हा एक दीर्घकालीन आजार आहे. हा आजार एक प्रकारच्या जिवाणूंमुळे होतो. कातडीबरोबरच हा आजार चेतातंतूंवरही दुष्परिणाम करतो. कातडीवर न खाजणारे चट्टे व बधिरता येते. नंतरनंतर तळव्यावर व्रण होणे, नाक बसणे, हातापायाची बोटे आखडणे किंवा वाकडी होणे, इत्यादी लक्षणे कुष्ठरोगात आढळतात. हा आजार आनुवंशिक नाही. हा आजार सांसर्गिक प्रकारच्या रुग्णांच्या संसर्गाने एकमेकांत पसरतो. यावर आता प्रभावी औषधे निघाल्याने बहुतेकांचा आजार सहा महिने ते दीड वर्ष या काळात पूर्ण बरा होतो. त्यासाठी कायमचे नुकसान होण्याआधीच या रोगाची सुरुवातीची लक्षणे ओळखून उपचार व्हायला पाहिजेत.
कुष्ठरोग हा आजार मायको लेप्री नावाच्या जिवाणूंमुळे होतो. हे जंतू खूप सावकाश वाढतात. म्हणून हा आजारही खूप सावकाश वाढतो. (2 ते 5 वर्ष लागू शकतात). या आजाराचा प्रसार खूपच मर्यादित असतो. मुळात 98% व्यक्तींना या आजाराविरुध्द उत्तम प्रतिकारशक्ती असते. म्हणजे फक्त 2% जणांना हा आजार होऊ शकतो. त्यातही केवळ सांसर्गिक प्रकारच्या कुष्ठरोग-बाधित व्यक्तींकडूनच हे जंतू पसरू शकतात. उपचार सुरु केल्यावर महिन्याभरातच हे रुग्ण असांसर्गिक होतात.
सांसर्गिक कुष्ठ रुग्णांच्या श्वसनावाटे हे जंतू पसरतात. श्वासोच्छ्वासातून जंतू तर पसरतातच, पण शिंकण्या खोकण्यातून विशेष संख्येने जंतू उडतात. क्षयरोगाप्रमाणेच कुष्ठरोग पसरतो त्वचेतून संपर्काने तो पसरत नाही.
आपली राष्ट्रीय कुष्ठरोग नियंत्रण योजना ही आधुनिक उपचारांमुळे अत्यंत यशस्वी झाली आहे. गेल्या दशकात कुष्ठरोगाचे प्रमाण हजारी 4-5 पासून आता दहा हजारात 4-5 इतके म्हणजे दहावा हिस्सा झाले आहे. कुष्ठरोग नियंत्रण योजना चालविणारे पॅरेमेडिक कर्मचारी आणि रिफॅम्पिसीन औषधाचे संशोधक यांना हे श्रेय जाते. ज्यांना अगदी एखादाच चट्टा आहे अशांनाही ‘एक डोस उपचार’ करण्यात येतो.
बहुधा तरुणपणात किंवा मध्यमवयातच या रोगाची चिन्हे दिसतात. ज्यांना कुष्ठरोगाविरुध्द चांगली प्रतिकारशक्ती असते त्यांना सहसा हा आजार होत नाही. हा आजार दोन स्वरुपात उमटतो. सांसर्गिक आणि असांसर्गिक.
असांसर्गिक कुष्ठरोगात तात्पुरते दोन तीन चट्टे किंवा एखादी नस सुजणे एवढेच घडते.
यातले चट्टे जाडसर किंवा सपाट, आखीव पण बधिर असतात.
चेता/नस सुजली असेल तर ती दुखते. पुढचा संबंधित भाग बधिर होतो किंवा स्नायूंची शक्ती कमी होते. काळजी घेतली नाही तर बधिरतेमुळे भाजणे, जखम होणे साहजिकच. या आजारात हे न भरून येणारे व्रण (जखमा) पावलाच्या तळव्यांना लवकर होतात.
काही वेळा हा कुष्ठरोग प्रकार जास्त पसरून बरेच चट्टे येतात किंवा एकाच वेळी अनेक नसांना सूज येते. या सर्व नसा दुखतात. त्या त्या नसांच्या जागी दाबून हा दुखरेपणा समजतो.
हा आजार फारसा संसर्गजन्य नसतो. कारण यातले जंतू श्वसनसंस्थेत फार नसतात, तर ते बहुधा नसांमध्ये असतात.
या योजनेचे काम प्राथमिक आरोग्य केंद्रे व शहरातले सरकारी दवाखाने यांच्यामार्फत चालते.
योजनेची उद्दिष्टे
1. जास्तीत जास्त कुष्ठरोगी शोधून उपचार करणे. यातून एकूण जंतुभार कमी करून संसर्गाचे प्रमाण कमी करणे.
2. समाजातील कुष्ठरोगाचे एकूण प्रमाण दहा हजारी 1 पेक्षा कमी करणे.
3. अंतिम उद्दिष्ट भारताला कुष्ठरोगमुक्त करणे.
या उद्देशाने कुष्ठरोग नियंत्रण योजना आता कुष्ठरोग निर्मूलन योजना झालेली आहे.
हे आपण कसे करणार आहोत !
मुख्य म्हणजे कुष्ठरोगाची लक्षणे लवकरात लवकर शोधून, त्यावर त्वरित उपचार करणे. यामुळे विकृती निर्माण व्हायच्या आतच रोग बरा होऊ शकेल. याबद्दल समाजाला, कुटुंबांना योग्य माहिती देणे हाच मार्ग आहे.
आता महाराष्ट्रात दर दहा हजारात सुमारे 3 कुष्ठरुग्ण आहेत. योग्य प्रयत्नांनी हे प्रमाण 2012 पर्यंत आपल्याला दहा हजारात केवळ अर्धा इतके कमी करायचे आहे. (म्हणजे 20000 लोकसंख्येस 1 कुष्ठरुग्ण). सध्या 34 पैकी 29 जिल्ह्यात हे प्रमाण एकपेक्षा कमी झालेले आहे.
यासाठी विशेष जिल्हे/भाग सोडल्यास कुष्ठरोगाची शोधमोहिम थांबवण्यात आली आहे. पूर्वी कुष्ठरोग सेवा केवळ कुष्ठरोग तंत्रज्ञ देत. आता कुष्ठरोग सेवा सर्वच आरोग्य सेवकांकडेच सोपवली आहे. या सेवा सर्व शासकीय आरोग्यकेंद्रांमध्ये आणि रुग्णालयांमध्ये मिळू लागल्या आहेत. लोकांनी स्वत:हून रोगनिदानासाठी पुढे यावे यासाठी आरोग्य शिक्षण हाच महत्त्वाचा कार्यक्रम आहे. सर्व प्राथमिक आरोग्यकेंद्रे, ग्रामीण रुग्णालये, जिल्हा रुग्णालये, पालिका दवाखाने/रुग्णालयांमध्ये रोगनिदान व उपचाराची सोय केली आहे.
आता रुग्ण निदानासाठी आला की केवळ शारीरिक तपासणी होते. पूर्वीप्रमाणे प्रत्येकाचा त्वचेचा नमुना तपासणीसाठी घेतला जात नाही. रोगनिदान केवळ चट्टा, बधिरता, अवयव आखडणे यावरून केली जाते.
रोगनिदानानंतर रुग्णास ओळखपत्र दिले जाते. बहुविध उपचार सुरु करून पाठपुरावा केला जातो. यानंतर ठरावीक काळाने पुनर्तपासणी केली जाते.
बहुविध उपचाराने रुग्ण लवकर बरे होतात. आता महाराष्ट्रात नागपूर विभाग सोडता सर्वत्र कुष्ठरुग्णांचे प्रमाण दर दहा हजारात एकपेक्षा कमी झाले आहे. नागपूर विभागात मात्र ते दीड इतके आहे.
कुष्ठरोग नियंत्रण योजना : आधुनिक बहुऔषधी उपचारपद्धती (तक्ता (Table) पहा)