(16.02.1958)
बी.जे मेडिकल कॉलेजमधून एम.बी.बी.एस. आणि नंतर बालरोग शाखेत डिप्लोमा.
1988 पासून दिंडोरी येथे ग्रामीण रुग्णालय चालवित आहे.
या पुस्तकातील आजारांसंबंधीची माहिती, फ्लोचार्ट, औषधे इ. बद्दल महत्त्वाचे योगदान.
दूरध्वनी – 02557 – 221143/48
भ्रमणध्वनी – 9422943898
ई-मेल – ratnaashtekar@yahoo.in
(29.03.1954)
शिक्षण
एम्.बी.बी.एस. 1977
बी.जे मेडिकल कॉलेज, पुणे.
एम.डी. (सामाजिक व रोगप्रतिबंधक वैद्यकशास्त्र) 1986
बी.जे. मेडिकल कॉलेज, पुणे.
संपर्क
21, चेरी हिल सोसायटी, पाईपलाईन रोड,
आनंदवल्ली, गंगापूर रोड, नासिक – 422 013
फोन – 0253 2342447
भ्रमणध्वनी – 9422271544
ई-मेल – shyamashtekar@yahoo.com
कार्यालयीन पत्ता
यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठ
‘ज्ञानगंगोत्री’ गंगापूर धरणाजवळ, नाशिक 422 222
दूरध्वनी – (0253) 2230718
1979-80 या काळात श्री. शदर जोशींबरोबर चाकणच्या भामनहर खो-या त फिरताना वैद्यकीय सेवेची परवड पाहून गावागावात किमान आरोग्यरक्षकाची तरी सोय अनिवार्य आहे असे मला पहिल्यांदा प्रखरपणे जाणवले. त्या काळी इतर अनेक ठिकाणक्ष आरोग्यरक्षक प्रकल्प चालू होते याची मला व्यक्तिश: फारशी जाणीव नव्हती. प्राथमिक आरोग्य केंद्राचा डॉक्टर म्हणून काम करताना भामनहर खो-या त आम्ही ही ‘अनवाणी डॉक्टर’ची कल्पना प्रत्यक्षात उतरवण्याचा प्रयत्न केला. आज मागे वळून पाहताना त्या कामातले अपुरेपण जाणवते. पण त्यातला अनुभव मोलाचा होता. एकदा भामनहर खो-या तले गडद गावचे श्री. गबाजी शिंदे हे आरोग्यरक्षक भर पावसाळयात, केवळ मलेरियाच्या गोळया संपल्या म्हणून पस्तीस किलोमीटर चालून भल्या पहाटे चाकणला आले आणि गोळया घेऊन तसेच चालत परत गेले. हा अनुभव मला आजही विदारक वाटतो. वर्षा-दीडवर्षापूर्वी इगतपुरी तालुक्यातल्या एका पाडयावर मी असेच काही भयानक पाहिले. काही कारणाने डोळे गेलेल्या एका ओल्या बाळंतिणीच्या मांडीवर डोळे येऊन नुकतेच आंधळे झालेले बाळ होते. या टोकाच्या गोष्टी अपवाद म्हणून सोडल्या तरी गावागावात आज विसंबून राहावी अशी कसलीच व्यवस्था नाही हे नजरेआड करता येणार नाही.
खरे तर राज्यघटनेनेही आरोग्यसेवा हा जनतेचा मूलभूत अधिकार आहे असे मानलेले नाही, पण तसे मानले असते तरी विशेष उपयोग झाला असता असे आज वाटत नाही. ‘कल्याणकारी’ धोरणाच्या मोघम पायावर, नियोजन व्यवस्थेच्या चौकटीत, वरून जेवढे द्यायचे ठरलेले असते तेही पुरेपूर पदरात टाकले जात नाही. अमूक इतकी किमान वैद्यकसेवा दिलीच पाहिजे अशी जनतेने सांगण्याची आणि कोणी ते ऐकून घेण्याची शक्यता आज तरी दिसत नाही. लोकांना केवळ लोकसंख्या समजून त्यांचे नियंत्रण करणे, समुचित आरोग्य-वैद्यकसोयींच्या नावाखाली कम अस्सल प्रतिबंधक सेवा देणे आणि ‘उपचारांपेक्षा प्रतिबंध बरा’ अशी घोषणा देऊन ‘उपचारांऐवजी जुजबी प्रतिबंधक उपाय करणे’ ही आजच्या शासकीय ग्रामीण आरोग्यसेवेची प्रमुख वैशिष्टये आहेत. साहजिकच उपलब्ध असलेल्या बहुश: शोषक, बाजारू आणि निरंकुश खाजगी वैद्यकव्यवसायावरच ग्रामीण जनतेला अवलंबून राहावे लागते.
ग्रामीण वैद्यक व्यवस्थेच्या या उपेक्षेची कारणे मला श्री. शरद जोशींच्या ‘भारत-इंडिया’ विरोधव्यवस्थेत दिसतात. एकीकडे इंडियात असलेल्याच काय पण नसलेल्या आजारांसाठीही कडेकोट तपासणी-उपचार करणारी हॉस्पिटल्स, अवयवागणिक डॉक्टर्स, क्रीडावैद्यक, हेल्थ-क्लब, आजारी पडणाऱ्यांसाठी औषधपाण्याचा खर्च, आजारपणाची रजा, या रजेचे वेतन, अल्प दरातल्या रुग्णवाहिका असे कोडकौतुक आहे, तर इकडे मेरा भारत महानमध्ये माणसाला थंडीतापाचा आजार असो किंवा बैलाने तुडविलेले असो; त्याला फाटयावर आणून दयेच्या वाहनाची वाट बघत बसण्याखेरीज अजूनही गत्यंतर नाही. इथे गावात सरकारी नर्स असलीच तर तिच्याकडे मिळेल काय तर कुटुंबनियोजनाच्या गोळया, निरोध, लसी आणि तापाची एखादी गोळी. यापुढे गेल्यावर असतात सदैव औषधे संपलेली ‘नाईलाज’ प्राथमिक आरोग्य कें्रदे (का कुटुंब नियोजन केंद्रे?), डॉक्टर आणि साधने नसलेली ग्रामीण रुग्णालय नामक बांधकामे. बरे, सरकारी दवाखान्यात जायचे नसेल तर मग आहेत बहुतांशी कुडमुडया डॉक्टरांचे बाजार दवाखाने, त्यांच्या कळकट सुया-इंजेक्शने, साडेतीन काळया-पिवळया गोळयांची पुडी, रोजगाराच्या दसपटीतली औषधांची बिले आणि अगदीच अडल्या नडल्या बाळंतिणीला गरीब बापडया सुईणी. शहरांमधली वैद्यक व्यवस्थाही काही अगदी आदर्श आहे असे नाही पण निदान पैसे मोजून का होईना तिथे डॉक्टर भेटू शकतो, कशी का असेना तिथे काहीतरी व्यवस्था आहे, निदान अशी वणवण तरी नाही.
ही समस्या मुख्यत: आर्थिक-राजकीय-सामाजिक स्वरुपाची आहे याचे भान राखून काय काम करता येईल याचा स्वत:पुरता शोध घेण्याचा माझा प्रयत्न आहे. पुण्याजवळ चाकणच्या प्राथमिक आरोग्य केंद्रावर डॉक्टर म्हणून काम करताना आरोग्यरक्षक व्यवस्था मुळापासून पाहता आली. त्यानंतर पुण्याच्या एका प्रसिध्द रुग्णालयाने चालविलेल्या आरोग्यरक्षक प्रकल्पात राहून स्वयंसेवी संस्थांचे मुखवटे आणि खरे चेहरे याचा दाहक असा प्रत्यक्ष अनुभव घेतला. नंतरच्या काळात इतर अनेक चांगल्या संस्थांनी आणि मित्रांनी चालविलेले प्रयत्न पाहिले आणि या सर्व अनुभवांचा स्वत:शी काही अर्थ लावण्याचा प्रयत्न केला. गावपातळीवर काही किमान वैद्यकव्यवस्था उभारण्याच्या या कामातले सार्वत्रिक आणि ब-या च संस्थांचे स्थानिक यशापयश अभ्यासल्यानंतर मी काही प्रमुख निष्कर्ष काढले आहेत.
गावपातळीवर अशी वैद्यकव्यवस्था मूळ न धरण्याचे पहिले कारण या योजनेच्या सामाजिक, आर्थिक, राजकीय व्यवस्थापनाचा अभाव हे आहे. सामाजिक-राजकीय पाठिंबा मिळाला तो अगदी सावध, फसवा आणि काडीमात्र आहे. गावागावात आरोग्यरक्षक योजनेची ना लाट होती ना हवा. जिल्हा परिषदा आणि पंचायत समित्या या संस्था म्हणाल तर लोकांच्या आहेत आणि म्हणाल तर नाहीत. खरे सांगायचे तिथे लोकांचा ना सहभाग असो ना निर्णय. ख-या पंचायत ग्रामस्वराज्याच्या स्वतंत्र व्यवस्थेतच अशा कामांचे सामूहिक-सामाजिक-राजकीय व्यवस्थापन, आणि ती करण्यासाठी इच्छाशक्ती निर्माण होऊ शकते याबद्दल मला तरी संदेह नाही. तसेच ग्रामीण अर्थव्यवस्थेची जेवढी शक्ती, तेवढाच आर्थिक आधार किंवा मोबदला आरोग्य कार्यकर्त्यांना मिळू शकेल; त्यापेक्षा जास्त मिळण्याची शक्यता नाही. गावोगावी भयाण दुष्काळ पडला तरीही जिच्या केसालाही धक्का लागत नाही अशा नोकरशाहीमार्फत ही योजना राबविणे अशक्य तर आहेच पण अयोग्यही आहे. वैद्यकसेवा देणारा आणि घेणारा हे दोघेही एकाच सतरंजीवर बसणारे असतील तरच अशी वैद्यक व्यवस्था शोषक होणार नाही.
माझा यापुढचा मुद्दा आहे तो गावपातळीवरच्या वैद्यक व्यवस्थेसाठी लागणा-या वैद्यकीय ज्ञान-विज्ञानाचा-तंत्राचा आणि साधनसामुग्रीसंबंधीचा. निदान या आघाडीवर तरी काही प्रयत्न करावा या उद्देशाने या पुस्तकाची निर्मिती आहे. वैद्यकशास्त्र हे एक उपयोजित शास्त्र आहे आणि समाजाच्या गरजांनुरुप, उपलब्ध साधनांप्रमाणे, योग्य दिशेने त्याचा वापर करणे आवश्यक आहे. हे एकदा मान्य केल्यावर गावांसाठी करायच्या वैद्यक व्यवस्थेसाठी स्वतंत्र मूस आवश्यक आहे हे ओघानेच आले. जुन्या-नव्या वैद्यकज्ञानाचा, विज्ञानाचा अर्थपूर्ण वापर केल्याशिवाय हे शक्य नाही.
भारतवैद्यक म्हणजे केवळ आयुर्वेद किंवा झाडपाल्याचे उपचार नाहीत, केवळ खेडयांसाठी स्वस्त आणि कामचलाऊ पर्यायही नाही आणि खरे तर निव्वळ शास्त्रही नाही. उपलब्ध वैद्यकशास्त्रांमधून आणि साधनांमधून गरजांनुरुप तयार झालेले वैद्यकज्ञानविज्ञान आणि वैद्यक व्यवहार म्हणजे भारतवैद्यक. अशा पध्दतीने गावोगावी काम करणारे कार्यकर्ते म्हणजे भारतवैद्य. मात्र अशी काही लोकाभिमुख चळवळ झाली तरच या शब्दांना अर्थ प्राप्त होतो याची मला जाणीव आहे. तसेच हा प्रयत्न पहिलाही नाही आणि शेवटचाही नाही, पण तो अशा कामांमधला एक पक्का दुवा ठरावा अशी आशा आहे. खेडोपाडी आरोग्यवैद्यक सेवा उभारण्याच्या कामात प्रत्यक्ष अप्रत्यक्ष मदत करणा-या लोकचळवळी, संस्था, कार्यकर्ते, शासनाचे आरोग्यसेवक-सेविका, परंपरागत उपचार करणारी मंडळी यासर्वांना हा अल्प शास्त्राधार उपयुक्त ठरला तर या श्रमांचे सार्थक झाले असे मी म्हणेन.