Medicine Law Icon आरोग्य कायदा
रुग्णांचे हक्क
मुंबई नर्सिंग होम कायद्याच्या नियमावलीतील रुग्णांचे हक्क

दवाखान्यात किंवा रुग्णालयात उपचार घेणा-या रुग्णांचे काही हक्क आहेत. हे हक्क समजून उमजून त्याचा योग्य वापर केल्यामुळे आरोग्यसेवा सुधारतील.

सेक्शन 16, नियम क्र. 14

1. जखमी रुग्णाला जीवरक्षक प्रथमोपचार मिळण्याचा हक्क : सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार जखमी व्यक्तीला जीवरक्षक प्रथमोपचार मिळण्याचा हक्क आहे.

2. रुग्णाला/आप्तेष्टांना माहिती मिळण्याचा अधिकार आहे.

  • डॉक्टरांना कोणत्या आजाराची शंका येते आहे किंवा पक्के निदान झाले आहे?
  • रुग्णाला झालेल्या आजाराचे स्वरुप; त्याची गंभीरता; उपचारामुळे होऊ शकणारे दुष्परिणाम;
  • उपचारासाठी येणारा खर्च याची पुरेशी माहिती.

  • आजा-याची परिस्थिती बदलली तर त्याची माहिती व उपचारामध्ये बदल केल्यास खर्चामध्ये किती बदल होणार आहे याची माहिती.
  • रुग्णाने किंवा रुग्णाने निर्देशित केलेल्या आप्तेष्टाने मागणी केल्यावर इनडोर केसपेपरची फोटोकॉपी, फोटेकॉपीसाठीचा सुयोग्य खर्च भरल्यानंतर मिळाली पाहिजे. (ऍडमिट असताना 24 तासात, डिस्चार्ज मिळाल्यावर 72 तासात)
  • डिस्चार्ज मिळतांना पुढील किमान माहिती देणारे डिस्चार्ज कार्ड मिळायला हवे. : दाखल करण्यामागचे कारण डॉक्टरी तपासणीत आढळलेल्या महत्त्वाच्या बाबी व तपासणीचे निष्कर्ष, निदान, केलेले उपचार, घरी पाठवताना रुग्णाची स्थिती. डिस्चार्ज मिळाल्यानंतर घ्यायची काळजी, घ्यायची औषधे, इतर सूचना तातडीने वैद्यकीय मदत हवी असल्यास कशी मिळवावी याची माहिती. (सामान्य माणसाला समजेल अशा भाषेत).

3. उपचार नाकारण्याचा अधिकार, उपचारासाठी संमती : रुग्णाला धोका पोचू शकेल असे कोणतेही उपचार (शस्त्रक्रिया, रक्त देणे, धोक्याची शक्यता असलेल्या तपासण्या) देतांना रुग्णाला त्याबाबत पुरेशी माहिती मिळून (सामान्य माणसाला समजेल अशा भाषेत) संमती देण्याचा, नाकारण्याचा अधिकार.

4. गोपनीयतेचा व खाजगीपणाचा अधिकार : रुग्णाने डॉक्टरांना स्वत:च्या आरोग्यासंबंधीची दिलेली माहिती व डॉक्टरांना तपासणीतून मिळालेली माहिती ही खाजगी राहील व रुग्णाच्या परवानगीशिवाय रुग्णाची आयडेंटीटी (अपवादात्मक परिस्थिती वगळता) इतरांना कळवली जाणार नाही हा अधिकार.

5. सेकंड ओपिनियन घेण्याचा हक्क : रुग्णाने किंवा रुग्णाने निर्देशित केलेल्या आप्तेष्टाने मागणी केल्यास रुग्णाच्या पसंतीच्या दुस-या तज्ज्ञ डॉक्टरला त्याच इस्पितळात बोलावून सल्ला घेण्याचा अधिकार आहे. त्यासाठी आवश्यक ते सर्व रिपोर्टस् रुग्णाला मिळण्याचा हक्क आहे.

6. रुग्णाची मानवी प्रतिष्ठा राखली जाण्याचा अधिकार: रुग्ण असहाय असतात हे लक्षात घेऊन उपचार करणा-या डॉक्टरांनी व आरोग्य सेवकांनी रुग्णाच्या मानवी प्रतिष्ठेचा सन्मान केला पाहिजे. स्त्री रुग्णांना पुरुष डॉक्टर तपासत असताना स्त्री-कर्मचारी वा स्त्री आप्तेष्ट सोबत असायला हवी. अशा प्रथा इस्पितळांनी पाळायला हव्या.

7. एच.आय. व्ही. रुग्णांना भेदभावरहित वागणूक मिळण्याचा हक्क: एच.आय. व्ही. रुग्णांना भेदभाव न करता केवळ माणूस या नात्याने वागणूक मिळण्याचा हक्क आहे.

8. उपचारात पर्याय उपलब्ध असतील तर (उदा. कर्करोगावर कोणत्या प्रकारचा उपचार करायचा, हृदयविकारावर शस्त्रक्रिया करायची की नाही) त्यापैकी पर्याय निवडण्याचा किंवा उपचार नाकारण्याचा अधिकार रुग्णाला आहे.

9. तक्रार करण्याचा हक्क : रुग्णांचे उपर्निर्देशित हक्कांची पायमल्ली होत आहे असे रुग्णाला / आप्तेष्टांना वाटल्यास त्याबाबत तक्रार करण्याचा रुग्णाला हक्क आहे. ही तक्रार इस्पितळ प्रमुखाकडे करण्याची पध्दत व तक्रार निवारण्याची पध्दत रुग्णाला कळायला हवी.

10.रुग्णावर संशोधन होणार असेल तर त्याबाबतची नैतिक तत्त्वे ICMR ने निर्देशित केलेल्या धोरणाप्रमाणे आणि प्रक्रियेप्रमाणे पाळली जाण्याची हमी.

 

डॉ. शाम अष्टेकर २१, चेरी हिल सोसायटी, पाईपलाईन रोड, आनंदवल्ली, गंगापूर रोड, नाशिक ४२२ ०१३. महाराष्ट्र, भारत

message-icon shyamashtekar@yahoo.com     ashtekar.shyam@gmail.com     bharatswasthya@gmail.com

© 2017 arogyavidya.net | All Rights Reserved.