‘बायोकेमिस्ट्री’ या नावाचे औषध देण्याचे शास्त्र शूस्लर नावाच्या जर्मन डॉक्टरने सुरू केले. येथे औषध शोधण्याची पध्दती बरीच होमिओपथीसारखी आहे, पण औषधे मात्र बाराच आहेत. ही बाराही औषधे म्हणजे पोटॅशियम, सोडियम, कॅल्शियम, आयर्न, मॅग्नेशियम,फॉस्फोरस, सल्फर, क्लोरीन, फ्लोरीन यांचे बरोबरचे क्षार आहेत. सिलिका हाही पदार्थ या शास्त्रात वापरला जातो. मराठीमध्ये या शास्त्राला ‘बाराक्षार चिकित्सा’ या नावाने ओळखले जाते. याच औषधांची नावे कल्केरिया फ्लूअर, कल्केरिया फॉस, कल्केरिया सल्फ, फेरम फॉस, काली मूर, काली फॉस, काली सल्फ, मॅग्नेशिया फॉस, नेट्रम मूर, नेट्रम फॉस, नेट्रम सल्फ, सिलिका अशी आहेत.
होमिओपथीच्या चिकित्सेतील क्लिष्टपणा कमी करून एखादी सोपी चिकित्सा पध्दती शोधण्याच्या मागे असताना शूस्लरने या पध्दतीचा शोध लावला व अवलंब केला. त्याने असे पाहिले, की रक्तामांसात अतिसूक्ष्म प्रमाणात वरील क्षार असतात आणि त्यांच्या कमी होण्यानेच शारीरिक व्याधी उद्भवतात. त्याच्या मते सर्व रोगांचे निर्मूलन बाराच क्षारांच्या उपयोगाने करणे शक्य आहे. मग तो रोग जंतूंमुळे उद्भवला असो, की अन्य कारणाने.
बाराक्षारांचे लक्षणगट सोबतच्या लक्षणसारणीमध्ये आहेत. शिवाय सोबतचा तक्ताही व्याधींच्या विविध प्रकारांमध्ये या क्षारांचा उपयोग दर्शवितो. सामान्यत: बायोकेमिकच्या औषधाच्या दोन गोळया दिवसातून तीन वेळा रोग्यास दिल्या जातात. त्यांची शक्ती 6* किंवा 12* असावी. जुनाट व्याधीमध्ये (सूक्ष्मता) 30* किंवा 200* शक्तीचे औषध दोन वेळा रोज घेतले जाते. औषध घेतल्यापासून आठ -दहा दिवसांत गुण दिसायला हवा. तसे न झाल्यास औषध बदलणे आवश्यक आहे की काय याचा विचार करावा. ही औषधे एक-दोन औंसाच्या बाटलीतून मिळतात. ही औषधे स्वस्त असून वाईट परिणाम नसणारी आहेत आणि म्हणून वापरण्यास सुरक्षित आहेत.
बाराक्षार चिकित्सासारणी (तक्ता (Table) पहा)