिन्यांनंतर काही रुग्णांमध्ये थोडीथोडी सुधारणा होण्याची शक्यता असते. मात्र काही जणांच्या बाबतीत सुधारणा होत नाही.
मानसिक, शारीरिकदृष्टया खचल्याने बरेच रुग्ण या आजारात दगावतात.
मेंदू आघाताचे वेळीच निदान करण्यासाठी खालील खुणा महत्त्वाच्या आहेत. यातले एकही चिन्ह असल्यास सावध व्हावे; आणि वैद्यकीय मदत मिळवावी.
अर्धांगवायूच्या रुग्णांना रुग्णालयातून घरी सोडल्यानंतर पुष्कळ काळजी घ्यावी लागते. असा रुग्ण दीर्घकाळ सांभाळावा लागतो. त्याची शारीरिक आणि मानसिक स्थिती चांगली नसते. अचानक आलेला अर्धांगवायूसारखा गंभीर आघात, अंथरुणाला खिळून राहावे लागणे, म्हातारपण, परावलंबित्व ह्या सर्वांचा एकत्रित परिणाम होतो. या रुग्णांना खालील समस्या भेडसावतात.
रक्तवाहिन्यांच्या आजारांमुळे रक्तपुरवठयात अडथळा येऊन मेंदूत बिघाड होतो. अशा आजाराला रक्तचंदन चूर्ण व जेष्ठमध चूर्ण समभाग एकत्र मिसळलेले तीन ते सहा ग्रॅम (एक-दोन चमचे) रोज याप्रमाणे एक दोन महिने घ्यावे. यामुळे रक्तप्रवाह नियमित राहण्यास मदत होते पण अर्थातच प्रारंभिक तीव्र अवस्थेत तज्ज्ञाकडे पाठवणे आवश्यक आहे. रुग्ण रुग्णालयातून घरी आल्यानंतरच वरील उपचार करावेत. अर्धांगवायू झालेल्या रुग्णांना आधी रुग्णालयात दाखल करावे लागते. घरी आणल्यानंतर नस्य, बस्ती, अभ्यंग, वाफा-याचे शेक, आसने व काही औषधे यांच्या मदतीने सुधारणा होऊ शकते. एकदा आजाराची पहिली तीव्रता ओसरली, मलमूत्र विसर्जनाची पूर्वसूचना देणे शक्य झाले की खाटेवर पडल्यापडल्या पवनमुक्तासन करावयास मदत करावी. प्रेम आणि सहानुभूतीने रुग्णास धीर द्यावा.
या बरोबरच महायोगराज गुग्गुळ एक ग्रॅम गोळी तीन वेळा आणि एकांगवीर 500 मि.ग्रॅ. गोळी तीन वेळा ही औषधे सुधारणा होईपर्यंत पोटातून द्यावीत.
हळूहळू इतर आसने शिकवता येतील. शक्याशक्यता पाहून वज्रासन, पद्मासन, भुजंगासन, इत्यादी शिकवता येईल. काही रुग्णांना आसने करताना अवयवांच्या कडकपणामुळे वेदना जाणवते. अशा रुग्णांचे श्वसन तपासावे. फक्त डावी नाकपुडी मोकळी आहे, उजवी बंद अशी स्थिती असल्यास डाव्या नाकपुडीत सुगंधी कापसाचा बोळा ठेऊन ती बंद करावी. या उपायाने उजवी नाकपुडी मोकळी होते. एकदा उजव्या बाजूने श्वसन सुरू झाले, की 15 मिनिटे बोळा तसाच ठेवून, नंतर काही तास बोळा काढावा व नंतर परत बसवून अर्धा तास जाऊ द्यावा. याप्रमाणे हळूहळू दोन्ही नाकपुडयांतून श्वसन एकसारखे चालू होईल अशी काळजी घ्यावी. यामुळे अवयवांचा कडकपणा कमी होतो.
याउलट अवयवांना अगदी शिथिलपणा असेल तर उजवी नाकपुडीच चालू असण्याचा संभव असतो. या परिस्थितीत डावी नाकपुडी चालू करण्याचा प्रयत्न करावा.
आसने करताना एकदम योग्य आसन व्हावे अशी इच्छा अवास्तव आहे. हळूहळू प्रगती होत जाते. हे सर्व करायला खूप सहनशीलता आणि चिकाटी लागते.
हे उपचार यौगिक परंपरेनुसार सांगितले आहेत. आपण स्वतःही या क्षणी कोणत्या नाकपुडीने आपला श्वास चालू आहे हे तपासू शकतो. सर्वसाधारणपणे कोणती तरी एकच नाकपुडी चालू असते हे अनुभवास येईल. दिवस-रात्र, आजारपण, इत्यादींप्रमाणे विशिष्ट बाजूने श्वसन चालू राहते असा अनुभव आहे.