औषधे कशी मिळतात
औषधे निरनिराळया स्वरूपांत मिळतात. काही औषधे फक्त तोंडाने तर काही फक्त इंजेक्शनरूपात घेता येतात. काही औषधे दोन्ही प्रकारात असतात.
- गोळया म्हणजे प्रक्रियेने एकत्र दाबलेली औषधाची पावडर.
- कॅपसूल म्हणजे लांबट आकाराच्या कागदी गोळीत भरलेली औषधी पावडर असते. ह्या ‘कागदी’ आवरणामुळे औषध पाचक रसांपासून बचावून सरळ जठरात किंवा आतडयात पोचते. तोपर्यंत वरचा कागदी भाग टिकतो.
- पातळ औषध म्हणजे द्रवपदार्थात मिसळलेले औषध असते. त्याची चव गोड, कडू किंवा कशीही असू शकते. पातळ औषध बहुधा लहान मुलांसाठी वापरतात.
- मलम म्हणजे कातडीवर लावण्यासाठी तेलकट पदार्थात मिसळलेले औषध. डोळयांत घालायची मलमे सौम्य असतात.
- थेंब किंवा ड्रॉप्स लहान बाळांना औषध पाजण्यासाठी वापरतात. तसेच काही थेंबाच्या बाटल्या नाक, कान, डोळा, इत्यादींमध्ये औषध घालण्यासाठी असतात.
- इंजेक्शन म्हणजे सुईवाटे शरीरात दिले जाणारे औषध असते. इंजेक्शन कातडीमध्ये, स्नायूमध्ये, नीलेमध्ये किंवा सांध्यात देता येते. मात्र प्रत्येकाचे प्रकार ठरलेले आहेत. सलाईन हे देखील इंजेक्शन आहे. इंजेक्शनच्या बाटलीवर ते कोठे द्यायचे हे लिहिलेले असते.
- हल्ली अनेक औषधे लवकर विरघळणा-या गोळयांच्या स्वरूपात मिळतात. मुलांसाठी या फार चांगल्या व स्वस्त पडतात. याची क्रिया पण लवकर सुरू होते. मात्र त्या गोळया पाण्यात विरघळवूनच घेतल्या पाहिजेत.
- दम्यासाठी औषधी फवारे मिळतात.
वेष्टनावरची माहिती
औषध तयार केल्याची तारीख, नंबर, कारखाना, मूळ औषधाचे नाव तसेच औषधाची मुदत संपणार ती तारीख वगैरे मजकूर औषधावरील वेष्टनावर असतो. हा मजकूर लोकांनी वाचण्यासाठी मराठी, हिंदी अशा स्थानिक भाषांमधून पाहिजे.