आपल्या देशात सरकारी वैद्यकीय सेवांपेक्षा खाजगी दवाखाने व रुग्णालये जास्त आहेत. आपल्याला आरोग्य-वैद्यकीय सेवांची गरज पडते. त्यातला पाव हिस्सा (25%) सरकार पुरवते तर पाऊण हिस्सा (75%) खाजगी डॉक्टरांकडून होतो.
ग्रामीण भागांत खाजगी डॉक्टर साधारणपणे बाजाराच्या गावी (बहुतेक वेळी तालुक्याच्या गावी) व्यवसाय करतात. सरकारी सेवांपेक्षा यांचा वाटा फार मोठा आहे. पण त्यांच्या तर्फे मुख्यत्वेकरून उपचारात्मक सेवा दिल्या जातात. प्रतिंबंधक सेवांसाठी सरकारी संस्थांकडेच वळावे लागते. ग्रामीण भागात तज्ज्ञसेवा (उदा. सर्जन, स्त्रीरोगतज्ज्ञ) चालू झाल्या आहेत त्या मात्र बहुतेक खाजगी वैद्यकीय व्यावसायिकांमार्फतच. या परिस्थितीमुळे ग्रामीण किंवा शहरी भागांत खाजगी डॉक्टरचाच प्रभाव अधिक आहे. भारतात अनेक प्रकारचे डॉक्टर दिसून येतात. ग्रामीण जनतेला तसेच सामान्य शहरी जनतेला पण याबद्दल पुरेशी माहिती नसते. डॉक्टरांचे प्रकार अनेक असल्याने जनमनात गोंधळ होऊ शकतो. आपल्याला खाजगी डॉक्टरांची व सेवांची नीट माहिती पाहिजे.