respiratory icon श्वसनसंस्थेचे काही गंभीर आजार श्वसनसंस्थेचे नेहमीचे आजार
श्वसनसंस्थेचे काही गंभीर आजार
न्यूमोनिया

न्यूमोनिया म्हणजे ‘फुप्फुसाची सूज’ (क्षयरोगाची सूज दीर्घ मुदतीची असते.) न्यूमोनिया हा अचानक येणारा अल्पमुदतीचा तीव्र आजार आहे. उपचार न केल्यास मृत्यू येऊ शकतो. न्यूमोनिया हा सूक्ष्मजंतूंमुळे होणारा आजार आहे. हा आजार कोणत्याही वयांत येऊ शकतो.

पाच वर्षाखालील मुलांमध्ये न्यूमोनियाचे प्रमाण जास्त आढळते. भारतामध्ये बरीच मुले या आजाराने दगावतात. (लहान मुलांच्या प्रकरणात याबद्दल जास्त माहिती दिली आहे.) अंथरुणाला खिळलेल्या वृध्द माणसांनाही किंवा मोठया शस्त्रक्रियेनंतर न्यूमोनिया होण्याची शक्यता असते.

लक्षणे व निदान

सतत जास्त ताप, खोकला, छातीत दुखणे, दम लागणे ही या आजाराची प्रमुख लक्षणे आहेत.

पाच वर्षाखालील मुलांमध्ये दर मिनिटास 50 पेक्षा जास्त वेगाने श्वास चालत असल्यास (धाप) व बरोबर ताप असल्यास न्यूमोनियाची दाट शक्यता असते. न्यूमोनियाचे निदान सोपे आहे. वेळीच उपचार झाल्यास प्राण वाचू शकतील. रडणा-या लहान मुलांना आवाजनळीने तपासणे अवघड असते. यातून चुकीचा समज होऊ शकतो. मुलांच्या रडण्याचा आवाज व श्वसनाचा आवाज वेगळा काढणे फार अवघड असते. ताप व श्वसनाचा वेग एवढयावरून मुलांमध्ये निदान करता येते.

मुलांच्या तपासणीत ताप व श्वसनाचा वेग तपासणे आवश्यक आहे. यापुढील वयातल्या रुग्णांच्या छातीवर बोटाने ठोकून पाहिल्यास फुप्फुसाच्या सुजलेल्या भागावर ‘ठक्क’ असा आवाज येईल. आवाजनळीने त्या भागात बारीक बुडबुडयांचा आवाज येतो. अशा व्यक्तीला छातीत दुखत असल्यास त्या जागी या खुणा आढळतात.

उपचार

मोठया माणसांना 5 दिवस तोंडाने ऍंमॉक्सी किंवा कोझाल दिल्यास आजार बरा होऊ शकेल. न्यूमोनिया आढळल्यास उपचार चालू करून मग तज्ज्ञाकडे पाठवावे. यामुळे उपचार लवकरात लवकर होऊन आजाराची तीव्रता कमी होईल.

मुलांचा न्यूमोनिया हा आजार स्वतंत्र प्रकरणात दिला आहे. इतर वयात न्यूमोनियाचे जंतू अनेक प्रकारचे असतात व काही प्रकार जास्त घातक असतात. त्यामुळे शक्यतो तज्ज्ञांकडून उपचार होणे आवश्यक आहे. जंतुविरोधी औषधांबरोबरच पॅमाल, ऍस्पिरिन, विश्रांती व हलका आहार द्यावा.

दम लागणे (श्वास लागणे) (तक्ता (Table) पहा)

होमिओपथी निवड

हेपार सल्फ, लॅकेसिस, मर्क्युरी सॉल, नेट्रम मूर, नक्स व्होमिका, फॉस्फोरस, पल्सेटिला, सिलिशिया

घोळणा फुटणे

burst nose bloodउन्हातून आल्यावर काही लहान मुलांमध्ये नाकातून रक्तस्राव होतो. याला घोळणा फुटणे असे म्हणतात. यात नाकाच्या पुढच्या भागातल्या नाजूक रक्तवाहिन्या (केशवाहिन्यांचे जाळे) उष्णतेने फुगून फुटतात व रक्त येते.

काही वेळा अतिरक्तदाब किंवा रक्ताच्या कर्करोगात पण घोळणा फुटतो. म्हणून वारंवार असा त्रास होत असल्यास तज्ज्ञास दाखवावे.

प्रथमोपचार

रक्तस्त्राव सुरु असताना जास्त हालचाल न करता बसून रहावे. डोके पुढे झुकलेले ठेवावे. म्हणजे रक्त गिळले जाणार नाही.

  • ऍड्रेनॅलिन स्प्रे उपलब्ध असल्यास नाकात एकदा फवारा मारावा. याने रक्तवाहिन्या आकसून रक्तस्राव थांबतो. वाटल्यास 5 मिनिटांनी परत एकदा मारावा. मात्र अतिरक्तदाबाच्या रुग्णांना हा उपचार करु नये.
  • नाकाचा पुढचा भाग हाताच्या बोटाने 2-5 मिनिटे दाबून धरावा. याने रक्तवाहिन्यांतून रक्त येणे बंद होते.
  • नाकाला व गालांना थंडगार पाणी किंवा बर्फ लावल्याने रक्तवाहिन्या आकुंचन पावून रक्तस्राव थांबायला मदत होते.
  • रक्तस्राव थांबल्यावर उशी घेऊन उताणे निजून राहावे.
आयुर्वेद

वारंवार घोळणा फुटण्यामागे योग्य ती सर्व तपासणी (तज्ज्ञाकडून) होऊन गंभीर कारण नसल्यास पुढील उपचार करा. पोटातून दीड-दोन चमचे अडुळसा रस व मध आणि गूळ (किंवा साखर) द्यावे. रक्तस्रावाच्या प्रवृत्तीला या उपायाने आळा बसतो.

 

डॉ. शाम अष्टेकर २१, चेरी हिल सोसायटी, पाईपलाईन रोड, आनंदवल्ली, गंगापूर रोड, नाशिक ४२२ ०१३. महाराष्ट्र, भारत

message-icon shyamashtekar@yahoo.com     ashtekar.shyam@gmail.com     bharatswasthya@gmail.com

© 2017 arogyavidya.net | All Rights Reserved.