अंगणवाडी ही मागास खेडयातील बालकांसाठी सुरू झालेली योजना होती. मुले हीच राष्ट्राचे भविष्य असतात. त्यामुळे बालकांची जडणघडण आणि विकास हेच आपले प्रथम कर्तव्य आहे. सहा वर्षाखालील मुलांचे आपल्या लोकसंख्येतील प्रमाण सुमारे 15.8% इतके आहे. या वयोगटात मुलामुलींचे परस्पर प्रमाण हजारी 927 इतके आहे. ही पिढी अनेक प्रतिकूल घटकांचा सामना करीत आहे. या प्रतिकूल घटकांचे निराकरण होऊन या वयोगटातील बालकांचे संवर्धन व्हावे म्हणून 1975 साली गांधीजयंती पासून भारत सरकारने एकात्मिक बाल विकास सेवा योजना (अंगणवाडी) सुरू केली. गेली 30 वर्षे प्रत्येक गावांत अंगणवाडी सुरू झालेली आहे. अंगणवाडी ही खास बालकांसाठी (सहा वर्षाखालील) तयार झालेली योजना असून त्यात पुढील सेवा येतात:
अंगणवाडीमार्फत ह्या सहाही सेवा द्यायच्या असून, तीन वर्षाखालील मुलांना घरभेटीतून सेवा पुरवायच्या आहेत, तर तीन वर्षावरील मुलांना अंगणवाडीत तीन तास एकत्र आणून सेवा पुरवायच्या आहेत. वैद्यकीय सेवा, तपासणी, इत्यादींसाठी प्राथमिक आरोग्य केंद्र साहाय्य करते.
अंगणवाडीत वजन तपासणी, वजन तक्ते-आरोग्यतक्ते ठेवणे, कुपोषण लवकर शोधून काढणे आणि सुधारणे, पूरक आहार – सुखदा (सुकडी), ‘अ’ जीवनसत्त्व डोस, शालापूर्व शिक्षण (पोषण, स्वच्छता इत्यादी विषयांवर भर) ह्या सेवा दिल्या जातात.
अंगणवाडीत फक्त तीन वर्षापुढची मुले येणे शक्य असते. यामुळे त्यापेक्षा कमी वयाची मुले योजनेच्या दृष्टीने दुर्लक्षित राहतात. कुपोषण व आजारांचे दुष्टचक्र याच लहान वयोगटात महत्त्वाचे असते. अंगणवाडी योजनेची ही एक मोठी त्रुटी आहे. मात्र तीन वर्षाच्या वरच्या गटातील मुलांना योजनेचा थोडाफार लाभ मिळतो. विशेषत: अतिकुपोषित मुलांचे प्रमाण कमी होण्यास मदत होते असे दिसते.
पण कुपोषण-अनारोग्य ज्या परिस्थितीमुळे निर्माण झाले त्याचा मुकाबला करणे जास्त महत्त्वाचे आहे.
अंगणवाडीत प्रत्येक बालकाचे दर महिन्यात एकदा वजन केले जाते. आरोग्य तक्त्यातील नोंदीवरून मूल ठीक आहे, की कुपोषित आहे याचा अंदाज येतो. तसेच अचानक वजन कमी झाले तर तेही कळते. मूल कुपोषित असेल तर त्याप्रमाणे लवकर उपाययोजना करायला सोपे जाते.
अंगणवाडीत बालकाची प्रत्येक महिन्याची होणारी वजननोंद करतात. या सर्व बिंदूंना जोडणारी रेषा पाहून बाळाची एकूण प्रगती लक्षात येईल. या तक्त्यावरून अनेक गोष्टी समजतात.
वजनतक्ते ठेवणे हा बालकांच्या आरोग्यसेवेतला एक महत्त्वाचा घटक आहे. पण केवळ वजन मोजणे पुरत नाही. बालकाची उंची, वाढीचे व विकासाचे टप्पे, इत्यादी गोष्टीही तपशीलवार पाहिल्या पाहिजेत.
कुपोषण हटवणे ही सोपी गोष्ट नाही. ही लढाई समाजाने अंगणवाडीवर सोपवून समस्या सुटणार नाही. अंगणवाडी केवळ यासाठी मदत करते. अंगणवाडी सेवांमध्येही अनेक अडचणी असतात.
बालकांच्या मानसिक विकासाचा व वाढीचा पाया भक्कम करणे.