काही आजार एकेकटे येतात, तर काही साथींच्या स्वरूपात. साथ म्हणजे एकावेळी अनेकांना आजार.
ताप, थंडीताप, सर्दी, खोकला, हगवण, पोलिओ वगैरे आजारांची आपल्याला माहिती आहे. या सर्व आजारांचे कारण रोगजंतू असतात. काही आजारांचे रोगजंतू एकमेकांकडे सहज पसरतात. असे काही आजार साथीच्या स्वरूपात येऊ शकतात. देवी, प्लेग, पटकी वगैरे आजारांच्या साथीबद्दल आपण ऐकलेले असते. आता देवीचा आजार संपला. प्लेगचा आजार कधी कधी येऊ शकतो. पटकीची साथ आता पूर्वीसारखी येत नाही. मात्र काही आजार अजून साथीने येऊ शकतात. डेंग्यू, चिकनगुण्या, मलेरिया, कावीळ, विषमज्वर (टायफॉईड), हगवण-जुलाब, फ्ल्यू ताप, गोवर, गालगुंड, मेंदुज्वर, लेप्टो, डोळे येणे, घसासूज, कांजिण्या हे आजार साथीने येऊ शकतात. या आजारांची थोडक्यात माहिती सोबतच्या तक्त्यात दिली आहे.
काही आजार रोगजंतूंमुळे येतात, पण ते सहसा साथीने येत नाहीत. कुष्ठरोग, टी.बी., हत्तीरोग, एड्स वगैरे आजार दीर्घ मुदतीचे म्हणजे महिनोन्महिने चालणारे असतात. या आजारांची सहसा साथ नसते, पण त्यांचे समाजात प्रमाण जास्त असेल तर आपण त्याला ‘प्रादुर्भाव’ म्हणतो.
काही आजार एकेकटया माणसांना होतात. कॅन्सर, हृदयविकार, मधुमेह वगैरे आजारांची साथ येत नाही. ‘साथ’ हा शब्द सांसर्गिक आजारांसाठीच आहे. हे आजार एकमेकाला लागत नाहीत, पण या आजारांचे समाजातले प्रमाण वाढू शकते. या आजारांची ‘लाट’ येऊ शकते, म्हणजे प्रमाण अचानक वाढू शकते. याचा अभ्यास व्हायला पाहिजे.
समाजात ताप, जुलाब, हगवण हे आजार अधूनमधून होतातच. गावात-वस्तीत 500-1000 लोकसंख्या असते. गावात कोणा ना कोणाला ह्यांपैकी आजार रोजच चालू असतीलच. मग साथ कशाला म्हणायचे. याचा विचार दोन गटांत करू या.
(अ) नेहमीचा आजार गट – साथ म्हणजे त्या आजाराचे प्रमाण ‘नेहमीपेक्षा’ जास्त असणे. उदा. हजार वस्तीच्या गावात रोज 1-2 तापाचे रुग्ण असणे साहजिक आहे. मात्र या ‘नेहमीपेक्षा’ आजार तिप्पट असेल तर आपण साथ आहे अशी शंका घेऊ शकतो.
(आ) आगंतुक गट – काही आजार नेहमी आढळत नाहीत. उदा. डेंग्यूचा आजार कधीतरीच येईल. असा आजार जेव्हा केव्हा येईल तेव्हा तो साथ सुरू करणार असे धरावे. डेंग्यू, मेंदुज्वर, चिकनगुण्या, रक्ती हगवण, कावीळ वगैरे आजार या गटात मोडतात.
‘साथ’ आलेली आहे किंवा येणार हे लवकर ओळखणे हे महत्त्वाचे आहे. हे आपल्याला घरी बसून कळणार नाही. यासाठी आपली रुग्णसेवा नियमित पाहिजे. तरच आजार कमी, का नेहमीइतके, का जास्त हे कळू शकेल. यासाठी आपल्याकडे येणा-या रुग्णांच्या नोंदी चांगल्या पाहिजेत.
काही आजार मोसमाप्रमाणे कमी जास्त होतात. उदा. छातीचे आजार थंडी वा-यात जास्त आढळतात. आपल्याला हा वर्षातला चढउतार हळूहळू माहीत होईलच.
गावात कोणतीही साथ आली आहे असे वाटले तर आपण खालीलप्रमाणे कृती करायची आहे.