Disease Science Icon रोगशास्त्र खास तपासण्या
रोगप्रतिबंधक उपाययोजना

रोगप्रतिबंध हे एक अगदी महत्त्वाचे ध्येयधोरण आहे. रोगांना व त्यांच्या दुष्परिणामांना प्रतिबंध कसा करायचा हे या पुस्तकात प्रत्येक आजाराबरोबर देण्याचा प्रयत्न आहे. या प्रकरणात रोगांच्या अनेकपदरी कारणपरंपरेनुसार प्रतिबंधही कसा अनेक पातळयांवर करता येईल हे पाहू या. रोग व रोगांचे दुष्परिणाम यांचा प्रतिबंध मुख्यत: पाच पातळयांवर समजून घेऊ या.

1. आरोग्यमान उंचावणे

समाजाचे एकूण जीवनमान, पोषण इत्यादी सुधारल्यावर एकूण आजारांची संख्या व प्रमाण कमी होते. ही रोगप्रतिबंधाची अगदी प्राथमिक महत्त्वाची पायरी आहे.

2. रोगविशिष्ट संरक्षण

विशिष्ट आरोग्यसमस्येच्या प्रतिबंधासाठी विशिष्ट वैयक्तिक काळजी घेणे म्हणजे रोगविशिष्ट संरक्षण. उदा. निरनिराळया रोगांविरुध्दची लसटोचणी, डोक्याला मार लागू नये म्हणून वाहनचालकाने हेल्मेट वापरणे, रातांधळेपणा येऊ नये म्हणून मुलांना ‘अ’ जीवनसत्वाचा डोस देणे, इत्यादी. रोग झाल्यावर करायच्या उपाययोजनेपेक्षा असे रोगविशिष्ट आणि व्यक्तिविशिष्ट संरक्षण केव्हाही चांगले. अनेक आजारांसाठी हा मुद्दा लागू होतो.

3. लवकर निदान व लवकर उपचार

पूर्वी सांगितलेल्या दोन संरक्षणाच्या फळया रोग व्हायच्या आधी प्रतिबंधक म्हणून आवश्यक आहेत. पण काही कारणांनी रोग झालाच तर लवकर रोग शोधून त्यावर त्वरित उपचार करावा. उदा. क्षयरोग, कर्करोग इत्यादी गंभीर प्रारंभिक अवस्था शोधून लगेच उपचार केल्याने त्याचे दुष्परिणाम टळू शकतात.

अनेक आजारांच्या बाबतीत ही पायरी फार महत्त्वाची आहे. क्षय, कुष्ठरोग, कर्करोग, न्युमोनिया, मेंदूसूज, जठरदाह, इत्यादी अनेक आजारांच्या बाबतीत लवकर निदान आणि लवकर उपचार चालू होणे महत्त्वाचे आहे. या पुस्तकातले रोगनिदानाचे तक्ते वापरून तुम्हाला अनेक आजार लवकर ओळखता येतील. तापाचे उदाहरण घ्या. तापामागे अनेक प्रकारचे आजार असतात. त्यातले न्यूमोनिया, क्षय, मेंदूसूज, विषमज्वर, मुत्रमार्गाचा जंतुदोष, हत्तीरोग, इत्यादी आजार वेळीच ओळखणे आवश्यक असते. हे शक्य झाले तरच तुमचे काम उपयुक्त ठरेल.

4. दुष्परिणाम आणि नुकसान टाळणे

काही वेळा आजाराचा जो दुष्परिणाम व्हायचा असतो तो होऊन गेलेला असतो. फक्त त्याची तीव्रता व प्रमाण कमी करता येते. उदा. भाजलेल्या रुग्णांच्या बाबतीत जखमा भरताना अवयव आखडणार नाहीत याची काळजी घेता येते. नुकसान टाळण्याची अशी अनेक उदाहरणे आहेत.

5. पुनर्वसन

काही वेळा रोग किंवा त्याचे दुष्परिणाम पूर्ण स्थिर झालेले असतात. अशा वेळी त्या व्यक्तीचे शक्य तेवढे पुनर्वसन करणे आवश्यक असते. म्हणजे ती व्यक्ती त्या आजाराच्या सामाजिक दुष्परिणामांपासून काही प्रमाणात तरी वाचू शकते. उदा. कुष्ठरोगपीडित व्यक्तींचे पुनर्वसन, पोलिओ झालेल्या अवयवांना कृत्रिम साधने देणे, इत्यादी. मनोरुग्णांसाठी योग्य प्रशिक्षण व कामधंदा, इ.

रोगप्रतिबंध असा विविध पातळयांवर असतो. आपल्या मनोवृत्तीतच रोगप्रतिबंध बाणवायला पाहिजे.

जंतुनाशन

निरनिराळया पदार्थांच्या आणि वस्तूंच्या जंतुनाशनाच्या अनेक पध्दती आहेत.

  • Disinfectant उष्णता देणे: वस्तू उकळणे, वाफारणे, उन्हात ठेवणे, जाळणे, इत्यादी अनेक पध्दती आहेत. पाणी, हत्यारे 10 ते 15 मिनिटे उकळणे, कपडे कडक उन्हात वाळवणे (अंशतः जंतुनाशन), कपडे प्रेशर कुकर किंवा स्टरिलायझरमध्ये दाबाखाली वाफारून घेणे (पूर्ण जंतुनाशन), रोग्याची विष्ठा, थुंकी जाळणे, इत्यादी उपाय आपल्याला माहीत असतील. काही वस्तू सोलर कुकरमध्ये निर्जंतुक करता येतील. (उदा. मासिक पाळीच्या घडया, जखमेची बँडेजपट्टी इ.)
  • वस्तूंचे रासायनिक जंतुनाशन: डेटॉल, फिनॉल, आयोडिन, चुनकळी, तीव्र आम्ले, इत्यादी रसायने जंतुनाशनासाठी वापरली जातात. ही रसायने अर्थातच शरीराच्या आत वापरता येणार नाहीत. कारण ती जंतूंप्रमाणेच शरीराच्या पेशींनाही मारक असतात. यांपैकी स्पिरिट, आयोडिन व सौम्य डेटॉल ही जखमांच्या स्वच्छतेसाठी वापरली जातात. तसेच ती शस्त्रक्रियेआधी त्वचा निर्जंतुक करण्यासाठी वापरली जातात. निर्जीव वस्तूंसाठी फिनॉल, आम्ले (उदा. सल्फ्युरिक ऍसिड-गंधकाम्ल), चुनकळी, इत्यादी वापरली जातात. क्लोरिन वायू किंवा ब्लिचिंग पावडर पाण्यातले जंतू मारण्यासाठी वापरले जातात.
  • गॅमा किरण: अनेक अन्नपदार्थ व वैद्यकीय साधने गॅमा किरण वापरून निर्जंतुक केली जातात. पॅकबंद वैद्यकीय साधने (उदा. जखमेसाठी पट्टया, नाळ बांधायचा दोरा, हातमोजे, सलाईनच्या नळया व इंजेक्शनच्या सिरींजेस व सुया, इ.) या पध्दतीने मोठया प्रमाणावर निर्जंतुक केली जातात. अर्थात एकदा वेष्टण फोडून वापरली की त्यांची निर्जंतुकता संपते. प्राथमिक आरोग्यचळवळीसाठी अशी निर्जंतुक साधने पुरवणे शक्य आहे.

 

डॉ. शाम अष्टेकर २१, चेरी हिल सोसायटी, पाईपलाईन रोड, आनंदवल्ली, गंगापूर रोड, नाशिक ४२२ ०१३. महाराष्ट्र, भारत

message-icon shyamashtekar@yahoo.com     ashtekar.shyam@gmail.com     bharatswasthya@gmail.com

© 2017 arogyavidya.net | All Rights Reserved.