Disease Science Icon रोगशास्त्र खास तपासण्या
समूह रोगशास्त्र

बर्ड फ्लू, किंवा डेंगू आजारासंबंधी आपण वाचले असेलच. एखाद्या लोकसमूहाच्या संदर्भात एखाद्या आजाराचा अभ्यास करणे याला ‘समूहरोगशास्त्र’ म्हणता येईल. आजारांच्या संशोधनात हे अगदी महत्त्वाचे साधन आहे. प्रत्येक रोगाचे संपूर्ण चित्र माहीत व्हायचे असेल तर समूहरोगशास्त्राच्या अंगाने अभ्यास करावा लागतो. आपण साधे हिवतापाचे उदाहरण घेऊ या. यातही आपण फक्त मलेरियात कोणकोणती लक्षणे येऊ शकतात असे प्रश्न धरून माहिती काढू या. यासाठी आपल्याला एखाद्या लोकसमूहातल्या (उदा. एका गावातल्या) किती लोकांना मलेरिया झाला आहे हे आधी काढावे लागेल. रक्तनमुन्यात हिवतापाचे जंतू सापडणे ही मलेरियाची मुख्य खूण मानू या. अशा सर्व लोकांमध्ये कोणकोणती लक्षणे दिसतात किंवा दिसत नाहीत याची पहाणी करावी लागेल. यानुसार काही लोकांना कसलाच त्रास नाही, तर काहींना थंडीताप, तर काहींना नुसता ताप- कणकण, लहान मुलांमध्ये ताप, खोकला, इत्यादींपैकी काहीही लक्षणे दिसतील. यावरून मलेरियाच्या लक्षणांचे बरेच खरे चित्र आपण काढू शकतो. केवळ एका रुग्णावरून आपल्याला ही माहिती झाली नसती. वैद्यकीय पुस्तकात दिलेली विस्तृत माहिती या पध्दतीने तयार झालेली असते. आपण आपल्या रोगनिदान तक्त्यातल्या लक्षणांचे चित्र अशाच पध्दतीने मांडले आहे.

समूहरोगशास्त्रात पाच प्रश्नांची उत्तरे शोधायची असतात. लोकसमूहात रोग (1) कोणाला होतो, (2) कधी होतो, (3) कोठे होतो, (4) कसा व का होतो आणि, (5) यावर काय करायचे. हे ते पाच प्रश्न. पहिल्या तीन प्रश्नांवरून (कोणाला, कधी व कोठे आजार होतो) थोडेफार वर्णनात्मक ज्ञान होते. रोग का होतो व मग त्यावर काय केले पाहिजे या दोन प्रश्नांना ‘शोधक समूहरोगशास्त्र’ म्हणता येईल. यावरून आपल्याला रोगांच्या कारणांचा आणि उपायांचा शोध करता येतो.

हल्ली समूहरोगशास्त्रात केवळ रोगांचा अभ्यास नसून कोठल्याही आरोग्यविषयक प्रश्नाचा अभ्यासही केला जातो. उदा. शाळेतील मुलांच्या वजन-उंचीचे प्रमाण, वाढीचे प्रमाण, इत्यादी माहितीसाठी या शास्त्राचा उपयोग होईल. एखाद्या औषधाचा उपयोग होत आहे की नाही हे शोधण्यासाठीही त्याचा उपयोग होतो.

समूहरोगशास्त्रात अनेक प्रकारची नवनवीन तंत्रे निघाली आहेत. आपल्याला स्वतः शिकताना यातील काही साधे ठोकताळे वापरता येतील. उदा. जखमांवर एखाद्या वनस्पतीचा किती प्रमाणात उपयोग होतो ह्याबद्दल आपण काही अंदाज बांधू शकतो. समजा आपण जखमांसाठी येणा-या रुग्णांचे नीट वर्गीकरण केले आणि कोरफडीचा वापर केला. यातून नेमक्या कोठल्या जखमा त्याने ब-या होतील किती दिवसांत ब-या होतील, कोणत्या जखमा ब-या होत नाहीत, इत्यादी गोष्टी कळतील. एवढे कळल्यावर निदान आपण कोरफड कोठल्याही जखमेवर चालते असे म्हणणार नाही. असा अभ्यास केल्यावरच आपल्या विचारांत शास्त्रीयता येत जाईल.

दुसरे उदाहरण साथरोगांच्या अभ्यासाचे आहे. साथी कशा पसरतात व काय उपाययोजना करायला पाहिजे याचे उत्तर समूहरोगशास्त्रातून शोधता येते.

रुग्णनोंदी

आरोग्यासाठी आपण जे काम करणार आहोत त्यातूनच आपल्याला समूहरोगशास्त्राचा एक साधा अभ्यासही करता येईल या प्रकरणाच्या शेवटी दिलेला तक्ता पाहून घ्या. वर्षभर येणा-या रुग्णांच्या नोंदी यात करीत गेल्यावर वर्षाच्या शेवटी पुष्कळ माहिती जमा होईल. या तक्त्यावरून येणा-या रुग्णात तापाचे किती, खोकल्याचे किती अशी रुग्णांची आकडेवारी तयार होईल. गावातले सगळेच रुग्ण आधी तुमच्याकडे येऊन मग गरजेप्रमाणे इकडे-तिकडे उपचारासाठी जातात. या माहितीवरून संपूर्ण गावाचे आजाराचे वर्षभराचे चित्र तयार होईल. वेगवेगळया आजारांचे प्रमाण यावरुन जसे कळेल तसे महिनावार बदलते प्रमाणही लक्षात येईल. या माहितीचा तुम्हाला आरोग्य नियोजनासाठी खालीलप्रमाणे उपयोग होईल.

  • कोणत्या आजारासाठी कोणती औषधे किती प्रमाणात लागतील याचाही चांगला अंदाज बांधता येईल.
  • एकूण किती रुग्ण पुढील उपचारांसाठी पाठवायला लागतात ते कळेल.
  • कोणत्या आजारांच्या बाबतीत अशी अडचण येते हेही यावरुन कळेल.
  • प्रत्येक महिन्यातल्या आजारांचे वैशिष्टय लक्षात आल्यावर त्यांच्या कारणांचाही काही प्रमाणात अंदाज लागेल. उदा. पावसाबरोबर येणारे आजार, थंडीबरोबर येणारे आजार, जास्तीत जास्त बाळंतपणांचा महिना, इत्यादी माहिती स्पष्ट होईल.
  • या सर्व माहितीवरुन प्रशिक्षणात आवश्यक ते बदल करता येतील. नोंदी ठेवण्याच्या साध्या पध्दतीमुळे इतके ज्ञान आपल्याला होऊ शकते.
सार्वजनिक आरोग्य प्रयोगशाळा (पब्लिक हेल्थ लॅबोरेटरी)

सार्वजनिक आरोग्यासाठी सुसज्ज प्रयोगशाळा लागते. महाराष्ट्रात 1960 साली पुणे येथील पब्लिक हेल्थ लॅबोरेटरी जागतिक आरोग्य संघटनेने मान्य केली, आज ही प्रयोगशाळा राज्याची मुख्य सार्वजनिक आरोग्य प्रयोगशाळा म्हणून काम करत आहे. याशिवाय नागपूर आणि औरंगाबाद येथेही अशा प्रयोगशाळा आहेत. या सर्व प्रयोगशाळांमधून अन्न, पिण्याचे पाणी, सांडपाणी, मलमूत्र हे नमुने साथ रोगांसाठी किंवा आरोग्याच्या दृष्टीने तपासले जातात. सध्या महाराष्ट्रात 11 ठिकाणी सार्वजनिक आरोग्यप्रयोगशाळा आहेत. यात पुणे (मुख्य), औरंगाबाद, नागपूर, अमरावती, कोल्हापूर, सोलापूर, जळगाव, सांगली, नाशिक, नांदेड आणि कोकणभवन (नवी मुंबई) येथे या प्रयोगशाळा आहेत. याशिवाय जिल्हा आरोग्य प्रयोगशाळा अहमदनगर, सातारा, ठाणे, जालना, बीड आणि गडचिरोली येथे उपलब्ध आहेत. या सर्व प्रयोगशाळांमध्ये अन्नभेसळ कायदा अंमलबजावणीसाठी नमुने तपासण्याची सोय आहे. महाराष्ट्रात 1980 ते 90 या काळात पाणी आणि स्वच्छता दशक राबवले गेले. या काळात उरलेल्या 19 जिल्ह्यांमध्ये पाणी नमुने तपासण्यासाठी आरोग्य प्रयोगशाळा सुरु झाल्या आहेत. याप्रमाणे आता महाराष्ट्रात जिल्हावार 30 आरोग्य प्रयोगशाळा आहेत.

आता पुणे येथे मध्यवर्ती अन्न प्रयोगशाळा पण स्थापित झाली आहे. यामध्ये अन्नभेसळीसाठी जप्त केलेले नमुने तपासण्याचे अधिकृत काम चालते. याशिवाय अन्नभेसळ प्रतिबंधासाठी निरनिराळी मानके तयार करण्याचे कामही या प्रयोगशाळेत चालते. महाराष्ट्रात 1974 साली जलप्रदूषण नियंत्रक कायदा झालेला आहे. या आधी 1954 साली अन्नभेसळ प्रतिबंधक कायदाही झालेला आहे. या दोन्ही कायद्यांच्या अंमलबजावणीसाठी या प्रयोगशाळा काम करीत असतात.

पाणी आणि इतर तपासणी
  • यामध्ये पाण्याची विविध बाबतीत तपासणी केली जाते. यात जिवाणू तपासणी, आणि रासायनिक तपासणी या दोन मुख्य तपासण्या केल्या जातात.
  • पाणी शुध्दीकरणासाठी वापरलेल्या रासायनिक औषधांचा दर्जा तपासण्याचे कामही या प्रयोगशाळांमध्ये होते.
  • ग्रामीण आणि शहरी भागात पिण्याच्या पाण्याचे निरनिराळे नमुने घेऊन त्यांचे नियमित सर्व्हेक्षण करण्यासाठी या प्रयोगशाळांचा उपयोग होतो.
  • जलप्रदुषणामुळे निर्माण होणा-या साथींच्या नियंत्रणासाठी या प्रयोगशाळांमधून भरारी पथके पाठवली जातात.
  • साथीच्या काळात संशयित रुग्णांचे मलमूत्र नमुने, रक्त, उलटीतल्या पदार्थांचे नमुने या प्रयोगशाळांमध्ये आणले जातात.

यासाठी या प्रयोगशाळांमध्ये अन्न,पाणी (रासायनिक), पाणी (जिवाणू तपासणी) असे तीन विभाग असतात.

साथीचा फ्लू : तथ्ये आणि पथ्ये

स्वाईन फ्लू च्या सध्याच्या साथीला ‘साथीचा फ्लू’ म्हणणे जास्त सयुक्तिक ठरेल, कारण स्वाईन म्हणजे डुकराशी याचा केवळ सुरुवातीचा संबंध आहे. या विषाणूत मानवी फ्लू, बर्ड फ्लू आणि डुकराचा फ्लू हया तिनही विषाणूंचे भाग समाविष्ट आहेत. हा विषाणू रुग्णाच्या श्वासातून व संपर्कातून पसरतो. रुग्णाने वापरलेल्या वस्तू किंवा त्याच्या खोलीतल्या वस्तू यावर काही तास हा जिवंत राहू शकतो. म्हणूनच या वस्तू जंतूनाशक द्रवाच्या फडक्याने पुसून घेणे आवश्यक असते. हा फ्लूचा विषाणू सतत संक्रमणशील म्हणून वैद्यकीय संशोधकांमध्ये प्रसिध्द आहे. याचे नवनवे अवतार जगात साथी पसरवू शकतात. परंतु तसे पाहता फ्लू हा सर्दीतापाचा किरकोळ आजार म्हणून सर्वत्र आढळतो. प्रस्तुत साथीचा फ्लू हाही मूळात एक सौम्य आणि बहुश: अ-घातक आजार आहे. जागतिक स्तरावर नोंदलेल्या एकूण रुग्णांपैकी झालेले मृत्यू पाहता याचा मृत्यूदर हजारी 6 इतका पडतो. परंतु याचे न नोंदलेले असंख्य रुग्ण असतात. म्हणूनच हा मृत्यूदर हजारी एक इतपतही कमी असू शकतो. डेंग्यू, मलेरिया, प्लेग हे यापेक्षा क्रमश: जास्त घातक आहेत. फक्त या साथीच्या फ्लू चा प्रसार जास्त थेट आणि वेगवान असल्याने एकूण संसर्गाचा धोका जास्त असतो. दुसरा घातक मुद्दा असा की लागण झालेल्या फ्लू च्या रुग्णांपैकी क्वचित काही जणांमध्ये हा विषाणू वेगाने श्वसनसंस्था, हृदय आणि मेंदू यावर अक्षरश: हल्ला चढवू शकतो. हे दोन मुद्दे अनुक्रमे साथ आणि मृत्यू यांना कारणीभूत ठरतात. या आजाराचा रुग्ण आजाराच्या आधी एक दिवसापासून ते रोग बरा झाल्यावरही सात दिवसांपर्यंत संसर्ग पसरवू शकतो. सुदैवाने या आजारावर परिणामकारक औषध आहे.

प्राथमिक आरोग्य शास्त्राच्या दृष्टीने आणि जागतिक आरोग्य संघटनेच्या मार्गदर्शक तत्वानुसार या आजारावर काही सूचना देता येतील. एकतर सर्दी, ताप, खोकला असलेला प्रत्येकजण साथीच्या फ्लू चा रुग्ण असेलच असे नाही. साथरोग शास्त्रानुसार या रुग्णांचे तीन प्रकार सांगता येतील. यापैकी ‘संशयित रुग्ण’ म्हणजे अशी लक्षणे असलेला रुग्ण पूर्वी रोगनिश्चित रुग्णाच्या संपर्कात असल्यास किंवा बाधित गावांमध्ये गेल्या सात दिवसांत प्रवास करून आलेला रुग्ण. यापेक्षा ‘संभाव्य रुग्ण’ म्हणजे अशी लक्षणे असून तपासण्यांमध्ये फ्लू चा ए विषाणू आहे. पण एच 1 एन 1 नाही असा रुग्ण. तसेच सादृश आजाराने मृत झालेली व्यक्ती ही संभाव्य रुग्ण धरली जाते. मात्र ‘रोगनिश्चित रुग्ण’ म्हणजे अशी लक्षणे असून रक्त, घसा- नमुना यापैकी एका तरी टेस्टमध्ये विशिष्ट विषाणू आढळलेला रुग्ण असतो. या आजारावर साथरोग शास्त्राच्या दृष्टीने उपाययोजना करताना या तीन प्रकारांसाठी क्रमश: वेगळे व्यवस्थापन करावे लागते. संशयित रुग्णांनी घरी थांबून साधे पॅरासिटामॉलचे औषध किंवा काढे घेतले तरी पुरते. एक आठवडयात 99% व्यक्तीत हा साधा आजार पूर्ण बरा होऊ शकतो. आपला आजार इतरांना पसरू नये म्हणून शक्यतो वेगळी खोली, तोंडावर फडके बांधणे, वापरलेल्या वस्तू निर्जंतुक करणे वगैरे प्राथमिक काळजी आजार त्या व्यक्तिपुरता मर्यादित ठेवायला पुरेशी आहे. आता दुसरा प्रकार म्हणजे संभाव्य रुग्णांना टॅमीफ्लू हे विषाणू रोधक औषध द्यावे की नाही याच्याबद्दल थोडे मतभेद आहेत. माझ्या मते संभाव्य रुग्णांना हे औषध पाच दिवस देऊन विषाणू बाधा आटोक्यात ठेवणे योग्य ठरेल. रोगनिश्चित रुग्णांना मात्र टॅमीफ्लूचे उपचार अर्थातच करावे लागतात.

टॅमीफ्लू हे औषध सध्या शासकीय रुग्णालयातच मिळू शकते. त्यामुळे त्याचा गैरवापर जरी टळला असला तरी असे प्रभावी हत्यार तुलनेने मोठया खाजगी क्षेत्रात उपलब्ध नसणे ही चुकीची रणनीती ठरू शकेल. टॅमीफ्लू बद्दल देखील काही वाद आहेत. ते पुरेसे परिणामकारक नाही इथपासून त्याची रिऍक्शन व मानसिक दुष्परिणाम होऊ शकतात असे काही जणांचे म्हणणे आहे. जागतिक आरोग्य संघटनेने मात्र टॅमीफ्लू हेच औषध वापरावे असे म्हटले आहे.
जास्त रुग्ण संपर्कात असलेल्या व्यक्ती म्हणजे ओपीडी सांभाळणारे डॉक्टर्स, परिचारिका आणि इतर रुग्णसेवक या मंडळींना संसर्गाचा कितीतरी जास्त धोका असतो. अशा सगळयांनी ओपीडी चालवतानाही मास्क किंवा तिपदरी फडके वापरलेच पाहिजे. शिवाय आपल्या रुग्णांनाही दवाखान्यात निदान पदर/हातरुमाल/ओढणी याची घडी करून नाकातोंडावर धरायला सांगितले पाहिजे. मास्कचा मुख्य उद्देश म्हणजे, आपल्या श्वासाचा फवारा हवेत उडू नये तसेच इतरांचे विषाणू आपल्या शरीरात प्रवेश करणार नाही यासाठी फडक्याचा अडसर तयार करणे. मात्र सामान्य जनतेने तसेच शाळा कॉलेजेस आणि सार्वजनिक ठिकाणी सरसकट मास्क वापरणे आवश्यक नाही. निदान ते महागामोलाने विकत घेण्याची काहीच आवश्यकता नाही. हल्ली स्कूटरवर मुली वापरतात असे रुमाल पुरेसे आहेत. डॉक्टरांनी आणि रुग्णांनी मास्क दर सहा तासांनी बदलावेत आणि वापरताना मध्येच काढावे लागल्यास परत घालताना तीच बाजू आत राहील अशी दक्षता घ्यावी. अमूकच मास्क विकत घेतला पाहिजे अशी आवश्यकता नाही. आमच्या रुग्णालयात आम्ही सरळ खादीचे दुपदरी मास्क करून घेतले आहेत. कापडासहित त्याची किंमत फक्त 9 रू. प्रतिमास्क एवढी झाली.

रुग्णसेवेत असलेल्यांनी हात वारंवार स्वच्छ धुणे आवश्यक आहे. याने विषाणूप्रसार कमी होतो. जागतिक आरोग्य संघटनेकडून उपलबध्द माहितीनुसार टॅमीफ्लू हे औषध रोगप्रतिबंधक म्हणून देखील उपयुक्त आहे. माझ्या मते साथीच्या विभागात/जिल्ह्यात ओपीडी आणि विशेष फ्लू कक्ष चालवणा-या सर्व रुग्ण सेवकांना टॅमीफ्लू हे प्रतिबंधक (रोज एक गोळी) द्यावयास हरकत नाही. याने रुग्णसेवा जास्त सुरक्षित होईल. हे प्रतिबंधक उपचार रुग्णाच्या संपर्कातल्या व्यक्तींनापण द्यावे लागतात. तथापि हे सगळे करायचे तर गोळयांचा पुरवठा वाढवावा लागेल. एकूणच आज तरी टॅमीफ्लू हे एकमेव हत्यार आपल्याकडे आहे आणि ते वापरण्याशिवाय गत्यंतर नाही. उपचार आणि प्रतिबंध या दोन्हीसाठी त्याचा उपयोग होतो. या तत्त्वानुसार 80%वैद्यकीय सेवा खाजगी क्षेत्रात असताना टॅमीफ्लू पासून त्यांना वंचित ठेवणे हे चूक ठरू शकते. आयुर्वेद व होमिओपथी यापैकी योग्य उपचार करायला काहीच हरकत नाही. होमिओपथी ही व्यक्तीविशिष्ट असली तरी हानेमानच्या काळापासून साथींमध्ये उपयुक्त ठरलेली आहे. याबद्दल त्या त्या संघटनांनी काटेकोरपणे काही मार्गदर्शक सूचना करायला हव्यात.

शाळा – कॉलेजेस बंद ठेवणे हा उपाय मेक्सिकोत प्रभावी ठरला असला तरी जागतिक आरोग्य संघटनेने हा उपाय उचलून धरलेला नाही. फक्त आजारी मुलांना दाखला न मागता घरी राहू देणे आणि त्यासाठी पालकांचे प्रबोधन करणे एवढे पुरेसे आहे. अधिक खबरदारी म्हणून शाळेत मुलांची सुरक्षितपणे तापमान तपासणी करणे उपयुक्त ठरू शकेल. असे असले तरी शेवटी साथ फैलावण्याची चिन्हे असल्यास शाळा-कॉलेजेस बंद ठेवण्याचा निर्णय घेणे चुकीचे नाही.
या आजारात सर्दी, ताप खोकला हे सामान्य लक्षणचित्र असले तरी रुग्ण यामुळे दगावत नाही. या आजारातून क्वचित न्यूमोनिया हृदयसूज, मेंदूसूज वगैरे घातक आजार उद्भवतात व त्याने रुग्ण दगावू शकतो. अशा गुंतागुंतीच्या किंवा अत्यवस्थ रुग्णाचे व्यवस्थापन फक्त स्वतंत्र आणि सुसज्ज रुग्णालयांमध्येच होऊ शकते. तांत्रिक दृष्टया हे टोकाचे आजार म्हणजे खिंडीतली लढाई असते. वैद्यकशास्त्र त्याबद्दल कोणतीही ग्वाही देऊ शकत नाही. म्हणूनच कोणीही मरणारच नाही अशी अपेक्षा बाळगणे अवास्तव आहे. अशा रुग्णालयांमध्ये अत्यंत सुरक्षित परिचर्या आणि रोगजंतूनाशन करावे लागते.

चांगली गोष्ट अशी की साथरोग शास्त्राच्या दृष्टीने असा वेगवान आजार तितक्याच वेगाने उतरणीला लागतो. याला शास्त्रीय कारण आहे. कोठल्याही आजाराचे जंतू त्या समाजातील सर्वांना बाधू शकत नाहीत कारण प्रत्येकाची रोगविशिष्ट प्रतिकारक्षमता वेगवेगळी असते. म्हणूनच निवडक लोकांना तो आजार होतो आणि या साथीच्या फ्लू बाबतीतही हे खरे आहे. संसर्गित लोकांपैकी बहुतेक लोक पहिल्या हल्ल्यातून सावरतात व 5-6 महिने प्रतिकार शक्ती बाळगतात. म्हणजे समाजातल्या कमी प्रतिकार शक्तीच्या व्यक्ती सुरुवातीच्या काळात आजार पकडतात आणि नंतर सक्षम होतात. (काही थोडके मृत्यू पावतात) यानंतर मात्र जवळ जवळ सर्वच लोकांमध्ये पुरेशी प्रतिकारशक्ती असल्याने जंतूंना मुक्काम करायला जागा उरत नाही. यामुळे साथ आटोक्यात येते आणि ओसरते. गेल्या एक दोन दशकातल्या सार्स, बर्ड फ्लू, प्लेग या सर्वच बाबतीत हे खरे ठरले आहे. याशिवाय आता आपल्याकडे हत्यार म्हणून औषधही आहे. मानव जातीने मोठया साथी व आता महामा-यांचा टप्पा कधीच ओलांडला आहे. तरीही योग्य त्या उपाययोजना करणे आवश्यक आहेच.

या विषाणूंविरुध्द लसीची तयारी चालू असली तरी हे विषाणू सतत संक्रमणशील असल्याने लसीचा नेमका प्रभाव आज सांगता येणार नाही. शिवाय तोपर्यंत ही साथ आटोक्यातही आली असेल. सार्वजनिक आरोग्याच्या दृष्टीने भारतातली परिस्थिती विदारक आहे हे सांगायला नको. उघडयावर विष्ठा विसर्जन, डुकरे, गायींचे कळप, रस्त्यावर शेणसडा, पचापचा थुंकणे, कचरा, वस्तू जागोजाग टाकून देणे वगैरे घातक गोष्टी स्वातंत्र्यानंतर आजही तेवढयाच जोमाने चालू आहेत. यामुळे कधी फ्लू येईल तर कधी प्लेग, तर कधी जुलाब उलटया. उपलब्ध माहितीनुसार ही अस्वच्छता भारतातल्या कुपोषणाचे महत्त्वाचे पूरक कारण आहे. मुंबई सारख्या महानगरातली प्रचंड गर्दी आणि लोकलमध्ये केवळ श्वास चालतो इतकी घुसमट असताना कोणतेही आजार पसरणार नाहीत असे म्हणणे धाडसाचे होईल.

 

डॉ. शाम अष्टेकर २१, चेरी हिल सोसायटी, पाईपलाईन रोड, आनंदवल्ली, गंगापूर रोड, नाशिक ४२२ ०१३. महाराष्ट्र, भारत

message-icon shyamashtekar@yahoo.com     ashtekar.shyam@gmail.com     bharatswasthya@gmail.com

© 2017 arogyavidya.net | All Rights Reserved.