/tantrika tantra icon चेतासंस्थेचे आजार (मज्जासंस्था) मानसिक आरोग्य आणि आजार
विस्मरण विकार

स्मरणशक्ती कमी होणे म्हणजे वाढत जाणारा विसराळूपणा ही एक गंभीर समस्या आपल्या समाजात येत आहे. वाढते वय आणि वृध्दांची संख्या हे त्याचे प्रमुख कारण आहे. या आजाराने अनेक व्यक्ती एक प्रकारे अपंग होतात. हळूहळू दैनंदिन व्यवहार करणेही अवघड व्हायला लागते. या विकारामागे काही वेगवेगळी कारणे आहेत.

रक्तप्रवाह कमी झाल्याने विस्मरण

उतारवयात मेंदूचा रक्तप्रवाह कमी व्हायला लागतो. एकूणच शरीरात रक्तवाहिन्या अरुंद होत असतात, त्यात छोटे मोठे अडथळे येत राहतात, सूक्ष्म रक्तस्राव होत राहतात. शरीरात अनेक इंद्रियात यामुळे बिघाड होतात. मात्र मेंदूत रक्तप्रवाहातले अडथळे खूप नुकसानकारक असतात. मेंदूत विशिष्ट कामासाठी विशिष्ट जागा ठरलेल्या असतात. याच कारणाने पक्षाघातही होतो. मात्र पक्षाघातासाठी अचानक मोठा अडथळा कारणीभूत ठरतो. विस्मरण व मानसिक क्षीणता अनेक सूक्ष्म अडथळयांमुळे येते.

अल्झायमरचा विकार

हा विकार उतारवयातच येतो. यामध्ये विस्मरण, स्थळ काळाचे भान कमी होणे, मूड बदलणे, वाक्ये न बोलता येणे, परत परत तेच शब्द येणे, ओळखायला न येणे, बोलणे न समजणे, आणि एकूण भ्रमिष्टपणा ही वाढती लक्षणे दिसून येतात. शब्दसंपत्ती कमी होत जाते. वाक्यरचना तुटक होते आणि शेवटी व्यक्ती मूक होते. पुढेपुढे दैनंदिन व्यवहार – खाणे, पिणे, स्वच्छता, कपडे घालणे वगैरे गोष्टीपण अवघड होत जातात. हळूहळू व्यक्ती परावलंबी होतात.

या आजारात साधारणपणे आठ प्रकारे बौध्दिक कमतरता निर्माण होतात.

  • स्मरणशक्ती कमी होते.
  • भाषाकौशल्य कमी होते.
  • लक्ष (ध्यान नसणे).
  • समज कमी होत जाते.
  • रचनात्मक बुध्दीकौशल्ये कमी होतात.
  • भान-स्थळ, काळ,ओळख कमी होते.
  • समस्या-सोडवणुकीची क्षमता कमी होते.
  • कार्य-कुशलता कमी होते.

शेवटी शेवटी असा माणूस पूर्णपणे मनविरहीत आणि परावलंबी होतो. ही परिस्थिती घरात सर्वांनाच दु:ख व पीडादायक असते. निदान झाल्यानंतर साधारणपणे 7-8 वर्षात मृत्यू येतो.

या विकाराचे मुख्य कारण म्हणजे मेंदू आकसत जातो व अकार्यक्षम होतो. मेंदूतले सूक्ष्म तंतू एकमेकात गुंतून जाळी तयार होतात. मेंदूत एका सदोष प्रथिनाचे प्रमाण वाढत जाते. रक्तवाहिन्यांमध्ये देखील थर जमायला लागतात. यामुळे रक्तप्रवाहाची कुचंबणा होते.

अल्झायमर प्रतिबंध

या आजाराबद्दल संशोधनाने थोडी थोडी माहिती उपलब्ध होत आहे. काही प्रतिबंधक मुद्दे माहीत झाले आहेत ते पुढीलप्रमाणे

  • आहारात गंजरोधक पदार्थ (फळे, भाजीपाला, मासे, योग्य तेले आणि रेड वाईन) असण्याने काही प्रमाणात आजार टळतो किंवा पुढे ढकलला जातो. जिरे आणि हळद ही या दृष्टीने उपकारक ठरतात असे दिसते.
  • मधुमेह, अतिरक्तदाब, रक्तात कोलेस्टेरॉलचे जास्त प्रमाण, धूम्रपान हे सर्व या आजाराची शक्यता वाढवतात. या आजारांचा प्रतिबंध करायला पाहिजे.
  • सौम्य प्रमाणात ऍस्पिरिनचा वापर उपकारक असेल असे दिसते. यामुळे हा आजार होणे टळते किंवा लांबणीवर पडते.
  • बौध्दिक खेळाने (उदा. बुध्दिबळ, शब्दकोडी) या आजाराचा काही प्रमाणात प्रतिबंध होतो असे दिसून आले आहे. तसेच संगीत, सामाजिक कार्यक्रमात सहभाग, द्विभाषिक व्यवहार, इ. मुळे आजाराचा थोडयाफार प्रमाणात प्रतिबंध होतो.
  • काही धातू व रसायनांमुळे हा आजार संभवतो असे दिसते. स्वयंपाकात अधिक अल्युमिनियमचा वापर (विशेषत: तवा, कढई) या दृष्टीने घातक आहे. रंगात वापरली जाणारी सॉल्वंट रसायनेही या आजाराला आमंत्रण देतात असे दिसते.

भारतात या आजारावर योगासने, प्राणायाम, ब्राह्मी वनस्पती यावर प्रयोग चालू आहे.

व्यवस्थापन

या आजारावर नक्की औषधे अद्याप मिळालेली नाहीत. काही औषधांचा वापर केला जातो, पण उपयोग मर्यादित आहे. याशिवाय काही मानसोपचारांचा अभ्यास चालू आहे.

घरातल्या इतर व्यक्तींवर या आजारी माणसाची विशेष जबाबदारी येऊन पडते.

सुरक्षितता : आजूबाजूची खोली, वस्तू, व्यवहार सुरक्षित होतील अशी काळजी घ्यायला पाहिजे, उदा. चालताना खाली पायात अडथळा येणा-या वस्तू-रचना काढून टाकणे, इ. काही वेळेला या व्यक्तीवर मुद्दाम बंधनेही घालावी लागतात.

आहार : ब-याच रुग्णांना अन्न भरवावे लागते. काही रुग्ण गिळू शकत नाहीत. त्यांना टयूब नळी घालावी लागते. या नळीतून अन्न द्यावे लागते. या गोष्टी शिकाव्या लागतात किंवा प्रशिक्षित व्यक्ती मदतनीस म्हणून लागतात.

स्वच्छता : डोळे, तोंड व दात, नाक, त्वचा, जखमा, इ. ची स्वच्छता सांभाळायला लागते. या गोष्टी रुग्णाला करून द्याव्या लागतात.

लघवी : अंथरुणात किंवा अवेळी नकळत लघवी होणे ही एक मोठीच समस्या असते. यासाठी थोडे नियोजन करावे लागते. द्रवपदार्थ-पाणी देण्याचे प्रमाण व वेळा, लघवीला नेऊन आणणे किंवा भांडे देणे, नळी घालून ठेवणे हे काही उपाय शिकावे लागतात.

मनोविकारांबरोबर येणारे विस्मरण विकार

गंभीर स्वरुपाच्या मानसिक आजारांबरोबर स्मृतिभ्रंश (विस्मरण-विकार) येऊ शकतो. विशेषत: अतिनैराश्य किंवा वेड लागणे, इ. विकारात हाही विकार दिसून येतो. उतारवयात येणा-या विस्मृती-विकारापेक्षा याची लक्षणे वेगळी असतात. याचा वयोगट पण बराच आधी म्हणजे तरुणवयात सुरु होतो.

मद्यपानामुळे येणारे विस्मृतीविकार

मद्यपि, व्यसनाधीन व्यक्तीच्या शरीरात ब जीवनसत्त्व (थायमिन) कमतरता निर्माण होते. त्वचा काळपट होणे, यकृत खराब होणे याबरोबरच मानसिक क्षीणता व विस्मृतीविकार वाढायला लागतो. या आजाराची एक प्रमुख खूण म्हणजे चालण्यात येणारा असमतोल. या विकारात खूप पूर्वीची स्मृती टिकून राहते पण नुकत्याच झालेल्या गोष्टी विसरल्या जातात. याबरोबरच एकूण गोंधळलेपण, अलिप्तता, असमंजसपणा, इ. बदल दिसतात. ब जीवनसत्त्वापैकी थायमिन औषधाची मात्रा देऊन या आजारात सुधारणा होऊ शकते.

याशिवाय इतर अनेक आजारांमुळे विस्मृतीविकार होतो. यांची यादी खूपच मोठी आहे, पण काही उदाहरणे म्हणजे – मेंदूत रक्तस्त्राव, सिफिलिस-गरमी, मेंदूत गाठी, मेंदूसूज, मेंदूज्वर, मेंदूआवरण दाह, फिट, अपस्मार-मिरगी, लकवा, इत्यादी.

जपानी मेंदूज्वर

Japanese Brain Fever जपानीज एन्सेफेलायटीस हा आजार डासांमार्फत होणारा प्राणीजन्य रोग आहे. या रोगाची साथ आशिया खंडातील अनेक देशात अधून मधून उद्भवत आहे. चीन, जपान, कोरिया, इंडोनेशिया, बांगला देश, भारत, इ. देशात या रोगाची साथ मधून मधून येते.

या रोगाचा प्रादुर्भाव विशेषतः ग्रामीण भागात आढळून येतो. मात्र शहरानजिकच्या वस्तीत/ झोपडपट्टीतसुध्दा या रोगाची साथ आढळून आली आहे. ग्रामीण भागात तसेच झोपडपट्टीत पुष्कळ डुकरे आढळतात. या डुकरांमध्ये जपानी मेंदूज्वराचे विषाणू मोठया प्रमाणात असतात. क्युलेक्स या डासांच्या मादीद्वारे या विषाणूंचा प्रसार होतो. हे डास डुकरांना चावतात. डुकरांना मात्र या विषाणूपासून काहीही अपाय होत नाही.

या डुकरांना चावलेले डास जेव्हा माणसांना चावतात, तेव्हा 9 ते 12 दिवसांनंतर माणसांमध्ये जपानी मेंदूज्वर हा रोग दिसू लागतो. या विषाणूंची बाधा झालेले मादी डास पुढील डासांच्या पिढीत सुध्दा या विषाणूंचा प्रसार करतात. ज्या भागात स्थलांतर करणारे बगळयासारखे पक्षी काही काळ वास्तव्य करतात, तेथेही या पक्ष्यांकडून डासांमार्फत या रोगाचा प्रसार होऊ शकतो. या रोगाचा अधिशयन काल 5 ते 15 दिवस असतो.

या रोगाचे विषाणू रक्तात फार अल्पकाळ टिकत असल्याने या रोगाचा प्रसार माणसांमार्फत होत नाही. माणसाला झालेला जंतूसंसर्ग त्या व्यक्तीपुरताच मर्यादित राहून थांबतो.

या रोगाची लागण लष्करातील सैनिकांना होण्याची जास्त शक्यता असते. तसेच विदेशी प्रवासी जर ग्रामीण भागात एक महिन्याहून अधिक काळ वास्तव्य करणार असतील तर त्यांनाही या रोगाची लागण होण्याची शक्यता असते.

या रोगाचे वैशिष्टय म्हणजे या रोगाची साथ मोठया प्रमाणावर कधीही येत नाही. 4-6 व्यक्तींना लागण व त्यातील 2 मृत्यू असे काहीसे चित्र आढळून येते. ज्यांना या रोगाची लक्षणे दिसतात त्यापैकी 20 ते 50 टक्के व्यक्ती मृत्युमुखी पडतात. मृत व्यक्तींमध्ये 65 वर्षावरील व्यक्तींचे प्रमाण जास्त आढळते.

रोग लक्षणे

या रोगाची बाधा होऊनही बहुतेक व्यक्तींमध्ये या रोगाची लक्षणे दिसून येत नाहीत या रोगाची लक्षणे 15 वर्षातील मुलांमध्ये किंवा 65 वर्षे वयोगटातील व्यक्तींमध्ये आढळून येतात. मात्र ज्या भागात या रोगाची पूर्वी साथ आलेली नसेल, अशा भागात कोणत्याही वयोगटात रोगाची लक्षणे दिसून येतात. मध्यवर्ती चेतासंस्थेवर- मेंदूवर या रोगाचा प्रभाव दिसून येतो.

सुरुवातीला ‘फ्लू’ सारखी लक्षणे दिसून येतात. ताप येतो, डोके ठणकते, मळमळते, उलटी येणे, जुलाब होणे, इ. लक्षणे दिसून येतात.

ज्यांच्या मेंदूस या रोगाच्या विषाणूंमुळे सूज आली असेल अशा थोडया व्यक्तींना जीभ अडखळणे, हात-पाय थरथरणे, चालताना पाय लटपटणे, अर्धांगवायू होणे, इ. लक्षणे दिसतात. या रुग्णात मनाची गोंधळलेली स्थिती होणे, वागणुकीत बदल होणे, इ. लक्षणेही आढळून येतात.

या रोगाची लागण प्रसूतिपूर्व काळात गरोदरपणाच्या 6 महिन्याच्या कालावधीत झाल्यास गर्भपात किंवा मुदतपूर्व प्रसूती संभवते.

ज्या व्यक्ती मृत्यूच्या तावडीतून सुटतात, त्यापैकी दोन तृतियांश व्यक्तींना या रोगाची कायम स्वरूपी हानी सोसावी लागते. लुळेपणा, कंपवात, मानसिकतेत बदल, मतिमंदपणा, इ. ने त्या व्यक्तीची कायमची हानी होते.

रोगनिदान

या रोगाचे निदान रक्तद्रव्याची तपासणी करून तसेच पाठीच्या मणक्यातील पाणी तपासणी करून करता येते.

उपचार

या रोगावर कोणतेही प्रभावी औषध नाही. सहाय्यक उपचार, चांगली शुश्रूषा करणे, यास विशेष महत्त्व आहे. अशा संशयित रुग्णास सरळ रुग्णालयात दाखल करावे. हाता-पायात लुळेपणा आलेल्या रुग्णांना पुढे भौतिकोपचार/ व्यायामोपचार देणे आवश्यक असते.

प्रतिबंधक उपाय
  • डास प्रतिबंधक उपाय – (पहा हिवताप प्रकरण)
  • डुकरांचा बंदोबस्त – या रोगाचे विषाणू डुकरांमध्ये विशेष करून वाढत असल्याने मोकाट डुकरांचा साथग्रस्त क्षेत्रात तात्काळ नायनाट करणे आवश्यक ठरते. वराह पालन केंद्रास मच्छरदाणीप्रमाणे बारीक जाळया असाव्यात, म्हणजे डासांचा संपर्क पाळीव डुकरांशी येणार नाही.
  • प्रतिबंधक लस – या रोगावर 90% गुणकारी लस शोधण्यात यश मिळालेले आहे. नवजात उंदराच्या मेंदूतील विषाणू मारून त्यापासून प्रतिबंधक लस बनविण्यात आलेली आहे. या लसीच्या 3 मात्रा त्वचेखाली इंजेक्शनने घ्याव्या लागतात. प्रथम मात्रा व दुस-या मात्रेत 7 ते 14 दिवसांचे अंतर असावे व तिसरी मात्रा प्रथम मात्रेच्या 28 ते 30 व्या दिवशी घ्यावी. या लसीचा परिणाम तीन वर्षापर्यंतच होत असल्याने दर तीन वर्षांनी बूस्टर मात्रा घेण्याची आवश्यकता असते. लस घेतल्यावर किमान अर्धातास तरी दवाखान्यात लस घेणा-यांनी थांबावे. कारण काही व्यक्तींना या लसीची प्रतिक्रिया येण्याची शक्यता असते. साथग्रस्त भागातील 1 वर्षावरील सर्व व्यक्तींना ही लस देता येते. एक वर्षाच्या आतील अर्भकांना, गरोदर स्त्रियांना, आजारी व्यक्तींना, हृदयविकार, किडनीविकार, यकृतविकार असणा-या कॅन्सरच्या रुग्णांना ही लस देऊ नये.
  • नियमित सर्वेक्षण – आरोग्य यंत्रणेमार्फत अशा लक्षणांचे रुग्ण आढळतात काय, याची नियमितपणे पाहणी करणेही अत्यावश्यक आहे. आपल्यालाही याची माहिती पाहिजे.
  • आरोग्यशिक्षण – लोकांच्या सहकार्यानेच या रोगावर मात करता येणे शक्य होईल. लोकांनी डास चावणार नाही याची काळजी घ्यावी. मच्छरदाणीचा वापर करावा, घरोघरी डासनाशक फवारणी करून घ्यावी, डुकरांच्या वास्तव्यास सामुदायिकरित्या विरोध करावा, डुकरे ही जणू भंग्याचे काम करीत असल्याने उघडयावर शौचास बसणा-यांची सोय होते; परंतु त्याऐवजी सोपा संडास/ सार्वजनिक शौचालयाचा वापर करणे हा प्रभावी उपाय आहे, हे आपण ध्यानात घ्यावे. आरोग्य यंत्रणा, स्वयंसेवी संघटना व जनतेच्या सहकार्याने व समन्वयाने या रोगावर मात करणे अवघड नाही.

 

डॉ. शाम अष्टेकर २१, चेरी हिल सोसायटी, पाईपलाईन रोड, आनंदवल्ली, गंगापूर रोड, नाशिक ४२२ ०१३. महाराष्ट्र, भारत

message-icon shyamashtekar@yahoo.com     ashtekar.shyam@gmail.com     bharatswasthya@gmail.com

© 2017 arogyavidya.net | All Rights Reserved.