Health Sciences Icon घर आणि परिसर स्वच्छता आरोग्य विज्ञाान
घर आणि परिसर स्वच्छता
पुरेशी योग्य जागा आणि बांधकाम

घराची व परिसराची स्वच्छता हे आरोग्याचे महत्त्वाचे अंग आहे. यांतले बरेचसे प्रश्न हे निकृष्ट राहणीमान म्हणजेच गरिबी असल्याने निर्माण होत असतात. काही थोडे प्रश्न माहितीमुळे सूटू शकतात. या सर्व प्रश्नांचा आता आपण विचार करु या. घर व परिसराच्या स्वच्छतेत खालील बाबी प्रमुख आहेत.

1 पुरेशी योग्य जागा
2 रचना व बांधकाम
3 आंघोळीसाठी आडोसा / स्नानगृह
4 मलमूत्र विसर्जनासाठी संडास
5 घन कचरा व्यवस्थापनासाठी कंपोस्ट
6 सांडपाण्यासाठी परसबाग किंवा शोषखड्डा
7 निर्धूर चूल
8 जनावरांसाठी वेगळा गोठा
9 घराजवळ झाडे
10 स्वच्छ पाणी पुरवठा

घराजवळ झाडे

plants near home घराजवळ सावलीसाठी आणि प्राणवायूसाठी झाडे असणे चांगले. झाडांमुळे आजूबाजूची हवा थंड राहते.

गोठा व जनावरे

ग्रामीण भागात विशेषतः डोंगराळ भागात घरामध्येच गुरे बांधण्याची पध्दत सर्रास दिसून येते. गुरांची काळजी व खर्चाची काटकसर यामुळे गोठे घरात ठेवण्याची पध्दत असावी.

गुरांमुळे पिसवा, गोचिडी यांचा त्रास तर होतोच; पण काही आजारही गुरांमुळे घरात शिरतात. मुख्यत: श्वसनसंस्थेचे जंतुदोष आणि त्त्वचारोग यांचा त्रास गोठयांमुळे घरात येतो.

ज्यांना शक्य असेल त्यांनी घरापासून जनावरांचा गोठा निदान 10-20 फूट लांब ठेवला पाहिजे. वा-याची दिशा पाहून गोठा ठेवल्यास जास्त चांगले. ज्यांना वेगळा गोठा ठेवणे शक्य नाही त्यांनी गोठा आणि घर यामध्ये सलग भिंत ठेवावी. यात मध्ये दार ठेवू नये.

जनावरांचे मलमूत्र ही एक मोठी समस्या असते. हाताने शेण गोळा करणे आणि त्याचा वापर करणे हे व्यक्तिगत आरोग्याला अपायकारक असते. परंतु भारतीय समाजात परंपरेने शेणाच्या वापराला महत्त्व आहे. शेणाचा खतासाठी किंवा गोबरगॅससाठी परस्पर (न हाताळता) वापर करता आला तर जास्त चांगले. गोव-यांसाठी वापर करताना काही यंत्रांचा वापर केला किंवा रबरी हातमोजे वापरले तर जास्त चांगले.

आंघोळीसाठी स्नानगृह

आंघोळीसाठी आडोसा असणे आवश्यक आहे. आडोसा नसल्यास कपडे ठेवूनच आंघोळ करावी लागते. त्यामुळे खरुज, गजकर्ण इ. आजार होण्याची शक्यता असते. साधा पत्र्याचा किंवा तट्टयाचा आडोसा चालतो. आंघोळीचे पाणी जमिनीत मुरण्यासाठी शोषखड्डा किंवा परसबाग असावी.

निर्धूर चूल

Mortise लहान खिडक्या, धूर यामुळे कोंदटलेल्या घरांची आपल्याला सवय झालेली असते. मुख्यतः स्त्रियांना रोज प्रदूषणाला नाहक तोंड द्यावे लागते. जेथे आता रॉकेलचा किंवा गॅसचा वापर होतो तेथे धूराचा त्रास अर्थातच नसतो. पण लाकूडफाटा वापरला तरी धूर होणार नाही अशा बिनधुराच्या चुली उपलब्ध आहेत त्यांत कमी इंधनातून जास्त उष्णता मिळते. धुरामुळे घरात कीटकांचे प्रमाण कमी राहते असे काही जणांचे मत आहे. तरी निर्धूर चुली आवश्यक आहेत. मधून मधून कीटकांसाठी धूर करणे काही अवघड नाही.

गेल्या काही वर्षांपासून इंधनाची टंचाई ही एक गंभीर समस्या बनली आहे. देशात फार मोठया प्रमाणावर झाडतोड झाली आहे. चुलीत जाळण्याकरिता लागणारे सरपण गोळा करण्यासाठी स्त्रियांना मैलोन् मैल पायपीट करावी लागते. अशाच वेगाने झाडतोड चालू राहिली आणि झाडांची लागवड केली गेली नाही तर येत्या 15-20 वर्षांत अन्न शिजवायला इंधनच मिळणार नाही अशी परिस्थिती निर्माण होईल.

जंगलतोडीमुळे निसर्गाचा समतोल ढासळतो आहे. उशिरा व अवेळी येणा-या पावसामुळे कधी दुष्काळ तर कधी अतिवृष्टी होत आहे. जमिनीची धूप होऊन पडिक जमिनी आणि कोरडा वैराण भूभाग वाढतो आहे. जंगलतोडीला सरकार व चोरटे हे ही जबाबदार आहेत. निसर्गावर अवलंबून असलेले मानवी जीवनही त्यामुळे असंतुलित होत आहे. संतुलन ढळू नये म्हणून भविष्यकाळासाठी नवीन झाडे लावण्याचा उपक्रम सरकार करत आहे. परंतु आपल्या देशात लाकूड फाटयाचा वापर इतक्या मोठया प्रमाणावर होतो आहे की, लाकूड फाटयाची मागणी आणि पुरवठा यांची सांगड घालणे कठीण आहे.

ग्रामीण भागात घरगुती कारणासाठी लागणा-या एकूण उर्जेपैकी 80% ऊर्जा स्वयंपाकासाठी वापरली जाते. खेडयातील लोक वर्षानुवर्षे चुली वापरत आहेत परंतु ह्या चुलींची कार्यक्षमता कमीच आहे. पारंपरिक चुलींच्या क्षमतेत 1% जरी वाढ झाली तरी प्रतिवर्षी लाखो टन लाकूड वाचेल. जळणाच्या टंचाईमुळे चुलीमध्ये सुधारणा करुन चुलींची कार्यक्षमता वाढवण्याचे व इंधनात बचत करण्याचे प्रयत्न संशोधकांनी सुरु केले आहेत.

महिलांना सरपण गोळा करण्यासाठी वणवण करावी लागते. चुलींच्या धुरामुळे त्यांच्या आरोग्यावर घातक परिणाम होतो. शिवाय लाकूडफाटयासाठी होणा-या झाडतोडीमुळे पर्यावरणावर दुष्परिणाम होतात. या सर्व समस्यांचे मूळ चुलीशी निगडित असल्याने चुलीत सुधारणा होणे ही काळाची गरज आहे.

भारत सरकारने 1983-84 साली सुधारित चुलीचा कार्यक्रम प्रात्यक्षिक स्वरुपात सुरु केला. पुढे 1987 पासून यातील प्रात्यक्षिक शब्द काढून ‘सुधारित चुलीचा कार्यक्रम’ म्हणून हा कार्यक्रम राबविण्यात येत आहे. इथे वर्धा येथील लक्ष्मी चुलींची माहिती दिली आहे. अशाच चुली कोकणात गोपुरी आश्रमानेही तयार केल्या आहेत.

लक्ष्मी सिमेंट चूल

लक्ष्मी मातीच्या चुलीप्रमाणेच लक्ष्मी सिमेंटची चूल आहे. यामध्ये दोन प्रकार आहेत. पहिल्या प्रकारामध्ये चुलींची सध्या उपलब्ध असलेल्या साच्यातून तयार केलेली लक्ष्मी सिमेंट चूल येते. दुस-या प्रकारामध्ये चुलीची लांबी, रुंदी थोडी कमी करून चुलीचे आकारमान आणि वजन कमी केले आहे. मात्र आतील मोजमापांमध्ये बदल केलेला नाही. यामुळे चुलीसाठी लागणारे सिमेंट मिश्रण कमी होऊन चुलींचे एकूण वजन व चुलींची किंमतही कमी होते. चुलींची कार्यक्षमता लक्ष्मी मातीच्या चुलींइतकीच म्हणजे 24 ते 26 % आहे.

लक्ष्मी सिमेंट चुलींचे फायदे

1. जळण आणण्यासाठी लागणारा वेळ व पैसा यात बचत हाते.

2. जळण गोळा करण्यासाठी करावी लागणारी पायपीट कमी करावी लागते.

3. चुलीवर व वैलावरही अन्न शिजत असल्यामुळे झटपट स्वयंपाक होऊन वेळेची बचत होते.

4. चूल चांगली पेटल्याने धूराचे प्रमाण कमी होते. धुराडयावाटे धूर बाहेर टाकला गेल्यामुळे धुराने डोळयांना व छातीला होणारा त्रास कमी होतो. त्यामुळे आरोग्य चांगले राहते.

5. भांडी कमी काळी होतात.

6. चूल उत्तम पेटत असल्यामुळे फुंकण्याचे श्रम वाचतात.

7. लाकूडफाटयाव्यतिरिक्त लाकडाच्या छोटया ढलप्या, गोव-या, बुरकुंडे, काटयाकुटया अशा सर्व प्रकारचे जळण ह्या चुलीत उत्तम पेटते.

8. अचूक एकसारख्या मापाच्या चुली भराभर काढण्यासाठी लोखंडी साचा असल्यामुळे गावच्या कुंभारांना तसेच महिलांनाही घरबसल्या उद्योगधंदा सुरु करण्याची नवी संधी आहे.

9. ही चूल जवळजवळ पारंपरिक वैलाच्या चुलीसारखीच दिसत असल्यामुळे महाराष्ट्रातील स्त्रियांच्या पसंतीस उतरते. चूल सुटसुटीत, सुबक आकाराची व कमी जागेत सुध्दा मावणारी आहे.

लक्ष्मी सिमेंट चूलसाहित्य प्रमाण

अ.क्र. साहित्य मोठी चूल लहान चूल
1. सिमेंट 10 किलो 7 किलो

2. दगडाची बारीक

कच बारीक गिट्टी 33 किलो 22 किलो

3. दगडाची भुकटी

(पावडर) 24 किलो 16 किलो

4. पाणी आवशकतेनुसार आवशकतेनुसार

मलमूत्र विसर्जनासाठी संडास

शहरातील घरांमध्ये आता संडास अनिवार्य आहे. त्याशिवाय घराचा आराखडा मंजूरच होत नाही. असेच आता खेडयांमध्येही झाले पाहिजे. संपूर्ण स्वच्छता अभियानामध्ये अनेक गावांमध्ये घरगुती संडास झाले आहेत.

शहरात सर्व घरांना सेप्टिक टँक अनिवार्य आहेत. त्यात मैलापाणी साठून काही प्रमाणात निर्जंतुक होते व त्यानंतर त्याची विल्हेवाट होते. ज्या शहरात मैलापाणी योजना आहे तिथे सेप्टिक टँक त्याला जोडलेले असतात. या बंद भुयारी गटारातून मैलापाणी (काळसर रंगाचे) वाहून जाते. शहराबाहेर ते प्रक्रिया केंद्रावर आणून निरुपद्रवी केले जाते. यानंतर त्यातला घनभाग वेगळा काढून वाळवला जातो. द्रवभाग शेतीसाठी वापरला जातो. मात्र या द्रवरुप भागात काही प्रमाणात जंतांची अंडी व काही जंतू असतातच. पण शेतात हळूहळू ते मरतात किंवा निष्क्रिय होतात. काही शहरात मात्र मैलापाणी नदीत सोडले जाते. पालिकेने हा गुन्हा केलेला असतो. महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण नुसार असे करणे अपराध आहे.

मात्र सेप्टिक टँक पुरेसे उंच असतील तरच त्यातील घाण निर्जंतुक होते.

शहरांमधील संडासांचा एक मोठा प्रश्न म्हणजे फ्लशमध्ये वाया जाणारे पाणी. एकूण पाणी बचतीची गरज असल्यामुळे संडास – लघवीनंतर 5 ते 10 लिटर पाणी फ्लशसाठी लागणे हे गैर आहे. यासाठी आता संडासची भांडी छोटी करणे तसेच 5 लिटरचा फ्लश वापरणे आवश्यक आहे. तसेच काही फ्लश टाक्यांमध्ये लघवीसाठी वेगळया लहान फ्लशची (1 लिटर पाणी) सोय असते. या फ्लशच्या टाकीला दोन बटने असतात. लहान बटन लघवीचे (1 लिटर) असते व मोठे बटन (5 लिटर) संडासचे असते.

ग्रामीण भागात मलमूत्र व्यवस्थापनासाठी अनेक तांत्रिक सुधारणा करणे शक्य आहे. यात खड्डयांचे संडास, जलबंदा ऐवजी झडप, स्वस्त मलपात्र व स्वस्त आडोसा अशी अनेक तंत्रे आहेत. याशिवाय संडास गोबर गॅसला जोडणेही शक्य आहे. यासाठी पुढे वेगळे प्रकरण दिले आहे.

 

डॉ. शाम अष्टेकर २१, चेरी हिल सोसायटी, पाईपलाईन रोड, आनंदवल्ली, गंगापूर रोड, नाशिक ४२२ ०१३. महाराष्ट्र, भारत

message-icon shyamashtekar@yahoo.com     ashtekar.shyam@gmail.com     bharatswasthya@gmail.com

© 2017 arogyavidya.net | All Rights Reserved.