वंध्यत्वावर उपचार करताना त्या जोडप्याची खूप मानसिक पूर्वतयारी लागते. पतिपत्नींनी एकमेकांवर दोषारोप न करता आधी कारण समजावून घेणे आवश्यक असते. यासाठी दोघांनी एकत्रच तपासणीला जाणे आवश्यक असते.
आधी पुरुषाच्या तपासणीत सक्षम शुक्रपेशी आहेत की नाही, ते पाहतात. ही तपासणी खूप सोपी आहे. हस्तमैथुनाने पुरुषाच्या वीर्याचा ताजा नमुना घेऊन सूक्ष्मदर्शकाखाली तपासला जातो. या शुक्रपेशींची संख्या आणि हालचाल पाहून वीर्य पुरेसे जननक्षम आहे की नाही हे कळते. यातच दोष असेल तर वंध्यत्वाचे निदान सोपे होते.
पुरुषांच्या तपासणीनंतर स्त्रियांच्या तपासणीत गर्भाशयाची तपासणी, गर्भनलिका मोकळी आहे की नाही, बीज तयार होते की नाही, इत्यादी तपासणी केली जाते. सोनोग्राफी आणि गर्भनलिकांची क्ष किरण तपासणी करतात.
वंध्यत्व तपासणीचे तंत्रज्ञान आता पुष्कळ प्रगत झाले आहे. यात शुक्रपेशी तपासणी, शरीरातील संप्रेरकांची पातळी तपासणी, गर्भाशयाची लॅपरॉस्कोपिक तपासणी, सोनोग्राफी, गर्भनलिका तपासणी इ. तंत्रे वापरली जातात. उपचाराच्या वेळेस यातल्या काही तपासण्या परत परत कराव्या लागतात.
शुक्रपेशी किंवा स्त्रीबीज नसेल तर गर्भधारणा होणे शक्य नसते. पण इतर कारणांवर उपचार होण्यासारखा असेल तर वंध्यत्वावर मात करता येते; यासाठी तज्ज्ञांची मदत लागते. अंधश्रध्दा न बाळगता सत्य परिस्थिती जाणून मार्ग काढणे आवश्यक असते. हे त्या जोडप्यास समजावून सांगणे आवश्यक आहे.