स्त्रियांच्या बाबतीत ओटीपोट म्हणजे गर्भाशय, गर्भनलिका, स्त्रीबीजांडे व आजूबाजूचा भाग (स्नायू, इत्यादी).
ओटीपोटात सूज हा तसा दुर्लक्षित आजार आहे. आपल्या देशात स्त्रियांसाठी चांगल्या वैद्यकीय सेवा नसणे हे त्याचे एक प्रमुख कारण आहे. या आजारांमध्ये आकस्मिक म्हणजे नवे जंतुदोष आणि जुने जंतुदोष असे दोन गट पाडता येतील. पहिल्या प्रकारात नीट उपचार न झाल्याने दुसरा प्रकार उद्भवतो.
ओटीपोटात सूज येण्याचे मुख्य कारण म्हणजे जंतुदोष. या जंतुदोषाची अनेक कारणे आहेत ती अशी :
या आजाराचे मुख्य दोन प्रकार पाडता येतील: तीव्र आकस्मिक किंवा नवा जंतुदोष (दाह) व दीर्घ म्हणजे जुना जंतुदोष (दाह):
आकस्मिक तीव्र जंतुदोष दाह (नवी सूज)
हा प्रकार बहुधा बाळंतपण, गर्भपात, शस्त्रक्रिया, लिंगसांसर्गिक आजार या घटनांनंतर येतो. यात अचानक ताप, ओटीपोटात खूप वेदना, दुखरेपणा ही मुख्य लक्षणे असतात. हा प्रकार अगदी त्रासदायक आणि गंभीर असतो. यासाठी वेळीच तज्ज्ञाकडे पाठवणे आवश्यक असते. रुग्णालयातच यावरचे उपचार करता येतील. अर्धवट उपचार झाल्यास जंतुदोष ओटीपोटात टिकून राहतो. यातून खाली दिलेला दुसरा प्रकार संभवतो.
ओटीपोटात दीर्घ दाह (जुनी सूज)
ह्या आजाराची लक्षणे सौम्य स्वरूपाची असतात. ओटीपोटात मंद दुखते, दुखरेपणा, म्हणजे आतून तपासताना किंवा लैंगिक संबंधाच्या वेळी दुखते. याबरोबरच, पाळीच्या वेळी दुखणे, कंबरदुखी, अशक्तपणा, बारीक ताप, अंगावरून पाणी जाणे (कधी यास दुर्गंधी असते.), इत्यादी लक्षणे आढळतात. वर सांगितल्याप्रमाणे हा प्रकार बहुधा तीव्र जंतुदोषातून सुरु होतो. पण काही वेळा याची सुरुवात नकळत होते. क्षयरोग हेही याचे एक कारण आहे. हा संथपणे चालणारा आजार आहे.
आतून तपासताना किंवा लैंगिक संबंधात दुखरेपणा ही ओटीपोटात सूज असल्याची नक्की खूण आहे. ओटीपोटात सूज आहे ही शंका घेऊन वेळीच तज्ज्ञाकडे पाठवणे फार महत्त्वाचे आहे.
सतत दुखरेपणा असणे हा मुख्य त्रास असतो. यामुळे लैंगिक संबंध त्रासदायक होतो. त्याचबरोबर वंध्यत्व व अस्थानी गर्भ राहणे हे महत्त्वाचे दुष्परिणाम आहेत. गर्भनलिका सुजून बंद झाल्यामुळे वंध्यत्व येते. गर्भनलिका अंशतः बंद झाल्यास स्त्रीबीज गर्भनलिकेत अडकून पडते व अस्थानी गर्भ राहतो. हे दोन्ही दुष्परिणाम गंभीर आहेत.
ओटीपोटात सूज असण्याचे प्रमाण व त्याचे दुष्परिणाम पाहून वेळीच रोगनिदान करणे महत्त्वाचे आहे. बाळंतरोग, दूषित गर्भपात व लिंगसांसर्गिक आजारांचा प्रतिबंध केल्यास ओटीपोटात सूज येण्याचे प्रमाण खूप कमी होईल. यासाठी चांगल्या वैद्यकीय सेवा सर्वत्र उपलब्ध होणे आवश्यक आहे.
सोबतच्या तक्त्यात रक्तस्रावाच्या कारणांचे तीन प्रमुख गट दिले आहेत.
एक गट म्हणजे पाळीशी संबंधित रक्तस्रावांची कारणे. यात होणारा रक्तस्राव संभाव्य तारखेस जोडून, थोडासा मागेपुढे होतो. यात मुख्यतः पाळीचा रक्तस्राव जास्त दिवस जात राहतो किंवा नेहमीपेक्षा जास्त प्रमाणावर रक्तस्राव होतो. साधारणपणे पाळीचा रक्तस्राव दोन ते पाच दिवस टिकतो. सुरुवातीचा व शेवटचा ठिपके येण्याचा भाग सोडल्यास मधले एक-दोन दिवस एक ते दोन घडया रोज भिजेपर्यंत रक्तस्राव होतो. मासिक पाळीसंबंधी रक्तस्रावाचा विचार वेगळया प्रकरणात केला आहे.
रक्तस्रावाचा दुसरा गट आहे-गरोदरपणाशी संबंधित असलेल्या आजारांचा. यात मुख्यतः निरनिराळया प्रकारचे गर्भपात (संभाव्य गर्भपात, अटळ गर्भपात, अपूर्ण गर्भपात, दूषित गर्भपात आणि अस्थानी गर्भ), आणि गर्भाशयातील वारेशी संबधित रक्तस्राव येतात. यांचा विचार गरोदरपणाच्या प्रकरणात केला आहे.
तिसरा गट आहे -गर्भाशयात गाठ किंवा कर्करोगामुळे होणारा रक्तस्राव आणि जखमा
गर्भाशयाच्या तोंडाचा कर्करोग
गर्भाशयाचा कर्करोग बहुधा गर्भाशयाच्या तोंडाशी तयार होतो. हा आजार मध्यम आणि त्यानंतरच्या उतारवयात होतो. याची मुख्य खूण म्हणजे पाळीशी संबंधित नसलेला अधूनमधून होणारा रक्तस्राव. याबरोबर वेदना असेलच असे नाही. पाळी थांबलेली असताना म्हणजे सुमारे ४५-५० वर्षे वयानंतर अधूनमधून होणारा रक्तस्राव म्हणजे कर्करोगाचीच शंका आधी घेतली पाहिजे. कर्करोगासंबंधी नंतर जास्त माहिती दिली आहे. लैंगिक संबंध आल्यानंतर रक्तस्त्राव झाल्यास हमखास ग्रीवेच्या कर्करोगाची शक्यता असते.
कर्करोग नसलेल्या पण त्यापेक्षा साध्या (म्हणजे न पसरणा-या) गाठी गर्भाशयात होतात. या गाठी मुख्यतः मध्यम वयात येतात. या गाठींमुळे पाळी सोडून अधेमध्ये रक्तस्राव होतो किंवा पाळीच्या वेळी जास्त रक्तस्राव होतो. ‘आतून’ तपासणी आणि सोनोग्राफीने नेमके निदान होऊ शकते.
तक्त्यात दिल्याप्रमाणे रक्तस्रावाची आणखी कारणे असू शकतात. संभोगातील जखम, विशेषतः जबरी संभोगातील जखमा, हे रक्तस्रावाचे एक महत्त्वाचे कारण आहे. पहिल्या संभोगाच्या वेळी योनिमार्गावरचा पडदा फाटल्याने रक्तस्राव होतो हे आपण पाहिलेच आहे.
जबरी संभोगातल्या जखमा मुख्यतः योनिमार्गाशी संबंधित असतात. पुढील निदानासाठी आणि उपचारासाठी स्त्रीरोग तज्ज्ञाकडे पाठवावे. याबरोबर अर्थातच न्यायवैद्यकीय प्रक्रिया पूर्ण करावी लागते.
योनिद्वारे रक्तस्रावाची कारणे अनेक आहेत. त्यांचे योग्य निदान करणे आवश्यक आहे. रक्तस्राव पाळीशी संबंधित आहे, की गरोदरपणाशी याचा आधी निर्णय करणे आवश्यक असते. पाळीचा रक्तस्राव सोडल्यास इतर सर्व कारणे तशी गंभीर आहेत. त्यांचे निदानही डॉक्टरकडून होणे आवश्यक आहे. पण रक्तस्रावावरून कारणाचा अंदाज बांधून संबंधित स्त्रीला समजावून सांगणे आवश्यक आहे. पुढच्या उपचारांची थोडीशी कल्पना त्यावरून देता येईल.
अंगावरून रक्तस्राव : गर्भाशय शस्त्रक्रियेऐवजी पर्यायी उपचार
गर्भपिशवी काढण्याची शस्त्रक्रिया खूप केली जात असली तरी याला बरेच चांगले पर्याय आहेत. शस्त्रक्रिया ही एक मोठी बाब आहे. आरोग्य, खर्च व नंतरचा त्रास या तिन्ही दृष्टिकोनातून ती शक्यतोवर टाळलेली बरी. गेल्या दशकात यासाठी विविध पर्याय उपलब्ध झालेले आहेत.
लेझरने (दूर्बीणीच्या सहाय्याने) गर्भाशयातील आतील आवरण जाळणे.
अंगावरून तांबडे जाणे (स्त्रियांच्या अंगावरून रक्तस्राव) (तक्ता (Table) पहा)
स्त्री व पुरुष जननसंस्थांमध्ये खूप फरक आहे. पुरुष जननसंस्था मुख्यतः शरीराच्या बाहेर तर स्त्रीमध्ये ती शरीराच्या आत असते. त्यामुळे स्त्रीजननसंस्थेची तपासणी ‘आतून’ करावी लागते.
योनी, गर्भाशय व बीजांडकोश हे जननसंस्थेचे मुख्य भाग आहेत. तपासणी करताना दोन पध्दती वापरतात.
धातूच्या एका उघडमिट करू शकणा-या नळीने (योनिदर्शक) योनीची व गर्भाशयाची पाहणी करता येते.
योनिमार्गाच्या आतल्या त्वचेचा दाह होत असल्यास ती लालसर दिसते व पांढरट पदार्थ दिसतो. हा पांढरा पदार्थ अंगावरून जात असला, की आपण त्याला ‘पांढरे जाणे’ असे म्हणतो. यातही दोन प्रकार आहेत. एक म्हणजे चिकट दह्यासारखा घट्ट पदार्थ जाणे. हा एक प्रकारच्या बुरशीमुळे येतो. दुसरा प्रकार म्हणजे पांढरा द्रवपदार्थ जाणे. याची बरीच कारणे आहेत. (पाहा : योनिदाह).
गर्भपिशवीचे तोंड पाहताना त्याचे छिद्र व सभोवतालची त्वचा पाहावी. जिला अद्याप मूल झालेले नाही अशा स्त्रीच्या पिशवीच्या तोंडाचे छिद्र लहान व गोलसर असते. बाळंतपणामुळे हे छिद्र थोडे मोठे व चपटे होते. छिद्राभोवतालची त्वचा व आवरण निरोगी असेल तर गुळगुळीत व स्वच्छ दिसते. नाहीतर ते खरबरीत व लालसर दिसते.
योनिदर्शक तपासणीनंतर डॉक्टर हाताच्या दोन बोटांनी (रबरी हातमोजा घालून) तपासतात. या बोटांनी व पोटावर ठेवलेल्या दुस-या मोकळया हातामध्ये गर्भाशयाचा आकार, दिशा-ठेवण, इत्यादी तपासता येते. याचबरोबर गर्भाशयास सूज किंवा दुखरेपणा आहे काय, बीजांडकोश व्यवस्थित आहेत की दुखतात, इत्यादी बाबी कळतात.
गर्भाशयाचा आकार पाहून गर्भ आहे का व असल्यास किती आठवडयांचा आहे हे ठरवता येते. पाळी चुकल्यानंतर गर्भ असेल तर एक-दोन आठवडयांतच गर्भाशय मोठे होऊ लागते. गरोदरपणात गर्भाशयाचे तोंड मऊ पडायला लागते.
ओटीपोटात गर्भाशयाची ठेवण तीन प्रकारची असते. हे तीन प्रकार म्हणजे गर्भाशय पुढे झुकलेले, मागे झुकलेले किंवा मधोमध असे असतात. पिशवी मागे झुकलेली असेल तर काही स्त्रियांमध्ये ओटीपोटात दुखण्याचीही तक्रार आढळते.
आतून तपासणी करताना शक्यतोवर पाळीचे दिवस टाळावे. तसेच तपासणीआधी लघवी केली नसल्यास तपासणी नीट होत नाही; कारण गर्भाशय हे भरलेल्या मूत्राशयामागे झाकले जाते.
तपासणीत सर्वसाधारणपणे योनिमार्गाच्या भिंती व पिशवीचे तोंड हे सर्व आत खेचलेल्या अवस्थेत असतात. वारंवार झालेल्या बाळंतपणानंतर किंवा उतारवयात हे खेचून धरणारे स्नायू सैल पडून या भिंतीही सैल होतात. योनिमार्गाशीच लघवीचा मार्गही संबंधित असल्याने अशा वेळी लघवी थोडी थोडी व हळूहळू होते. तसेच सैलपणा फार झाला तर पिशवीचे तोंड किंवा पूर्ण गर्भाशय बाहेर पडते. यालाच आपण ‘अंग बाहेर पडणे’ असे म्हणतो.
जननसंस्थेची गरोदरपणातली तपासणी हा एक वेगळा विषय म्हणून या पुस्तकात अन्य ठिकाणी घेतला आहे.
स्तनांची वाढ पाळी सुरू होण्याच्या (न्हाण येणे, वयात येणे) वयात सुरू होते व गर्भधारणेनंतर चांगलीच वाढ होते. ही वाढ स्त्रियांच्या शरीरातील हार्मोन्समुळे (अंतःस्रावामुळे) होते. प्रसूतीनंतर बाळाच्या पोषणासाठी ही तयारी चाललेली असते. मूल अंगावर पीत असताना साधारण दीड वर्ष होईपर्यंत हा वाढलेला आकार राहतो व मग कमी होतो. अंगावर पाजल्यानंतर हळूहळू स्तन सैल होतात व थोडेफार लोंबतात. अंगावर पाजण्याच्या काळात ब-याच वेळा दुधाच्या (निचरा न झाल्यास) गाठी तयार होतात व नंतर त्यात पू होतो. अशा स्तनात ताण, दुखरेपणा, गरमपणा वगैरे चिन्हे दिसून येतात. कधी ही गाठ फुटते व पू बाहेर पडतो. पू झाला असेल तर काखेतल्या गाठी सुजतात. हे गळू शस्त्रक्रियेने फोडून पूर्ण निचरा करणे चांगले.
हाताने दोन्ही स्तन चाचपून पाहिले तर सगळीकडे सारखाच मऊपणा आढळतो. घट्ट किंवा कठीण गाठी लागल्या तर मात्र लगेच तज्ज्ञाकडून तपासून घेतले पाहिजे. कदाचित कर्करोग असू शकेल. विशेषतः चाळीशीनंतर स्तनांची तपासणी वारंवार करावी हे चांगले. गाठ असेल तर वेळीच तपासून घ्यावे.
स्तन तपासताना बोंड व भोवतालची लालसर काळी त्वचाही तपासावी. मूल अंगावर पीत असताना त्याला दुखरेपणा, जखम असू शकते.